ऑस्ट्रेलिया दौर्यातील पराभवानंतर ‘बीसीसीआय’नं मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसह कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, आदी तारांकित क्रिकेटपटूंसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केलीत. संघातलं वातावरण बिघडलंय, अशा अनेक बातम्या बाहेर येतायत. पुढील क्रिकेट आव्हानांना सामोरे जाण्यापूर्वी क्रिकेटपटूंनी कुटुंबासह ताडोबा येथे ‘रो-को’ (रोहित-कोहली) आत्मचिंतन शिबिराचा घाट घातला होता. त्या बैठकीत काय घडलं, याचा इतिवृत्तांत…
– – –
ऑस्ट्रेलिया दौर्यातील दारुण पराभवाचे तीव्र पडसाद ‘बीसीसीआय’च्या आढावा बैठकीत उमटले. तारांकित क्रिकेटपटू विरुद्ध प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी एकमेकांची उणीदुणी काढली. परिणामी ‘बीसीसीआय’नं क्रिकेटपटू आणि मार्गदर्शकांसाठी नवी आचारसंहिता जाहीर केली. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि गंभीर यांनाच प्रामुख्यानं हा शिस्तीचा बडगा उगारण्यात आलाय. संघातील खेळाडूंची योग्य साथ न मिळाल्यामुळे एकीकडे गंभीर अस्वस्थ आहे, तर दुसरीकडे रोहित आणि विराट यापुढे परदेश दौर्यावर पत्नींची सोबत औटघटकेची ठरणार म्हणून चिंताग्रस्त स्थितीत होते. लय हरवल्यामुळे ‘बीसीसीआय’नं रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत खेळण्याचेही निर्देश दिल्यामुळे रोहित, विराटसह तारांकित क्रिकेटपटूंनी स्थानिक मैदानांवर सरावही सुरू केलाय. पण मनात धुमसणारं वादळ शांत बसू देत नव्हतं. पुढील क्रिकेट आव्हानांना सामोरे जाण्यापूर्वी क्रिकेटपटूंनी कुटुंबासह ताडोबा येथे ‘रो-को’ (रोहित-कोहली) आत्मचिंतन शिबिराचा घाट घातला. न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया दौर्यातील अपयशाचं आत्मपरीक्षण हा वरकरणी उद्देश असल्याचे हे क्रिकेटपटू दाखवत असले तरी त्यांना चर्चेसाठी आणि पुढील रणनीतीसाठी व्यासपीठ हवं होतं, म्हणूनच हा बेत आखलेला.
ठरल्याप्रमाणे रोहित, कोहली, जसप्रीत बुमरा, केएल राहुल, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, शुभमन गिल, ऋषभ पंत या तारांकित क्रिकेटपटूंनी पत्नी आणि मुलाबाळांसह नागपूर गाठलं. सकाळच्या समयी कुटुंबासह ताडोबा सफरीचा आनंद लुटल्यानं आणि तिथे व्याघ्रदर्शन झाल्यानं सारेच जण खुशीत होते. निवासाच्या रिसॉर्टवर रात्रीचं भोजन आटोपल्यावर मैफल रंगली. पत्नी-मुलांना आधीच आत्मचिंतन शिबीर असल्याचं सांगून कटवण्यात आलेलं. त्यामुळे तारांकित क्रिकेटपटूंना आपलं मत मोकळेपणानं मांडण्याचं स्वातंत्र्य होतं.
पंत : अजि म्या वाघ पाहिला… प्रथमच इतक्या जवळून. भक्ष्यावर तुटून पडण्याची त्याची चपळता एखाद्या यष्टीरक्षकासारखीच. त्यामुळे माझ्यासाठी तो नेहमीच प्रेरणादायी…
जडेजा : बरोब्बर बोलतोयस.
रोहित : चिकू (विराटचं टोपणनाव), अनुष्काभाभी काय सांगत होती, ते खरंय का?
