‘मी कपाटातला माणूस नाही, तर रस्त्यावरचा माणूस आहे, तेव्हा आत्मचरित्र वगैरे लिहिणार नाही,’ असे एका मुलाखतीत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. बाळासाहेबांनी आत्मचरित्र लिहिले असते तर त्यांच्या जीवनातील संघर्षगाथा महाराष्ट्रापुढे आली असती असे काहींना वाटते. पण बाळासाहेबांचे जीवनच ‘खुली किताब’ आहे. त्यांना आत्मचरित्र लिहिण्याची गरजच भासली नाही. मात्र त्यांचे संघर्षमय जीवनकार्य हे स्मारकरूपात असावे असे मराठी माणसाला वाटत होते. तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे स्मारक व्हावे अशी इच्छा प्रगट केली. मग शिवसैनिक, बाळासाहेबांवर प्रेम करणारा मराठी माणूस व प्रखर हिंदुत्वाची कास धरणारा हिंदुस्थानी, यांनी या महापौर बंगल्याच्या आवारातील स्मारकाला अंत:करणापासून पाठिंबा दिला.
मराठी माणसाने एखादे चांगले कार्य हाती घेतले की त्याला विरोध करण्यात, टीका करण्यात अमराठी मंडळींपेक्षा मराठी मंडळीच पुढे असतात. त्याप्रमाणे हे स्मारक महापौर बंगल्याच्या आवारात उभारण्यालाही विरोध झाला. या स्मारकामुळे ठाकरे कुटुंबाला आणि शिवसेनेला, महापौर बंगल्याची जागा हडप करायची आहे. हे स्मारक, ठाकरे व त्यांचा परिवार, मित्रमंडळींच्या गप्पांचा अड्डा बनेल. तेव्हा राज्य सरकारने, मुंबई महानगरपालिकेने महापौर बंगल्याची जागा स्मारकासाठी देऊ नये अशी मागणी विरोधकांनी केली. पण अशा नतद्रष्टांच्या आणि शिवसेना विरोधकांच्या नाकावर टिच्चून आणि सगळी अडथळ्यांची शर्यत पार पाडून आज बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.
वंदनीय बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष २३ जानेवारी २०२६पासून सुरू होत आहे. आज शिवसेनाप्रमुखांच्या भव्य स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. २३ जानेवारी २०२६ रोजी या भव्य-दिव्य स्मारकाचा लोकार्पण सोहळा निश्चितपणे दिमाखाने पार पडणार आहे. शिवसेनाप्रमुखांचा संपूर्ण जीवनपट मांडणार्या या स्मारकाची माहिती पत्रकारांना देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, स्मारकाचे अध्यक्ष शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि स्मारकाचे सचिव सुभाष देसाई यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसर्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे, असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी आर्किटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट यांना धन्यवाद दिले. हे स्मारक ज्या ठिकाणी बनवले जात आहे, ते महापौर निवासस्थान ही केवळ एक वास्तू नाही तर त्याच्याशी शिवसेनाप्रमुखांच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. शिवसेनाप्रमुखांनी अनेक महत्त्वाच्या बैठका या वास्तूमध्ये घेतल्या होत्या. युतीच्या बैठका इथे झालेल्या आहेत. ही हेरिटेज वास्तू आहे. या वास्तूला कुठेही धक्का न लावता तिचे वैभव जपून स्मारक उभारणे हे फार महत्त्वाचे आणि खूप कठीण काम होते. त्यातच ही वास्तू समुद्राला लागूनच आहे. समुद्राचा रेटा जमिनीच्या खालून मोठा असतो. शेजारीच संयुक्त महाराष्ट्र दालन आहे. त्या दालनाच्या खालून समुद्राचे पाणी झिरपून वर येत होते. नंतर तिथे दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे भूमिगत स्ट्रक्चर बनवणे जिकरीचे होते, पण ही कामगिरी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
या स्मारकात बाळासाहेबांनी वापरलेल्या वस्तूंचे जतन करण्यात आले आहे. त्यांनी वापरलेला चष्मा, पेन, कुंचले आदींचा समावेश असेल. या स्मारकात एक अद्ययावत पुस्तकांची लायब्ररी, बाळासाहेबांचे पहिले भाषण, इतर भाषणे, मुलाखती, लेखांचे ऑडियो-व्हिडिओज असतील. अँफी थिएटर आणि वाचनकक्षही असेल. छायाचित्रे, व्यंगचित्रांचा नजराणा असणार असेल.
