काँग्रेसचे कार्यालय कितीही धष्टपुष्ट असो व कृश असो, त्याला देशाच्या (खर्याखुर्या) स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आहे. भाजपने पक्ष कार्यालयाच्या निमित्ताने कितीही राजमहाल, शीशमहाल बांधलेत तरीही त्या वास्तूंमध्ये स्वातंत्र्याचा इतिहास नसणार आहे. पण प्रश्न वर्तमानाचा आहे… इंदिरा भवनाच्या वर्तमानात काँग्रेसकडे भूतकाळातील नेत्यांएवढे मातब्बर नेते असणार आहेत काय?
– – –
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या १२५व्या दिनी २८ डिसेंबर २००९ रोजी तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या समवेत दिल्लीतील ९ अ, कोटला मार्गावर प्रस्तावित ‘इंदिरा गांधी भवन’ची कोनशिला बसवली होती. इंदिरा भवन बांधायला काँग्रेसला तब्बल १५ वर्षे लागली. विलंबाचे कारण पक्षाच्या तिजोरीत ठणठणाट असल्याचे सांगण्यात येत होते. इमारतीला इंदिराजींचे नाव तर मिळाले, परंतु या वास्तूत बसायला त्या तोडीच्या कणखर नेत्यांचा पक्षात अभाव आहे. काँग्रेसचे बहुतांश नेते सत्ता, पदे उपभोगल्यानंतर रग्गड झालेत. ईडी, सीबीआय, आयकर आणि तुरुंगाच्या भयापोटी अनेकांनी पक्ष सोडला. आता हे नेते ५०० मीटर अंतरावर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पंचतारांकित मुख्यालयातील ‘म्युझियम’मध्ये आढळतात.
गेल्याच आठवड्यात अडीचशे कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या इंदिरा गांधी भवनाचे उद्घाटन सोनिया गांधी यांच्या हस्ते झाले. काँग्रेसच्या या मुख्यालयाला इंदिराजींचेच नाव का, म्हणून भाजपवाल्यांची (कसलाच काही संबंध नसताना) पोटदुखी सुरू झाली. दिवंगत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव द्यायला हवे, असा फुकटचा सल्ला ते द्यायला लागले. याचाच अर्थ भाजपच्या नेत्यांना अद्यापही नेहरू आणि गांधींच्या नावाने घाम फुटतोय. या दोन्ही नावांचा त्यांना मत्सर वाटतो. या कुटुंबियांचे इतिहासातील योगदान विस्मरणात जावे यासाठी भाजपचा सातत्याने आटोकाट प्रयत्न असतो. काँग्रेसच्या नवीन मुख्यालयापासून अवघ्या पाचशे मीटरवर भाजपचे राष्ट्रीय कार्यालय आहे. दीड वर्षातच ते बांधून पूर्ण झाले. या वास्तूला ७०० कोटी रुपये खर्च करण्यात आला, असा दावा तेव्हा काँग्रेसने केला होता. नरेंद्र मोदींचे सरकार आल्यानंतर भाजपा अचानक श्रीमंत झाल्याचे दिसून येते. भाजपने देशभरात ७६८ कार्यालयं बांधण्याचे काम सुरू केले. त्यापैकी ५६३ कार्यालये तयार झालीत. ९६ कार्यालयांचे काम सुरू आहे. या कामासाठी हजारो कोटींचा खर्च भाजपने केलेला आहे. सर्वच कार्यालय पंचतारांकित व्हावी हा भाजपनेत्यांचा अट्टाहास आहे. याउलट काँग्रेसची देशभरातील कार्यालयांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी स्वत:चा विकास केला आणि पक्षाकडे दुर्लक्ष केले हे लपून नाही. गेल्या चार-पाच दशकांत वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी संस्था आणि अनेक लाभ स्वत:साठी मिळवण्याकरता काँग्रेसचे नेते कष्ट उपसताना दिसले. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा पक्षाकडे निधीचा अभाव असतो. राहुल गांधीही या नेत्यांना, तुम्ही पक्षाला पोखरून स्वत:चा विकास केला हे सुनावताना दिसतात. परंतु एका बाबीकडे दुर्लक्ष करता येत नाही. काँग्रेसचे कार्यालय कितीही धष्टपुष्ट असो व कृश असो, त्याला देशाच्या (खर्याखुर्या) स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आहे. भाजपने पक्ष कार्यालयाच्या निमित्ताने कितीही राजमहाल, शीशमहाल बांधलेत तरीही त्या वास्तूंमध्ये स्वातंत्र्याचा इतिहास नसणार आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय मार्गावरील भाजपच्या राष्ट्रीय कार्यालयात स्वातंत्र्यलढ्यात किती जणांनी योगदान दिले याबाबत देश-विदेशातील लोकांना कदाचित माहिती मिळेलही, परंतु ती चैतन्यदायी नसेल. इथेही त्यांना काँग्रेसच्या