जुन्या काळातले पत्रकार आणि कार्यकर्ते सुस्मृत गणेश विद्यार्थी यांच एक वाक्य प्रसिद्ध आहे. ‘सच्चे पत्रकार को हमेशा विपक्ष मे होना चाहिये.‘ विद्यार्थ्यांचा काळ स्वातंत्र्यपूर्व होता.
नंतरच्या काळातही आणीबाणी असो किंवा नंतरच्या काळातही असो, अनेक पत्रकारांनी भक्कमपणे सरकारच्या विरोधात सामान्य लोकांची बाजू मांडली. ‘पेपरात छापून आलेलं आहे म्हणजे ते खोटं कसं असेल?‘ असा प्रश्न ठामपणे विचारला जाण्याचा काळ भारताने बघितलेला आहे. संपादक असोत, पत्रकार असोत, सातत्याने एका विषयाचा पाठपुरावा करणे, प्रश्न धसास लावणे या बाबी करणारे अनेक लोक होते.
दुष्काळी नगर तालुक्याच्या पाण्याची प्रश्नाची सोडवणूक करायला एसटी, सायकल मिळेल त्या वाहनाने जिल्हाभर प्रवास करून पाणीपरिषद घेण्यासाठी, जनजागृती करायला आघाडीवर असणारे पत्रकार वा. द. कस्तुरे म्हणजे विधायक पत्रकारितेचा नमुना. हे सगळ सांगायचं कारण सध्याच्या पत्रकारितेची अवस्था.
उपग्रह वाहिन्याचा जमाना आला तसा घराघरात असलेल्या टीव्हीच्या माध्यमातून जाहिराती आणि आपलं उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवायला उत्पादकांना मोठ माध्यम मिळालं, या जाहिरातींचे अर्थकारण डोळे दिपवणार होतं. जसा प्रचंड पैसा आला तसाच या वाहिन्यांच्या मालकी हक्कासाठी मोठ्या गुंतवणूकदारांनी रस घेण्यासाठी सुरुवात केली.
हा पैशाचा ओघ जेव्हा प्रिंट मिडियामध्ये आला तेव्हा प्रिंट मीडियाच्या अर्थकारणात बदल सुरु झाले. टाइम्स, एक्सप्रेस सारख्या वृत्तसमूहाचे संचलन, मालकी आधीपासूनच खाजगी मालकांकडे असली तरीही संपादकांच्या कामात असणारा हस्तक्षेप मर्यादित होता.
अण्णा आंदोलनाच्या काळात टीआरपीसाठी माणसांच्या मागे माईक घेऊन धावणारे वाहिन्यांचे कामगार (पत्रकार वेगळे असतात) हे चित्र नंतर सार्वत्रिक झाले. आपल्या राजकीय फायद्यासाठी लोकांच्या मताला दिशा देणे, लोकांना सत्य काय आहे हे कळू न देणे, लोकांचे मूळ प्रश्न, आर्थिक अडचणी, जगण्याचे प्रश्न, महागाईचे मुद्दे याकडे लोकांच लक्षच जाऊ नये यासाठी या वाहिन्यांचा प्रच्छन्न वापर सुरु झाला. माध्यमांची भूमिका नेमकी गणेश विद्यार्थी सांगतात त्याच्या उलट झाली. सरकारचे प्रवक्ते म्हणून माध्यमांनी कामाला सुरुवात केली, सरकारच्या भूमिकांची तळी उचलणे, सरकारच्या प्रत्येक निर्णयाला समर्थन करणारे कार्यक्रम चालवणे, सरकारला अडचणीचे ठरतील असे प्रश्न उभे राहिल्यास त्यांना बगल द्यायला हिंदू मुस्लीम, भारत पाकिस्तान, देशप्रेमी देशद्रोही हे ठरलेले अजेंडे वाहिन्यांनी चालवायला सुरुवात केली.
जणू अफूची नशा झाल्यागत माध्यमांनी सामान्य जनतेला महागाई, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण हे मुद्देच नाहीसे करून फक्त सरकारचे भाट बनून काम करायला सुरुवात केली.
जेव्हा सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांचे बुद्धिभेद करण्याचं काम सातत्याने केलं गेलं तेव्हा वाहिन्यांनी त्यांचा भांडाफोड करण्याऐवजी त्यांचीच री ओढण्यात धन्यता मानली.
शरमेची बाब अशी की जे काही सत्ताधारी पक्षाचे अजेंडे हे हाडक चघळत अजेंडे चालवतात त्या आयटी सेलच्या निबंधाची सुरुवात ‘बिकाऊ मीडिया ये आपको नहीं दिखायेगा’ म्हणून यांचीच इज्जत काढून होते. निर्लज्जपणाची परिसीमा जेव्हा आयटीसेलने मोडतोड केलेले खोटे व्हिडीओ या वाहिन्यांनी जेएनयू बदनाम करायला वापरले तेव्हाच झाली. नोटाबंदी, जीएसटीची घाई, नागरिकत्व कायदा आंदोलन, कोरोना, शेतकरी आंदोलन, प्रत्येक वेळेला संधी मिळूनही माध्यमांनी सरकारला प्रश्न विचारणे सोडून सामान्य नागरिकांना आरोपीच्या पिंजर्यात उभं करण्यात धन्यता मानली हा माध्यमांचा गंभीर गुन्हा आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवण्यात आलेल अपयश आहे. ‘आपका टीव्ही बिमार हो चुका है‘ असं रविशकुमार म्हटला आणि त्याने सगळ्यांना टीव्ही वाहिन्यावर बहिष्कार टाकायचं आवाहन केलं ते याच काळात. विरोधातल्या सरकारला बदनाम करायला किरकोळ मुद्दे घेऊन तासनतास भलतेच मुद्दे दळत बसणे, बिनकामाचे विषय चघळत बसणे हे सातत्याने होत आलेलं आहे.
‘जिंदा कौम पाच साल इंतजार नही करती‘ हे आणीबाणीच्या काळात म्हटलेलं वाक्यच माध्यमांनी कायमच गाडून टाकलं आणि लोकांना नशेत ठेवण्यात धन्यता मानली. मुख्य प्रवाहातली माध्यम सरकारचे प्रवक्ते, भाट बनलेले असताना मोजकेच काही पत्रकार, वाहिन्या, प्रिंट मिडिया सत्य सांगण्याची हिंमत करत होता. त्याची शिक्षाही त्यांना वेळोवेळी भोगावी लागली.
या सगळ्या काळात सरकारच्या विरोधात ताकदीने उभा राहिलेला सोशल मिडिया सरकारची अजूनही मोठी डोकेदुखी आहे.
सोशल मिडिया संगठीत नाहीये, तिथे कुठलीही एक संघटना, यंत्रणा नाही हा म्हटला तर दोष आहे म्हटल तर बलस्थान आहे. असंगठीत असल्याने एकेक माणूस टार्गेट करण अवघड आहे. तरीही लोक चिकाटीने प्रयत्न करत आहेत. या कालखंडाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा माध्यमांची बोटचेपी भूमिका, माध्यमांनी सत्तेपुढे घातलेलं लोटांगण आणि त्यामुळे देशाच झालेलं नुकसान याची जबाबदारी माध्यमांची असेल हेही नक्कीच. लोकांपर्यंत सत्य आणि तथ्य मांडणे, लोकांचे जगण्याचे प्रश्न सरकार समोर मांडणे ही माध्यमांची जबाबदारी पार पाडण्यात ही मंडळी पूर्णपणे अपयशी ठरली हा इतिहास कधीही पुसला जाणार नाही.
– आनंद शितोळे