संघ आणि भाजप हे बहुजन हिंदूहिताकडे दुर्लक्ष करत निव्वळ विघटनवादी आणि द्वेषात्मक गोष्टींना प्रोत्साहन देत आहेत, हे दिसत असताना राजकीय व्यासपीठावरून हिंदुत्ववादी हा शब्द देखील उच्चारायला काँग्रेस पक्षाचे पुढारी धजावत नव्हते. ते धारिष्ट्य राहुल गांधींनी अखेर दाखवले. त्याचे राजकीय, सामाजिक परिणाम दूरगामी असतील. उद्धवजी आणि राहुल यांनी हिंदुत्व व हिंदू धर्म काय आहे याची नव्याने केलेली मांडणी स्वागतार्ह आहे.
—-
मागील आठवड्यात दोन घटना अशा घडल्या की त्यामुळे या देशातील राजकारण विकासात्मक दिशेने न जाता नेहमीच्या भावनिक मुद्द्यांकडे झुकणार याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. पहिली घटना आहे काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांचे जयपूर येथील महागाईविरोधातील रॅलीसमोरील ‘हिंदूंचे राज्य’ आणायची घोषणा करणारे भाषण तर दुसरी घटना आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी येथील मंदिर व घाट परिसरांच्या नूतनीकरणाच्या निमित्ताने केलेली काशीची वारी आणि गंगेत घेतलेली डुबकी. उत्तर प्रदेश निवडणुकीत विकास, गरिबी, महागाई, महामारी हे सारे मुद्दे गौण ठरणार असतील, तर त्याइतकी दुर्दैवी गोष्ट त्या राज्यातील गरीब जनतेसाठी अजून काय असणार?
जयपूरमध्ये राहुल गांधी यांचा आवेश आणि भाषणातील प्रभावी मुद्दे पहाता राहुल यांना सतत हिणवणारे भाजपावाले यापुढे तरी तसे करण्याआधी दहावेळा विचार करतील, असे वाटते. हिंदू व्होटबँकेचा भाजपाचा किल्ला अभेद्य आहे आणि त्याला कधीच भगदाड पडू शकत नाही असे समजणार्या भाजपा आणि संघ यांच्या पायाखालची वाळूच सरकली असेल राहुल यांच्या भाषणाने. राहुल यांनी हिंदूंच्या कोणत्याही भावना न दुखावता संघ आणि भाजपच्या सध्याच्या हिंदुत्वावर सर्जिकल स्ट्राइक केला आहे. देशातील बहुसंख्य हिंदू हे सत्याचा आग्रह धरतात तर भाजपाचे हिंदुत्ववादी हे फक्त सत्तेचे लोभी आहेत, हे त्यांचे म्हणणे किती खरे आहे हे महाराष्ट्र आणि शिवसेना यांनी अनुभवलेले आहे. देशभरातील सत्तेची सगळी भांडी भरून वाहात असताना महाराष्ट्राचे पहिल्या अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद ज्यांना हिंदुत्वाच्या एकीपेक्षा मोठे वाटले ते भाजपाचे हिंदुत्व सत्तावादी हिंदुत्वच आहे. देशात आज हिंदूंचे सरकार नसून हिंदुत्ववाद्यांचे सरकार आहे आणि काँग्रेस पक्ष हाच हिंदूंचे राज्य आणणार आहे असे सांगताना राहुल यांनी महात्मा गांधी हिंदू होते तर त्यांचा खुनी नथुराम गोडसे हिंदुत्ववादी होता, अशी स्वच्छ, सुलभ फोड करून दाखवली. त्यानंतर हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यातील फरक समजावणार्या हजारो पोस्ट सोशल मीडियात फिरू लागल्या