तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा त्रास काय आहे?
– हरिदास मोकाशी, लासलगाव
सहन होत नाही आणि बघता पण येत नाही… सांगितलं तर औषध लावायला तरी मदत कराल का? (स्लिप डिस्कचा त्रास आहे मला.)
तुम्ही तरूण झालात तेव्हा आपण तरूण झालो, हे तुम्हाला कसं कळलं?
– नंदकुमार अळशी, भंडारदरा
माझ्याबरोबर खेळणारी शेजारची मुलगी मला दादा म्हणाली तेव्हा…
बायकोला नव्या साडीत पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं, खरं सांगा.
– राखी बेलसरे, नेरूळ
साडी सोडल्यावर… साडीची घडी तिनेच घालावी, मला सांगू नये (जे बहुतांशी नवर्यांना वाटतं) असंच वाटतं!
१८ वर्षांची एखादी मुलगी एकदम तुमच्याशी लग्न करायला निघाली तर तुम्ही तिला काय सल्ला द्याल?
– पल्लवी माने, तुळजापूर
तिला सांगेन… बाय, माझ्या लग्नाला १८ वर्ष झालीयत, तू दुसरा कोणीतरी बघ…
लग्न आणि ट्रॅफिक जॅम यांच्यात काय साम्य आहे?
– मधुसूदन शेरेकर, यवतमाळ
किती काही वाटलं तरी घंटा, घंटा, घंटा काही करता येत नाही. रस्ता क्लिअर होईपर्यंत हात चोळत बसावं लागतं…
तुमची सगळी संपत्ती तुम्ही माझ्या नावावर करावी, यासाठी मला काय करावं लागेल?
– बंडू पाटील, करमाळा
तुमचा माझा ‘संबंध’ आहे हे तुमच्या घरातल्यांना सांगावं लागेल.
पवारानुं, कोकणचे ना तुम्ही? मग तुमका कोकणात कधी भूत भेटलंय काय?
– राहुल दरेकर, बिरवाडी
नाय.. भूत भेटेल या भीतीने म्या कधी बिरवाडीत गेलंय नाय दरेकरानु!
मोठमोठे महापुरुष सांगून गेले आहेत की शत्रूची गळाभेट घेतली पाहिजे. दारू ही माणसाची शत्रू आहे, असं म्हणतात. तिच्याबाबतीत काय करावं? तुमचा सल्ला काय?
– पोपटराव पाचपुते, श्रीगोंदा
दारूची गळाभेट घ्यायची तुम्हाला गरज नाही… कारण दारू घेतल्यानंतर भले भले पोपटासारखे बोलतात हे लक्षात घ्या, पोपटराव (कळलं नसेल तर ‘घेऊन’ वाचा).
संतोषराव, मी एक घोडा घेतला आहे. पण तो काही केल्या गवत खात नाही. काय करू?
– विलायत खान, गोवंडी
कडेवर घेऊन भरवा!
एखाद्या म्हशीला बुद्धी आली तर काय होईल?
– सोमनाथ शेलार, पाचगणी
एखाद्या रेड्याचं काम जाईल (लोकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं.)
पत्नी ही बाँब असेल, तर गर्लफ्रेंड काय असते?
– रॉनी डिसिल्वा, वांद्रे
वात काढलेला बॉम्ब!
नाटक हा तुमचा छंद आहे की पेशा आहे?
– सविता आंधळे, मालाड
नसता उद्योग आहे (जेव्हा नाटक हा माझा व्यवसाय झाला नव्हता, तेव्हा आई बाबा, सासू-सासरे, नातेवाईक सगळे असंच बोलायचे).
मला माझ्या घराण्याचे नाव रोशन करायचं आहे, त्यासाठी मी काय करू?
– पवन पासलकर, पुणे
तुमचे केस भादरा… म्हणजे तुम्ही राकेश रोशन.. तुमचा लेक हृतिक रोशन… अख्खं घराणं रोशन.
माझी अंतिम इच्छा अशी आहे की मला विमानात मरायचं आहे. काय करावं लागेल?
– रणविजय राठोड, अमरावती
आधी विमानाचं तिकीट परवडतं का ते बघावं लागेल.
तराजूच्या एका पारड्यात तुम्ही आणि दुसरीकडे देव असेल, तर कोणतं पारडं वजनदार ठरेल?
– सलोनी वाघमारे, पिंपळे गुरव
माझं पारडं जड असेल… कारण माझ्यात ‘मी’ आहे.. आणि देवामध्ये ‘मी’ नाही.
मूल जन्माला आल्यावर कधी हसत नाही, रडण्याचा भोकाणा पसरतं… असं का?
– पल्लवी दुर्गेश काळे, सोलापूर
त्या मुलाला न विचारता, त्याच्या मनाविरुद्ध, कधी आपल्या हौसेसाठी, तर कधी चुकून मुलाला जन्माला घातलेल असतं. मग ते मूल भोकाणा पसरणार नाही तर काय हसणार? नशीब समजा त्याला तेव्हा बोलता येत नाही, नाहीतर त्याने आपल्याच आईबाबाच्या आईबाबाचा उद्धार केला असता.