आज बॅग स्मार्ट झाली आहे. चाके लागून धावती झालेल्या त्या पहिल्या बोजड ट्रंक्सपासून ते आजच्या स्टायलिश लगेजपर्यंतचा हा प्रवास प्रवाशाच्या मनावरील बोजा कमी करणारा आहे. हा प्रवास केवळ सामान एका जागेवरून दुसर्या जागेवर नेण्याचा नसून, तो माणसाच्या बदलत्या जीवनशैलीचा आहे.
– – –
एक काळ होता, जेव्हा प्रवास ही मौज नसायची. तो काहीसा धोकादायक असे आणि सामानाची बांधाबांध कशी असेल यावरून बर्याच अंशी प्रवासाची यशस्वीता ठरायची. त्यामुळे प्रवासासाठी सामान बांधणं हा एक सोहळा व्हायचा. प्रवास मुक्कामाचा असला म्हणजे अक्षरश: ‘घर पाठीवर घेऊन फिरणं असायचं. ते घर एका मोठ्या, चौकोनी, लोखंडी ट्रंकमध्ये सामावून जाई. प्रवासासाठीची लगबग घरात काही दिवस आधीच सुरू व्हायची. लाकडी बाजेखालील लोखंडी ट्रंक बाहेर काढून त्यात कपडे, पिशव्या, चपला, तेलाची बाटली, शिळं लोणचं आणि कांदा भाकर… आजी एकेक गोष्ट ट्रंकेत भरायची, तेव्हा आपणही मनातून त्या प्रवासावर निघालेलो असायचो. हा प्रवास त्या काळी जितका शरीराचा होता, तितकाच तो मनाचाही होता आणि या सगळ्याची साक्षीदार होती ती बॅग. कधी ट्रंक, कधी सुटकेस, कधी पिठाच्या पोत्यातून शिवलेली पिशवी… रूप कोणतेही असेना, हे गाठोडं प्रवासात सोबतीला असायचं. तिची बोच, तिचं वजन आणि तिचं असणं, हे सगळं त्या प्रवासाला एक ओळख द्यायचं. आज तीच बॅग स्मार्ट झालीय. चाके लागून धावती झाली, पॉश ट्रॉली आली, चाव्यांचे जुडगे जाऊन पासवर्ड आले, मोबाईल चार्जिंगची सोयसुद्धा आली… त्या पहिल्या बोजड ट्रंक्सपासून ते आजच्या स्टायलिश लगेजपर्यंतचा हा प्रवास प्रवाशाच्या मनावरील बोजा कमी करणारा आहे. हा प्रवास केवळ सामान एका जागेवरून दुसर्या जागेवर नेण्याचा नसून, तो माणसाच्या बदलत्या जीवनशैलीचा, सामाजिक गतिशीलतेचा आणि अंतर्मनातल्या स्वप्नांचा आहे.
प्राचीन काळातील माणूस मनोरंजनासाठी नव्हे तर जगण्यासाठी प्रवास करत असे. शिकार, व्यापार, नवा प्रदेश शोधणे असो की यात्रा… त्या काळातली ‘बॅग’ म्हणजे एका हातात गाठोडं, दुसर्या हातात वळकटी, डोक्यावरचा पाट, पाठीवरची टोपली आणि हा सर्व भार उचलणारं साधन म्हणजे आपलं शरीर. काही लोक ओझं वाहण्यासाठी उंट, घोडा, गाढव किंवा बैल असे प्राणी वापरत. भारतात वैदिक काळापासून आध्यात्मिक, सामाजिक आणि व्यापारी उद्देशासाठी यात्रा केल्या जात. ऋषी-मुनींनी वस्त्र, कमंडलू, ग्रंथ असलेली झोळी पाठीवर टाकून देशभर भ्रमण केलं, तर व्यापार्यांकडे सामान वाहण्यासाठी मोर्या चामड्याची पिशवी किंवा धातूची भांडी असायची. दक्षिण भारतात ‘थळई’ नावाच्या हातात धरायच्या कपड्याच्या पिशव्या प्रसिद्ध होत्या आणि कोकणात बांबूपासून तयार केलेल्या पाठीवर बांधता येणार्या टोपल्या वापरल्या जात.
