माझ्या मानलेल्या परमप्रिय मित्र पोक्याने ‘अजितदादा – एक गूढ व्यक्तिमत्व’ या विषयावर प्रबंध लिहिण्याचा मनोदय व्यक्त केला तेव्हा मी त्याचं मनापासून अभिनंदन करून काही मार्गदर्शनपर टिप्सही दिल्या. मी म्हटलं, पोक्या, अजितदादांसारख्या महान व्यक्तिमत्वाला जितके कंगोरे आहेत तितके महाराष्ट्रात होऊन गेलेल्या किंवा अस्तित्वात असलेल्या एकाही राजकीय व्यक्तिमत्वाला नाहीत. ज्या बाजूने तू त्यांच्याकडे पाहशील तितकी त्यांची वेगवेगळी रुपं तुला दिसतील. मी त्यांना कंगोरे म्हणतो. तुला ते कदाचित काट्यांसारखे वाटतील. सतत एखाद्यावर सूड उगवण्याच्या किंवा समोरच्याचा अपमान करण्याच्या मूडमध्ये असलेले अजितदादा आपण पाहतो त्यावेळी त्यांच्या स्वभावात लपलेले अनेक गूढ पैलूही नजरेसमोर येतात… माझं म्हणणं पोक्याला पटलं आणि सध्या वैâचीत सापडल्यासारखी अवस्था झालेल्या अजितदादांची त्याविषयीची मुलाखत घेऊन तो परतही आला. तीच ही मुलाखत…
– नमस्कार अजितदादा.
– नमस्कार. कशाला झक मारायला आलास इथे? मी किती व्यापात आणि तापात आहे हे माहीताय ना तुला?
– सॉरी दादा, पण राहवलंच नाही म्हणून आलो. माननीय पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी बारामतीला भेट देऊन तुम्ही तिथे शेती-बागायतीपासून अनेक धंद्यात केलेल्या प्रगतीबद्दल तुमचं तोंड फाटेस्तोवर कौतुक केलं. त्यामुळे खूप बरं वाटलं. भारावल्यागत बोलत होत्या त्या. काकांनी केलेल्या कामाचं श्रेय तुम्हाला देऊन मोकळ्या झाल्या त्या.
– कोणी अडचणीत सापडला की त्याला माझाच आधार लागतो. दुसरा पर्याय नव्हता पंकजाकडे. सध्या ती आणि मी आम्ही दोघंही त्या कराड प्रकरणात नेक्स्ट टार्गेटवर आहोत. पंकजा सुटेल रे, पण माझं काय! ते मुख्यमंत्री फडणवीस तर वाटच पाहतायत त्याची.
– तुम्ही तर मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी आहात.
– ते सगळं ठीक असलं पोक्या तरी सध्या मला राजकारणातून संपवण्यासाठी सभोवताली कारस्थानं सुरू आहेत. शत्रू दबा धरून बसले आहेत. त्या शिंद्यांना आणि त्यांच्या रम्य स्वप्नांना संपवण्यात ते जसे यशस्वी झाले तोच प्रयोग आता वेगळ्या तर्हेने माझ्यावर करतायत ते. वाल्मीक कराड आणि माझे स्नेहसंबंध पूर्वीपासून असल्यामुळे सध्याच्या प्रकरणात मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतोय असा आभास उत्पन्न करतायत ते. मी कशाला त्याला वाचवू? असेल दोषी तर होईल फाशी. पुरावे सिद्ध झाले की कोणीही कितीही मोठा असला तरी त्याची गय करू नका, असं जाहीरपणे सांगितलंय मी. मात्र पुरावे सबळ असले पाहिजेत.
– तरीही राज्य मंत्रिमंडळातील काही प्रमुख मंत्री कराडला वाचवण्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्नशील होते, असं म्हटलं जातंय आणि त्यामुळेच केवळ खंडणी प्रकरणात त्याला आरोपी करण्यात आलं. देशमुख हत्या प्रकरणातून त्याला सुरुवातीलाच ढील देण्यात आली, असाही आरोप होता. मात्र फडणवीसांनी देशमुख कुटुंबाची बाजू लावून धरल्यानंतर आणि चोहोबाजूंनी दबाव वाढत गेल्यानंतर अखेर कराडला हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून मकोका लावून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली हे खरंच ना?
