१९९३ साली माझ्या ‘एक फूल चार हाफ’ या चित्रपटाच्या निगेटिव्ह कटिंगसाठी दिलीप कुमार साहेब आले होते. निगेटिव्ह कटिंग हा त्यावेळी मोठा सोहळा असे. चित्रपट पूर्ण झाल्याचा त्यात आनंद असे… त्यामुळे निगेटिव्ह कटिंगसाठी मोठा सेलिब्रेटी बोलावला जाई.
११च्या मुहूर्ताला हे शहेनशहा त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने दीड वाजता आले… बांद्रा येथील केतनव स्टुडिओत होता सोहळा… दीडच्या सुमारास पांढरी शुभ्र मर्सिडीज गेटसमोर थांबली… स्वतः सायराजी त्यांना सोडून पुढे निघून गेल्या… पांढ-या शुभ्र कपड्यांमध्ये सुहास्य वदन आणि प्रसन्न मुद्रा असलेले दिलीप साहेब समोरून येत होते… आम्ही सर्व स्वागताला उभे होतो…
मी, संकलक अशोक पटवर्धन, साउंड इंजिनियर रवींद्र साठे, निर्माते बाबा मिस्त्री आणि विकी गायकवाड…
सामोरं येताच रवींद्र साठेला बघून ‘रवींद्र साठे?’ असे नावानिशी हाक मारून त्यांनीच रवीला ओळख दिली… रवी अचंबित झाला… (कारण आठ-नऊ वर्षांपूर्वी डॉ. जब्बार पटेल आणि तेंडुलकर यांच्यासमवेत एका हिंदी चित्रपटासाठी मिटिंग होत असत, तेव्हा रवींद्र साठे त्यांच्याबरोबर असत, त्यानंतर एवढ्या वर्षांनी भेटूनसुद्धा मेमरी शार्प).
आगत स्वागत झाले आणि त्यानंतर जवळ दीडेक तास दिलीप साहेब आमच्याशी गप्पा मारीत होते… मध्येच माझ्या खांद्यावर हात ठेवून मला म्हणाले.. ‘अरे मला घेऊन एक मराठी फिल्म का नाही बनवत? माझं मराठी चांगला आहे.. मी देवळालीचा आहे.. म्हणजे महाराष्ट्रीयनच नाय काय?’ अर्थात म्हणून काय मी लगेच दुस-या दिवशी त्यांच्या घरी स्क्रिप्ट घेऊन नाही गेलो.
आम्हाला भरपूर शुभेच्छा देऊन (अस्खलित उर्दू आणि मराठीत) दिलीप साब अत्यन्त सुखद आठवणी मागे ठेऊन निघून गेले.