□ अॅपलची उत्पादने हिंदुस्थानात बनवू नका; युद्धविरामाच्या ‘डील’नंतर ट्रम्प यांचा मोदींना झटका.
■ दोस्त दोस्त ना रहा… मुळात कुणालाही मिठ्या मारल्या किंवा तटस्थतेचे संकेत बाजूला ठेवून कुणाचाही प्रचार केला (खरंतर तो प्रचारही स्वत:चाच होता) की कोणी मित्र बनत नाही, हे भक्तघोषित विश्वगुरूंना आता तरी समजले असेल का? त्यांच्या निवडणूकजीवीत्वाने देशाचं हित धोक्यात घातलेलं आहे.
□ विजय शहा यांचे विधान अक्षम्य, त्यांना मंत्रीपदावरून हटवा; कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबीयांचा संताप.
■ लष्करी अधिकार्याच्या कुटुंबीयांना हे बोलावं लागतं, हीच किती संतापजनक गोष्ट आहे. लष्करातला कोणी सिंघम जागा व्हावा आणि त्याने असल्या दळभद्री विजय शहांचा योग्य तो सत्कार करावा, अशी सर्वसामान्यांची इच्छा असेल.
□ सरन्यायाधीश गवईंचा पहिला निकाल; नारायण राणेंना झटका.
■ राणेंना झटका बसला आहे की त्यांना सांभाळून घेतलं गेलं आहे? सर्वसामान्य माणसांचा फार घोळ होतो कायदेशीर गोष्टी समजून घेताना. राणे यांचे नेमके नुकसान काय झाले, ते कळल्याशिवाय झटका की इतर काही, ते कळणार कसं?
□ वसई महापालिकेच्या उपसंचालकाकडे सापडले घबाड; ईडीच्या छाप्यात २३ कोटींचे दागिने, ९ कोटींची रोकड.
■ सामनाचे झुंजार संपादक, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या अटकेचं प्रकरण अंगावर शेकल्यापासून ईडीचे लोक सरकार सांगेल त्या भिंतींना तुंबड्या लावण्याऐवजी काही खरोखरचं, जनतेच्या पैशातून मिळणार्या पगाराचं काम करत आहेत, ही आनंदाचीच गोष्ट म्हणायला हवी. बाकी लोकशाहीत बाबूशाही घुसवली की मग ही अशी फळं मिळतातच.
□ निवडणुका घेण्यात मान्सूनची अडचण; आयोगाकडून फडणवीस मुदत मागून घेणार.
■ अनंत काळापर्यंत मुदत मागून घ्या. त्यानंतर जेव्हा अपरिहार्यपणे करावीच लागेल तेव्हा बॅलट पेपरवर निवडणूक घ्या. जनता तुम्हाला उताणं पाडल्याशिवाय राहणार नाही. किती पळाल या सत्यापासून.
□ राष्ट्रपती, राज्यपालांना डेडलाईन देण्याचा सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे काय? द्रौपदी मुर्मू यांचे सर्वोच्च न्यायालयाला १४ प्रश्न.
■ राष्ट्रपतींनी कधीतरी आपल्या सरकारला आणि स्वत:लाही प्रश्न विचारला पाहिजे की राष्ट्रीय सुरक्षा वगैरेचाच विषय नसेल तर लोकनियुक्त सरकारांनी दोन दोन वेळा मंजूर केलेले विधेयक अनिश्चित काळ रोखून धरण्याचा आपल्याला अधिकार असायला हवा का आणि ती राजनैतिक नैतिकता आहे का? आरशात पण बघा की जरा!
□ मालमत्ता जप्तीच्या अधिकाराचा गैरवापर होऊ देऊ नका – हायकोर्टाने ठणकावले.
■ म्हणजे काय? कायदे आहेत कशासाठी? फक्त न्यायाने वापर करण्यासाठी? त्यांचा गैरवापर केल्यावर न्यायालय जेव्हा कान उपटतं, थोबाडीत हाणतं तेव्हा निगरगट्ट हसत गाल चोळण्यातली मजा कशी अनुभवता येणार?
□ मिठी नदी गाळाने भरलेलीच! महानगरपालिका ३१ मेची डेडलाईन कशी पाळणार?
■ कधी पाळली होती, तेव्हा ती आता पाळली जाईल. दर वर्षी या बातम्या वाचूनही कंटाळा आला. आता संबंधित अधिकार्यांनी कोट्यवधी रुपयांच्या बॅगा संबंधित कंत्राटदारांना समारंभपूर्वक देऊन मिठी मारावी आणि विषय संपवावा. तीच मिठीची सफाई असं लोक समजून घेतील. दरवर्षी कशाला तेच नाटक उभं करायचं?
□ वंचितांना घाबरून मोदींनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला – राहुल गांधी यांचा दावा.
■ मोदी फक्त एकाच गोष्टीला घाबरतात… सत्ता जाणं… एकदा हातातून सत्ता गेली की नंतरचे सत्ताधीश त्यांच्या सत्ताकाळातल्या गैरकृत्यांचा पंचनामा करतील आणि जे खड्डे इतरांसाठी खणले त्यात स्वत:ला पडावं लागेल, हे त्यांना माहिती आहे.
□ ‘ऑपरेशन सिंदूर’वरून विचारताच ‘गुजरात समाचार’वर ईडीचे छापे
■ विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं काय देणार? काही असतील तर देतील ना? मग लक्ष उडवण्यासाठी छापे घालायचे, देशभक्तीवरून प्रश्न उभे करायचे. आता हे स्क्रिप्टही लोकांना समजायला लागलं आहे. उलटी गिनती सुरू झाली आहे.
□ देशाचे सैन्य आणि जवान मोदींच्या चरणी नतमस्तक – आता मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्याने अक्कल पाजळली.
■ तुम्ही भिकारडे भक्त आणि तुमचा देव मिळून कुठेतरी वेगळ्या ठिकाणी झिम्मा फुगडी खेळा. भारतीय सेनेचा अपमान करू नका. सभ्य सुसंस्कृत मानल्या जाणार्या मध्य प्रदेशाची लाज घालवण्याचा विडाच तिथल्या या लोचट आणि विखारी मंत्र्यांनी उचलला आहे. चुकीचे लोक सत्तेत बसवले की हे भोग भोगावे लागतातच राज्यांना.
□ सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन खरेदीत आठ कोटींचा घोटाळा.
■ मरायला टेकलेल्यांना लुबाडा, मढ्याच्या टाळूवरचं लोणी खा, एकही गोष्ट सोडू नका. आपली हवस पूर्ण करून घ्या.
□ बेताल बडबड अंगलट; मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात माझगाव कोर्टाचे वॉरंट.
■ काही फरक पडत नाही त्यांना. वकिलांच्या फौजा असतात. सत्तेचं पाठबळ असतं. आपल्याला पोकळ समाधान मिळतं तात्पुरतं. कायद्यापुढे सगळे समान नसतात. काहीजण कायदाही वाकवत फिरत असतात.
□ नवी मुंबईत मिंधेपुत्राच्या कार्यक्रमात भाडोत्री कार्यकर्त्यांचा गोंधळ.
■ आता नवी मुंबई, ठाणे आणि परिसरावर तीन तीन टोळ्यांची गिधाडं भिरभिरत आहेत. त्यांच्यात अधून मधून झटापटी होणारच.