चीनमध्ये हान राजवटीत सिल्क रूट सुरू झाल्यापासून देशोदेशी ये जा वाढली. व्यापारी, भिक्षु आणि मुत्सद्दी हजारो मैल प्रवास करू लागले. तेव्हा पारंपरिक ‘झिप्स’ किंवा दोर्यांनी बंद करता येणार्या कापडी पिशव्या (च्यान नांग) वापरल्या जात. सामान वाहण्यासाठी घोड्यांवर बांधलेल्या चामड्याच्या पेट्या, कुठेही बसून जेवता यावं म्हणून ‘पोर्टेबल बेंटो बॉक्स’सारख्या खाऊच्या पेट्याही तयार झाल्या. या बॉक्सेसमध्ये अनेकदा सूप, भात व भाज्या वेगवेगळ्या डब्यांमध्ये ठेवून प्रवासात नेले जात. सहारा वाळवंट पार करणारे व्यापारी साखर, मीठ, सोनं आणि गुलामांना घेऊन प्रवास करत. बर्किना फासो आणि नायजर परिसरात स्त्रिया स्वत: हाताने विणलेल्या दोर्यांच्या पिशव्या वापरत. सोमालियन समुद्रमार्गावर खांद्यावर अडकवता येणार्या कापडी गाठोड्यांचा वापर होत असे. हा प्रवास फक्त ‘ट्रॅव्हल’ नव्हता तर संस्कृतींच्या देवाणघेवाणीचा मार्ग होता. वस्त्र, पिशव्या आणि अगदी ओझं वाहण्याच्या पद्धतीही मौखिक परंपरेने पुढे गेल्या.
इ.स. ११५३ ते १३व्या शतकादरम्यान जेव्हा युरोपातील ख्रिश्चन सैनिक त्यांच्या (जेरूसलेम) या पवित्र भूमीकडे क्रुसेड्स म्हणजे मोहिमा करत होते, तेव्हा त्यांच्या शस्त्रास्त्र आणि अन्नसामुग्रीचा मोठा साठा नेताना चाकांवर चालणारी धातुपात्रं आणि लाकडी पेट्या वापरण्यात आल्या. हाच तो क्षण होता जेव्हा ‘लांब अंतरापर्यंत सामानाची ने-आण’ नियमित सुरू झाली. पण हे कंटेनर्स वजनाने जड, लोखंडी अँगल्सनी बळकट केलेले आणि मेंदीचे तेल किंवा झाडांचा चीक (रेजिन) वापरून कॅनव्हास जलरोधक स्वरूपात तयार केलेले असत. युद्धभूमीवरील वेगवान हालचालींसाठी या चाकांवरून खेचून नेता येणारे ट्रंक अत्यावश्यक होत्या.
काही शतकानंतर ‘लग’ म्हणजेच ओढणं किंवा ओझं उचलून नेणं, या क्रियापदावरून ‘लगेज’ (अत्यंत त्रासदायक आणि जड सामान) हा शब्द ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये दाखल झाला. सामान वाहणं, उचलणं ही बाब प्रतिष्ठेची नव्हे तर श्रमिक नोकरांची जबाबदारी मानली जायची, हे या नावावरूनच स्पष्ट होतं. १८व्या शतकात, जेव्हा ‘ग्रँड टूर’ ही परंपरा युरोपीय श्रीमंत वर्गात लोकप्रिय झाली (विशेषत: इंग्लिश उमराव इटली आणि फ्रान्ससारख्या ठिकाणी कला अनुभवण्यासाठी आणि शिक्षणासाठी जात) तेव्हा या जड ट्रंक त्यांच्यासोबत नेल्या जात. त्यांना त्या स्वत: उचलणं शक्य नसल्याने त्यांचे नोकर किंवा सेवक त्या पाठीवर किंवा हातगाड्यांवर वाहून नेत.