आणि त्या थोपवणे भाजपच्या आयटी सेलला देखील जमले नाही, हे राहुल यांचे यश. हा मुत्सद्दीपणा काँग्रेससाठी लगेच अच्छे दिन आणणार नाही, पण, त्यांनी थेट हिंदू व्होटबँकेला हात घालणे धाडसाचे आहे. त्यातून एक नवे राजकीय समीकरण आकाराला येऊ शकते. परंपरागत दलित आणि मुस्लिम व्होटबँक हल्ली एकगठ्ठा काँग्रेससोबत जात नाहीत. त्यामुळेच राहुल यांना हिंदू व्होटबँकेचे पाणी चाखायचा मोह टाळता आला नाही व आज तेच राजकीयदृष्ट्या शहाणपणाचे आहे. संघाचे हिंदुत्व हे गोडसेवादी आहे, म्हणजेच द्वेषात्मक, हिंसक आणि सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारे हिंदुत्व आहे असेच राहुल यांना सांगायचे आहे. भारतातील सर्वसामान्य हिंदू हा सत्याच्या मार्गाने जाणारा, इतर धर्माचा आदर करणारा सहिष्णु हिंदू आहे आणि आपण स्वतःदेखील असेच एक हिंदू आहोत, असे राहुल यांनी जाहीरपणे सांगितले. काँग्रेसच्या सेक्युलर विचारसरणीला पचायला जड जाणारेच त्यांचे हे भाषण होते. पण या भाषणातून सध्यातरी राहुल यांनी भाजपाची फार मोठी कोंडी केली आहे. भाजपाला यावर लगेच कोणतीच ठोस रणनीती आखता येणे कठीण दिसते. त्यामुळेच भाजपची सारी मदार आता फक्त मोदींच्या नाममहात्म्यावरच आहे. त्यामुळेच मोदींना संकटमोचक बाबा विश्वनाथांना साकडे घालावे लागलेले दिसते.
मोदी यांनी काशी येथे गंगेत घेतलेली डुबकी काही फार आश्चर्यचकित करणारी नव्हती. विकासगंगा कोरडी ठणठणीत असल्याने त्यांना गंगा नदीतच डुबकी घेणे भाग आहे. कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट बनवून दाखवण्यात त्यांचा हात कोणीच धरणार नाही. सोबतीला शेकडो कॅमेरे घेऊन मोदी सहस्त्रनामाचा जप करणारा पाळीव मीडिया सेवेशी तैनात असतोच. काशीचा विश्वनाथ कॉरीडोर हा प्रकल्प भाविकांसाठी खरोखर गरजेचा होता आणि तो पूर्णत्वास नेल्याबद्दल सरकारचे मनापासून अभिनंदन केले पाहिजे. पण जणू काही गेल्या तीनशे वर्षात हे मंदिर पूर्णपणे जीर्ण झाले होते आणि मोदींनी त्याचा जीर्णोद्धार करून थेट औरंगजेबाच्या अत्याचाराचा बदला घेतला, असा जो आभास निर्माण केला जात आहे तो वास्तववादी नाही. काशी विश्वनाथ मंदिराचा पहिला ज्ञात जीर्णोद्धार अकबर बादशहाच्या पदरी असलेल्या राजा तोडरमल यांनी केला आणि त्याला मुघल राजाची आडकाठी नव्हती, हा अकबर बादशहाचा इतिहास देखील सांगायला हवा. भाजपला सहिष्णु अकबराऐवजी दरवेळी औरंगजेब का आठवतो? संपूर्णपणे पडीक अवस्थेतून बाहेर काढून काशी विश्वनाथ मंदिराचा भव्य असा दुसरा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यामुळेच शक्य झाला होता. मोदींना या प्रसंगी राजा तोडरमल अथवा अहिल्याबाई होळकर यांची आठवण न येता औरंगजेबाच्या आठवणीने उचक्या का लागाव्यात?
