पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच ‘मी देखील एक माणूस आहे; देव नाही. त्यामुळे माझ्याकडूनही चुका घडू शकतात’ असं विधान एका पॉडकास्टमध्ये केलं. त्यांच्या या विधानाशी कोणीही असहमत असू शकत नाही. माणूस म्हटलं म्हणजे चुका ह्या होणारच. चुकला नाही तो माणूस कसला? चुका करणं आणि त्यातून शिकत जाणं हा माणसाचा स्थायीभाव आहे.
मोदींचं हे विधान वरकरणी कितीही निष्पाप आणि निरुपद्रवी वाटत असलं तरी सखोल विचार केल्यास त्यातला उथळपणा जाणवल्याशिवाय राहात नाही. हे विधान करताना मोदींनी कोणताही सारासार विचार केलेला दिसत नाही असं लगेचच लक्षात येतं.
एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीने त्याच्या व्यक्तिगत किंवा सार्वजनिक जीवनात काही चुका केल्यास त्याचे बरेवाईट परिणाम हे त्याच्या परिघापुरतेच मर्यादित राहतात. इतरांच्या आयुष्यावर त्याचा फारसा काही परिणाम होत नाही. मात्र देशाचे सर्वोच्च पद भूषवणार्या एखाद्या व्यक्तीने व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात चुका केल्यास त्याचे संपूर्ण देशावर दूरगामी परिणाम दिसून येतात. अशा व्यक्तीचे देशभरात लाखो चाहते पसरलेले असतात. हे चाहते त्याच्यापासून प्रेरणा घेत असतात. त्याचं अंधानुकरण करून त्याच्या पावलावर पाऊल टाकण्यात धन्यता मानत असतात. त्याची एकंदर वर्तणूक ही भल्याबुर्याचे मापदंड ठरवत असते आणि त्यातून देशाच्या राष्ट्रीय चारित्र्याला एक प्रकारचा आकार मिळत असतो. त्यामुळे सर्वोच्च स्थानावर असलेल्या एखाद्या व्यक्तीनं अतिशय जबाबदारीने वागणं आणि बोलणं अपेक्षित असतं.
देशाच्या सर्वोच्च स्थानावर विराजमान झालेल्या व्यक्तीने व्यक्तिगत आयुष्यात चुका केल्यास त्याचा परिणाम केवळ जनमानसापुरताच मर्यादित असतो. मात्र देशाची ध्येयधोरणं आखताना चुका केल्यास त्याचे परिणाम करोडो लोकांना प्रदीर्घ काळ भोगावे लागतात. गोरगरीबांची तर अक्षरश: वाताहत होऊन त्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अशा व्यक्तीनं अतिशय शांतपणे, सर्वसंमतीनं आणि विचारपूर्वक निर्णय घेणं अगत्याचं ठरतं.
मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी कोणालाही विश्वासात न घेता अचानक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रकट होत नोटबंदीचा निर्णय जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या चलनी नोटा एका रात्रीत रद्द केल्या. त्यामुळे सगळीकडे एकच गोंधळ माजला. रोख रकमेची चणचण निर्माण होऊन सगळेच आर्थिक व्यवहार ठप्प झाले. खेळते भांडवल नसल्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले. हा सगळा अट्टाहास कशासाठी करण्यात आला, तर म्हणे अर्थव्यवस्थेतून काळा पैसा बाहेर काढण्यासाठी! हा काळा पैसा खरोखर किती प्रमाणात बाहेर आला? या प्रश्नाचं उत्तर तर मोदीच जाणोत. काळा पैसा बाहेर येणं तर दूरच; पण नोटबंदी करताना आपल्या पक्षातील लोकांचं हित जपल्याचेही आरोप झाले. हा प्रयोग सपशेल फसला. ह्या धक्क्यातून देशाची अर्थव्यवस्था आजही पूर्णपणे सावरलेली दिसत नाही. नोटबंदीपासून आपल्या उद्योगधंद्यांना लागलेली उतरती कळा आजही कायम आहे. देशाचे सर्वोच्च पद भूषवणार्या व्यक्तीनं केलेली एखादी चूक देशाला कशी महागात पडू शकते हे अवघ्या देशानं अनुभवलं. वास्तविक ह्या प्रकरणाची नि:पक्षपणे राष्ट्रीय स्तरावर कारणमिमांसा झाली असती तर भविष्यात अशा चुका टाळायला मदतच झाली असती. पण तसं करायचं सोडून, ‘मी देखील एक माणूस आहे; देव नाही. माझ्याकडूनही चुका घडू शकतात,’ असं विधान करणं म्हणजे केलेल्या चुकांवर पांघरूण घालण्यासारखं आहे. सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी केलेलं हे एक नाटकी छापाचं पोकळ विधान आहे असंच वाटतं.