नेत्यांचीच गौरवगाथा सांगावी लागेल. किंबहुना भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वातंत्र्य लढा या विषयावरील चर्चेत भाजपच्या नेत्यांची मान खाली जात असते. त्यामुळेच १५ ऑगस्ट १९४७ देशाला स्वातंत्र्य मिळाले असे हे लोक मानत नाहीत. मोदी सत्तेत आल्यानंतर अर्थात २०१४मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले असे बरळणारी भाजपची खासदार कंगना राणावत असो किंवा रामाची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर खरे स्वातंत्र्य मिळाले असे म्हणणारे संघाचे प्रमुख मोहन भागवत असोत, या सगळ्यांनाच स्वातंत्र्यलढ्यातील सेनानींचे बलिदान अत्यंत क्षुल्लक वाटणे हे त्यांच्यातील न्यूनगंड दर्शवतं. याउलट देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्या महात्मा गांधींपासून इंदिरा गांधींपर्यंतच्या प्रवासात हजारो स्वातंत्र्यवीरांचा त्याग आणि बलिदानाचे रोमांच उभे करणार्या कथा काँग्रेस मुख्यालयाच्या भिंतीवर अभिमानाने झळकताना दिसणार आहेत. पुढच्या अनेक पिढ्यांना या वास्तूतून देशप्रेम आणि संविधानाबद्दल अभिमान जागवणार्या ठरणार आहेत.
असे आहे इंदिरा गांधी भवन…
काँग्रेसचे नवे मुख्यालय हे केवळ विटा आणि दगडांची इमारत नाही. तर काँग्रेस पक्षाच्या १४० वर्षांची ती गौरवगाथा आहे. इमारतीच्या भिंतीवर कोरलेली संविधानातील पाच मूल्ये हे काँग्रेसचे सिद्धांत आहेत. स्वागतकक्षात काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी आणि विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची छायाचित्रे लक्ष वेधतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य चित्र आणि त्यावर लिहिलेले ‘जोपर्यंत आपल्याला सामािजक स्वातंत्र्य मिळत नाही, तोपर्यंत कायद्याने कितीही स्वातंत्र्य दिलं तरीही ते कोणत्याही कामाचे नाही’ हे वाक्य समानतेचा संदेश देतं. पाच मजली इंदिरा भवनात २४६ दुर्लभ फोटो लावण्यात आलेले आहेत. या फोटोंतून भारत आणि काँग्रेसच्या इतिहासाचे दर्शन होते. महात्मा गांधींची राउंड टेबलवर चर्चिलसोबतची चर्चा असो, किंवा सरदार वल्लभभाई पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांचा स्वाभिमान या वास्तूतील त्यांच्या छायाचित्रातून झळकतोय. रवींद्रनाथ टागोर असो किंवा खान अब्दुल गफार खान यांच्या रगारगांतील राष्ट्रप्रेम या वास्तूमध्ये आपलेसे करत असते. संपूर्ण इमारतीतील भिंतींवर काँग्रेसचा गौरवशाली इतिहास झळकतो आहे. काँग्रेसचे १८८५पासून तर आतापर्यंतची अधिवेशने आणि संपूर्ण स्वातंत्र्य, सहयोग आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, गरिबी हटाव, धर्मांधतेच्या विरोधात राहुल गांधी यांची दक्षिण ते उत्तर ‘मोहब्बत’ दर्शवणारी भारत जोडो यात्रा, आईन्स्टाईनचा हात पकडलेले नेहरू, जय जवान जय किसान हा नारा देणारे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा साधेपणा, इंदिरा गांधींसमोर झुकलेला पाकिस्तान, बँकांचे राष्ट्रीयीकरण, राजीव गांधी यांचे टेलिकॉम आणि तंत्रविज्ञान याशिवाय देशात झालेले शांती करार, नरसिंहराव सरकारने घेतलेले धाडसी निर्णय त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण या सगळ्याच गोष्टी इंदिरा भवनात झळाळत आहेत. २००४ ते २०१४पर्यंत डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील सरकारचे जनहिताचे निर्णय व त्याचा लेखाजोखा या इमारतीत मांडण्यात आलेला आहे. माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, मनरेगा आणि अन्नसुरक्षा या क्रांतिकारी निर्णयाचे दर्शन इथे होते. प्रत्येक मजल्यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. काँग्रेसच्या समर्पित कार्यकर्त्यांचा सन्मानही या भिंतीवर दिसून येतोय. पाच मजल्यांची ही इमारत पर्यावरणपूरक आहे. ही इमारत देशापुढे नवा संकल्प ठेवून एक ऊर्जा देईल असा काँग्रेसनेत्यांचा आशावाद आहे.