पुढे जेव्हा रेल्वे, कोळशावर चालणार्या स्टीमर बोट्स आणि पोस्टल सेवा यांचा उदय झाला, तेव्हा प्रवास हे फक्त श्रीमंतांचं वैशिष्ट्य राहिलं नाही तर मध्यमवर्गीय व्यापारी, नोकरदार, शिक्षक आणि अगदी लेखकसुद्धा प्रवास करू शकत होते. यामुळे स्टँडर्डाइझ्ड सूटकेस अँड पोर्टमँटो हा नवा प्रकार उदयाला आला. दोन भागात उघडणारी, आतून कपड्यांच्या विभागांमध्ये विभागलेली, मजबूत आणि सुटसुटीत बॅग. या काळात बॅग्सच्या निर्मितीत लेदर, कॅनव्हास, धातूच्या फ्रेम्स आणि पट्टे यांचा वापर वाढला. बॅग आता केवळ वस्तू वाहण्याचे साधन न राहता डिझाइन व टफनेस यांचा मिलाफ बनली.
त्या काळातील बॅग्स ओबडधोबड आणि गोल घुमटाच्या आकाराच्या असायच्या, त्या एकमेकांवर रचणं शक्य नव्हतं, म्हणूनच सर्व प्रवाशांचं सामान एका गाडीत मावणं अशक्य व्हायचं. ही अशक्य गोष्ट पॅरिसमधील लुई व्हिटॉन या तरुण कारागीराने शक्य करून दाखवली. लुईने प्रवासी बॅगेत आमूलाग्र बदल करताना बॅगेचे वजन कमी करण्यासाठी ‘त्रियानाँ कॅनव्हास’ नावाचा विशेष जलरोधक कपडा वापरला, मजबुतीसाठी त्याने धातू-लाकडाच्या पट्ट्या वापरल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅगेचे झाकण सपाट बनवलं, ज्यामुळे बॅगा एकावर एक रचून ठेवता येऊ लागल्या. ही बॅग आता रेल्वे डब्यात, जहाजात किंवा कारमध्ये सहज बसू शकत होती. या दर्जेदार बॅगा बनवणार्या लुई व्हिटॉनला फ्रान्सची सम्राज्ञी ‘युजिनी डी मोंटिजो’ने (नेपोलियन-३ची पत्नी) राजमान्य ट्रंक निर्माता म्हणून निवडलं. ही त्या काळातील सर्वात मोठी ब्रँड एन्डोर्समेंट होती. त्याच्या ट्रंक्स लवकरच युरोपभर आणि मग अमेरिकेत पोहोचल्या, इथून प्रवासी बॅगेचा व्यवसाय खर्या अर्थाने उदयास आला.
आंतरखंडीय प्रवास करणार्या संपन्न वर्गाने लुई व्हिटॉन ट्रंक हा आपल्या प्रतिष्ठेचा भाग मानायला सुरुवात केली. लुई व्हिटॉनने केवळ ट्रंक्स तयार केल्या नाहीत, तर ‘सूटकेस’ला एक स्टेटस सिम्बॉलमध्ये रूपांतरित केलं. त्याच्या ट्रंक्सवर खास डॅमियर आणि मोनोग्राम प्रिंट, खास कोड्स असलेले लॉक्स वापरण्यात आले. याशिवाय प्रत्येक ट्रंक ग्राहकाच्या नावे, प्रवासाच्या गरजा आणि वैयक्तिक पसंतीनुसार खास ऑर्डरने तयार केली गेली.
लुई व्हिटॉनच्या बॅगांना युरोपात प्रचंड मागणी वाढू लागली तशा बॅग निर्मिती करणार्या नवीन कंपन्या मोठ्या संख्येने पुढे आल्या. त्यापैकी ग्लोब ट्रॉटर या इंग्लंडमधील बॅग कंपनीने व्हल्कनाइज्ड फायबरबोर्ड नावाच्या विशेष सामुग्रीपासून तयार केलेली ‘नाजूक दिसणारी पण मजबूत’ बॅग बनवली. एका हत्तीला तिच्यावर उभं केलं गेलं आणि तरीही ती तुटली नाही, हे छायाचित्र त्यांच्या जाहिरातींमध्ये मोठ्या अभिमानाने दाखवलं जायचं. त्या काळात ओसिलिटे ट्रंक तयार करणारे लंडनचे एच. जे. केव अँड सन्स आणि १८४९ साली स्थापण्यात आलेल्या पॅरिसच्या मोयनात यासारख्या प्रतिस्पर्ध्यांनीही बाजारात जागा मिळवली होती. या स्पर्धेचा हेतू केवळ मजबूत ट्रंक बनवणं हा नव्हता तर नावीन्यपूर्ण, स्टायलिश आणि उच्चभ्रू दर्जाचा ट्रॅव्हल पार्टनर बनवणं हा होता. प्रत्येक ब्रँडने स्वत:ची वैशिष्ट्यं तयार केली. मोयनातने हलक्या वजनाचे ट्रंक्स आणि मोटर प्रवासासाठी अनुकूल डिझाइन पाहिलं, तर गोयार्डने कंपनीने केवळ उच्चभ्रू वर्गासाठी बॅग बनवताना उत्कृष्ट हस्तकलेचा नमुना उपलब्ध करून दिला.
