बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह नऊजणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. इतर आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना आधीच मोक्का लावण्यात आला होता. नंतर विरोधी पक्षांच्या आंदोलनानंतर कराडविरुद्ध मोक्का लावण्यात आला. कराडविरुद्ध मोक्का लागताच कराड समर्थकांतर्पेâ एक दिवस परळी बंदचे आयोजन करण्यात आले. या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे.
खून, खंडणी, अपहरण, अंमली पदार्थांची तस्करी, हप्तेवसुली, सुपारी देणे अशा संघटित स्वरूपातील गुन्हे करणार्या टोळींवर मोक्का कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येतो. मोक्का लावण्यासाठी संबंधित टोळीतील सदस्यांवर गेल्या १० वर्षांत एकापेक्षा जास्त आरोपपत्रं दाखल असणे गरजेचे आहे. मोक्काची कारवाई केलेला खटला विशेष कोर्टात चालविला जातो. भारतीय दंडविधान संहितेअंतर्गत देण्यात येणारी शिक्षाच मोक्का कायद्यांअंतर्गत लागू होते. कमीतकमी पाच वर्षे ते जन्मठेप अशा स्वरूपात शिक्षा असू शकते. शिवाय मोक्का सिद्ध झालेल्या आरोपींवर पाच लाखांपर्यंत दंडही लावता येऊ शकतो. कराड विरोधक त्यांना फाशीची मागणी करीत आहेत तर त्याचे समर्थक त्यांना या गुन्ह्यात नाहक गुंतवण्यात आलंय असा दावा करून अजूनही अधूनमधून मोर्चा काढत आहेत. एसआयटी या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहे.
वाल्मीक कराड परळी नगरपरिषदेचा माजी नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि माजी गटनेता, नाथ प्रतिष्ठानचा सदस्य, बीड जिल्हा स्थायी समिती सदस्य आणि गेल्या १० वर्षापासून परळी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचा (आता अजित पवार गट) नेता होता आणि विद्यमान मंत्री धनंजय मुंडेंच्या राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत होता. बीडमधील पोलीस ठाण्यात खंडणीशी संबंधित गुन्हा त्याच्याविरुद्ध दाखल आहे. त्याच्या अटकेनंतर बीड आणि खासकरून परळीबद्दल इतकी नकारात्मक माहिती समोर आली की संपूर्ण महाराष्ट्रात हे गाव बदनाम झालं. परळी आणि बीडच्या लोकांकडे इतर लोक संशयाने बघू लागले. परळीकरांना याबद्दल काय वाटतं?
परळीवर राखमाफियांचे साम्राज्य असल्याचा आणि यापायी सर्रास खून होत असल्याचा आरोप होत आहे. मात्र गुन्हेगारीपायी बीड अशांत टापू झाला असून एका वर्षात परळीत १०९ खून झाल्याचा विरोधी पक्षाचा आरोप स्थानिक नागरिकांना मान्य नाही. परळी वैजनाथचे बाजीराव धर्माधिकारी म्हणतात की महाराष्ट्र राज्याला ‘टाडा’, ‘मोक्का’सारखे कठोर कायदे देणारे आणि मुंबई शहर ‘अंडरवर्ल्डमुक्त’ करीत राज्याचे आदर्श गृहमंत्री म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणारे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची परळी ही कर्मभूमी आहे. कर्तृत्ववान युवा सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली, त्यांची लेकरं पोरकी झाली, चिमुकल्यांना बघून महाराष्ट्र हळहळला. या नीच दहशतवादी प्रवृत्तीच्या मारेकर्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत गप्प बसता कामा नये. पण आता मुख्य उद्दिष्ट भरकटत आहे. परळीत एका वर्षात १०९ खून म्हणजे सरासरी तीन दिवसांत एक खून हे अतिरंजक आहे. ना पोलीस डायरीत नोंद, ना पोस्टमार्टम रिपोर्ट, ना प्रेतांसाठी नातेवाईकांनी केलेला क्लेम. या परिस्थितीत एका वर्षाला १०९ खून या म्हणण्याला काही आधार नाही.
ते सांगतात, परळी हे दक्षिण मध्य रेल्वेचे मोठे रेल्वे जंक्शन असल्याने देशभरातून अनेक बेघर लोक परळीत येतात. वैद्यनाथ मंदिर आणि रेल्वे स्थानक परिसरात काहीजण भीक मागतात आणि नंतर इथेच स्थिरावतात. अनेकांचा शेवट इथेच होतो. त्यात बरेच मानसिक रुग्णही असतात. अशा बेवारस प्रेतांचा अंत्यविधी करण्यासाठी नगरपरिषदेने आकस्मिक निधीची तरतूद करुन वेगळी यंत्रणा उभारली आहे. म्हणून मृत व्यक्तीची आकस्मिक खर्च रजिस्टरमध्ये नोंद असणे आवश्यक आहे. किमान स्मशानभूमीतील रजिस्टरमध्ये नोंद असायलाच हवी. अशा नोंदीच नसतील तर वारेमाप खुनांच्या आरोपाला काय अर्थ आहे?