सुमारे ४६ वर्षांनंतर पक्षाने आपला पत्ता बदलला आहे. याआधी जुने कार्यालय २४, अकबर रोड हे होते. सोनिया गांधींच्या १० जनपथ या निवासस्थानाला लागून असलेले काँग्रेसचे मुख्यालय येत्या काही दिवसांत पूर्णपणे बंद होईल. दीनदयाल उपाध्याय मार्गावर काँग्रेसने मुख्य प्रवेशद्वार ठेवले नाही. पत्त्यात संघाच्या नेत्याचे नाव असणे काँग्रेसला चालले नसते, त्यामुळे मागील बाजूच्या कोटला मार्गावर मुख्य प्रवेशद्वार देण्यात आले. ७०च्या दशकात काँग्रेसचे कार्यालय डॉ. राजेंद्र प्रसाद रोडवर होते. त्याचा पत्ता ३, रायसीना रोड होता. यासमोर ६, रायसीना मार्गावर अटल बिहारी वाजपेयी राहात होते, म्हणून काँग्रेसने तेथेही मागील प्रवेशद्वार निवडले होते. १९७८मध्ये काँग्रेसमधील फुटीनंतर कार्यालय पक्षाचे तत्कालीन खासदार जी. वेंकटस्वामी यांना देण्यात आलेल्या २४, अकबर रोड या बंगल्यात स्थलांतरित झाले. तेव्हापासून आतापर्यंत काँग्रेसचे मुख्यालय इथेच राहिले. इंदिरा गांधी यांनी २४, अकबर रोडला काँग्रेस मुख्यालय म्हणून निवडले, तेव्हा पक्षाला मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले होते. पण हे कार्यालय काँग्रेस आणि इंदिराजींसाठी भाग्यशाली ठरले. १९८०मध्ये मध्यावधी निवडणुकीत काँग्रेस मोठ्या बहुमताने सत्तेवर परत आली. हे कार्यालय इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग या चार पंतप्रधानांचे साक्षीदार ठरले. कार्यालयावरील शेवटचा काँग्रेसध्वज १४ जानेवारीला उतरवला गेला. काँग्रेसला दिलेल्या चार बंगल्यांचे वाटप केंद्र सरकारने २०१५ मध्ये रद्द केले होते. यामध्ये २४, अकबर रोड कार्यालयाचाही समावेश होता. त्याशिवाय २६ अकबर रोड (काँग्रेस सेवा दल कार्यालय), ५-रायसीना रोड (युवक काँग्रेस कार्यालय) आणि सी-टू /१०९ चाणक्यपुरी हेसुद्धा रद्द करण्यात आले होते. लुटियन्स झोनमधील गर्दीमुळे सर्व राजकीय पक्षांना आपले कार्यालय बदलण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते. त्यानंतर सर्वप्रथम भाजपाने २०१८मध्ये दीनदयाल उपाध्याय मार्गावर आपले कार्यालय उभारले.
