काही इच्छा असतात अर्ध्या राहिलेल्या. काही व्यथा असतात ज्यांना कुणी जाणलेलं नसतं. काही चेहरे असतात ज्यांना कुणी वाचलेलं नसतं. काही पुस्तके अशीच मिटलेली राहून जातात, ज्यांची पाने कुणी उघडलेलीच नसतात… आणि काही स्वप्ने असतात, आयुष्याच्या अर्ध्यामुर्ध्या टप्प्यावर, अवेळी आलेल्या पावसातल्या पाण्यात कागदी नावेबरोबर सोडून दिलेली! हरेकाच्या आयुष्यात खूप काही निसटून गेलेलं असतं, आयुष्य संपत आलं तरी जगणं खर्या अर्थाने बरंचसं बाकी असतं! पण साध्या माणसांच्या जगण्याला नि त्यांच्या रोजच्याच संघर्षाला बाह्य जगात शून्य किंमत असते, इतरांच्या लेखी हे गौण असतं. सामान्य माणसांचं विश्व जगासाठी कधीच महत्वाचं नसतं, कारण ते जगाच्या उतरंडीत सर्वात तळाशी असतात. अशांना कोण नायक-नायिकेचे स्थान देणार? मात्र बॉलिवुडने हे करून दाखवलेय! जेमतेम काही दशकांपूर्वी सिनेमाचे कथाविषय साधीसुधी माणसं होती. त्यांचे सरळसाधे गुंते होते. निरलस मने आणि नितळ संघर्ष. लेपविरहित चेहरे, ओढाळ गाणी. शांत रात्री नि बेजान दिवस यांचं कॉम्बिनेशन असणारी तरल आयुष्ये. डामडौल नसणारा भवताल आणि डोळ्यांची भाषा बोलणारी कॅरेक्टर्स, ना कसला कोलाहल ना कुठला प्रबोधनाचा बाज, सरळ सुबक मांडणी! यांची गुंफण असणार्या निव्वळ सरस जीवनकथा! केवळ उत्तुंग हिमशिखरांना पाहूनच छाती भरून येते असं काही नसतं, काही गवताची पातीही अशी टोकदार नि चिवट असतात की त्यांनीही मन भरून येतं, याची प्रचिती बॉलिवुडच्या सिनेमांमधून टोकदारपणे अनुभवाला आलीय.
ग्लॅमर नसलेले चेहरे, अनपॉलिश्ड कथा, रोजच्या जगण्यातल्या काही सुलभ, काही कठीण गोष्टी असं विश्व बॉलिवुडमध्ये सुखाने नांदत होतं. यांच्या जोडीला अर्थपूर्ण सुरेल गाणी होती, सुश्राव्य संगीत होतं, खटकेबाज संवाद होते, स्वत:ची वेगळी स्टाईल असणारे भलेबुरे नायक-नायिका होत्या, दिलखुलास हसवणारे हास्य अभिनेते होते आणि मस्तकात तिडीक आणणारे खलनायक होते; हेलावून टाकणार्या काळीजकथा होत्या नि हलक्या फुलक्या आनंदकथाही होत्या! मात्र मागील काही वर्षांपासून अतिवास्तववाद, उठसूटचा राष्ट्रवाद नि इतिहासाचा पराकोटीचा हव्यास यांच्या गर्दीत हे विश्व गुदमरून गेलं. हृषिकेश मुखर्जी, बासू चॅटर्जी यांच्या सिनेमांचा एक देखणा हवाहवासा परीघ होता आणि त्याला छेद देणारा मणिरत्नम, गोविंद निहलानी आदींचा एक टोकदार परीघ होता. ही दोन्ही वर्तुळे जीवनदायी होती, त्यांचे एकेक बिंदू आताच्या उन्मादाने उखडून काढले जाताहेत. बघता बघता चित्रपटाचा रुपेरी पडदा करपत चाललाय आणि सिनेमा घायाळ झालाय. आयुष्याच्या विविध वळणवाटांवर नवनवे जीवनार्थ शिकवणार्या नि रोजच्या धकाधकीच्या जीवनात दोन घटका मनोरंजनाचे हक्काचे साधन असणार्या सिनेमाने अशी मान टाकणं हे वेदनादायी आहे. तरीही असे सिनेमे अजूनही बनवले जाताहेत, भलेही त्यांना आता मोठा प्रतिसाद नसला तरी येत्या काही वर्षांत हे चित्र नक्की बदलेल. मग पुन्हा आशय विषयाला पूर्वीसारखे सोनेरी दिवस येतील. आता तसे सिनेमे त्या प्रमाणात निर्मिले जात नसले, तरी भूतकाळातले काही सिनेमे थेट टाइम ट्रॅव्हल करून त्या युगामध्ये घेऊन जातात, हे काय कमी आहे का? आपल्याला टाइम ट्रॅव्हलची सैर करवण्यासाठी बॉलिवुडला धन्यवाद दिले पाहिजेत.
