भारतीय जनता पक्षाने सगळा देशच मध्ययुगात किंवा पौराणिक युगात नेण्याचा चंग बांधला आहे. महाराष्ट्रातही सध्या वटवृक्ष, सूर्य, वेली, हत्ती, बेडूक वगैरे पंचतंत्राचा काळ अवतरला आहे. आहे. राज्यापुढच्या कळीच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नसलेले दोन राज्यप्रमुख आणि त्यांचे चेलेचपाटे सार्वजनिक नळावरच्या पाचकळ साळकाया माळकायांसारख्या एकमेकांच्या आणि वेळ मिळालाच तर इतरांच्या उखाळ्या पाखाळ्या काढत आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच म्हणाले की भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जणू वटवृक्ष आहेत आणि इतर पक्ष या वेली आहेत. वेली वटवृक्षाचे काही वाकडे करू शकत नाहीत. आता यांना हे कोण सांगणार की सकस, सर्वसमावेशक विचारधारेचे पोषण नसलेल्या, आंतरिक विषाने वठलेल्या, खुरट्या रोपट्याला वटवृक्ष म्हणत नाहीत, त्याला ‘वठवृक्ष’ म्हणता येईल फारतर! त्यावरची फुलापानांची, पारंब्यांची जी चमकदार लयलूट दिसते ती ख्रिस्मस ट्री सजवतात तशी इकडून तिकडून फांद्या, पानं तोडून केलेली तात्पुरती सजावट आहे. काही धाक दाखवून पळवलेली बांडगुळे आहेत. सत्तेचा नाताळ आटोपला की सगळी सजावट गळून पडेल आणि वठवृक्ष उघडा पडेल. बांडगुळे तर त्याआधीच संपलेली असतील. शिवाय हा तथाकथित वठवृक्ष थापा मारून मारून जेमतेम ४० टक्क्यांचा पाठिंबा मिळवतो. वेलींना आधार ६० टक्क्यांचा आहे आणि वेलींनी ठरवले तर त्या तथाकथित वटवृक्षाचा गळा कसा आवळू शकतात, ते कर्नाटकाने दाखवून दिले आहे.
दुसरीकडे, बाटग्याची बांग मोठी असते, ही म्हण खरी करत मुख्य मिंधे म्हणतात, मोदी हे सूर्य आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका करू नयेत. अदानींच्या अंगणात तेजाने तळपणार्या या सूर्याची महागाथा उद्धव यांना सांगणारे मिंधे मुळात कोण आहेत? ठाण्यापलीकडे त्यांना ओळखते कोण? मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत ओढवलेल्या कोरोनाकाळात कुटुंबप्रमुख बनून राज्य सांभाळणार्या आणि देशभर एक आदर्श बनलेल्या उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलावे? ज्यांच्या बळावर यांच्या उड्या, तेही यांना बेडूक म्हणून हिणवतात. यांनी इतरांना बोलावे?
