आरोपी लुईजी मँजोनी. बळी ब्रायन थॉमसन. मुद्दा युनायटेड हेल्थकेअर विमा कंपनी. २०२४च्या डिसेंबर महिन्यात ब्रायन थॉमसन या माणसाचा न्यूयॉर्कमधे हिल्टन हॉटेलच्या इमारतीच्या तळाशी खून झाला. सूर्य उजाडायच्या आधी. युनायटेड हेल्थकेअर या विमा कंपनीचा तो मुख्य कार्यकारी अधिकारी होता. भागधारकांच्या बैठकीसाठी जात होता. (काय लोक असतात. पहाटे बैठका घेतात. असो.)
खून केल्याच्या आरोपावरून, पाच दिवस तपास केल्यानंतर, लुईजी मँजोनी या २६ वर्षाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. लुईजी अनेक दिवस घर सोडून गेला होता, बेपत्ता होता. त्याच्या आईनं सॅन फ्रान्सिस्कोच्या पोलीस विभागाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास करून लुईजीला पकडलं.
– – –
लुईजीचा विमा कंपन्यांवर राग होता. लुईजीनं सोशल मीडियावर विमा कंपन्यांच्या वागण्यावर पोस्ट लिहिल्या होत्या, विमा कंपन्या बांडगुळं आहेत, त्या लोकांना लुटतात असं त्याचं म्हणणं होतं. त्यानं एकदा थियोडोर केझिन्सकी या अराजकवादी हिंसक माणसाशी आपण सहमत असल्याचं लिहिलं होतं. केझिन्सकी हा ‘उनाबाँबर’ या नावानं ओळखला जातो. आधुनिक तंत्रज्ञान निसर्गाचा नाश करतं, असं उनाबाँबरचं मत होतं. आपला राग आणि हिंसक मार्ग त्यानं एका पुस्तिकेतून जाहीर केला होता; त्यानं तीन माणसं मारली होती. अर्थात हे सारं पोलिसांना लुईजीला अटक केल्यानंतर लुईजी समजून घेताना समजलं.
लुईजीच्या डोळ्यात ब्रायन का भरला?
ब्रायन ज्या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी होता ती कंपनी म्हणजे युनायटेड हेल्थकेअर. ती युनायटेड हेल्थ या समूहातली एक कंपनी. या कंपनीची ५६० अब्ज डॉलरची उलाढाल आहे. जास्तीत जास्त विमा रक्कम घ्यायची आणि कमीतकमी भरपाई द्यायची हा या (बहुतेक विमा कंपन्यांचा) फंडा. कंपनीनं फीच्या रूपात भरमसाठ रक्कम लुबाडलीय या मुद्द्यावर या कंपनीवर खटले चालू आहेत.
पैसे देताना दिरंगाई करा, पैसे द्यायला नकार द्या, आपलंच म्हणणं खरं आहे असं म्हणत कोर्टबाजी करत राहा, ही विमा कंपन्यांची कामाची पद्धत आहे. दिरंगाईसाठी अनेक कल्पक मार्ग वापरले जातात. क्लेम नामंजूर करताना पर्यायी सर्टिफिकेटं, पर्यायी पुरावे मागितले जातात. ते सतत नामंजूर केले जातात. कर्मचार्यांची भेट होत नाही कारण फोनवरून आणि इंटरनेटवरूनच तुम्हाला संपर्क करावा लागतो. फोन करून-करून माणूस थकतो, कंटाळतो, मरतोही.
विम्याच्या कायद्याची एकूण रचना, कायद्यात वापरलेले शब्द हे सारं अशा रीतीनं रचलेलं असतं की त्यात पळवाटाच फार असतात. या पळवाटांचा वापर करून नागरिकांना लुटलं जातं.
नुकतीच घडलेली एक घटना. पेशंटवर शस्त्रक्रिया झाली. त्यासाठी भूल (अनास्थेशिया) दिली गेली. पेशंटला त्या प्रोसिजरचे पैसे मिळायला हवे होते. तरतूद असलेल्यापेक्षा कितीतरी कमी पैसे दिले गेले, तेही खूप वेळ गेल्यानंतर. आवश्यक असल्यापेक्षा जास्त काळ भूल दिली गेली असल्यानं विमा करारात मंजूर केलेली कमी रक्कमच दिली जाईल असं विमा कंपनीनं ठरवलं. भूल किती द्यायची हे डॉक्टर ठरवतो, विमा कंपनीचं ते काम नव्हे. नागरिकानं खूप पुरावे दिले, वाद घातला, पण कंपनी बधली नाही.