गतकाळात डोकावलं तर अशा सिनेमांची एक रांगच दिसून येते. काही निर्माते-दिग्दर्शक तर अशाच कंटेंटच्या चित्रपटांसाठी खास ओळखले जात. सई परांजपे यांचे सिनेमे तर वरवर एका सेटअपप्रमाणे वाटत असले आणि काही ठराविक नटनट्यांना घेऊन केले गेले असले तरी त्यातले विषयवैविध्य आणि मांडणी अशी काही होती की पाहताच फिदा व्हावे! स्मिता पाटील, दीप्ती नवल, फारूख शेख, नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी, ओम पुरी इत्यादी मंडळी यातले कसलेले खेळाडू होते. यातल्या कोणत्याही अभिनेत्याला घेऊन केलेला धंदेवाईक सिनेमाही आर्ट मूव्ही आहे की काय अशी शंका यावी, इतक्या मोठ्या संख्येने हे सिनेमे बनवले जात होते. या चित्रपटांचे विषयवैविध्य अफाट होते. यातलाच एक चित्रपट होता ‘बाजार’. यात स्मिता पाटील, दीप्ती नवल, फारूख शेख, नसीरुद्दीन यांचे लीड रोल होते. ‘बाजार’ आणि स्मिताविषयीच्या काही नोंदी असाधारण आहेत.
‘बाजार’चं चित्रीकरण सुरू होतं तेव्हा स्मिता पाटील उद्ध्वस्त झालेल्या मानसिकतेत होती. राज बब्बरने आपल्याला फसवल्याची भावना तिच्या ठायी दृढ झाली होती. २१ मे १९८२ रोजी ‘बाजार’ रिलीज झाला आणि १३ डिसेंबर १९८६च्या दिवशी स्मिता गेली. ‘बाजार’च्या सेटवर ती अस्वस्थ असायची. यातल्या कथेने भेदरून जावं असं आयुष्य ती जगत होती. तरीही सिनेमामध्ये तिचा वावर सर्वाधिक सफाईदार होता. यात अशा अनेक दुर्दैवी मुस्लीम मुलींची खरी कहाणी होती, ज्यांना त्यांच्या गरीब पालक/पालकांकडून लग्नाच्या छळाखाली आखाती देशातील श्रीमंत लोकांना विकले जाई. या दुर्दैवी मुलींना त्यांचे संपूर्ण आयुष्य आपल्याहून कितीतरी मोठ्या वयाच्या नवर्यांसोबत किंवा त्यांच्या हुकुमानुसार घालवण्याचा शापच होता. हा ‘बाजार’ खरे तर त्यांच्या गरिबीचा बाजार होता; त्यांची असहायता सूचक होती. यातले बहुतेक तथाकथित विवाह फक्त मुलींच्या विक्रीसाठी होत असत. लग्न हे यांच्या देहव्यापाराला दिलेलं सभ्य नाव असून याशिवाय दुसरे काहीही नसे. हे विवाह बहुतांशी हैदराबादमध्ये होत असत.
