पुरुषी बलात्कारी प्रवृत्तीपुढे उद्ध्वस्त झालेली स्त्री आणि त्याभोवती राजकीय, सामाजिक हिंसाचाराचे थैमान! हे कथानक म्हणजे नाटककार जयवंत दळवी यांचे ‘पुरुष’ हे नाटक!
दर्जेदार नाटकांच्या दालनात एका पिढीने अनुभवलेले हे नाटक, ज्यात जिवंत, विलक्षण, भेदक, थरारक असा नाट्यानुभव होता. अन्यायावर प्रहार करून चोख प्रत्युत्तर देण्याचा मेसेजही त्यातून अधोरेखित करणारा. ‘कलावैभव’ या नाट्यसंस्थेतर्पेâ १९८२च्या सुमारास हे नाट्य रंगभूमीवर प्रगटले. आज वयाची ४३ वर्षे झाली तरी नाटकातील आशय कालबाह्य झालेला नाही. मोबाईल आले. टीव्ही रंगीत झाले. इंटरनेटने उभे जग बोटाच्या तालावर आले. राजकीय समीकरणेही बदलली. पण यातील विषय हा आजही कुठेतरी सत्यकथा वर्तमानकथा म्हणून दिसतोय. हे श्रेय नाटककार जयवंत दळवी यांच्या सिद्धहस्त प्रतिभासंपन्न लेखणीला आहे.
नाटककार दळवी यांच्या कथा, कादंबर्यावरून दहाएक नाटके रंगभूमीवर आलीत. त्यात कादंबर्यावरून बॅरिस्टर (अंधारातील पारंब्या), महासागर (अथांग), दुर्गी (सावल्या), सावित्री (अधांतरी,) मुक्ता (वेडगळ), नातीगोती (ऋणानुबंध) आणि कथांवरून सभ्य गृहस्थ हो, संध्याछाया, स्पर्श, कृष्णलीला या काही गाजलेल्या नाटकांचा उल्लेख करता येईल. पण स्वतंत्रपणे ‘नाटक’ म्हणून आलेल्या नाटकांत सूर्यास्त, पर्याय, कालचक्र, किनारा आणि पुरुष! या नाटकांना कुठेही कथा, कादंबरीचा आधार नाही. कथा-कादंबरीचे तंत्र निवेदनात्मक तर नाटक त्यापासून पूर्णपणे हट के. या ‘दृश्यश्राव्य’ माध्यमात कायापालट करताना त्यांच्यातला नाटककार चाणाक्षपणे सामोरा जातो. कदाचित कथा-कादंबरी पूर्ण झाली तरी त्यातला विषय त्यांना नाटककार म्हणून खुणावत असेल. असो. पण इथे ‘पुरुष’ हे नाटक सर्वस्वी वेगळ्या वाटेवरले अन् वळणावरले म्हणावे लागेल. म्हणूनच आज नव्या पिढीला हे नाटक मर्यादित प्रयोगांपुरते का होईना सादर करण्याला मोह होतोय आणि रसिक प्रेक्षकही हाऊसफुल्ल गर्दीने त्याचे स्वागत करतोय.
ऐंशीच्या दशकातील प्रारंभीचा काळ. कारण त्यावेळी सिमेंटचा प्रश्न, दलित चळवळ, नामांतर, आरक्षण, साखरसम्राटांची नवी पिढी या घटना चर्चेत होत्या. उभा समाज त्यात अडकलेला. सामाजिक वास्तवता आणि त्यामुळे ग्रासलेली जनता. या सार्या पार्श्वभूमीवर हे कथानक आहे, जे अनेक घटनांशी आजही थोड्याबहुत प्रमाणात सांगड घालणारे आणि डोळे उघडविणारे आहे.
गांधीवादी विचारांचे आदर्श शिक्षक अण्णासाहेब आपटे आणि त्यांची पत्नी ताराबाई यांच्या घरातून नाट्याला प्रारंभ होतो. अण्णासाहेबांना राष्ट्रपतींच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी बैठका, सभा, भेटीगाठी सुरू आहेत. त्यांना अंबिका ही तरुण मुलगी आहे. तिच्या मनात दलित चळवळीतल्या सिद्धार्थशी लग्नाचा विचार चालू आहे. सिद्धार्थ चळवळीत गुंतलेला. लग्न झालं तर संवाद कसा काय करणार, हा प्रश्न आहे. दरम्यान मतलबी राजकारणी गुलाबराव जाधव अण्णांच्या घरी अभिनंदन करण्यासाठी येतो. अंबिकेची शाळा आहे. शाळेसाठी देणगी मिळावी म्हणून तिचे प्रयत्न सुरू आहेत. गुलाबराव तिला देणग्या मिळवून देण्यासाठी डाक बंगल्यावर बोलवतो आणि तिच्यावर बलात्कार करतो. पोलीस स्टेशन गुलाबरावांच्या हाती असल्याने प्रकरण दाबले जाते. मोर्चे, कोर्टकचेरी यामुळे अंबिकाचा बलात्कार जगापुढे येतो. त्यामुळे आई ताराबाई आत्महत्या करते. भावी नवरा सिद्धार्थ दूर जातो. अण्णा हताश होतात. याचा सूड घेण्यासाठी अंबिका एक नाटक रचते. स्त्रियांना हुकमतीत ठेवणारं एकमेव पुरुषी शस्त्र, गुलाबरावाच्या अहंकाराचं मूळ नष्ट करते. पुरुषी बेताल प्रवृतीचा बदला अंबिका घेते, अशी ही कथा.