१९३० मध्ये मोतीलाल नेहरू यांच्या प्रयागराज (अलाहाबाद) येथील आनंद भवनला लागून असलेले ‘स्वराज भवन’ हे काँग्रेसचे मुख्यालय म्हणून वापरण्यात आले. १९४७मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळायच्या काही दिवस आधी काँग्रेसचे मुख्यालय ७, जंतर मंतर रोड, दिल्ली येथे आणण्यात आले. १५ जून १९४७ रोजी काँग्रेसच्या कार्य समितीने अर्थात सीडब्लूसीने या नवीन कार्यालयात देशाच्या फाळणीची चर्चा केली होती. पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनीही या कार्यालयाचा उपयोग केला. १९६९मध्ये काँग्रेस फुटला, तेव्हा एस. निजलिंगप्पा यांच्या नेतृत्वातील काँग्रेसने जंतर मंतरवरील कार्यालयावर कब्जा केला. इंदिरा गांधी यांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळातील एम. व्ही. कृष्णप्पा यांना मिळालेला २१, विंडसर प्लेस हा बंगला पक्षाचे कार्यालय म्हणून वापरला. १९७१ मध्ये काँग्रेसचे कार्यालय ५, राजेंद्र प्रसाद रोड इथे आले. १९७७ मध्ये आणीबाणीनंतर निवडणुकीत काँग्रेस हरली आणि कार्यालय २४, अकबर रोड इथे आले. तेव्हापासून काँग्रेसचे मुख्यालय इथेच होते.
इंदिरा गांधी भवनात पाचव्या मजल्यावर राष्ट्रीय अध्यक्षांचे कार्यालय असणार आहे. याच इमारतीत महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय यासह विविध सेलचे कार्यालय असणार आहे. विजेसाठी सोलर पॅनल लावण्यात आलेले आहे. संपूर्ण इमारत इको फ्रेंडली कशी होईल यास प्राधान्य देण्यात आले आहे. हाय स्पीड इंटरनेट आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था, अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, बैठक कक्ष, मीडिया सेंटर, लाईव्ह प्रसारणची व्यवस्था, डिजिटल आर्काइव्हमध्ये पक्षाचे ऐतिहासिक दस्तावेज, जुनी भाषणे आणि फोटोग्राफचा संचय करण्यात आलेला आहे. संशोधन आणि अभ्यासासाठी एक भव्य लायब्ररी उभारण्यात आलेली आहे. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि अत्याधुनिक यंत्रणा वापरण्यात आली आहे. पाहुणे आणि कर्मचार्यांसाठी कॅफेटेरिया, आराम कक्ष, वाहनतळ उभारण्यात आले आहे. या इमारतीसाठी २५२ कोटी रुपये खर्च झालेत. हफीज कॉन्ट्रॅक्टर इमारतीचे डिझायनर आहेत. लार्सन अँड टुब्रो या कंपनीने ८० हजार चौरस फुटात ही इमारत बांधली आहे.
आता काँग्रेसचे हे अत्याधुनिक नवे मुख्यालय तर तयार झाले, परंतु काँग्रेसला घरघर लागली त्याचे काय? ही इमारत काँग्रेसचा १४० वर्षांचा इतिहास नक्कीच सांगेल. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले हेही खरे आहे. परंतु काँग्रेसमध्ये आज राष्ट्रप्रेम प्रथम म्हणणारे नेते अभावानेच दिसून येतात. सेवाग्राम येथील झोपडीत राहून महात्मा गांधींनी स्वातंत्र्याचा लढा लढला. त्यासाठी त्यांना पंचतारांकित इमारतीची गरज नव्हती. साम्राज्याचा सूर्य मावळत नसलेल्या इंग्रजांना त्यांनी भारतातून हाकलून लावले. तीच काँग्रेस आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आगेकूच करणार आहे. परंतु पक्ष पुढे नेणे हे एकट्याचे काम नव्हे. त्यांचे हात बळकट करणारे नेते पक्षात दिसत नाहीत. आज सोनिया किंवा राहुल यांना भेटायचे म्हणजे सामान्य लोकांची दिव्य परीक्षा असते. पुरुषसत्ताक राजकारणाला चिरडून टाकणार्या इंदिराजींचे नाव दिल्याने ही इमारत एक स्मारक म्हणून कायम राहू शकेल. पण काँग्रेस जिवंत ठेवायची असेल तर पक्षांतर्गत अनेक बदल करावे लागतील. इंदिराजींसारखे धडाडीचे नेते तयार व्हावे लागतील. तरच हे भवन या देशाच्या लोकशाहीचे, संविधान सुरक्षेचे, सामान्याचे आशास्थान राहील हे निश्चित.