स्व. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सर्वसामान्य लोकांत लोकप्रिय होत्या. एक भारतीय नारी देशाचे खंबीरपणे नेतृत्व करते आहे, याचा समस्त महिलावर्गाला अभिमान वाटायचा. बाई शिस्तप्रिय आणि करारी स्वभावाच्या. त्यामुळे त्यांचे दिल्लीहून बोलावणे आले की मी मी म्हणवणार्या अनेकांच्या छातीत धाकधूक व्हायची.
मुंबईशी त्यांचे नाते जिव्हाळ्याचे. येथील वास्तव्यातील अनेक कडू-गोड आठवणी सांगता येतील. त्यांचे बाळंतपण गिरगावात झाले. स्व. राजीव गांधी यांचा जन्म गिरगावचा, हे फारच थोड्या लोकांना माहीत असेल. येथील नऊवारी साडीचे त्यांना आकर्षण वाटले असावे; म्हणून कदाचित त्या नऊवारी साडी नेसून विधान भवनाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आल्या होत्या.
त्यांचे चालणे बोलणे रुबाबदार असे. कारमधून उतरल्या की उंच टाचाच्या चपला घालूनही त्या तुरुतुरू वेगाने पुढे निघून जात. तेव्हा मागून येणार्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनाही धोतर सांभाळीत धावत पळत यावे लागे.
नरिमन पाँइंटच्या टोकाला जी टाटा थिएटरची इमारत दिसते, तिचे उद्घाटन इंदिराजींच्या हस्ते होणार होते. तो कार्यक्रम कव्हर करण्यासाठी संपादक वसंत सोपारकरांनी मला सांगितले आणि त्यांचे व्हिजिटिंग कार्ड दिले. कारण माझ्याकडे ओळखपत्र नव्हते. कुणी अडवले तर माझं कार्ड दाखवून माझं नाव सांग असे म्हणून सोपारकरांनी मला कामाला लावले. उमेदीच्या काळात मी स्वतंत्रपणे काम करत होतो. संधी मिळाली की सोडायची नाही. काम करत राहायचे. एक दिवस चांगली नोकरी मिळेल, या आशेवर बाहेर पडलो.
मुंबईत जेव्हा व्हीव्हीआयपी लोकांचे आगमन होत, तेव्हा पोलीस रस्तोरस्ती उभे राहून पहारा देत असतात. पादचारी आणि दुचाकीस्वार यांच्यावर त्यांची खास मेहेरनजर असते. कारमालकांशी ते हुज्जत घालीत नाहीत. त्यांच्यासाठी त्यांना एक दिवस दिलेला असतो. नाकाबंदीचा!
मी लोकल ट्रेनने निघून चर्चगेट स्थानकात उतरलो. कॅमेर्याची बॅग नसती तर टाटा थिएटरपर्यंत पोहोचलो असतो. पण पोलिसांची नजर ठेल्यावर. (ठेल्यावर म्हणजे पिशवीवर. तुमच्या पिशवीत काय असेल असा संशय नेहमीच पोलीस घेतात आणि चौकशी करतात) तेथून जाणार्या आणि संशयित वाटणार्या काही लोकांच्या पिशव्या आणि बॅगा पोलीस तपासून त्यांना सोडत होते. माझा कॅमेरा बघून विचारले.
– कोठे चाललात?
– टाटा थिएटर.
– मग निमंत्रण कुठे आहे? ओळखपत्र दाखवा.
मी सोपारकरांचे कार्ड दाखवले. ते पाहून तेही हसले आणि मलाही हसायला आले. काय विनोद करून ठेवला संपादकांनी. असा प्रवेश द्यायला हे काय बिहारचे पोलीस आहेत काय? मी त्यांची खूप समजूत घातली. अहो, मी उमेदवारी करतो आहे. माझी ट्रायल चालू आहे. सुरुवातीला कोण ओळखपत्र देत नाही. नोकरी लागल्यावर देतील ते.
पोलिसांनी मला पुढे जाऊ दिले नाही. मी पुन्हा चर्चगेटजवळ आलो. संपादक म्हणाले होते, ‘माझ्या कार्डावर त्यांनी प्रवेश दिला नाही, तर बाहेर गेटवर उभा रहा कार्यक्रम संपेपर्यंत. आतून जो फोटोग्राफर बाहेर येईल, त्याला विनंती करून त्याच्याकडून इंदिराजींचा फोटो मागून घे.
आता काय करावं बरं?