अगदी अलिकडेच ‘मला थेट परमात्म्याने पाठवलं आहे’ असं विधान करून मोदींनी एकच धमाल उडवून दिली होती. त्याच्या ह्या विधानामुळे मुगल सुलतान गयासुद्दीन बल्बन याची आठवण झाली. त्याने स्वतःला ‘जिल-ए-इलाही’ अर्थात ‘ईश्वराची सावली’ अशी उपाधी लावून घेतली होती. त्यामुळे थेट परमात्म्यानं धाडलेल्या मोदींची तुलना अपरिहार्यपणे गयासुद्दीन बल्बनशी झाल्यावाचून रहात नाही. शिवाय कधी ‘मला थेट परमात्म्याने पाठवलं’ म्हणायचं तर कधी ‘मी देव नाही म्हणायचं.’ अशा परस्परविरोधी विधानांमुळे मोदींच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असावा. मोदींना देव म्हणायचं की अजून वेगळंच काही हा प्रश्न पडून तेही नक्कीच बुचकळ्यात पडत असावेत.
ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची उणीव प्रकर्षाने जाणवल्याशिवाय राहात नाही. डॉ. सिंग यांनी पंतप्रधान असताना सर्वोच्च पदावरील व्यक्तींनी धोरणात्मक निर्णय कसे घ्यायला हवेत याचा एक आदर्श वस्तुपाठच घालून दिला होता. स्वत: एक नामांकित अर्थतज्ज्ञ असूनही आपल्या जुन्या जाणत्या सहकार्यांशी व घनिष्ठ मित्रांशी विचारविनिमय करण्यात त्यांना कधीही कमीपणा वाटला नाही. त्यामुळे सर्वांशी साधकबाधक चर्चा करूनच ते अंतिम निर्णय घेत. निर्णयप्रक्रियेत सर्वांना सामील करून घेतल्यामुळे त्यांचे सर्व निर्णय अचूक ठरत.
डॉ. सिंग देशाचे अर्थमंत्री असताना त्यांनी वित्तीय क्षेत्राचं वार्तांकन करणार्या फायनान्शियल टाइम्स ह्या वृत्तपत्राच्या लंडनस्थित कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी डॉ. सिंग यांनी त्यांचे एकेकाळचे सहकारी मार्टिन वुल्फ आणि स्तंभलेखक मार्टिन लॅम्बर्ट यांची आवर्जून भेट घेतली. त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा रंगात आलेल्या असताना मार्टिन वुल्फ यांनी डॉ. सिंग यांना ‘भारतात आर्थिक गुंतवणूक वाढवण्यासाठी धोरणात्मक बदल का करत नाही’? असा प्रश्न केला. यावेळी डॉ. सिंग यांनी त्यांना अतिशय बाणेदारपणे उत्तर दिले. ‘मलाही अर्थशास्त्र समजतं. पण तुमच्यात आणि माझ्यात एक मूलभूत फरक आहे. तुमच्या स्तंभलेखात केलेली एखादी चूक तुम्ही पुढच्या स्तंभलेखात दुरुस्त करू शकता. पण मी एखादी चूक केली तर त्याचे परिणाम माझ्या करोडो देशवासियांना कायमचे भोगावे लागू शकतात’. ह्या उत्तराने लॅम्बर्ट खजील झाले. डॉ. सिंग धोरणात्मक निर्णय घेताना किती सतर्क व संवेदनशील असत, हेच यातून दिसून येतं.
चुका करणं हे मानवी आहे, तर त्या माफ करणं दैवी आहे अशा आशयाचे एक सुभाषित आहे. त्यामुळे मोदी यांचा चुका करण्याचा अधिकार अबाधित ठेवून आपण त्यांना माफ करू या आणि ते पुन्हा अशा चुका करणार नाहीत अशी अपेक्षा करुया.
– स्वप्नील गायकवाड