विराट : (स्मित करीत) बातमी बाहेर आलीय तर…? बरं झालं आपण सर्फराजला नाही आणलंय. नाही तर प्रसारमाध्यमांपर्यंतही पोहोचली असती. झालं असं सकाळी ताडोबा सफरीत वाघासाठी काठीला लावून मांस देत होतो, तेव्हा त्यानं ते फस्त केलं तरी मला लक्षात आलं नाही. कारण मला वाघाच्या जागी गंभीरच दिसत होता. चिकू वाघानं तुझा खाऊ खाल्ला, असं सांगत अनुष्कानं माझे खांदे मागून हलवले, तेव्हा कुठे मी भानावर आलो! (एकच हशा पिकला.)
रोहित : एकीकडे बॅट साथ देत नाही, तर दुसरीकडे वय पुढे जात असल्यानं मीडिया रिटायरमेंटसाठी पिच्छा पुरवतेय. कारकीर्दीतला शेवटचा काळ मनासारखा जावा, असं वाटत असताना या गंभीरनं आयुष्य आणखी कठीण केलंय.
विराट : गंभीर मुख्य प्रशिक्षक होणार आणि तो त्रासदायक ठरणार हे मला आधीपासूनच अभिप्रेत होतं. कारण त्याला पाठबळ कुणाचं आहे, हे विसरलात का? दिल्लीच्या संघात असो वा भारतीय क्रिकेट संघात, मी त्याच्यासोबत खेळलोय, एका ताटात जेवलोय आणि भांडलोयही. माझा त्याच्याशी छत्तीसचा आकडा आहे. पण, संघनिष्ठेपुढे वाद बाजूला ठेवून खेळतोय.
बुमरा : गंभीरचा खासगी सचिव आपल्यावर सारखी पाळत ठेवून असायचा. माझी सूत्रसंचालक पत्नी संजना गणेशनसुद्धा मला सांगायची. तो बरेच प्रश्न विचारून भंडावून सोडतो.
राहुल : हो, माझ्या अभिनेत्री पत्नीनंही मला ही तक्रार केलेली…
रोहित : त्या सचिवाचाही प्रश्न आता कायमचा सोडवलाय.
विराट : आता चिंता दौर्यावरील निर्बंधांची आहे. बुमरा, तुझा प्रॉब्लेम नाही. तुझी पत्नी प्रक्षेपण कंपनीसोबत पूर्ण काळ दौर्यावर असेल. समस्या आमचीच झालीय.
रोहित : काही तरी मार्ग काढावा लागेल. माझी पत्नी रितिका म्हणाली की, माझी स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनी आहे. त्यामुळे माझ्या कामानिमित्त मला अनेक खेळाडूंना भेटावं लागतं. मी काहीतरी निमित्त काढून दौर्यावर येऊ शकेन.
पंत : छोटा मुँह, बडी बात. आधीच वाईट दिवस चाललेत. रोहितभाई, रिस्क घेऊ नकोस!
विराट : (भडकला) छोट्या, दात आलेत का तुझे? आता तू आम्हाला शिकवणार का?
पंत : नाही भाई. माफी असावी!
यशस्वी : कुटुंबाची सोबत किती महत्त्वाची असते, हे मला ऑस्ट्रेलिया दौर्यावर कळलं. चौथ्या कसोटीत विराटभाई आणि माझ्यात गफलतीचं निमित्त झालं आणि शतकाकडे कूच करीत असताना धावचीत झालो. खूप वाईट वाटलं तेव्हा… पण कसोटी सामन्यानंतर अनुष्काभाभीनं मला जवळ घेऊन सांत्वन केलं. मायेचा तो स्पर्श दिलासा देणारा होता.
पंत : (वातावरणातलं गांभीर्य निवळावं या हेतूनं) यश, तू आता लग्न करून टाक. ती इंग्रज कन्या मॅडी, तुझ्यासाठी झालीय वेडी. तिला विचारून टाक.
यशस्वी : पंतजी, तुम्ही मोठे भाऊ आहात. प्रथम आपला विवाह झाल्याशिवाय मी करणं कसं काय योग्य दिसेल? मी अजून पंचविशीसुद्धा गाठलेली नाही. जरा खेळू दे, देशोदेशीच्या खेळपट्ट्या पाहू दे…
पंत : तुला आणखी काही अफेअर्स करायचेत का? यशस्वी भव (यशस्वी लाजून गोरामोरा झालेला)
विराट : (यशस्वीला जवळ घेत) एव्हरिथिंग इज फेअर इन लव्ह-अफेअर, वॉर अँड क्रिकेट हे सूत्र नेहमी लक्षात ठेव. (यशस्वी मानेनंच होकार दर्शवत.) गिल, ऐकतोयस ना? इसका तो ‘सारा’ मामला गंभीर है.