कोणताही विचार, मग तो गांधींचा असो, आंबेडकरांचा असो, मार्क्सवाद असो अथवा हिंदुत्ववाद असो- तो प्रवाही आणि चांगल्या बदलासाठी पूरक असला पाहिजे. आजच्या खायच्या अन्नाला उद्या लगेच बुरशी धरते आणि मग ते अन्न आपण खात नाही. समाजातील विचार देखील काल व स्थल यानुसार बुरसटतात आणि ते जनतेच्या पचनी पडत नाहीत. विचारधारा या शब्दातच प्रवाहीपणा अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील ठाकरे घराण्यातील तीन पिढ्यांनी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार केला पण, तो प्रवाही स्वरूपाचा आहे. शिवसेना भवनापासून हाकेच्या अंतरावर टिळक पुलाखालील दादर ग्रंथालयाच्या मागे सार्वजनिक गणेशोत्सव व्हायचा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२६ सालच्या उत्सवात एका दलिताच्या हस्ते गणेशपूजन करायचा निर्धार केला, तेव्हा त्याला सनातनी ब्राम्हण कडवा विरोध करू लागले आणि बाबासाहेबांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली गेली. त्या प्रसंगात सवर्ण समाजातून फक्त प्रबोधनकार ठाकरे हेच जिवाची बाजी लावून बाबासाहेबांची साथ देत होते. गणेशोत्सवात दुपारी तीन वाजेपर्यंत जर दलिताला पूजेचा मान दिला गेला नाही, तर ‘ठाकरी’ पद्धतीने सरळ करेन, असे प्रबोधनकारांनी ठणकावल्यावर मडकेबुवा या दलिताच्या हस्ते गणेशपूजन झाले. प्रबोधनकार आणि बाबासाहेब आंबेडकर हातात हात घेऊन हिंदू धर्मात सुधारणा करू पाहात होते, त्यांना एकत्र करू पाहात होते, तेव्हा आजच्या रा. स्वयंसेवक संघाला दुधाचे दातही यायचे होते. प्रबोधनकारांचा वारसा घेऊन राजकारणात उतरलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली व त्यातून महाराष्ट्रातील विशिष्ट जातींमध्ये कुंठित झालेल्या सत्तेला त्यांनी एक तगडे आव्हान दिले. जातीचे गणित न बघता निवडणुकीचे तिकीट वाटणारे बाळासाहेब प्रबोधनकारांच्या पुढे एक पाऊल गेले. राजकारणात हिंदूंच्या एकीकरणाचा नवीन प्रयोग ते करत होते. तो यशस्वी होऊ लागला. हिंदू व्होटबँकेचा शोध पहिल्यांदा बाळासाहेबांनीच लावला, तेव्हा चंद्रकांत पाटील दादा शाखेत नुकतेच हुतूतू शिकत असावेत- नाहीतर त्यांनी समशेरीच्या बळावर स्वराज्य मिळवणार्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची व्होटबँक बनवली असा जावईशोध लावला नसता. औरंगजेब औरंगाबादेला काही निवडणुकीचा प्रचार करायला आला नव्हता. शाहिस्तेखान काही मतदारसंघ बदलून विधानसभा लढवायला पुण्याला आला नव्हता, अफजलखान काही सातारला पक्ष बदलून लोकसभा लढवायला आला नव्हता. ते सगळेच नंग्या तलवारी नाचवत स्वराज्य गिळायला आणि महाराजांना ठार मारायला आले होते. निवडणुकीच्या राजकारणात रोखठोक हिंदुत्वाचा पुरस्कार केल्याची जबरदस्त राजकीय किंमत बाळासाहेबांनी मोजली हे चंद्रकांतदादांनी विसरू नये. हिंदुत्वाच्या पुरस्कारामुळे सहा वर्ष मतदानापासून वंचित ठेवले गेलेले बाळासाहेब एकमेव राजकीय नेते असावेत. बाळासाहेबांचे हिंदुत्व आक्रमक होते, पण ते उन्मत्त आणि कारस्थानी नव्हते. राजकारणात हिंदुत्वाची जागा मोकळी होती, ती शिवसेनेने भरून काढली आणि संघाने हे हेरून शिवसेनेच्या खांद्यावर बसून महाराष्ट्रातल्या निवडणूक जत्रेचा देखावा पहिल्यांदा पाहिला, हे दादांनी विसरू नये.