विमा कंपनीकडून मिळणारी रक्कम कमी पडते, रोग्याला पदरचे पैसे भरावे लागतात. अमेरिकेत उपचार व्यवस्था इतकी महाग आहे की विमा कंपनीनं दगा दिला तर रोगी भिकेला लागतो. या धक्क्यानं आत्महत्याही झाल्या आहेत. हे सारं पेपरांत वारंवार येत असतं, त्यांच्या लोकसभेत यावर चर्चाही होतात. पण सुधारणा होत नाही.
तर अशा युनायटेड हेल्थकेअर या कंपनीचा नफा २०२३ साली १२ अब्ज डॉलरवरून १६ अब्ज डॉलरवर गेला. ब्रायनच्या कारकीर्दीत नफा वाढल्यानं ब्रायनचं उत्पन्न वाढलं. गेल्या वर्षी ब्रायनला एक कोटी डॉलर वेतन मिळालं होतं.
अमेरिकेत गरीब आणि मध्यमवर्गीय माणसाला जगताना पैसे कमीच पडतात. महागाई फार वाढलीय. वस्तू विकत घ्यायची हौसही वाढलीय. त्यामुळे माणसं पैसे मिळवण्याचे अनेक मार्ग शोधतात. ब्रायननं शोधलेला एक मार्ग म्हणजे इनसायडर ट्रेडिंग. कंपनीची गुप्त माहिती त्याला मिळत असे. कंपनीचा शेअर घसरणार आहे हे त्याला कळलं. त्यानं स्वत:जवळचे लाखो शेअर विकून नफा मिळवला. या गुन्ह्यासाठी ब्रायनवर खटलाही चालला आहे.
ही घटना डिसेंबर महिन्यात घडली. त्या आधी सहा महिने माध्यमांत ब्रायनवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. युनायटेड हेल्थकेअरच्या गैरकारभाराविरोधात ‘पीपल्स अॅक्शन’ नावाची संघटना स्थापन झाली होती. या संघटनेनं मिनेसोटामध्ये कंपनीच्या कार्यालयासमोर तीन वेळा निदर्शनं केली होती. पैकी एका निदर्शनात डझनभर लोकांना अटकही झाली होती.
– – –
लुईजीचे वडील मेरिलँड राज्यात आमदार आहेत. लुईजी संपन्न कुटुंबातले आहेत. त्यांचं शिक्षण आयवी लीग या भद्रलोकांच्या विद्यापीठ साखळीत झालं. मेरिलँडमधे लुईजी रहात होता. तिथून पाच हजार किमी अंतरावरच्या हवाईमध्ये तो समुद्र सर्फिंग करायला जात असे. पाठदुखी सुरू झाल्यानं त्याला सर्फिंग करता येत नव्हतं. त्या दुखण्यासाठी तो विमा कंपनीकडं गेला होता की काय ते माहीत नाही. लुईजीचं करियर चांगल्ां होतं. हुशार विद्यार्थी असा त्याचा लौकिक होता. तो एका ठिकाणी काम करत होता, गेली दोन वर्षं त्यानं कामाला दांडी मारली होती. जुलै महिन्यात तो एकाएकी घरून गायब झाला. आईला चिंता वाटली, तिनं त्याच्या गायब होण्याची माहिती पोलिसांना दिली.
लुईजीचे मित्र, कुटुंबीय सांगतात की तो शांत, समंजस होता, हिंसेची कोणतीही चिन्हं त्याच्यात दिसलेली नाहीत. शाळा
कॉलेजात गुन्हेगारी वा दांडगाईची कोणतीही नोंद त्याच्या नावावर नाही. त्याला अटक झाल्याची बातमी आल्यावर त्याला ओळखणार्या लोकांना आश्चर्य वाटलं.
लुईजीनं पिस्तूल मिळवलं. त्यासाठी खोटं ओळखपत्र दाखवलं. ओळखपत्रं बनावट होतं. पोलिसांना खोटी माहिती दिली. पोलिसांनी माहितीची खातरजमा केली नव्हती. पिस्तूल विकताना दुकानदारांनं कागदपत्रांची कसून पाहणी करणं आवश्यक असतं. दहशतवाद्याच्या हातात पिस्तूल पडू नये, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्याला पिस्तूल मिळता कामा नये यासाठी कायद्यात तरतुदी करण्यात आल्या आहेत. दुकानदारांना पिस्तुलं विकायची असतात, ते कायदा पाहात नाहीत.
