भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी जाहीर झाल्यापासून माझा मानलेला लाडका परमप्रिय पोक्या आजपर्यंत अस्वस्थ आहे. तो म्हणतो, त्या ट्रम्पने दिलेला सल्ला मानण्यापेक्षा जर मला सल्ला विचारला असता तर मी कसलीही तोडबाजी न करता तो फुकटात दिला असता. मात्र पोक्याच्या अंगात भिनलेला युद्धज्वर अजून उतरायची चिन्हं दिसत नाहीत. झोपेतसुद्धा पाकिस्तानी सैनिकांना ठोसे लगावतानाचे त्याचे हातवारे मी पाहिलेत. तसेच महाराष्ट्रातील बर्याच नेत्यांचे या विषयावरचे मुद्दे खोडून टाकणारी त्याची बडबडही ऐकलीय. सकाळी तो उठताच मी त्याला जाब विचारला, तेव्हा तो म्हणाला, टोक्या, अरे त्या उनाड ट्रम्पविषयी मी स्वप्नात काही नेत्यांच्या प्रतिक्रिया घेत होतो, तेव्हाची बडबड माझ्या तोंडातून बाहेर पडली असावी. त्या प्रतिक्रिया तुला थोड्याच वेळात लिहून देतो! त्याने लिहून दिलेल्या या प्रतिक्रिया… (गंमत म्हणजे आपले दादा कोंडकेसुद्धा अवतरले होते स्वप्नात. त्यांचीही प्रतिक्रिया यात आहे.)
दादा कोंडके : च्या मायला, हा डोनाल्ड ट्रम्प समजतो कोण सोताला? माझ्या हातात गावला असता ना तर त्येला कुदव कुदव कुदवला असता. ह्येला कोनी सांगितलं मांडवली करायला? अरे सोताची पँट किती फाटलीय ती शिवून घे आधी. तुला म्हायत नाय आमच्या सैनिकांची ताकद! आमच्या त्या तीन सैनिक अधिकारी बायामाणसांची भाषनं टीव्हीवरून ऐकली असतीस ना तर बोलती बंद झाली असती तुझी तेव्हाच. मी तर म्हंतो, त्या पाकिस्तानच्या आधी ह्या ट्रम्पला धडा शिकवला पायजे, म्हणजे पुन्यांदा अशी वटवट करनार नाय. अरे चिंपाट, तुला वाटतो तसा माजा भारत लेचापेचा नाय. पाकिस्तानाचं पार कंबरडं मोडून टाकलंय आमच्या जवानांनी. विमानं कुठून कशी घुसत होती ना त्येचा पत्ताच लागत न्हवता. तू जास्त आगावपणा केलास ना, तर तुज्या देशाच्या सासरच्या आणि माहेरच्या धोतरात घुसून अशे बॉम्बगोळे टाकतील ना, कुठल्या कुठे उडून जायल अमेरिका आणि तू. मी म्हंतो, ह्येला हा आगावपना करण्याची सुपारी दिली तरी कोनी? आज माझी आय असती ना तर तुझ्या छप्पन पिढ्या तिने शिव्या देऊन अग्निबाणातून नरकात धाडल्या असत्या. तुला सांगतो, आमच्या देशाच्या वाटेला जायाचं नाय. न्हायतर हा पांडू हवालदार तुला दांडक्याचे फटके कुठे कुठे देऊन हाकलून लावील ना ते सांगता येयाचं नाय.
देवेंद्र फडणवीस : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीसंबंधी माननीय मोदीजींनी त्यांना स्पष्ट शब्दात सुनावलंय. त्याला माझा आणि महाराष्ट्राचा पूर्ण पाठिंबा आहे. भारताला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही, असं पंतप्रधानांनी त्यांचं नाव न घेता ऐकवलंय यातच सारं काही आलं. त्यांनी कसलाही निर्णय घेतला तरी तो देशाच्या हिताचाच असेल याची खात्री बाळगा.
