(एका हिरव्यागार झाडाखाली.)
देवसेना : आज मी येणारच नव्हते!
स्कंद : का पण?
देवसेना : असं वेळेवर ‘ये.’ म्हणून मेसेज करतोस, आई-बाबा, ताई-दादा, आजी-आजोबा असं सगळ्यांना चुकवून यायचं, सोपं आहे का?
स्कंद : काय करू? (कुमार सोनू निकमला हेसमिया चावल्यागत गातो) तुझे ना देखूं तो चैन मुझे आता नहीं हैं। एक तेरे सिवा मुझे कोई भाता नहीं हैं। कहीं मुझे प्यार हुआ तो नहीं हैं?
देवसेना : (अघळपघळ लाजत) खरंच? चल काहीतरीच!
स्कंद : तुझ्या ह्याच लाजण्यावर भाळून गौहत्तीच्या कामाख्या देवीसमोर रेडा बनून जिंदगी कुर्बान करावी वाटते. या मरण्यावर शतदा प्रेम करावे!
देवसेना : तू बोलतोस खूप छान! ऐकत बसावं वाटतं!
स्कंद : मन की बात मैं करता हूँ! लब तुझे लब मैं करता हूँ! तेरी इसी अदा पे मैं मरता हूँ।
देवसेना : किती प्रेम करतोस तू माझ्यावर?
स्कंद : मणिपूरसारखं तुझं प्रेम माझ्या काळजात कायम धगधगतं आहे!
देवसेना : आणि?
स्कंद : तुला दोन हजारातल्या चिपसारखं काळजात लपवून ठेवावं वाटतं!
देवसेना : म्हणजे मला चलनातून केव्हाही बाद करशील तर?
स्कंद : तुझे ना भूलूंगा मैं जब तक है जान।
देवसेना : असंच बोलतोस तू दरवेळी.
स्कंद : रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना, भूल कहीं मुझसे ना हो जाये। तुझं लाजणं कातिल आहे अगदी!
देवसेना : (लाजत) किती?
स्कंद : शेठच्या लॉकडाऊन घोषणेइतकं!
देवसेना : ए ऐक ना! आपण असं किती दिवस भेटायचं?
स्कंद : देवूभैय्या मिनी शेठला वेष पालटून जितक्या दिवस भेटले, किमान तितक्या दिवस?
देवसेना : मी भेटायला आतूरच असते पण तूही यायला हवं ना?
स्कंद : मी पुन्हा येईन! मी पुन्हा येईन!
देवसेना : आपण लग्न करूयात का?
स्कंद : सिनोरिटा! क्या जरूरत है इसकी? हां?
देवसेना : म्हणजे? मग आपलं नातं?
स्कंद : अख्ख्या दुनियेने तुला माझ्या नावानं ओळखावं. तू माझी अत्यंत खाजगी बाब असावी नि तरीही आपला कुठलाही ऑन रेकॉर्ड संबंध नसावा.
देवसेना : हे कोणत्या प्रकारचं नातं?
स्कंद : पीएम केअर फंड नि शेठ यातल्यासारखं!
देवसेना : कधी कधी तुझी भीती वाटते मला.
स्कंद : कसली?
देवसेना : तुझ्या ह्या भूलथापांत मी प्रेग्नंट राहिले तर? आणि आपल्याला मूल झालं तर?
स्कंद : तर काय?
देवसेना : गलवान खोर्यागत तू त्यावरही मौन राहिलास नि कधी जाहीरपणे त्याला स्वीकारलंस नाहीस तर…
स्कंद : (अभिनयाचा विनोद संचारल्यागत.) पुष्पा, आय हेट थेयरीज! तू माझ्यावर शंका घेतेय…
देवसेना : भीती वाटते रे कधी कधी!
स्कंद : माझं प्रेम नोटबंदीच्या लाईनमधल्या पब्लिकच्या स्पिरिटइतकं प्युअर आहे. विश्वास ठेव! दिल तुम्हें दिया है। जान तुम्हें ही देंगे।…
देवसेना : नुसतं प्रेमावर भागतं का? तुझ्या नोकरीचं अजून काही झालेलं नाही. काय करायचं ठरवलं तू?
स्कंद : यूपीएससी!
देवसेना : कधी दिसला नाहीस एक्झामची तयारी करताना?
स्कंद : उसकी जरूरत नहीं मेरी जान!
देवसेना : म्हणजे?
स्कंद : मी लॅटरल की बायलॅटरल एन्ट्री असते ना? ती ट्राय करणार आहे.
देवसेना : तू सिरीयस का नसतोस रे?
स्कंद : तुम दिल की धडकन में रहती हो। रहती हो। बाहों में आ जाओ…
देवसेना : मी काही विचारलंय तुला.
स्कंद : मिनी शेठ जेव्हढा अतुल सुतारच्या भ्रष्टाचाराबद्दल, शेठ त्यांच्या मंत्र्यांच्या कम्युनल स्पीचबद्दल सिरीयस असतो तितकाच सिरीयस आहे मी जिंदगीत!
देवसेना : मग लवकरात लवकर एक नोकरी शोध. आपण रेंटवर एखादा फ्लॅट घेऊयात नि एखादं दिवशी कोर्ट मॅरेज करूयात. असं आणखी किती दिवस चेहरा लपवून तुला भेटावं मी? कधी फिरुयात की चेहरा न झाकता…
स्कंद : निकलो ना बेनकाब, जमाना खराब है। और…
देवसेना : हो त्यामुळेच मला काळजी वाटते. इथे लहान मुलींपासून देशाचा गौरव वाढवणार्या महिला खेळाडूंपर्यंत कुणीही सुरक्षित नाहीय. त्यात ज्यांच्यावर प्रेम करावं, ते एकतर गंभीर नसतात वा पाठीशी उभे राहायला खंबीर नसतात.
स्कंद : ये क्या कह दिया, क्या कह दिया? तूने ओ सनम?…
देवसेना : मग काय ठरवलंस तू?
स्कंद : मेरा क्या? मैं तो फकीर आदमी हूँ। झोला उठा के चलता बनूँगा!
देवसेना : तू तिकडेच जा! ब्रेकअप झालं आपलं! परत फोन करू नकोस तू! (रागात निघते.)
स्कंद : अश्विनी ये ना! प्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी गं, कशी ही जिंदगीत आणीबाणी गं, ये ना प्रिये!
देवसेना : तू सुधारला नाहीस तर तू एकटाच नाहीयेस सुरत व्हाया गौहत्ती नेणारा? मी दुसरा यार शोधेन! समजलं?