गिल : भाई, काय तुम्हीसुद्धा आता…?
सिराज : जड्डू, तुझी पत्नी रविबा आमदार आहेत. तुला काय कठीण आहे?
जडेजा : कायद्यात राहशील, तर फायद्यात राहशील, हे मला पक्कं माहितीए.
राहुल : रोहितभाई, रणजीचा सराव कसा सुरू आहे? मी, विराट आणि बुमरा दुखापतीमुळे विश्रांती घेतोय. सुटलो सध्यातरी…
विराट : गौतीला रणजीचा विषय उकरून काढायची काय आवश्यकता होती?
रोहित : सनीभाईंनीही हा विषय ऐरणीवर ठेवून आता प्रत्यक्षात खेळतायत का पाहू? असा सवाल ऑस्ट्रेलियातील मालिका गमावल्यानंतर चॅनेलवर उपस्थित केला. आता रणजी खेळूया.
विराट : रणजीत चार दिवस पळावं लागेल. जवळच क्षेत्ररक्षणाला उभा राहिलास तर कमी पळावं लागेल.
रोहित : माझ्यासाठी इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका आणि चॅम्पियन्स करंडक स्पर्धा या अग्निपरीक्षेच्या ठरणार आहेत. माझं नेतृत्व किंवा खेळणं तिथपर्यंत मर्यादित राहू शकतं अशा चर्चाही पेन, माइकवाली लोकं घडवू लागलीयत म्हणे. पण, मलाच ठाऊक नाही?
विराट : भावी कर्णधाराचाही निवड समितीनं आढावा घेतला. बुमराचा मार्ग दुखापतींमुळे अडवला.
रोहित : आता कशाला उद्याची बात? चॅम्पियन्स करंडक जिंकून दाखवू. क्रिकेटविश्व आपल्याला डोक्यावर घेईल.
राहुल : माझे सासरेबुवा बोललेयत. पुरे झाले क्रिकेट. आता सिनेमात किंवा वेब सीरिजमध्ये कामं कर.
जडेजा : राहुलभाई, तुझं वय आत्ताशी ३२ आहे. आणखी बरंच क्रिकेट शिल्लक आहे. इतक्यात घाई कशाला?
विराट : गंभीरला बरंच सहन केलंय आपण. या बैठकीचा महत्त्वाचा विषय गंभीरच आहे.
जडेजा : क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक वादात नेहमीच प्रशिक्षकाला नारळ मिळाल्याचा भारतीय क्रिकेटचा इतिहास आहे. सौरव गांगुलीनं चक्क ग्रेग चॅपेलला ऑस्ट्रेलियात माघारी धाडलं. चिकूनं जम्बोचा खेळ खल्लास केला. येणारा काळ ठरवेल की आधी कोण निवृत्ती घेतंय.
विराट : वाह जड्डू!!!
रोहित : सर, तुमचा अभ्यास दांडगा आहे. (रोहित दोन्ही हात जुळवून नमस्कार करतो. एकच हशा पिकतो. इतक्यात फोन वाजतो.) रितिकाचा फोन आलेला. आता पुरे गंभीर पुराण. दोन मुलांचा बाप आहे मी, आता झोपायला जाऊया.
पंत : तुम्ही निघा. मी, गिल आणि यशस्वी थोडा वेळ गप्पा मारत बसू.
विराट : सल्ला देतोय, तो ऐका. रात्री रिसॉर्टच्या बाहेर पाऊल ठेवू नका. हिंस्र प्राणी वावरतात. इथेच समाधी बांधावी लागेल.
पंत : आज्ञा शिरसावंद्य!
(रोहित, विराट सर्व क्रिकेटपटूंची गळाभेट घेतात आणि ताडोबा रिसॉर्टची आत्मचिंतन बैठक संपवतात.)