रस्ता मोकळा होता. वाहतूक सुरू होती. पोलीस कोणत्याही टॅक्सीला अडवत नव्हते. चला तर टॅक्सीने जाऊन पाहू. आत नाही सोडले तर बाहेरून टाटा थिएटर कसे बांधले आहे, ते तरी पाहता येईल, अशा विचाराने मी टॅक्सी केली. चर्चगेटवरून ओबेरॉय हॉटेलसाठी डावीकडे वळण घेतले तेव्हा वाहतूक पोलिसाने फुर्रर्र शिट्टी मारून टॅक्सी थांबवण्याचा इशारा केला. मी ड्रायव्हरला म्हटले, पोलिसांकडे पाहू नकोस. सरळ पुढे चल. घाबरू नकोस, मी पत्रकार आहे. हा बघ बॅगेत कॅमेरा आहे. मी पत्रकार म्हटले असते तर पोलिसाने आपल्याला सोडले असते, पण आता थांबायला वेळ नाही. इंदिरा गांधीचा फोटो काढायचा आहे.
असं म्हटल्यावर त्याला जोर आला. तो बहुधा इंदिराजींच्या मतदारसंघातील असावा. त्याने थेट टाटाच्या दारात सोडले. त्याचे पैसे दिले आणि समारंभाला उशिरा येणारे पाहुणे कसे घाईघाईत येतात त्या स्टाईलमध्ये घाईत झपाझप पावले टाकत पुढे निघालो. बॅगेमुळे पोलिसांनी मला अडवू नये म्हणून ती रिकामी केली.
कॅमेरा गळ्यात टाकला फ्लॅशगन वगैरे हातात धरले. पोलिसांसारखे दिसणारे बारीक केसाचे काही धडधाकट लोक डोअरकीपरच्या वेषात होते. अशावेळी तेथील कर्मचार्यांच्या बरोबरीने पोलीसही साध्या कपड्यांत डोळ्यात तेल घालून पाहात असतात.
एका माणसाने मला अडवलेच. निमंत्रणपत्रिका आणि ओळखपत्र विचारले. मी संपादक सोपारकरांचे कार्ड दाखवून असा रागीट चेहरा केला की हा काय मला ऐरागैरा समजतो काय? त्याने कार्ड वाचून माझ्याकडे आश्चर्याने पाहिले. कदाचित त्याला वाटले असेल की इतक्या लहान वयात हा संपादक कसा झाला? मी म्हटलं सोडतो का आत नाहीतर. जातो परत तुझं फक्त नाव सांग. उद्या इंदिराजींनी विचारलं, माझा फोटो का आला नाही. छापून तर तुझं नाव सांगतो मॅडमना. त्यानं इथंतिथं पाहिलं. त्याला वाटलं असेल याला धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. मी म्हणालो, अरे काही घेऊन पळून तर जात नाही ना! मी आत जाऊन कुणाचे फोटो काढतो ते लांबून बघ. मग तुझी खात्री पटेल. नाही पटली तर परत बोलव. मी दोन फोटो काढून निघून जाईन. माझ्या चेहर्यावरील निरागस भाव त्याने पाहिले आणि आत जा म्हणाला.
सभागृह तुडुंब भरले होते. व्यासपीठावर साक्षात पंतप्रधान इंदिरा गांधी, राज्यपाल सादिक अली, मुख्यमंत्री अब्दुल रहेमान अंतुले, उद्योगपती जे. आर. डी. टाटा व टाटा कुटुंबातील इतर सदस्य अशी बडी बडी मंडळी बसली होती. उद्घाटन सोहळ्याला प्रारंभ झाला. पाहुण्यांचे भाषण, सत्कार झाले. आभार प्रदर्शन झाल्यानंतर सुप्रसिद्ध सनईवादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ साहेबांचे सनईवादन झाले. कर्नाटकी नृत्याचा तसेच गायनाचा सुंदर कार्यक्रम झाला. या सर्वांचे भरपूर फोटो घेतले.
समारंभ संपल्यानंतर सर्व प्रेस फोटोग्राफर निघून गेले. बाजूच्या हॉलमध्ये अल्पोपहार ठेवला होता. त्यासाठी सर्व पाहुणे तेथे गेले. त्याच्या मागोमाग मीही फोटोसाठी गेलो. इंदिराजी व त्यांची सून मेनका गांधी एका सोफ्यावर बसून अल्पोपहार घेत होते. सासूसुनेची ही जवळीक फोटोच्या दृष्टीने महत्त्वाची होती. कारण संजय गांधींच्या निधनानंतर बर्याच दिवसांनी दोघींचे एकत्र छायाचित्र मला मिळत होते. त्यांचे अनेक फोटो घेतले.