विसावे शतक उजाडताना जागतिक प्रवास पद्धती झपाट्याने बदलू लागली. रेल्वे, मोटारी आणि नंतर विमानाने प्रवास करणार्या प्रवाशांत लक्षणीय वाढ झाली. आता प्रवास हे फक्त राजघराणे किंवा सरदारांचे क्षेत्र राहिले नाही, तर व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी, सैनिक, पर्यटक अशा नव्या वर्गांसाठीही प्रवास गरजेचा बनला. त्यांच्यासाठी लागणार्या बॅगाही वेगळ्या होत्या. या काळात बॅग व्यवसायात दोन स्पष्ट गट पडले. एक लक्झरी बॅग उत्पादक आणि दुसरा सर्वसामान्यांसाठी बॅग तयार करणारा वर्ग. या कालखंडात दोन महायुद्धं झाली, स्थलांतरं झाली, हवाई प्रवास सुलभ झाला. त्यामुळे बॅग ही दैनंदिन गरज बनली. लांब प्रवासात सहज हाताळता येणारी, मजबूत आणि खिशाला परवडेल अशी बॅग आवश्यक बनली. या मागणीप्रमाणे हलक्या वजनाच्या बॅगा बनवायला सुरुवात झाली.
अमेरिकेच्या डेन्व्हर शहरात, जेसी श्वायडर या दूरदृष्टीच्या विक्रेत्याने खिशाला परवडणार्या दरात लक्झरी आणि डिझाईनचा एकत्र विचार करून १९१० साली ‘सॅमसोनाईट’ या बॅग कंपनीची स्थापना केली. श्वायडरने तयार केलेल्या पहिल्या बॅगेला बायबलमधील सामर्थ्यवान पात्राच्या नावावरून ‘सॅमसन’ हे नाव दिले. पुढे हीच ओळख ‘सॅमसोनाईट’ या नावात रूपांतरित झाली. चाळीसच्या दशकात सॅमसोनाईटने व्हल्कनाइज्ड फायबरबोर्डपासून मजबूत आणि पाण्यापासून संरक्षण करणार्या सूटकेसेस बनवल्या. १९५६मध्ये ‘स्ट्रीमलाईट’ या नावाने वक्र डिझाईन असलेली आणि फायबर कोअर-व्हिनाइल कव्हर असलेली बॅग सादर केली गेली, जी दुसर्या महायुद्धानंतर वाढलेल्या हवाई प्रवासासाठी एक परिपूर्ण पर्याय ठरली.
