शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकची स्थापना केली तीच मुळी मराठी माणसावरच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी. त्यामुळे मुखपृष्ठ असो की रविवारची जत्रा असो- बाळासाहेबांनी आज कोणत्या राजकीय नेत्यांची ‘पूजा’ बांधलेली आहे, हे पाहण्याची वाचकांना उत्सुकता असायची आणि बाळासाहेबही सहसा कुणाला निराश करत नसत. पण स्वत: राजकारणात असूनही त्यांचे विरोधी पक्षातल्या नेत्यांशी मैत्रीचे संबंध होते. अमुकमुक्त भारत आणि तमुकमुक्त महाराष्ट्र अशा विखारी वल्गनांचा काळ तेव्हा आला नव्हता. प्रचारयुद्धात दिवसा एकमेकांवर प्रखर टीका करणारे नेते सायंकाळी एकमेकांच्या घरी जाऊन, घरगुती गप्पा मारत सहभोजनाचा आस्वादही घेत असत. रसिक राजकारणी अशी ज्यांची ओळख आहे, त्या सुशीलकुमार शिंदे यांच्याशी बाळासाहेबांचे स्नेहाचे संबंध होते. १९८३ साली राज्यात अर्थमंत्री असलेल्या सुशीलकुमारांनी एकही कर नसलेला अर्थसंकल्प सादर करून विरोधकांची कशी पंचाईत केली, ते बाळासाहेबांनी किती खुमासदार, दिलदार पद्धतीने सादर केलं आहे, पाहा. सुशीलकुमार देखणे काव्यरसिक होते. अर्थसंकल्प सादर करताना समर्पक कवितेच्या ओळीही उद्घृत करायचे. त्या रसिकतेलाही साहेबांनी छान न्याय दिला आहे.