एप्रिल महिन्यात एका ठिकाणी ऑफिसच्या भेटीसाठी जाण्याचा योग आला. ज्या कंपनीत भेट होती तिथल्या एक बाई दिवसभर माझ्याबरोबर असणार होत्या. दिवसभर बाई अस्वस्थ दिसत होत्या. सारखा फोन तपासत होत्या. म्हटलं, कदाचित सवय असेल त्यांची, म्हणून मी लक्ष दिले नाही. दुपारी जेवणाच्या वेळेवर फोन आला. इकडून बाईंची फोनवर प्रतिक्रिया अशी होती, काय झालं मन्या? बाबा बरोबर आले होते ना रिझल्टसाठी? लागला ना?
तिकडून काहीतरी संभाषण झालं.
बाई ताड्कन खुर्चीतून उठल्या, जोरात ओरडल्या, बघ… म्हटलं होतं ना तुला. नीट अभ्यास कर. गेले किनई मार्क आता. कसा मिळणार त्या ठिकाणी प्रवेश? थोडक्यात घालवलं तू.
इच्छा नसूनही माझे कान या संवादाकडे लागले होते. बाई काळजीत वाटत होत्या. कमी अभ्यास केल्याने बहुधा मुलाला कमी गुण मिळाले आणि त्याचा एका चांगल्या संस्थेत इंजीनियरिंग किंवा मेडिकलला प्रवेश होता होता राहिला असावा हे नक्की.
बाईंनी फोन ठेवला. त्यांचे डोळे पाणावले होते. मी त्यांची समजूत काढत होते, असू दे हो. चालतं. काय करणार?
बाई : किती अभ्यास करून घेतला हो मी त्याचा. कानीकपाळी ओरडत होते. पण ऐकेल तर शपथ. गेम खेळायचे. टीव्ही बघायचा. आता राहिला ना चांगल्या ठिकाणी प्रवेश. थोडक्यात राहिला.
मी : इंजीनियरिंगला घ्यायचा होता का प्रवेश? (बाई आता माझ्याकडे खुळ्यागत बघत होत्या.)
बाई : माझ्याकडे बघून माझा मुलगा इंजीनियरिंगला असेल असे वाटले का तुम्हाला? अहो नर्सरीला प्रवेश हवा होता मुलाला. त्याकरिता प्रवेश परीक्षा होती. आणि केवढी नामांकित संस्था आहे. मुलं अभ्यासच करत नाहीत हल्ली, काय करणार?
डोळ्यांत पाणी येण्याची वेळ आता माझी होती. मुलाला नर्सरीला प्रवेश न मिळाल्याने बाई इतक्या अस्वस्थ होत्या आणि एक आमची वेळ होती.
शाळेत प्रवेश घेण्यासाठी किमान मुलांची जन्मतारीख माहिती असावी लागते हेदेखील कित्येक पालकांना माहिती नसायचे. त्यामुळे आज जर मागच्या काही पिढ्यांमधील लोकांच्या जन्मतारखा बघितल्या तर लोकसंख्येचा विस्फोट अचानक दरवर्षी
१ जूनला कसा काय होतो यावर कदाचित नवीन पिढीच्या शिक्षणात संशोधनही होऊ शकते.