१९६० आणि ७०च्या दशकात जेट युग सुरू झालं. तरीही काही कंपन्या पारंपरिक लाकडी किंवा धातूच्या ट्रंक्सवर भर देत होत्या, त्या हवाई प्रवासासाठी अजिबात अनुकूल नव्हत्या. याच दशकात बर्नार्ड सॅडो याने एका लगेज कंपनी एका कामगाराला एक मोठं यंत्र चाकांवरच्या पॅलेटवरून नेताना पाहिलं. घरी आल्यावर त्याने एका लाकडी कपाटाची चाकं काढून ती सूटकेसला लावली आणि एक पट्टा अडकवून आपली जुगाडू बॅग घरभर फिरवली. व्यावसायिकदृष्ट्या त्याच्या बॅगमध्ये अनेक त्रुटी होत्या. ती जड होती, वळवायलाही अवघड होती, तसेच या बॅगेची चाकंदेखील फिरणारी नव्हती. या कल्पनेला ८०च्या दशकात विमानचालक रॉबर्ट प्लॅथ यांनी ‘रोलाबोर्ड’ या नावाने अधिक मूर्त रूप दिलं. आतापर्यंत आडवी राहणारी बॅग उभीदेखील राहू शकते हे रोलाबोर्ड संकल्पनेने दाखवलं. बॅगेच्या खालच्या बाजूला दोन चाके लावल्यानंतर बॅग फिरती झाली. तसेच बॅग ओढण्यासाठी एक टेलिस्कोपिक हँडल दिला गेला, ज्यामुळे बॅग सैरावैरा न पळता आपल्या सांगण्यानुसार प्रवास करू लागली. याआधी बर्नार्ड सॅडोने बनवलेल्या सपाट, चार चाकांच्या बॅगच्या तुलनेत ट्रॅव्हलप्रो कंपनीची रोलाबोर्ड ही बॅग अधिक स्थिर, सोपी व सोयीस्कर होती. त्यामुळे ती रोज प्रवास करणारे वैमानिक आणि हवाई सुंदरी यांच्यात लोकप्रिय झाली, त्यांना पाहून सामान्य प्रवाशांनीही त्यांचं अनुकरण केलं. विमानाच्या लगेज कंपार्टमेंटमध्ये नीट बसवता येणे हे या बॅगेचं प्रमुख वैशिष्ट्य असून आजही बहुतेक प्रवासी बॅग्स या संकल्पनेवर आधारित असतात. त्यानंतर प्रत्येक विमानातील स्टोरेज बिन्सही ह्याच मापानुसार तयार करण्यात आल्या.
मागणी वाढताच बॅग्सचं उत्पादन मर्यादित संख्येच्या व्यक्तिगत कुशलतेकडून सांख्यिकी वाढीच्या औद्योगिक प्रॉडक्शन लाइनवर गेलं. कामगारांनी काटेकोरपणे कापलेल्या, मशीनद्वारे शिवलेल्या हजारो एकसंध डिझाइनमधल्या बॅग्ज तयार होऊ लागल्या. जगभरात पोर्टेबल सामानाचं स्टँडर्डायझेशन झालं. रेल्वे टर्मिनल्स, स्टीमर डॉक्स आणि पोस्ट ऑफिसेसमध्ये आता विशिष्ट प्रकारच्या बॅग्स पाहायला मिळू लागल्या. थोडक्यात बॅग ही आता केवळ सामानाची गोष्ट नव्हे, तर संपूर्ण ‘ट्रॅव्हल कल्चर’ची ओळख झाली होती. लुईस व्हिटॉनने बॅगला सौंदर्य दिलं, ग्लोब-ट्रॉटरने बळकटी दिली आणि औद्योगिक क्रांतीने बॅग सर्वसामान्यांपर्यंत पोहचवली.
भारताच्या बॅग उद्योगाची गोष्ट सत्तरच्या दशकात सुरू होते. या काळात प्रवास ही संकल्पना भारतीय मध्यमवर्गीयांच्या मनात घर करत होती. भारत हळूहळू औद्योगिक प्रगतीच्या वाटेवर चालत होता. अशावेळी रेल्वे स्टेशनवर लाकडी ट्रंक, लोखंडी पेट्या आणि गाडगी-गाठोडी दिसणं ही सामान्य बाब होती. त्या काळात दिलीप पिरामल यांनी ‘व्हीआयपी इंडस्ट्रीज लिमिटेड’ या पहिल्या ट्रॅव्हल बॅग कंपनीची स्थापना केली. त्यांची ‘ब्लो प्लॅस्ट लिमिटेड’ ही मूळ कंपनी प्लॅस्टिक प्रॉडक्ट्स बनवायची. पण पिरामल यांनी भारतात ट्रॅव्हल बॅग्जची मागणी ओळखून हलकी, टिकाऊ आणि सहज वाहून नेता येणारी मोल्डेड फायबर बॅग्स बाजारात आणली. पण परंपरावादी भारतीय ग्राहकांनी हा बदल लगेच स्वीकारला नाही. मजबूत टिकाऊ लाकडी आणि लोखंडी ट्रंकांना सरावलेल्या भारतीय मनाला प्लॅस्टिकची बॅग अनोळखी होती. यामुळे ग्राहकाचा विश्वास जिंकणं व्हीआयपीसमोरील पहिली अडचण होती. याशिवाय दुसरं मोठं आव्हान होतं ते बॅगनिर्मितीसाठी लागणारी साधनसामग्री जमा करणे. त्या काळात मोल्डेड प्लास्टिक बॅग्ससाठी लागणारी यंत्रसामग्री, टेक्नॉलॉजी भारतात सहज उपलब्ध नव्हती. पण व्हीआयपीने अनेक धाडसी निर्णय घेत स्वत:ची मोल्डिंग यंत्रणा तयार केली. रेल्वे प्रवास करणार्या वर्गाला लक्षात घेऊन बॅगची किंमत आकर्षक ठेवली. उत्तम जाहिरात करण्यावर भर दिला. आधीपासूनच व्हीआयपी कल्चरचं राजेशाही स्तोम असलेल्या भारतात व्हीआयपी म्हणजे ‘व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन’ ही टॅगलाइन खूप लोकप्रिय झाली.