माझ्या कॅमेर्याच्या फ्लॅशमुळे इंदिराजींच्या डोळ्यांना त्रास होत असावा. मी क्लिक करताच त्या अनेकदा डोळे मिचमिचवीत होत्या. मला चुकविण्यासाठी त्यांनी तीन वेळा बसण्याची जागा बदलली. पुन्हा मी त्यांच्याजवळ गेलो, तेव्हा त्यांनी प्लीज… प्लीज… असे म्हणून फोटो न घेण्याची विनंती केली. त्यांनी प्लीज म्हणतानाही मी फोटो घेतले. त्यावेळी सफारी घातलेल्या एका माणसाने मला मागे बोलावले व म्हणाला, थोडा वेळ थांबा. मॅडमचे खाऊन झाले की नंतर पुन्हा फोटो घ्या.
मी थोडा वेळ थांबून वाट पाहिली, पण त्यांचे खाणे संपत नव्हते. त्या फार संथगतीने खात होत्या. स्वयंपाक्याच्या पोषाख घातलेल्या एका इसमाने मला थंडगार सरबताचे ग्लास आणून दिले. मी दमलो होतो. गटागटा ग्लास रिकामे केले. पुन्हा हवे का विचारले. मी हो म्हणालो. त्याने पुन्हा दुसरे सरबताचे ग्लास आणून दिले व म्हणाला, इंदिराजी जे खात आहेत ना ते मी बनविले आहे. त्या माझ्या हातचे खात आहेत त्याचा मला आनंद आहे. तुम्ही माझा त्यांच्याबरोबर शेजारी उभे राहून फोटो काढाल का? अर्थात ज्याने माझी तृष्णा भागवली त्याला नाही कसे म्हणायचे.
त्याला म्हटलं फोटो काढतो, पण तू पुतळ्यासारखा उभा राहू नकोस. तू आचारी आहेस म्हणतोस ना, तेच इंदिराजींना सांग. त्यांच्याशी बोल. त्यांना कोणता पदार्थ आवडला विचार. तो कसा केला तेही सांग म्हणजे मला अवधी मिळेल आणि तुमच्या दोघांचा संवाद होताना चांगला फोटो टिपता येईल.
त्याने तसे केले आणि अनेक फोटो घेता आले.
ते पाहून अनेकजण माझ्याकडे आले मी म्हणालो, फोटो काढतो, पण तुम्ही मॅडमशी बोलायची हिम्मत करा. मग काय विचारता?…
जो येईल तो मॅडम स्वीट घेणार का?
मॅडम पाणी आणू का?
असे विचारू लागला. असे दहा-बाराजण विचारून गेले. प्रत्येकाला त्यांनी मान वर करून नो! थँक्स! म्हटले.
ही माणसं फोटो काढण्यापुरती विचारत आहेत हे त्यांना समजले असावे. कारण त्यानंतर त्यांचा मूड गेला. चेहर्यावरचे भाव बदलले. ते पाहून मीही कॅमेरा ठेवून दिला. एक इसम दोन-चार फाईली हातात धरून आला. त्याला मॅडमबरोबर फोटो हवा होता. मीही थकलो होतो म्हणून नाही म्हटले. आता शक्य नाही म्हणताच त्याने खिश्यातून व्हिजिटिंग कार्ड काढून दिले. त्यावर लिहिले होते, बी. डी. शिंदे – पी.ए. टू सी.एम. हे वाचून धक्काच बसला. हे साहेब मुख्यमंत्री अंतुले यांचे पी.ए. होते. यांना नाही कसे म्हणायचे, म्हणून पुन्हा कॅमेरा चालू केला.
मॅडमना दोन फोटोसाठी मी विनंती केली आणि चार सुंदर फोटो घेतले. शिंदे साहेब भलतेच खूष झाले. त्यांनी चेंबूर येथील त्यांच्या राहत्या घरचा पत्ता दिला व घरी येण्याचे निमंत्रण दिले. दुसर्या दिवशी मी फोटो देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गेलो, तेव्हा त्यांनी इतर अधिकार्यांशी माझी ओळख करून दिली. चहा दिला आणि म्हणाले, बोला, काय काम असेल तर सांगा. साहेबांशी बोलून करून देतो. नुकत्याच झालेल्या ओळखीने लगेच काही मागायचे कसे? बरे दिसत नाही, म्हणून मी, आभारी आहे साहेब, असे म्हणालो आणि निरोप घेतला.
त्यावेळी समज नव्हती. आता समजायला लागले. पण संधी कधी पुन्हा येत नाही. आता शिंदे नाहीत आणि अंतुलेही…
तेलही गेले आणि तूपही.