□ लोक आम्हाला ‘जय-वीरू’ म्हणतात – आगलाव्या जाहिरातीनंतर मिंध्यांची सारवासारव सुरूच.
■ असं होय… आमच्या कानावर तर फारच वेगळी नावं आली होती… ते असो… त्या शोले सिनेमात साइड कार एकीकडे आणि बुलेट दुसरीकडे असं घडतं, म्हणून लोकांनी हे नाव ठेवलं नसेल ना तुम्हाला?
□ धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग; ‘जय-वीरू’च्या राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे ‘शोले’ उडाले.
■ यांचा पक्ष इतका निलाजरा आहे की दुसर्यांच्या काळात हे राजीनामे मागायला धावतात आणि आपल्या कारकीर्दीत असं घडलं की रेल्वेमंत्री काय रेल्वे चालवतात का, गृहमंत्री काय लोकल ट्रेनमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात का, असे मस्तवाल सवाल करतात!
□ मुंबई विद्यापीठाच्या बीकॉमच्या निकालात गडबड गोंधळ.
■ कोणत्या तरी निकालात गोंधळ झालेला नसेल, तर ती ‘बातमी’ आहे आता!
□ विलेपार्लेकर कचर्यामुळे हैराण
■ नेमकं कशाला कचरा म्हटलेलं आहे इथे, ते स्पष्ट करा; गैरसमज होतात.
□ गुजरातला बिपरजॉय वादळाचा तडाखा.
■ ते देशातलंच नव्हे, तर जगातलं सगळ्यात प्रगत राज्य आहे; तिथे बिपरजॉयलाच तडाखा बसेल हो!
□ आमदार निधीवाटपाला २१ जूनपर्यंत स्थगिती; मिंधे सरकारला हायकोर्टाचा झटका.
■ सगळीकडे लाज निघते, तरी सुधारत मात्र नाहीत.
□ झाडांवरील विद्युत रोषणाई मुंबईकरांच्या जिवावर उठली; पर्यटकांना शॉक
■ जी ट्वेंटीसाठी असली वरवरची देखावेबाजी केली की दिव्याखालचा अंधार दिसणारच ना?
□ बिहारमध्ये भाजपचं ठरलं; मित्रपक्षांना फक्त दहा जागा- महाराष्ट्रात मिंधे गट गॅसवर.
■ तोही मोदींनी शोध लावलेल्या नोबेल पुरस्कारपात्र चहावाल्याच्या संशोधनातल्या गॅसवर!
□ बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांतून क्युआर कोड गायब
■ म्हणजे एका नव्या घोटाळ्याची नांदीच!
□ सचिवांपासून सरकारी अधिकार्यांपर्यंत सर्वांच्या कामाचे दर महिन्याला होणार मूल्यमापन.
■ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मंत्री यांच्या बाबतीत पण आहे का अशी काही व्यवस्था?
□ कर्नाटक सरकारने हेडगेवार, गोळवलकर यांचे धडे शालेय पुस्तकातून वगळले.
■ जैसी करनी, वैसी भरनी!
□ ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात पालघरवासीयांना टळटळीत उन्हात बसवले.
■ आपल्या बोडक्यावर बेकायदा बसलेले शासन काय लायकीचे आहे ते एरवी त्यांना कळले कसे असते?
□ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाण्यात बेकायदा बांधकामांचा वेग चौपट.
■ फक्त चौपट? नीट चौकशी करा.
□ भाजपने मिंधे गटाला जागा दाखवली; ५० कुठं आणि १०५ कुठं?
■ तरी इथे अस्वलाने दरवेशाच्या नाकातून दोरी ओवली आहे ना हो! नाचा आता अस्वलाच्या तालावर.
□ गृह विभाग झोपा काढतोय का? विरोधकांचा संताप.
■ नाही, त्याचा कान दुखतोय.
□ आता म्हणे पाऊस २३ जूनला येणार.
■ तारीख पे तारीख, तारीख पे तारीख!
□ सध्या खोके लोकप्रिय, महाराष्ट्रातही खोक्यांचा कार्यक्रम झाला – शरद पवार यांचा हल्ला.
■ खोके, बोके, सगळे ओक्के!
□ ५० खोके, १०५ डोके! नांदेडात झळकले बॅनर.
■ त्या मस्तवाल डोक्यांनीच खोकेबाजी केली ना? मग तेही रिकामे खोकेच की!
□ गुवाहाटीला शेवटी पळालेलेच गद्दारीचे खरे सूत्रधार – अखेर उघड झाले.
■ शेण चमच्याने खाल्लं काय किंवा पाटी भरून खाल्लं काय, आधी खाल्लं काय, नंतर खाल्लं काय, शेण ते शेणच!
□ अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ -खासदार सुप्रिया सुळे.
■ ताईंनी दादांनाच रक्षाबंधनाचं गिफ्ट देऊन टाकलं वाटतं!
□ आषाढी वारीत मिंध्यांची घुसखोरी.
■ भोंदुत्ववाद्यांनी आधीच घुसखोरी केली आहे, मग यात नवल काय?
□ मणिपुरात भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचे घर पेटवले.
■ युक्रेन आणि रशिया यांच्यात मध्यस्थी करणारे विश्वगुरू आपल्याच देशातल्या मणिपुरात का जात नाहीत? निदान एखादी मन की बात तरी ऐकवा तिथे!
□ विद्यार्थ्यांच्या गजबजाटाने शाळा गजबजल्या.
■ …आणि घरात शांतता प्रस्थापित झाल्याने आईबाबांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.