– ते तू मला शिकवू नकोस. आता त्या कराडला फाशीच्या तख्तापर्यंत पोचवण्यासाठी मुख्यमंत्री जिवाचं रान करतील, पण त्याचबरोबर मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरुवातीपासून केला, अशी जनतेच्या संशयाची सुई माझ्यावर राहील आणि माझी बदनामी होईल, असे डावपेचही खेळतील, तू बघत रहा. अरे, मी बारामतीच्या बारा गावचं पाणी प्यायलेला माणूस आहे. मी त्या शिंद्यांसारखा दूधखुळा नाही. पण, तुला एक सांगतो पोक्या, मी या पदावर असेपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या नाकात दम आणल्याशिवाय राहणार नाही.
– काय करणार तुम्ही?
– त्यांच्या प्रत्येक योजनेला आडवा जाणार. एक तर त्या शिंद्यांच्या लाडकी बहीण योजनेने राज्याच्या आर्थिक अडचणीत आधीच भर घातलीय. महापालिका, पंचायत समित्या, नगर परिषद निवडणुकांनंतर ही योजना बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्याशिवाय मुख्यमंत्री स्वत:च्या आणि भाजपच्या लोकप्रियतेसाठी राज्याच्या तिजोरीवर भर पडेल अशी आपली योजना जाहीर करण्याची शक्यता आहे. हे राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी सहन करू शकत नाही. सगळा हुकूमशाही कारभार चाललाय. त्यांना राज्यातच काय देशातही त्यांचाच पक्ष हवाय. याचा अर्थ देशातील बाकीच्या पक्षांना यांना हद्दपार करायचंय. ही कसली लोकशाही?
– दादा, तुम्ही एवढे कुशल राजकारणी. काकांवरही मात करून तुम्ही महायुतीत शिरलात, पत्रकारांनाही तुम्ही दमात घेता, मग आत्ताच अवसान गळल्यासारखे का वागताय?
– ते तुला नाही कळणार. पाणी गळ्यापर्यंत आलं की माणसाची अवस्था काय होते ते तुला नाही समजणार.
– मी तर तुम्हाला राजकारणातील अष्टपैलू नेता समजतो. पण तुमचं व्यक्तिमत्व मला सरळसोट वाटत नाही. म्हणूनच मी तुमच्यावर प्रबंध लिहिण्याचा संकल्प नव्या वर्षात केलाय. पोटात तेच ओठात, असं तुम्ही तुमच्या बाबतीत दाखवत असलात तरी प्रत्यक्षात तसं नाही हेही मी सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे.
– तुला काय वाटेल ते कर. पण सध्या माझी अवस्था त्या शिंदेंसारखी झालीय. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतोय मी. ते अष्टपैलू की काय म्हणतोस ते गुण गेलेत खड्ड्यात. हे भाजपवाले ब्लॅकमेल करण्यात हुशार आहेत. त्यांनी काकांचा राष्ट्रवादी फोडण्यासाठी माझा वापर केला आणि आता हेतू साध्य झाल्यावर मला मंत्रिमंडळाबाहेर फेकून देण्याच्या त्यांच्या हालचालींना प्रारंभ झाल्याचंही मला जाणवतंय.
– तुम्ही अर्थमंत्रीपद मिळाल्यावर गुलाबी रंगात न्हाऊन निघाला होता. पण आता तो रंग फिका पडून पांढरा होत चालल्याचं जाणवतंय. कराडसारख्या हिंस्त्र पशूशी असलेले स्नेहसंबंध तुम्हाला अडचणीत आणतायत हे स्पष्ट आहे. असंगाशी संग कधीतरी अडचणीत आणतो हेच सत्य आहे.