सुट्टी संपणार म्हणून आम्हाला वाईट वाटायचं. शिवाय शाळा बुडवण्याचा आनंद आमचे पालक घेऊ देतील तर शपथ. आमच्या आनंदाचं आणि पालकांच्या आनंदाचं व्यस्त प्रमाण होतं. आम्हाला ज्या कुठल्या गोष्टीत आनंद म्हणून वाटला तो आमच्या पालकांना कधीही वाटला नाही. आताचे पालक कसे मुलांच्या मानसिकतेचा वगैरे विचार करतात. मूल शाळेत जाताना रडू लागलं तर त्याची समजूत घालतात. शाळा सुटेपर्यंत बाहेर बसतात. फारच झालं तर त्याला घरी परत घेऊन येतात. आमच्या वेळी आम्ही शाळेत जाताना रडलोच तर समजूत वगैरे घालायची असते हे आईबाबांच्या विचारातसुद्धा नसायचं. प्रत्येक तक्रारीवर फक्त आणि फक्त दोन चार रट्टे हा एकमेव इलाज होता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमची मानसिकता त्याने लगेच ठिकाणावर यायची. प्रत्येक पाल्याने एकेकदा असे रट्टे खाल्ले की घरी बसून आईबाबांचा मार खाण्यापेक्षा शाळेत बसून मास्तरांचा किंवा बाईंचा खाणे काय वाईट असा हिशेब लावला होता.
या रट्टे खाणार्यांमध्ये आजचे आयपीएस अधिकारी, डॉक्टर्स, इंजीनियर्स लपलेले आहेत हे तेव्हा आमच्या पालकांना समजले नसेल काय? आम्हा अधिकार्यांचे पाय तेव्हा त्यांना पाळण्यात दिसले नसतील काय? आमच्या भावी सेल्स टॅक्स ऑफिसरला,
डॉक्टरला, किंवा सॉफ्टवेयर इंजिनयरला जास्त मारू नका असे आमचे आईवडील मास्तरांना का म्हणाले नसतील?
हल्ली मुलांना अगदी लहानपणीच हे ठाऊक असतं की आपल्याला मोठं होऊन कोण व्हायचं आहे? आमच्यावेळी जेव्हा आम्ही पुढच्या वर्गात जाऊ की नाही किंवा आहे त्याच वर्गात किती वर्षे राहू याची खात्री खुद्द आम्हांलाच नव्हती, तेव्हा मोठेपणी कोण होणार याबद्दल कोण बोलणार? तरीही घरी आलेल्या पाहुण्याने असा प्रश्न विचारलाच तर तोंडाला येईल ते उत्तर आम्ही देत असू.
उदा. एका पाहुण्याने सुमीला विचारले की तुला काय व्हायचे आहे? सुमीने उत्तर दिले होते, आई व्हायचे आहे. पाहुण्यांनी विचारले, आई होऊन पुढे काय? सुमी म्हणाली, ‘आई होऊन पुढे पण आईच होणार. मला ५-६ वेळा आईच व्हायचे आहे.’ भविष्याबाबत एवढी स्पष्टता तिच्याकडे होती त्यामुळे मला तिचा हेवा वाटला होता.
आजकाल जसे कर्तव्यतत्पर आईवडील आहेत तसे आमच्या काळी अजिबातच नव्हते. आजकालचे आईवडील मुलांचे गणवेश, दप्तर, पुस्तकं आणायला ऑफिसमधून सुट्टी घेतात. अगदी लहानपणीपासून मुलाने शिकले पाहिजे या आस्थेने त्याला वेगवेगळे क्लासेस लावतात. कराटे म्हणू नका, बुद्धिबळ म्हणू नका, गिटार आणि अजून कसले कसले क्लासेस लावतात. आमच्या बाबांना बुद्धिबळाचे क्लासेस लावू का विचारले तर म्हणाले होते, अभ्यासात जरा बुद्धी लावा, तिथे जास्त गरज आहे आपल्याला बुद्धीच्या बळाची. गिटार लावू का म्हटलं तर म्हणाले, कशाला तारा खाजवायच्या आहेत?
हे असे नाउमेद करणारे वातावरण असल्याने आम्ही आमचे विविध गुणदर्शन शाळेतच करत असू. मुलांना चांगले गुण मिळाल्यावर आजकालचे आईवडील त्यांचं किती कौतुक करतात. हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातात. आमच्यावर असा प्रसंग येण्याची शक्यताच नव्हती. कारण आम्हाला चांगले गुण म्हणजे काय याचा पत्ताच नव्हता. निकालावर लाल रेघ न येणे ही गुणांची परमावधी होती. पण एकदाच चुकून मला भाषेत ६२ गुण पडले आणि मी त्या विषयात वर्गात पहिली आले. घरी हे सांगितल्यावर घरचे म्हणाले, लगेच काही एका विषयाने एवढे शेफारून जायला नको आहे, गणितातील उजेड बघा आधी.