१९८० साली व्हीआयपीने ‘स्कायलाईट’ नावाने वजनाने हलकी, डबल लॉकिंगवाली बॅग तयार केली. तिच्यामुळे ‘स्वत:ची वेगळी बॅग’ ही संकल्पना प्रत्येक प्रवाशाच्या मनात रुजली. स्कायलाईट हा व्हीआयपीचा हिरो प्रॉडक्ट झाला. मध्यमवर्गीय घरात ही बॅग असणं म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जाऊ लागलं. मुलीचं लग्न लागल्यावर सासरी जाताना तिला बॅग भरून दिली जायची ती व्हीआयपीचीच. नाशिकजवळ एका लहानशा फॅक्टरीत सुरू झालेला हा बॅग व्यवसायाचा प्रवास पुढील अनेक वर्ष लाखो भारतीयांचा प्रवास सुखकर बनविण्यात यशस्वी ठरला.
१९९०च्या दशकापर्यंत परदेशी ब्रँड्सना भारतात प्रवेश नसल्यामुळे व्हीआयपीला स्पर्धा नव्हती. पण नंतर भारताने आर्थिक उदारीकरण स्वीकारलं आणि जागतिक बाजारपेठ भारतात स्पर्धा करू लागली. भारतात सॅमसोनाईट, डेल्सी, अमेरिकन टुरिस्टर यांसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची एन्ट्री झाली. या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या बॅग्स आकर्षक डिझाईन, रंगसंगतीतील नावीन्य आणि अप्रतिम फिनिशिंगमुळे अल्पावधीत लोकप्रिय झाल्या. या बॅग्स फक्त सामान ठेवण्यासाठी राहिल्या नव्हत्या, तर त्या ग्राहकांचे व्यक्तिमत्त्व खुलवणार्या होत्या. या परदेशी बॅग्ससमोर भारतीय व्हीआयपी बॅग्सचा लूक फिकट वाटू लागला. त्यांनी नवीन पिढीची आवड लक्षात घेऊन रंगीत, ट्रेंडी ‘स्कायबॅग्स’ लॉन्च केली. ‘मूव्ह इन स्टाईल’ ही टॅगलाईन घेऊन स्कायबॅग्सने तरुण वर्गाच्या मनात नवा उत्साह निर्माण केला. पुढे २०००च्या दशकात चार चाकी, ३६० अंशात फिरणार्या, वजनाने हलक्या आणि रंगांनी लक्ष वेधून घेणार्या ‘स्पिनर बॅग्स’ आल्या. आता बॅग केवळ फंक्शनल राहिली नाही, तर ती फॅशनेबल झाली होती. व्हीआयपी कंपनीने प्रत्येक वर्गासाठी ‘कार्ल्टन’, ‘अरिस्टोक्रॅट’, ‘कॅप्रेसे’ असे विविध ब्रँड्स निर्माण केले.
