मला सकाळी सकाळी एक सुविचार मित्राने फॉरवर्ड केला, तुम्ही देवाच्या भरवशावर बसू नका, कोण जाणे, देव तुमच्या भरवशावर बसला असेल… काय अर्थ घ्यायचा याचा?
– विनोद केळवणकर, सावंतवाडी
याचा अर्थ तुमचा मित्र त्याच्या देवाचा भक्त असणार… आणि ‘त्याचा देव’ सुद्धा आत्मनिर्भर नाही हे त्याला उमगलं असणार. आपण बनवला म्हणून ‘तो’ देव बनला हे त्याला समजलं असणार (असा एक अर्थ तुमच्या प्रश्नातून निघतो आहे. पण हा अर्थ वाचून तुम्ही वेगळा अर्थ काढू नका.) अर्थ काय, काढावे तितके निघतात. सगळेच इथे लिहिता येणार नाहीत… जागेअभावी… तुमचे अर्थ तुम्हीच काढा. ‘तुम्ही तरी’ तेवढे आत्मनिर्भर बना..
आका मी आका सगळ्यांचा काका माझ्या शिष्याचा कसा बाल होईल बाका अशी कविता मी लिहिली आहे. ती शालेय अभ्यासक्रमात लावण्यासाठी काय करता येईल?
– मायकेल मच्याडो, नालासोपारा
अहो, शालेय अभ्यासक्रमातील ‘पूर्वी’च्या ‘भावे’ अलंकारातील कविता पहा. त्या कवितांचा तुम्ही तरी अभ्यास करा… आणि तुम्ही जे काही ‘का’ ला ‘का’ जुळवले आहे ते बदला… अक्कल, टक्कल, बक्कल अशी नक्कल तरी करा… किंवा नाव तरी बदला… कवितेचं. (आम्हाला वाटतं, तुम्ही ही तुमची कविता अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा हट्ट सोडा… ही कविता ‘अज्ञान’पीठ पुरस्कारासाठी पाठवा…)
ज्यांनी राज्यपालांसमोर नागरिकांमध्ये कसलाही भेदभाव करणार नाही, अशी शपथ घेतली आहे, असे राज्याचे मंत्री अमुक धर्माच्या नागरिकांचाच देश आहे, त्यांच्याच कलाने चालणार, त्यांचंच रक्षण करणार, अशी भाषा कशी करू शकतात?
– वामन म्हात्रे, पनवेल
मग तुम्हाला काय वाटतं? राज्यपालांनी अशा भाषेत बोलावं? मग राज्याचे मंत्री काय बोलणार? अहो प्रत्येक जण त्यांना नेमून दिलेले काम करतो आहे. तसं नसतं तर देशाचे महामहीम काहीतरी बोलले असते. (आता ‘महामहीम’ सुद्धा त्यांना नेमून दिलेलं काम करतायत,’ अशी भाषा तुम्ही करू नका.. आम्ही तसं बोललेलोच नाही, वाटल्यास उत्तर पुन्हा एकदा वाचून बघा.)
तुमच्या नाटकांची नावं फार मजेशीर असतात. आता द दमयंती दामले या नाटकाची जाहिरात पाहिली. कशी सुचतात ही नावं तुम्हाला?
– रेखा रावते, पारनेर
नावात काय आहे, असं म्हणणार्या शेक्सपिअरला, नावातच सारं आहे हे दाखवून देण्याच आम्ही ठरवलं आहे… (संधी मिळाली म्हणून शेक्सपियरबरोबर नाव जोडून घेतलं… यात आम्ही नाटकवाले पटाईत असतो)… काय आहे… नाव कसं सुचतं, हे गुपित जर मी इथे सांगितलं, तर बाकी नाटकवाले त्याचा फायदा घेतील आणि आम्ही नाटकवाले दुसर्या नाटकवाल्याचा फायदा होऊ देत नाही… यातही पटाईत असतो. आता विचाराल हे गुपित कसं सांगितलं? तर हे उघड गुपित आहे. ते प्रेक्षकांना माहित नाही, पण नाटकवाल्यांना माहित आहे.
तुमच्या मुंबईत कोणीतरी सेफ आहे का हो संतोषराव? हे काय ऐकतोय आम्ही रोज?
– विलास शहापूरकर, पुणे
पुण्यात बसून मुंबई सेफ असण्या-नसण्याबद्दल बोलू नका… तुम्ही ज्या गोष्टी ऐकल्या नाहीयत, अशा खूप गोष्टी तुमच्यापर्यंत पोहचूच दिल्या गेल्या नाहीयत, याचा अर्थ तुम्ही सेफ आहात असं समजा.. तरी तुम्हाला सेफ वाटत नसेल, तर पाकिस्तान चले जाव (असं म्हणणारेच इथे सेफ आहेत… असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हीही दुसर्याला पाकिस्तान चले जाव असं म्हणायला सुरुवात करा, तुम्हाला सुद्धा सेफ वाटेल.) इथे आम्हाला सैफचं टेन्शन आहे. तुम्ही सेफ असण्या-नसण्याशी आम्हाला काय करायचंय? आता सैफचं टेन्शन कोणाला आहे, असं आम्हाला शहाजोगपणे विचारू नका, शहापूरकर, प्लीज.. आम्हालाही सेफ राहायचंय…
भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं याबद्दल जो उठतोय तो काही ना काही बकतोय, तर तुमची काही वेगळी थियरी आहे का स्वातंत्र्याबद्दल? सांगून टाका आम्हाला.
– किरण राजोपाध्ये, खोपोली
‘कमळ’ आवडतं, म्हणून चिखलात दगड मारून चिखल आपल्या अंगावर उडवून घेणार्यातले आम्ही नाही, कोणाच्या थेअरीबद्दल आम्ही आमची थेअरी मांडून, आमच्या स्वातंत्र्यावर, आम्हीच गदा आणावी असं तुम्हाला वाटतं का? स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आम्ही आणि आमच्या ‘परिवारातल्या’ कोणीही काही केलं नसलं, तरी आमचा ‘परिवार’ स्वातंत्र्य पुरेपूर ‘भोगतोय’ याची जाणीव आम्हाला तरी आहे… त्यामुळे स्वातंत्र्याबद्दल वेगळी थेअरी मांडण्याची आम्हाला तरी गरज नाही. कोणी वेगळी थेअरी मांडत असतील तर ती त्यांची गरज असेल. -आभार -अखिल भारतीय काम ना धंदा नेटकरी मंडळ. (कारण त्यांच्याच सौजन्याने हे उत्तर दिले आहे).