□ हिंडेनबर्ग अचानक बंद; अदानीचे शेअर्स उसळले.
■ हिंडेनबर्ग बंद झाल्याचा आनंद व्यक्त करणं हा उच्च दर्जाचा मंदपणा आहे. पण ज्यांची बुद्धी कुंद झाली आहे, त्यांना हे सांगून उपयोग नाही. आपल्या देशाचा राष्ट्रीय उद्योगपती भ्रष्ट व्यवहारांपोटी गोत्यात येणार आणि देशालाही गोत्यात आणणार हे स्पष्ट आहे. त्यासाठी हिंडेनबर्गची गरज नाही.
□ महाराष्ट्रात कुणीच सेफ नाही; सैफ अली खानवर हल्ला करणारा अजूनही मोकाटच.
■ मुंबईतली चित्रपटसृष्टी अस्थिर करणं सुरू आहे. हा मोठा व्यवसाय इथून बाहेर पडला की हजारो लोकांचा रोजगार संपेल. बाकीचे अनेक उद्योग बाहेर गेले आहेत, कार्यालयं गुजरातला पळवली जात आहे. महाराष्ट्रातली जनता दीड दोन हजारांपायी स्वत्त्व गहाण ठेवून राज्याला भिकारी करणार्यांना सामील होणार असेल, तर सेफ कोण असेल?
□ लोकांना तुरुंगात डांबणे एवढेच ईडीला कळते – सर्वोच्च न्यायालयाचे तपास यंत्रणेवर कडक ताशेरे.
■ ते खाल्ल्या बिस्कुटांचे गुलाम! देशातली एकही यंत्रणा कणा राखून वागताना दिसत नाही. आपल्या पदाची गरिमा राखणारे कणखर अधिकारी दिसत नाहीत. न्यायालयाने कान उपटून उपयोग काय? त्या यंत्रणेत तरी वेगळं काय सुरू आहे?
□ होय, ईडीमध्ये ‘कुछ गडबड है’! – सुप्रीम कोर्टात केंद्राचे वकील ‘खरे’ बोलले.
■ ते हे खरं बोलले कारण खरं बोललं तरी काहीही बिघडणार नाही, हे त्यांना माहिती आहे. एखाद्या अधिकार्याच्या भ्रष्टतेचा बिनबोभाट बभ्रा होतो तेव्हा ती त्याची जाहिरात असते, कारण मग रेट कार्ड ठरवणं सोपं जातं… तसंच आहे हे. ईडी बेबंदपणे वागू शकते, बिनधास्त वागते, याची जाहिरातच आहे ही.
□ पगारासाठी बेस्टच्या काळा किल्ला आगारातील कंत्राटी चालक संपावर…
■ बेस्टला वर्स्ट बनवून संपवायचीच सुपारी आहे… एकदा ते झालं की अदानी महोदयांच्या बसगाड्या येतील रस्त्यावर. त्या पाच रुपये तिकीटात कुठेही नेणार नाहीत, हे कळेपर्यंत वेळ गेली असेल. बेस्ट काळ आपण आपल्या कर्माने गमावला आहे.
□ एनटीसीच्या कर्मचार्यांना तीन महिन्यांपासून पगार नाही – खायचे काय? जगायचे कसे?
■ जाब विचारा, रस्त्यावर उतरा, मोर्चा काढा. काहीतरी करा. व्हॉट्सअपवरचे बनावट फॉरवर्ड, छपरी रील्स यांच्यातून बाहेर पडला नाहीत तर उपाशीच मरायची वेळ येईल, सगळ्यांवर.
□ गंगेत डुबकी मारल्यावर त्वचारोग होतो – मुनगंटीवार.