१०,०००हून अधिक विक्री केंद्रांमध्ये विणलेलं वितरण जाळं हे व्हीआयपी कंपनीचे सामर्थ्य आहे. म्हणूनच आजही भारतीय बॅग व्यवसायातील ४० टक्के वाटा व्हीआयपीचा आहे. काळानुसार बदलणं इतर अनेक ब्रँड्सना न जमल्यामुळे ते बंद पडले. इनोव्हेशन अँड इम्प्रुव्हमेंट ही लंडनमधील बॅग कंपनी, अमेरिकेतील ट्रॅव्हल ट्रंक बनवणारी जॅस बी. मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अशा अनेक दर्जेदार कंपन्या बंद पडल्या. फक्त पारंपरिक लेदर ट्रंक्सवर भर देणारे काही इटालियन आणि जर्मन ब्रँड्स कालबाह्य झाले.
नवी पिढी आता बॅग कंपन्यांना नवा प्रश्न विचारत होती, ‘माझ्या बॅगेत काय वेगळेपण आहे?’ इथेच डीटूसी म्हणजे ‘डायरेक्ट टू कन्झ्युमर’ ब्रँड्सनी भारतीय बाजारात पाऊल ठेवलं. या नव्या कंपन्यांकडे अनुभव, मोठं आर्थिक भांडवल नव्हतं, पण त्यांच्याकडे ‘ग्राहकाशी थेट नातं’ जोडण्याची रणनीती होती. २०१५नंतर भारतातला बॅग उद्योग सरळ ‘स्टेटमेंट’च्या भाषेत बोलायला लागला. ग्राहकाला बॅग ही फॅशन स्टेटमेंट म्हणून हवी होती, झकास डिझाईन, स्टाईल आणि सोयींसह! याच काळात पारंपरिक ब्रँड्सच्या (व्हीआयपी, सॅमसोनाईट) एकाधिकारशाहीला ‘मोकोबारा, नॅशर माइल्स, आयकॉन आणि अपरकेस यांसारख्या नव्या डीटुसी कंपन्यांनी धक्का दिला. आज हे ब्रँड्स आकर्षक डिझाईन्स, स्टाइल्स आणि नवोन्मेष घेऊन मार्केटमध्ये क्रांती घडवत आहेत. परिणामी सुमारे १५,००० कोटी रुपयांच्या भारतीय बॅग बाजारपेठेत मोठा बदल घडतोय आणि जुन्या कंपन्यांना याचा फटका बसतोय.
‘नॅशर माइल्स’ या ब्रँडने प्रवासी बॅग उत्पादनात डिझाईन आणि परवडणारी किंमत यांच्यात सुवर्णमध्य गाठला. त्यांचे सामान सहज ओळखता येईल अशा प्रकारे डिझाइन केलेले आहे, ज्यात चमकदार रंग आणि अनोख्या शैली आहेत. या बॅग्स गर्दीच्या विमानतळांवर आणि प्रवासाच्या वातावरणात वेगळ्या दिसतात. एका बॅगवर एक बॅग फ्री अशा ऑफर, आकर्षक टॅगलाइन अशा युक्त्यांनी फ्लिपकार्ट, अॅगमेझॉनसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर त्यांनी एक नवा ग्राहकवर्ग जोडून घेतला. ‘अपरकेस’ या स्टार्टअप ब्रँडने ‘बॅग फक्त सामान वाहणारी वस्तू न राहता ती पर्यावरणपूरक असावी’ हा विचार पुढे आणला. एका बॅगसाठी ३०पेक्षा अधिक रिसायकल्ड प्लास्टिक बॉटल्स वापरणं, कार्बन न्यूट्रल उत्पादनप्रक्रियेचा वापर करणं आणि प्रत्येक बॅगसोबत क्यूआर कोड देणं ही सगळी नावीन्यपूर्ण तत्त्वं होती. तर ‘मोकोबारा’ बॅग्स आधुनिक, मिनिमलिस्ट डिझाईन, जर्मन पॉलीकार्बोनेटसारखं टिकाऊ आणि प्रीमियम मटेरियल आणि चारऐवजी आठ व्हील सिस्टीम आणि टेलिस्कोपिक हँडल्सने सुसज्ज असलेल्या ट्रॉलीज सादर करून वेगळेपण जपत आहे. ‘युमी’ या नव्या स्टार्टअपने महिलांसाठी आकर्षक, फॅशनेबल आणि हलक्या बॅग्स तयार केल्या, ज्या ऑफिस, ट्रॅव्हल आणि शॉपिंगसाठी सहज वापरता येतात, शिवाय त्या ‘महागड्या लक्झरी ब्रँड्स’पेक्षा अधिक जवळच्या वाटतात.