भाजपचे हिंदुत्ववादी एकट्या-दुकट्याला गाठून झुंडबळी घेऊ लागले तेव्हाच हिंदुत्वाच्या विचारसरणीला गालबोट लागले होते. ही देशविघातक अरेरावी वेळेत थांबवायलाच हवी होती, पण पंतप्रधान मोदी या घटनांकडे डोळेझाक करू लागले. म्हणूनच यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून हिंदुत्वावरची पुटे काढून ते लखलखीत करून दाखवले. प्रबोधनकारांशी उद्धवजींचे फक्त रक्ताचे नातेच नाही तर विचारांचे देखील सख्खे नाते आहे हे सांगणारे ते भाषण होते. संघाच्या हिंदुत्वापेक्षा शिवसेनेचे हिंदुत्व वेगळे आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले. देश हाच धर्म असे म्हणताना उद्धवजींनी धर्म हाच देश म्हणणार्या भाजपला खडे बोल सुनावले. शिवसेनेला देवळात अडकलेले कच्चे हिंदुत्व नको असून तळागाळात खितपत पडलेल्या हिंदूचा विकास करणारे हिंदुत्व अभिप्रेत आहे, असेच त्या भाषणातून स्पष्ट झाले.
संघ आणि भाजप हे बहुजन हिंदूहिताकडे दुर्लक्ष करत निव्वळ विघटनवादी आणि द्वेषात्मक गोष्टींना प्रोत्साहन देत आहेत, हे दिसत असताना राजकीय व्यासपीठावरून हिंदुत्ववादी हा शब्द देखील उच्चारायला काँग्रेस पक्षाचे पुढारी धजावत नव्हते. ते धारिष्ट्य राहुल गांधींनी अखेर दाखवले. त्याचे राजकीय, सामाजिक परिणाम दूरगामी असतील. उद्धवजी आणि राहुल यांनी हिंदुत्व व हिंदू धर्म काय आहे याची नव्याने केलेली मांडणी स्वागतार्ह आहे. एकतर हिंदू धर्म हा कायमच विचारमंथनातून फुलत गेला आहे. श्रीकृष्णापासून ते महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्यापर्यंत बर्याच ज्ञात-अज्ञात लोकांनी, संतानी, चार्वाकांसारख्या ऋषी-मुनींनी हिंदू धर्माला सतत प्रवाही आणि जिवंत ठेवले आहे. यज्ञांसारख्या कृतीला अवास्तव महत्व आल्याने पत्र, पुष्पं, फलं, तोयं म्हणजेच पान, फूल, फळ अथवा पाणी यातील एखादी वस्तू ईश्वराला अर्पून यज्ञाचे पुण्य मिळते असे श्रीकृष्णांनी सांगणे, वेद आम्हाला समजत नाहीत म्हणून आम्ही त्या वेदांच्या बापाला म्हणजे विठ्ठलनामाला कंठी धरले, असे तुकारामानी अभंगातून मांडणे आणि काळाराम मंदिरात दलितांनी देवदर्शन केल्याने देवाला विटाळ होत नाही असे महामानव आंबेडकरांनी सांगणे हे हिंदू धर्मावर साठलेली बुरशी साफ करून तो धर्म प्रवाही करण्याचेच कार्य होते. हा धर्म टिकला तो केवळ शंकराचार्यांमुळेच असे म्हणणे हा निव्वळ संकुचितपणा आहे. गांधीचे सत्य हेच ईश्वर आहे असे मानणे हा देखील हिंदूधर्माची शिकवण सोपे करून सांगण्याचा प्रयत्न नव्हे का? या देशातला सर्वसामान्य हिंदू माणूस इतर धर्माच्या द्वेषाचे विष जवळ करणारा नाही, त्यामुळेच मोदी सगळ्या हिंदू मतदारांना कायम खिशात घेऊन फिरतात, हे समजणे भ्रामक आहे. महागाईचा मापदंड समजला जाणारा होलसेल प्राइस इंडेक्स तीस वर्षातील उच्चांकी १४.२३ टक्के एवढ्या वर पोहोचला आहे. म्हणजे ३० वर्षांतली सर्वोच्च महागाई आपण अनुभवतो आहोत. बेरोजगारी वाढतेच आहे. तरीदेखील मोदींच्या पाठीशी असलेला हिंदू समाज निव्वळ महागाई आणि बेरोजगारीला विटून परत येणे शक्य नाही, हे ओळखून राहुल यांनी हिंदू मतदाराला भावनिक साद घातली आहे. या सादेला प्रतिसाद मिळणार का, हा नंतरचा प्रश्न… पडसाद उमटवण्याची ताकद तिच्यात नक्कीच आहे.