■ मुनगंटीवार खरं बोलतायत. गंगेच्या पाण्यातले औषधी गुण ही भाकडकथा बनली आहे आजच्या काळात. गंगाकिनारी राहणार्या लोकांनी ती सर्व प्रकारे अस्वच्छ करून टाकली आहे. तिच्या पाण्यातले सगळे गुण नष्ट करून टाकले आहेत त्यात मैला, प्रेतं, सांडपाणी, केमिकल्स सोडून… फक्त अचानक ही खरं बोलण्याची उबळ मुनगंटीवारांना का आली, हा प्रश्न मात्र पडतो.
□ सिडकोच्या अध्यक्षपदावरून संजय शिरसाट यांना डच्चू; मंत्रीपद मिळूनही लाभाच्या पदाला चिकटले होते.
■ हकालपट्टी केली जाण्याची वेळ यावी, इतकं काय आहे त्या पदात, नेमका कसला आणि किती गोंद आहे, याचा विचार आपण कधी करणार की नाही? नाहीतर एक जळू गेली आणि दुसरी चिकटली, तर उपयोग काय? रक्त आपलंच शोषलं जाणार आहे.
□ वाल्मीक कराडचे अमेरिका कनेक्शन उघड.
■ त्याचं चंद्रावरही कनेक्शन असेल आणि मंगळावरही असेल. हे सगळं होत असताना सगळ्या यंत्रणा झोपल्या होत्या आणि कुणालाही उठून छळणारी ईडी अजून घोरत पडली आहे, याची नोंद कशी करायची?
□ शहापुरातील ‘लाडक्या बहिणीं’च्या हंड्यात डबक्याचे पाणी; कोट्यवधींच्या योजना गेल्या कुठे?
■ कोट्यवधींच्या योजना मतांसाठी खिरापत खर्च करण्यात गेल्या. ज्यांना मिळाले त्यांचेही पैसे काढून घेतले जाणार आहेत. म्हणून मत देताना अक्कल गहाण ठेवायची नसते. आपल्याला कोणी स्वत:च्या खिशातून पैसे देत नाहीये, ही आपलीच पाकीटमारी आहे, याचं भान ठेवायचं असतं.
□ लाडकी बहीण आणि मोदींच्या सभांसाठी ठाण्यात टीएमटी बसेस दावणीला.
■ त्यांची बिलंही थकवली गेली आहेत. अशा न्यायाने नंतर मेकअप, मश्रूम, भाड्याने आणलेले किंवा शिवून घेतलेले कपडे, जाकीटं, हूडी यांचा केवढा खर्च देशाच्या बोकांडी बसणार आहे, ते सांगता येत नाही.
□ लग्न, पूजेत ठीक आहे, पण राजकारणात धर्म कशाला? – प्रणिती शिंदे यांचा सवाल.
■ मुळात पूजाअर्चा सोडल्यास तो इतर कशातही, अगदी लग्नातही कशाला? शिवाय, पूजाअर्चा हे खासगी, व्यक्तिगत प्रकरण आहे. जो काही धर्म पाळायचा तो चार भिंतींआड. तो जेव्हा राज्यकारभारात शिरतो तेव्हा देशाचं काय मातेरं होतं, हे आपण अफगाणिस्तान, पाकिस्तान यांच्याकडे पाहूनही शिकलो नाही आणि त्यांना कमी लेखतो, हे किती केविलवाणे आणि विनोदी आहे.
□ बायको दारू पिते, ही क्रूरता नव्हे – हायकोर्टाने नवर्यांची ‘उतरविली’.
■ नवरा रोज कंपनी देत नसेल, तर ती मात्र क्रूरता ठरू शकते.
□ मुंबई गुन्हे शाखेचा दरारा संपला; खबरे उल्लू बनवतात.
■ पोलिसांच्यात काही धमक उरणार नाही, याची खबरदारी घेतली गेली आहेच. त्यांनीही मंत्र्यासंत्र्यांचे पित्तू आणि ‘कलेक्टर’ बनण्यात आनंद मानला आहे. आता सगळ्या देशाची सुरक्षा रामभरोसेच आहे.