व्यंगचित्रकाराच्या व्यंगचित्रात स्वत: तोच व्यंगचित्रकार असा योग काही जुळून येत नाही सहसा. पण, शिवसेनाप्रमुख निव्वळ व्यंगचित्रकार नव्हते, महाराष्ट्रातले एक मोठे राजकीय नेते होते, पक्षप्रमुख होते. तरीही त्यांनी स्वत:चं प्रमोशन करणारी व्यंगचित्रं काढली नाहीत. त्यांची त्यांना गरजच नव्हती. एका परदेश दौर्यानंतर ते परत आले तेव्हा राज्यातली परिस्थिती तशीच असल्याचं पाहून त्यांच्या तोंडून इथे खास ठाकरी शैलीतले मार्मिक उद्गार निघाले आहेत, कचरा तसाच? नुकतेच बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. राज्याची अधोगती, कमळीचा उत्मात पाहिल्यावर बाळासाहेबांच्या अनेक चाहत्यांना असं वाटतं की बाळासाहेब वैकुंठलोकाहून परतून आले पाहिजेत. त्यांचे तडाखे या गणंगांना बसले पाहिजेत. कल्पना करा की या व्यंगचित्रातला प्रसंग आज घडतो आहे. बाळासाहेब स्वर्गातून परतले आहेत, ते काय म्हणतील? आजची राज्याची परिस्थिती पाहून ते म्हणतील, डंपिंग ग्राऊंड तसंच?