आजकालचे शिक्षकही किती चांगले असतात. शाळेच्या पहिल्या दिवशी गुलाबाचं फुल देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जातं. अशी फुलं वगैरे दिली तर आम्ही बिघडणार तर नाहीत ना, अशी शक्यता आमच्या शिक्षकांना वाटली असती. त्यामुळे हातावर आणि पाठीवर फुलं उमटवण्यात त्यांनी जास्त विश्वास ठेवला.
प्रार्थना हा माझा शाळेतील अत्यंत आवडीचा प्रकार होता. सगळ्या वर्गाच्या तालाशी आपला ताल आणि सूर कधीही जुळणार नाही याची काळजी आम्ही परोपरीने घ्यायचो. त्यामुळे ऐच्छिक विषयात जेव्हा गायन हा पर्याय समोर आला, तेव्हा आमच्या शिक्षकांनीच परस्परच तो पर्याय खोडून टाकला.
आमच्या शिक्षणासाठी जबाबदार कोणाला धरावे, शिक्षकांना की पालकांना? हा प्रश्न मला बर्याचदा पडतो. आईवडिलांनी शाळेत घातलं म्हणून शिकलो, शिक्षकांनी पुढच्या वर्गात ढकललं म्हणून पुढे गेलो. मानसिकता हा शब्द वापरला नसला तरीही मुलांना नीतिमूल्यांचं शिक्षण द्यायला आमचे शिक्षक आणि पालक विसरले नाहीत. दुसरीत जाईपर्यंत फक्त पाटी वापरणारी आणि जेमतेम दोन पुस्तकं असलेली आमची पिढी. आताच्या इयत्ता पहिलीतच ७००० रुपयांच्या पुस्तकांपुढे ती दोन पुस्तकं जास्त मोठी भासू लागतात. एयर कण्डिशनर असेलल्या शाळेपुढे आमची खिडक्या आणि फळे फुटलेली इमारत जास्त थोर वाटू लागते.
शाळेत गेलो नाही तर घरी येऊन पाठ फोडत घेऊन जाणार्या बाई आणि घरी आई यात कधी विशेष फरकच वाटला नाही. कारण दोन्हीकडे तितक्याच हक्काने दोघीही आम्हाला रागवायच्या. दरवर्षी नवीन पुस्तकं आणली की त्या कोर्या पुस्तकातून वाचलेले इतिहासाचे धडे, भाषेच्या पुस्तकात वाचलेल्या गोष्टी-कविता हे सगळं मनाच्या कोपर्यात रचून ठेवलेलं आहे.
आमच्या शेजारचा चिनू यावर्षी शाळेत जाऊ लागला. त्यामुळे शाळेची आठवण प्रकर्षाने झाली. नुकत्याच शाळेच्या बाई घरी येऊन त्याच्या पालकांना भेटून गेल्या. त्यांनी प्रश्न विचारला, तुमच्या मुलाला काय झालेलं तुम्हाला बघायचं आहे? तुम्हाला हवे असेल तर आपण त्याची बुद्धिमत्ता चाचणी करून बघूया. त्यात त्याचा कल समजेल.
हे ऐकून मी थिजले होते. शाळेत जाण्याचाच कल जिथे नसतो तिथे आयुष्यात काय बनणार याची उत्तरं आताच कुठून मिळत असतील? मी त्यांच्या घरातून निघून गेले. कोण जाणे, पालकांनी सांगितलं, त्याला डॉक्टर करायचं आहे आणि बाई म्हणाल्या की तुम्हाला हा विचार करायला थोडासा उशीरच झाला, तर?