या कथेपेक्षा त्यातील दलित-सवर्ण वादविवाद, राजकारणी आणि समाजकारणी यातील फरक, विकाऊ पत्रकारिता, स्त्री-पुरुष संघर्ष, बलात्काराला चोख प्रत्युत्तर हे सारं काही लक्षवेधी ठरते. कथानकाभोवती असणारे मानवी मनाचे एकेक पापुद्रे नाट्याला एका वैचारिक उंचीवर घेऊन जाते. नाट्याचा शेवट स्फोटक असूनही बलात्काराचा विषय मांडताना नाटककाराने त्यात कुठेही सुसंस्कृत पातळी घसरू दिलेली नाही. ही कमाल जयवंत दळवी यांच्या लेखणीची आहे. संघर्षमय प्रश्नांचे न सुटणारे ताळेबंद सोडविण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो.
पन्नास प्रयोगापुरते रंगभूमीवर आलेल्या या नाटकाला जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीची पार्श्वभूमी आहे. एक काळ उलटला असला तरीही त्यांची नाटके व कथा, कादंबर्या आजही मराठी रसिक, वाचक यांच्या मनात घर करून बसल्या आहेत. दळवींच्या नाटकांना मिळालेले यश हे क्वचितच कुठल्याही नाटककाराला मिळाले असेल. त्यात ‘पुरुष’ नाटक म्हणजे ‘मास्टरपीस’ म्हणावे लागेल. काळाआड जाणारी अशी दर्जेदार नाटके नव्या रसिकांपुढे येत असल्याने रंगेतिहास जागा होतोय हेही नसे थोडके!
मूळ प्रयोगाचे दिग्दर्शन विजया मेहता यांनी केले होते. त्यामुळे नाट्याच्या सादरीकरणाला कमालीची अर्थपूर्णता प्राप्त झाली होती. ताकदीच्या रंगकर्मींची फौजच जणू या निमित्ताने एकत्र आली. नाना पाटेकर यांचा गुलाबराव हा खलनायक असला तरी ‘शोले’तल्या गब्बरसिंगप्रमाणे तो या नाटकाचे तेव्हा आकर्षण ठरला होता. चंद्रकांत गोखले या बुजुर्ग रंगधर्मीचा आदर्श शिक्षक अण्णा, रिमा लागू यांची अंबिका, उषा नाडकर्णींची ताराबाई आणि सतीश पुळेकर यांचा सिद्धार्थ… ही टीम. दोन हजारावर प्रयोगांचा विक्रम या नाटकाने पहिल्या प्रवासात पार केला.
या प्रयोगाच्या आठवणी या आजही दर्दी रसिकांच्या मनात आहेत, याची प्रचिती आताही प्रयोगातून येत आहे. दोन्ही प्रयोगांची तुलना करण्याचा प्रश्न नाही. पण मजबूत संहितेच्या पायावर हे नाट्य ताकदीने उभे आहे.
गुलाबरावाच्या भूमिकेत शरद पोंक्षे. पुरुषी अहंकाराचा स्वार्थी आणि निर्लज्ज राजकारणी म्हणून शोभून दिसले आहेत. देहबोली आणि लकबी भन्नाटच. सत्ता-संपत्तीचा वैâफ एकूणच गुलाबरावाच्या प्रत्येक हालचालीतून दिसतो. तंबाखू खाण्याची तर्हा तसेच डाक बंगल्यातल्या दोन्ही प्रसंगातला वावर भूमिकेला न्याय देणारा. त्यांच्या आजवरच्या भूमिकांमध्ये वेगळेपण सिद्ध करणारी ही भूमिका आहे. अंबिकाच्या भूमिकेत स्पृहा जोशी, प्रारंभी खेळकर, आनंदी, नंतर बलात्काराच्या प्रसंगानंतर चिडलेली. शेवटी सूड घेण्यास खंबीरपणे सज्ज झालेली. अशा तिच्या विविध छटा नजरेत भरतात. संवादफेक उत्तम. गांधीवादी आदर्श शिक्षकाच्या भूमिकेत अविनाश नारकर यांच्या आवाजातील थरथर तसेच चाल लक्षवेधी ठरते. काहीदा चंद्रकांत गोखले यांच्या अण्णांची आठवण करून देणारी. अनुपमा ताकमोगे यांनी ताराबाई रंगविताना भूमिकेची नेमकी जाण ठेवली आहे. फटकळ बोल, बोचरी मार्मिक टीका यामुळे पहिल्या अंकात अनेक हशे-टाळ्या वसूल केलेत, तर दुसर्या अंकातील ‘हताश आई’ जी आत्महत्येपर्यंत पोहचते.