एका अतिशय तरूण आणि निष्पाप मुलीच्या हतबलतेची कथा ‘बाजार’मध्ये होती. शबनम (सुप्रिया पाठक) ही एका गरीब कुटुंबातली तरुणी. तिच्यासारख्याच एका भणंग तरुणावर, सरजूवर (फारूक शेख) तिचे मन जडते. तिचे पालक मात्र ‘लग्नासाठी’ हैदराबादला आलेल्या दुबईतील एका श्रीमंत वृद्ध व्यक्तीशी डील निश्चित करतात. या वृद्धासाठी योग्य मुलगी शोधण्यात अख्तर हुसेन (भरत कपूर) मदत करतो. याकामी त्याला रग्गड पैसे आणि नजमा (स्मिता पाटील) मिळणार असते. नजमाला भीती असते की गरिबीवर मात करण्यासाठी आपले आईवडिलही आपलं बनावट लग्न लावून अंध:कारात लोटून देतील. त्यापायी तिने घरातून पलायन केलेलं असतं. विचारवंत, शायर सलीम (नसिरुद्दीन शाह) यांच्यावर ती प्रेम करत असते. त्यांच्यातलं प्रेम प्लॅटोनिक लेव्हलचं! आपल्याला विकलं जाऊ नये म्हणून नगमा आपल्या घरातून पळून जाण्याचा पर्याय निवडते आणि अख्तरसोबतची लिव्ह-इन रिलेशनशिप स्वीकारते. सलीमची वाट पाहत आयुष्य घालवणं तिला शक्य नसतं नि अख्तरसोबत पत्नी म्हणून जगण्याशिवाय पर्याय नसतो! अख्तर तिला आश्वासन देतो की त्याच्यापाशी पुरेसे पैसे मिळताच तो तिच्याशी लग्न करेल. दरम्यान नजमा देखील अख्तरसोबत राहून शबनमच्या कथित विक्रीचा एक हिस्सा बनते. तिला आशा असते की यातून अख्तरला भरपूर पैसे मिळून तो तिच्याशी लग्न करेल. शबनमचे ज्या सरजूवरती प्रेम असते, तो नजमाचाच भाऊ असतो. नजमाला जेव्हा त्यांच्या प्रेमाची प्रचिती येते तेव्हा ती कोलमडून पडते, कारण एव्हाना उशीर झालेला असतो.
‘बाजार’मधल्या शबनमच्या आईची भूमिका केली होती सुलभा देशपांडे यांनी. आपल्या लेकीचं लग्न जमावं म्हणून जिवाचा आटापिटा करणारी आई त्यांनी अगदी नेमकी निभावली होती. सुलभाताईंची भूमिका छोटी होती, तरीही ती लक्षात राहिली. मुंबई आणि हैदराबाद या दोन शहरांतली भिन्न संस्कृती नकळत समोर येते जे आपल्याला अगदी अखेरीस जाणवतं!
१९३३मध्ये तेव्हाच्या ब्रिटिशकालीन पाकिस्तानमधील बफ्फा शहरात जन्मलेल्या सागर सरहदी यांनी हा माफक निर्मितीमूल्ये असलेला हा उत्तम चित्रपट दिग्दर्शित केला होता. शॉर्टफिल्म्स आणि नाटकं यात रमणार्या सरहदींना व्यावसायिक गणिते जमली नाहीत, पण माणसांच्या मनाचा तळ शोधता आला, जो त्यांच्या सिनेमात स्पष्ट दिसतो! आता सरहदी जिवंत असते तर कदाचित त्यांच्या सिनेमांना बॉयकॉट केलं गेलं असतं, पाकिस्तानला परत जा, असं सुनवलं गेलं असतं.
आता उपलब्ध असलेल्या प्रिंट्समध्येही या रंगीत चित्रपटाचे रंग फिके पडले आहेत. पण एक गोष्ट अबाधित आहे, तो म्हणजे या चित्रपटाचा आत्मा! हा चित्रपट डोळ्यांनी आणि कानांनी पाहण्यापुरता नाहीये. यातील गाणी अजरामर आहेत आणि संवाद हृदयाला छेद देणारे आहेत ज्यांना अंतरात्म्यातून महसूस करायचेय! अशा शेकडो गरीब (मुस्लीम) मुलींच्या वास्तविक जीवनातील दुर्दशेची कल्पना केली तर आपल्याला शरम वाटेल, कारण ज्या एकदा विकल्या गेल्या आणि ‘डिलिव्हर’ झाल्या, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. खांडोळी करुन मांस विकायला ठेवलेल्या हलाल जित्राबासारखी त्यांची अवस्था होती. त्या स्वावलंबी नव्हत्या नि स्वतंत्रही नव्हत्या. त्यांना विकत घेणारे लोक त्यांचे पती बनण्यास पात्र नसत, परंतु त्यांच्या पालकांकडून त्यांची गरीबी, असहायता विकत घेण्याइतके श्रीमंत असत. या मुली म्हणजे निव्वळ भोगवस्तू होत्या. निव्वळ वस्तू!