या हत्ती आणि बेडकाची एक सुरस आणि चमत्कारिक कथा महाराष्ट्राने नुकतीच पाहिली आहे. ही जोडगोळी महाराष्ट्राच्या बाकी काही उपयोगाची नसली तरी निखळ हसवणूक मात्र करतेच, यात शंका नाही. एक दिवशी सकाळी प्रमुख वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना पसंती, अशी हास्यस्फोटक दावा करणारी जाहिरात ‘कोणा हितचिंतका’ने प्रसिद्ध केली. त्यात तथाकथित महाशक्तीच्या कोणाचा उल्लेख नाही, ज्यांच्या नावाला काळिमा फासून त्यांचा वारसा चालवल्याचा आव आणला, त्या हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नाही, वर बळजबरीचे उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे दुसर्या क्रमांकाच्या पसंतीचे मुख्यमंत्री आहेत, असा अचाट दावा, असा सगळा चित्तचक्षुचमत्कारिक प्रकार होता. यांच्या जागी एखादा स्वाभिमानी माणूस असता, तर तात्काळ ही बेईमान बांडगुळं आताच छाटून टाका, असं वठवृक्षाला ठणकावले असते. पण, इथे कोणा किरकोळ प्रवक्त्याकरवी हत्ती आणि बेडूक वगैरे तुलना करून फक्त दोन दिवसांच्या कानदुखीवरच प्रकरण निभावलं आणि नंतर परत खोटं खोटं हसत जय-वीरूची जोडी लोकांना ‘हात दाखवत’ फिरू लागली. मनोमन केवढ्या घनघोर यातना भोगाव्या लागत असतील वठवृक्षाच्या पारंबीला. शिवसेनेचे तुकडे पाडायचेच या इरेला पेटून, रात्रीची नको तिथली मुशाफिरी करून ४० बांडगुळं गोळा करून आणली ती त्यांच्या बळावर आपण ज्युनियर वठवृक्ष बनू या महत्त्वाकांक्षेने. आता ही बांडगुळं यांनाच वाकुल्या दाखवायला लागली आहेत, ज्याने सत्तासोपान खुले केले, त्यालाच मागे टाकण्याच्या वल्गना करू लागली आहेत.
नंतर मग नवीन सर्वेक्षण केले गेले आणि भाजपला सव्वाशे जागा, मिंध्यांना २५ जागा अशी आकड्यांची फेकाफेक करून आत्ता निवडणूक झाली तर आम्हीच सत्तेत येणार, अशा वावड्या भाडोत्री मीडियाकरवी पेरल्या गेल्या. पूर्वी राजे महाराजे बाहेर पडत तेव्हा त्यांना शुभशकुन करायला भाडोत्री ललना डोईवर, अंगावर पाण्याची भांडी घेऊन उभ्या असत आणि त्या महाराजांच्या समोरून जात. तसे इथे यांच्या घरासमोर सर्व्हेवाले उभे केलेले असतात बहुतेक. स्वारी बाहेर आली की लगेच सर्व्हेवाले पुढे येऊन सांगतात, महाराज, इथे तर तुम्हाला दोनशे टक्के लोकांचा पाठिंबा आहेच, पण टिंबक्टूमध्ये तीनशे आणि ग्वाटेमालामध्ये पण पाचशे टक्के लोकांचा पाठिंबा आहे. महाराजांकडे समृद्धीची वानवा नाही; ते लगेच मोत्याचा कंठा घालत असणार सर्व्हेवाल्याच्या गळ्यात.
यांच्या विजयाची यांना इतकी खात्री होती, तर मुळात गद्दारी केली तेव्हाच राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे का गेले नाहीत? सर्वोच्च न्यायालयाने वाभाडे काढल्यानंतरही बेकायदा आणि अनैतिक पद्धतीने वर्षभर सत्तेवर चिकटून राहिल्यावरही राज्यातले वातावरण अनुकूल नाही, शंभराच्या आत खेळ आटोपेल दोघांचा मिळून, हे माहिती आहे, म्हणूनच तर कुठेच कोणत्याच निवडणुका घेतल्या जात नाहीत. उगा, भाडोत्री सर्व्हेंच्या बेटकुळ्या कसल्या काढून दाखवता?
वठवृक्षाची भलामण करणार्या फडणवीसांनी मुळांनी आधी याचा शोध घ्यायला हवा की मिंध्यांची थेट आपल्याला ललकारण्याची हिंमत झाली कशी? त्यामागे कोणती महाशक्ती काय खेळ करते आहे? आपण शिवसेनेसाठी खणलेल्या खड्ड्यात स्वत:च तर पडलेलो नाही ना? महाराष्ट्रातली जनता या भोजनभाऊंच्या भाऊबंदकीकडे पाहून इतकेच म्हणते आहे की ‘खूब लडो, समाप्त कर दो एक दूसरे को!…’ नाहीतरी निवडणुका लावा, ते सत्कार्य जनता आनंदाने करेलच!