दलित कार्यकर्ता आणि अंबिकाचा भावी पती सिद्धार्थ. त्याची दोन परस्परविरुद्ध रूपे निषाद भोईर याने चांगली रंगवली आहेत. अंबिकाशी लग्नाचा विचार करणारा, पण बलात्कारानंतर ‘आमचा लढा जातीपुरता’ असे म्हणतो. दोघांतील संवादफेक विचार करायला लावणारा. नेहा परांजपे, ऋषिकेश रत्नपारखी, संतोष पैठणे यांच्या भूमिकाही साथसोबत करणार्या आहेत. सुयोग्य पात्रनिवड हीदेखील जमेची बाजू ठरलीय.
बलात्कारासारखा ‘हॉट’ विषय हा भडक होणार नाही, तसेच नाटकाच्या दोन्ही प्रयोगांची तुलना करणार्या रसिकांचा बेरंग होणार नाही, याची पुरेपूर दक्षता दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांनी घेतली आहे. अर्थात मूळ नाटक बघणारे रसिक कमी प्रमाणात असतील. अंगाला स्पर्शही न करता गुलाबराव याचा स्पर्श हा काहीदा अंबिकाच्या सर्वांगावर दिसतो. कोर्टातली उलटतपासणी तसाच मधू-अंबिका संवाद रेंगाळणार नाही याचेही भान ठेवले आहे. नाट्याचा वेग उत्तम. प्रारंभ-मध्य-शेवट अशा चढत्या कमानीतून नाट्य कळसापर्यंत पोहचते आणि सुन्न करून सोडते. रंगभूमीच्या सर्वच दालनांचा अनुभव गाठीशी असल्याने दिग्दर्शक म्हणून राजन ताम्हाणे नजरेत भरतात. त्यांची तांत्रिक बाजूंवरली कल्पकता उत्तम. त्यांचे हे ८३वे नाटक. अनुभवसंपन्न अभ्यासू दिग्दर्शकाचा रंगस्पर्श नाटकाला मिळालाय. संहितेत कुठेही बदल नाही. म्हणून हे नाटक पुनरुज्जीवन वाटत नाही तर सादरीकरणातून ते ‘फ्रेश’ वाटत राहाते.
नेपथ्यकार प्रदीप पाटील यांच्या नेपथ्यरचनेत घर, फुलबाग आणि डाक बंगला शोभून दिसतो. रंगसंगती चांगली आहे. त्यामुळे वातावरणनिर्मिती होते. स्वतः दिग्दर्शकांनीही प्रकाशयोजना केली आहे. त्यात बलात्कार आणि बदला हे दोन्ही प्रसंग ठळकपणे प्रकाशमान केलेत. विजय गवंडे यांचे संगीत आणि मंगल केंकरे यांची वेशभूषा नोंद घेण्याजोगी आहे. तांत्रिक बाजूंनी हे नाट्य चांगले बांधले आहे.
पडदा पडला तरी नाट्य संपत नाही. ते रसिकांना कमालीचे अस्वस्थ करते. विचार करायला भाग पाडते. हेच या प्रयोगाचे यश म्हणावे लागेल. विनोदासाठी विनोद असलेल्या करमणूकप्रधान नाटकांच्या गर्दीमध्ये ‘पुरुष’सारखे वैचारिक चौकट मांडणारे नाट्य रसिकांना खुणावते आहे. त्याला तत्कालीन सामाजिक राजकीय संदर्भ असला तरीही त्यातील विषय आजही कालबाह्य झालेला नाही. अशा दर्जेदार नाट्यकृतींचे पन्नास नव्हे तर पाचशे प्रयोग व्हावेत, ही अपेक्षा.
पुरुष
लेखक – जयवंत दळवी
दिग्दर्शक/प्रकाश – राजन ताम्हाणे
नेपथ्य – प्रदीप पाटील
संगीत – विजय गवंडे
वेशभूषा – मंगल केंकरे
निर्मिती संस्था – मोरया/भूमिका/अथर्व