लुईजी आठ दिवस आधी न्यूयॉर्कमध्ये आला. एका हॉटेलवर उतरला. ते सोडून दुसर्या एका हॉस्टेलवर गेला. घटनेच्या दिवशी पहाटे सायकल उसनी घेतली, हूडवालं जॅकेट पांघरलं आणि कॉफी हाऊसमध्ये गेला. तिथून सायकलनं तो हिल्टन हॉटेलवर पोचला. ब्रायनची बैठकीला जाण्याची वेळ लुईजीला माहीत होती. दहा मिनिटं आधी तो दाराजवळ पोचला. ब्रायन दरवाजाजवळ पोचला तेव्हां लुईजीनं तो पाठमोरा असताना दोन गोळ्या घातल्या. ब्रायननं मागं वळून पाहिलं आणि कोसळला. कोसळलेल्या ब्रायनकडं लुईजीनं वाकून पाहिलं, त्याच्यावर पिस्तूल रोखलं. मेलाय हे कळल्यामुळं पुन्हा गोळी न घालता लुईजी तिथून पळाला. सायकलवरून. मग बसनं तो शहराबाहेर निघून गेला.
पिस्तुलाला सायलेन्सर बसवलेला असल्यानं, शिवाय पहाटेची वेळ असल्यानं लोकांच्या खून लक्षात आला नाही, लुईजीला पळता आलं.
गोळ्या घालताना लुईजीकडं एक कागद घडी घालून जॅकेटमध्ये ठेवलेला होता. त्यावर २६२ शब्दात खुनाची जबाबदारी घेतली होती. विमा आणि आरोग्यव्यवस्थेतल्या भ्रष्टाचार, सत्तेचा खेळ याला या कृत्यानं आपण आव्हान देत आहोत असं त्या हस्तलिखितात लिहिलेलं होतं.
आठवडाभर अमेरिकन माध्यमात ही घटना गाजत होती. दोन्ही बाजूंनी लोक लिहीत होते. लुईजीनं केलं ते योग्यच होतं असं खूप लोकांनी माध्यमांत लिहिलं. विमा कंपनीनं आपल्याला कसं छळलंय तेही या निमित्तानं लोकांनी लिहिलं.
– – –
ब्रायन हा एक मध्यमवर्गीय सामान्य माणूस होता. अमेरिकन ड्रीम जगत होता. अमेरिकन ड्रीम म्हणजे श्रीमंत व्हा. त्यानं कोणाचाही कधी खून केला नव्हता, कोणताही फौजदारी गुन्हा केला नव्हता. बायकामुलांसह तो इतर कुठल्याही अमेरिकन नागरिकासारखं जगत होता.
लुईजी एका सधन कुटुंबात वाढलेला बुद्धिमान तरुण होता. बिझनेसमनचं घराणं, वडील आमदार. लुईजीही अमेरिकन ड्रीमच जगत होता. पैसे कमवा, पैसे आणि पदं मिळवा. लुईजीला गुन्हेगारी वर्तनाचा इतिहास नाही.
ब्रायन आणि लुईजी हे दोघे गॉडफादरमध्ये दिसलेल्या टोळीचा भाग असते तर ते समजण्यासारखं होतं. दोघेही तसे सभ्य नागरिक. त्यातला एक खुनी झाला, एक बळी झाला.
लोकांची लूट करणार्या एका कंपनीचा ब्रायन अधिकारी होता. तो व्यक्तिश: कोणताही गुन्हा करत नव्हता. गुन्हा कंपनी करत होती. ब्रायन एका सामूहिक गुन्ह्याचा छोटासा अंश होता. ब्रायन लोकांना दिसत असे, कंपनीचे संचालक, मालक आणि शेअरहोल्डर्स लोकांना दिसत नव्हते. त्यामुळे राग ब्रायनवर निघाला.
अमेरिकेतली इस्पितळं, विमा कंपन्या, औषध उत्पादक कंपन्या मिळून रॅकेट चालवतात, पेशंटना लुटतात. त्यात वकीलही सहभागी असतात. रोगी मरतो, रोग्याला अतोनात त्रास होतो त्यावेळी रोग्याच्या समोर असतो डॉक्टर किंवा नर्स, रोगी आणि त्याचे नातेवाईक आपला राग त्यांच्यावर काढतात. अमेरिकेत शेकडो नर्सेस आणि डॉक्टर अशा रीतीनं मेले आहेत.
त्रास तर होतो पण तो दूर करता येत नाही, अशा हताशेचा बळी नागरिक ठरतात. लूट करणारी टोळी प्रतिष्ठित असते, श्रीमंत असते. या टोळीकडे वकिलांची फौज असते. पोलीस आणि न्यायव्यवस्थाही कधी थेट तर कधी अप्रत्यक्षपणे या टोळीकडे डोळेझाक तरी करते किंवा टोळीत सामील तरी होते. त्रासलेला नागरिक डॉक्टरला, नर्सला, ब्रायनला मारतो.