एकनाथ शिंदे
कधीही खुर्ची जाईल म्हणून
माझी गाडी फास्ट धावते
एकेक खूर मोडत आला
माझे मला अचूक कळते
भाजपवाले कधीही करतील
माझी स्वप्ने चक्काचूर
त्यांच्या मीठाला जागलो तरीही
डोळ्यांमध्ये सोडतील धूर
घर का ना घाट का अशी
माझी जेव्हा स्थिती होईल
तेव्हा उतरेल सगळी गुर्मी
फक्त गोहाटी आठवत राहील
—– —– —–
देवेंद्र फडणवीस
भांडण लावले आपापसात
मजा आम्ही बघतो मात्र
आनंदाने टाळ्या पिटून
आता दमली आमची गात्रं
फोडा-झोडा राज्य करा
ही तर इंग्रजांची नीती
सेना संपवण्यासाठी तर
आहे आम्हाला कसली भीती?
एकेकाला वेचून वेचून
महाशक्तीत करू सामील
निष्ठावंत शिवसैनिक
येणे मात्र आहे मुश्किल
—– —– —–
नरेंद्र मोदी
देत नाहीत मते कशी
लोक-नाड्या आपल्या हाती
पाक-चीनचा बागुलबुवा
तो तर लोहचुंबक साथी
नेहमीप्रमाणे याही वेळी
विकासाचा देऊ नारा
अर्थव्यवस्था जाऊंदे खड्ड्यात
महागाईचा नेहमीच फेरा
भाईयों और बहनों म्हणता
लोक सगळे विसरून जातात
युद्ध तोंडाशी आले म्हणता
घाबरून आमची निशाणी दाबतात
—– —– —–
अमित शहा
दोन उद्योगपती खिशात
बघा किती फुगले जाकीट
कसल्या बाता करता तुम्ही
कसले खोके, कसले पाकीट
फुलांसारखे उधळू पैसे
प्रत्येक मतदार आपला राजा
कोण म्हणतो दो दो हजार
आम्ही नाही वाजवत बाजा
जनतेसाठीच आहोत आपण
मोठे टॉवर, बंगले, गाड्या
आश्वासनांची खैरात करा
मनात भरू दे सुरती साड्या
—– —– —–
शिवसैनिक
देवेंद्रांच्या खांद्यावर
दाढीमिशांचेही ओझे
विक्रम-वेताळ गोष्टींसारखे
त्यांचे तात्पर्यही गाजे
विक्रम कोण आणि वेताळ कोण
दोघांत जेव्हा लागेल भांडण
भक्त लोंबते टाळ्या पिटतील
पाहून त्यांची दे दणादण
कपड्यांसारखे टाकतील वाळत
पीळ नसलेल्या सुंभावरती
तेव्हा उतरेल सगळी मस्ती
जेव्हा आठवेल ‘शिवसेना’ ती!