जमिनीखाली ४० हजार चौरस फुटांचे स्मारकाचे बांधकाम असेल. शिवाय दहा हजार चौरस फुटांच्या दोन इमारतींत बाळासाहेबांच्या कार्याचा जीवनपट असेल. या स्मारकाशी आर्किटेक्ट आभा लांबा यांचे भावनिक नातेही जोडले गेले आहे. ‘‘बाळासाहेबांचे विस्थापित काश्मीरी कुटुंबांवर उपकार आहेत. कारण विस्थापित काश्मीरी पंडितांना त्यांनी महाराष्ट्रात आधार दिला. काश्मीरी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी महाराष्ट्रातील विद्यालय व महाविद्यालयात काही जागा राखीव ठेवल्या. एवढेच नाही तर त्यांना सर्वोतोपरी सहाय्य केले. त्या उपकृतांपैकी माझे आईवडील व कुटुंब आहे. बाळासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात माझा खारीचा वाटा आहे. त्यामुळे मी जीवनात कृतकृत्य झाले. मला आनंद आणि अभिमान वाटला,’’ अशा भावना आभा लांबा यांनी एका मुलाखतीत व्यक्त केल्या.
एकही झाड न तोडता, नवी झाडे लावून स्मारकाचे काम सुरू आहे. सुरुवातीला तिथे २११ वृक्ष होते. आज २३३ वृक्ष आहेत. महापौर बंगल्याचा परिसर ही बाळासाहेबांची आवडती जागा. जशा ‘मातोश्री’वर बाळासाहेबांच्या बैठका, गाठीभेटी होत होत्या, त्याचप्रमाणे महापौर बंगल्यात अनेक थोर व्यक्तींच्या, कलावंतांच्या, विविध राजकीय पक्षनेत्यांच्या, देश-विदेशातील पाहुण्यांच्या आणि शिवसैनिकांच्या गाठीभेटी होत होत्या. अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना बाळासाहेबांबरोबर इथेच त्या दोघांची भेट आणि गप्पा झाल्या होत्या.
शिवसेनाप्रमुखांचे समाजकारण, राजकारण आणि त्यांनी केलेले कार्य लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहचवण्याचा प्रयत्न या स्मारकाद्वारे केला जाणार आहे. ‘मातोश्री’प्रमाणेच बाळासाहेबांनी या महापौर निवासामधून काम केले. १९२७ साली बाळासाहेबांचा जन्म झाला. त्याच वर्षी मुंबईतील दादर येथील मैदानाचे नामकरण शिवाजी पार्क असे झाले. महापौर निवासाच्या पाठीमागे समुद्रात असलेल्या वरळी-वांद्रे सी-लिंकची संकल्पनाही बाळासाहेबांची होती. कोविडच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन झाले.
शिवाजी पार्क परिसरात स्वातंत्र्यसेनानी व हिंदुत्वाचे प्रणेते स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे स्मारक आहे. त्याच्या शेजारी संयुक्त महाराष्ट्र लढ्याची शौर्यगाथा सांगणारे संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे दालन आहे आणि आता मराठी माणसाचे मानबिंदू व प्रखर हिंदुत्ववादी बाळासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक उभे राहत आहे. ही तीनही स्थळे, राष्ट्र व महाराष्ट्राच्या लढ्याची प्रतीके आहेत आणि शौर्यगाथा सांगणारी स्मारके आहेत.
केवळ पुतळा उभा राहणे म्हणजेच स्मारक नव्हे. प्रेरणास्थान, स्मृतिस्थान, शक्तिस्थान असणे गरजेचे आहे. तसेच हे स्मारक असेल!
कसे आहे स्मारक…?
- महाराष्ट्र सरकारने जुने महापौर निवास व संलग्न जमीन यांना मुंबईच्या विकास आराखड्यात स्मारक स्थळ म्हणून विशेष दर्जा दिला.
- राज्य सरकारने प्रेरणादायक स्मारक उभारण्याच्या जबाबदारीसाठी एक स्मारक समिती नियुक्त केली. मा. धर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयात विश्वस्त संस्थेची रीतसर नोंदणी करण्यात आली.
- नियोजित स्मारक स्थळ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विश्वस्त संस्थेच्या ताब्यात देण्यात आले.
- स्मारकाच्या आराखड्यासाठी स्पर्धात्मक बोली पद्धत राबविण्यात आली व सर्वोत्तम संकल्पना सादर करणार्या आभा नारायण लांबा असोसिएट्स या सुप्रसिद्ध आर्किटेक्टची सल्लागार व आर्किटेक्ट म्हणून निवड करण्यात आली.
- राज्य मंत्रिमंडळाने नियोजित स्मारकासाठी अंमलबजावणी संस्था म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची नियुक्ती केली.
- एमएमआरडीएतर्फे निविदा प्रक्रिया राबविण्यात आली व यशस्वी ठरलेल्या मेसर्स टाटा प्रोजेक्टस् लि., या संस्थेला पहिल्या टप्प्याचे बांधकाम करण्याचा कार्यादेश देण्यात आला.
- दि. ३१-३-२०२१ रोजी स्मारकाचे भूमिपूजन झाले.