काशीपेक्षा जवाभर पुण्यभू असलेल्या परळीचे महात्म्य अधिक आहे. परळीत आलेले मरण थेट कैलासाला घेऊन जाते, अशी आमची समजूत आहे असं सांगून धर्माधिकारी म्हणतात की परळी आमची चिताभूमी आहे, असे आम्ही मानतो. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारी आमची धन्वंतरी प्रभु वैद्यनाथांची नगरी, स्वत: ईश्वराने ज्यांच्यासाठी व्याघ्ररूप धारण केले असे थोर संत जगमित्र नागांची ‘जगमित्र भूमी’, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केलेले आणि समुद्रमंथनात देवांनी या स्वयंभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगात अमृत लपवून ठेवले अशी आख्यायिका असलेली आमची अमृतभूमी म्हणजे परळी. आमच्या ‘ऊर्जानगरीचे’ माहात्म्य वर्णन करण्यासाठी एक अख्खा दिवस कमी पडेल. मात्र आज बदनामीमुळे वैद्यनाथ नगरी हलाहल पचविण्यासाठी सिद्ध झाली आहे आणि यासाठी हलाहल पचवणारा साक्षात ‘नीळकंठ’ आमच्यासोबत आहे हे निश्चित, असें धर्माधिकारी म्हणतात.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना राष्ट्रीय पीक विमा धोरणात अमूलाग्र बदल करायला प्रेरणा देणारे, पीक विमा जनक ठरलेले कृषीमहर्षी स्व. पंडितअण्णा मुंडे यांची परळी ही जन्मभूमी आहे. परळीत राखेपासून वीटनिर्मिती आणि त्यातून उभारले गेलेले ‘ब्रिक हब’ हे हजारो कुटुंबांचे उपजीविकेचे साधन आहे. राखेमुळे आरोग्यविषयक आणि पर्यावरणाशी संबंधित समस्या निर्माण झाल्या असतील तर याबाबत कठोर व्यवस्थापन ही काळाची गरज आहे, या बाबीशी धर्माधिकारी सहमत आहेत.
या बदनामीमुळे परळीतील एका इन्स्टिट्यूटला प्रशिक्षणासाठी येणारे विद्यार्थी कमी झाले आहेत. परळीच्या बाहेर जिल्ह्यात शिकणार्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत असून त्यांच्याकडे आपराधिक नजरेने बघितले जात आहे. परळीतला मोठा वर्ग उदरनिर्वाहासाठी बाहेर आहे. त्यांना साशंक नजरेने पाहिले जात आहे. या बदनामीमुळे उद्या परळीतील मुलांची लग्ने जमणार नाहीत. परळीत कुणी मुलगी देणार नाही आणि व्यापारही बंद पडेल, अशी भीती धर्माधिकारी व्यक्त करतात.
उद्या नेत्यांचे आपापसातील वाद मिटून जातील. प्रसारमाध्यमांना वेगळ्या बातम्या मिळतील. समाजधुरीणांना वेगळा मुद्दा आणि सामाजिक कार्यकर्त्यांना दुसरा जिल्हा मिळेल. पण शिल्लक राहील तो मुद्दा म्हणजे परळीवर या काळात झालेले जखमांचे व्रण आणि स्व. संतोष देशमुखांना योग्य न्याय मिळेल की नाही? म्हणून परळीची बदनामी नेत्यांनी आणि माध्यमांनी थांबवावी.
महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनचे परळी निवासी अध्यक्ष कैलाश तांदळे यांच्या मते पवनचक्कीचा ठेका असो, औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातून राख उचलण्याचे काम असो, इतर शासकीय कामाचा ठेका असो किंवा बेनामी मालमत्तेचा मुद्दा असो, काही माफियांची संबंधितांकडून खंडणी/ प्रोटेक्शन मनी वसूल करण्याची पद्धत इतर जिल्ह्यांप्रमाणे परळीतही प्रचलित आहे. अशा खंडणी बहाद्दरांचा उपयोग राजकीय नेते करून घेतात ही वस्तुस्थिती आहे. मात्र या प्रकरणाला जातीय, मराठा विरुद्ध वंजारी असेही वळण लागत आहे. शिवाय या हत्या प्रकरणामुळे परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रात येणार्या भाविकांच्या संख्येतही थोडीफार घट दिसून येते.