या व्यवसायात येण्यासाठी व्हीआयपीसारख्या मोठ्या भांडवली कंपनीचे अनुकरण करण्याऐवजी, कमी भांडवलात सुरू झालेल्या डायरेक्ट टू कस्टमर कंपन्यांनी बाजारात पाय ठेवताना काय क्लृप्त्या लढवल्या, त्यांचं वेगळेपण काय होतं याचा अभ्यास करायला हवा. नाशिक परिसरात अनेक मराठी तरुण बॅग आऊटसोर्सिंगचे काम करतात. या तरुणांना बॅग कशी तयार होते, त्याला काय रॉ मटेरियल लागतं ते कुठून येतं याची इत्यंभूत माहिती आहे. मोठ्या कंपन्यांसाठी बॅग तयार करून कमी मार्जिन कमावण्यापेक्षा डीटूसी ब्रँडच्या पावलावर पाऊल ठेवायला हवं. काळाच्या पुढचा विचार, डिझाईनमध्ये धाडसी निर्णय घेण्याची क्षमता आणि गोष्ट सांगण्याची (स्टोरीटेलिंग मार्केटिंग) कला जोपासायला हवी. सध्या बॅग्जवर ई-कॉमर्स व ऑफलाइन प्लॅटफॉर्म्सवर ५० ते ७० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे, जे ग्राहकांना टिकाऊ आणि किफायतशीर पर्यायांकडे वळायला भाग पाडतंय. क्रिसिल रेटिंग्सच्या अहवालानुसार, भारतात संघटित बॅग कंपन्यांचा बाजारातील वाटा सध्या ४० ते ४५ टक्के इतका आहे. खरे लाभार्थी मात्र धाडसी निर्णय घेणारे नवोन्मेषी ब्रँड्स ठरत आहेत. जगातील सर्वात मोठी बॅग उत्पादक कंपनी असलेल्या सॅमसोनाईटला मागील वर्षात भारतातील विक्रीत १९.३ टक्के घट पाहायला मिळाली. कोविडनंतर बॅग मार्केट पूर्णत: बदललंय. आता ग्राहक अधिक प्रवास करत आहेत आणि त्यांना फॅशनेबल, नवोन्मेषी बॅगा हव्या आहेत. वर्षानुवर्ष एकच बॅग वापरणारे ग्राहक आज दर दोन-तीन वर्षांनी नवीन बॅग घेताना दिसतात, त्यांना मोबाइलप्रमाणे अपडेटेड फीचर्स बॅगेतदेखील हवे आहेत. या गरजा पूर्ण करण्यासाठी डी२सी ब्रँड्स स्मार्ट सोल्यूशन्ससह आघाडीवर आहेत. आजच्या हे ब्रँड्स ट्रॅकिंग सिस्टीमसह स्मार्ट बॅग्स बनवत आहेत, ज्या हरवल्यास शोधता येतात. काही कंपन्या हलक्या वजनाची झिरो फिगर बॅग बनवत आहेत, तर काही बॅगा स्मार्ट सेन्सर्ससह येतात, ज्या ग्राहकाच्या चालण्याच्या वेगानुसार संतुलन राखतात. काही बॅगा अधिक सामान सहज सामावू शकतात. वजनाने हलक्या मटेरियलमुळे या बॅगा जड वाटत नाहीत. या बदलत्या काळाला सामोरे जाण्यासाठी व्हीआयपीसारख्या पारंपरिक कंपन्यांनीही डिजिटल मार्केटिंगवर भर दिला आहे.
सध्या लहानग्यांच्या सुट्ट्या असल्याने सहली, प्रवासाचा मौसम आहे. काश्मीर से कन्याकुमारीपर्यंत प्रवासात जितकी माणसे तितक्या बॅग्ज आहेत. या ग्राहकांची पसंती कोणत्याही ठराविक ब्रँडपेक्षा नवीन आणि वेगळ्या कल्पना असलेल्या बॅगला मिळते. तेव्हा वाट कसली बघताय, चला झटपट बॅग भरा आणि बॅग बनवण्याच्या प्रवासात दाखल व्हा.