एकनाथ शिंदे : कोण ट्रम्प? बरं झालं मोदीसाहेबांनी त्यांना किंमत दिली नाही ते. त्यांचे पूर्वी त्यांच्याशी मित्रत्वाचे संबंध होते; पण माणसं बदलतात, तसे नेते, पक्ष बदलतात. शेंडी तुटली तरी चालेल, पण माणसाने मूळ सोडू नये, या मताचा मी आहे. माझा आणि माझ्या ठाणे जिल्ह्याचा मोदीसाहेबांना पूर्ण पाठिंबा आहे.
अजित पवार : मध्यस्थी या गोष्टीचीच मला चीड आहे. मी भाजपाबरोबर साटंलोटं केलं तेव्हा कुत्रंही मध्यस्थीला घेतलं नव्हतं. तो ट्रम्प यडपट माणूस आहे. त्याच्या नादाला मोदीसाहेबांनी लागू नये. तो मागे कोविड घेऊन भारतात आला ना तेव्हाच त्याचा बंदोबस्त करायचा विचार आला होता माझ्या मनात. काकांनी रोखलं नसतं तर बारामतीतल्या फंटरला घेऊन तेव्हाच काटा काढला असता त्याचा. मोदीसाहेबांनी त्याच्याशी असलेली वैयक्तिक मैत्रीची युती देशाच्या हितासाठी तोडलेली बरी. नाहीतर तो परत परत चावा घेत राहील.
दीपक केसरकर : डोनाल्ड ट्रम्प ही एक प्रचंड मोठी सायकिक केस आहे, असं मला वाटतं. अशा केसमध्ये माणूस स्वत:विषयी भ्रामक समजुती बाळगून काहीतरी कल्पनेपलीकडल्या गोष्टी करायला धावतो आणि त्यात अपयश आलं की तोंडावर आपटतो. मोदीसाहेबांनी त्यांच्या मित्राची ही केस माझ्यावर सोपवली तर माझ्या जिल्ह्यातल्या एका नव्यानेच उदयाला आलेल्या मानसोपचार तज्ज्ञांकडे नेऊन त्यांना कायमचं बरं करण्याची गॅरंटी मी देतो. ट्रम्प कसाही वागत असला तरी त्याला त्याच्या जवळच्यांनी एकटा टाकून न देता आपल्यात सामावून घ्यायला हवा.
किरीट सोमय्या : हा माणूस तिकडच्या देशाचा अध्यक्ष असल्यामुळे त्याला ईडीपण लावता येत नाय ना! नायतर जगाच्या
पॉलिटिक्समधून उठवला असता त्याला. त्याचा कायतरी बंदोबस्त केलाच पायजे. नायतर हा असाच धक्के देत र्हाणार. माझ्याकडे पाठवला असता तर माझे गाजलेले व्हिडीओ दाखवून येडा केला असता मी त्याला. अजून वेळ गेलेली नाय.
दादासाहेब भुसे : ट्रम्प यांच्या मनात भारत आणि पाकिस्तानच्या भल्याचाच विचार असणार याची मला खात्री आहे. जशा माझ्या मनात शालेय शिक्षण खात्याचं भलं व्हावं म्हणून नवनव्या कल्पना येत असतात तशा त्यांच्याही मनात जगाचं भलं व्हावं म्हणून काही कल्पना येत असतील तर त्यांना दोष देऊन चालणार नाही. त्यांना समजून घेण्याची गरज आहे.
विरोधी पक्ष आमदार : त्या ट्रम्पविषयी प्रतिक्रिया देण्यापेक्षा या नेत्यांना बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची त्या वाल्मिक कराडच्या बगलबच्च्यांनी कशी हालहाल करून हत्या केली त्याविषयी प्रतिक्रिया द्यायला सांगा. बघा कशी बोलती बंद होते यांची! त्यांच्या बायका-मुलांचा आक्रोश ऐकून कराडने दडवलेल्या हल्लेखोरांवर आधी एअर स्ट्राईक करायला सांगा मोदींना. हिंमत असेल तर त्यांच्याविरुद्ध मोर्चे काढा. सरपंच देशमुखांच्या पत्नीचं सिंदूर पुसणार्यांना पाठिशी घालण्याची कशी लाजिरवाणी चढाओढ लागलीय त्यांच्यात! थूत तुमच्या जिनगानीवर आणि ढोंगबाजीवर!!