ज्या ज्योतिष्यांना भारताच्या कारवाईत पाकिस्तानचा साफ पराभव होईल, असं भाकित सांगता येतं; त्यांना मुळात त्या कारवाईला कारणीभूत ठरणारा दहशतवादी हल्ला होणार आहे, हे आधी का सांगता येत नाही? हे असलं कसलं शास्त्र?
– रोहिणी पेंढारकर, परभणी
तुम्ही आम्हाला तसल्या ‘शास्त्र’ज्ञांमधला समजताय की काय? मुळात पाकिस्तानचा पराभव होईल, दहशतवादी हल्ला होईल हे शेंबड पोरगंही सांगू शकेल… पण आपण तसे शेंबडे नाही हे दाखवण्यासाठी ‘अशा’ ‘शास्त्र’ज्ञांना अशी भविष्यवाणी करावी लागते. कारण कसलाही भूतकाळ नसलेल्या अशा ‘शास्त्र’ज्ञांना त्यांच्या भविष्याचा भरोसा नसतो… त्यामुळे आपलं वर्तमान सुरक्षित राहावं म्हणून त्यांना अशा भविष्यवाण्या कराव्याच लागतात. काळाचा महिमा आहे. त्यालाच काही ‘नतदृष्ट देशद्रोही’ अमृतकाळ म्हणतात.
संतोषराव, या देशावर बहिष्कार घाला, त्या देशात जाऊ नका, म्हणून लोक ज्या फोनवरून आवाहन करत आहेत, त्या मोबाइल फोनची, त्यातल्या सुट्या भागांची निर्मिती चीनमध्ये होते. त्या देशाने पाकिस्तानला थेट पाठिंबा दिला, युद्धसामुग्रीही दिली. त्याच्यावर बहिष्कार कधी घालणार हे बॉयकॉटवाले?
– मंदार काळे, हडपसर
हे असा प्रश्न विचारताय त्यापेक्षा शाहरुख आणि आमिरला सांगा ना पिक्चर बनवायला. सध्या त्यांचा कोणताही पिक्चर पण येत नाहीये, बेशरम रंगवालं कुठलं गाणंही रिलीज करत नाहीयेत, पाकिस्तानबरोबर मॅच पण खेळली जात नाहीये, उरफाट्या स्वभावाची, जावेद बिवेद असं नाव असणारी, कपड्यांची कटकट नको म्हणणारी, कोणी नटी विचित्र बॉयकट पण करत नाहीये. मग बायकॉटवाल्यांनी करायचं काय? ते जर आज हात चोळत बसले… तर उद्या, अमक्यावर बायकॉट घाला असं सांगणार्यांवरच ते बायकॉट घालतील…
एका घरात चोरी झाली. मोठा डल्ला मारला गेला. पोलिसांनी चोरांची वस्ती म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या ठिकाणी छापेमारी केली. तिथून चोरांना पकडता आलं नाही. शिवाय गलेलठ्ठ पगारावर नेमलेल्या घराच्या दोन्ही वॉचमनना कोणीही प्रश्न विचारत नाही की तुम्ही असताना चोर घरात घुसले कसे? याचा शेवट काय होईल?
– विनायक पेंडसे, गिरगाव
जोपर्यंत ईव्हीएम आहे तोपर्यंत या गोष्टीचा शेवट होणार नाही, असं विरोधक बोलतील. आणि त्यांचे विरोधक बोलतील की ‘असं काही घडलेलंचं नाही…’ आता यांच्यामध्ये आमच्यासारख्या तिर्हाईताने काय उत्तर द्यायचं? तरीही प्रयत्न केला असता पण प्रश्न पडलाय की तुम्ही म्हणताय त्या वॉचमनला ‘चौकीदार’ म्हणतात का? तेवढं क्लियर केलं तर तसं क्लिअर उत्तर देता येईल…
पंतप्रधानांना देवाच्या जागी माना, अशी सूचना महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली आहे. तुमच्या देव्हार्यात जागा आहे ना संतोषराव?
– मिलिंद पाटील, कोल्हापूर
कोशारींचा आधीचा देव त्यांना पावला नसेल म्हणून त्यांनी देव बदलला असेल… नवसाला पावणार्याच देवाचं गुणगान करण्याची आपली परंपरा आहे. त्याला कोश्यारी कसे अपवाद असतील? शिवाय देवाच्या कृपेने खायचं प्यायचं आणि देवाला विसरायचं असा कृताघ्नपणा करण्याएवढे कोशारी विषारी नसतील, म्हणून ते पंतप्रधानांना देव मानायला सांगत असतील. तेच तुम्ही आम्हाला सांगताय… मग कोणाला देव मानायचं ते सांगणार्या तुमच्यात आणि कोशारींमध्ये मध्ये फरक काय? (तुमचाच प्रश्न तुमच्यावरच उलटवला की नाही पाटील?.. तुम्ही कितीही ‘कोशारी’ ‘कोशारी’ केलंत तरी ‘हुशारी’ आम्हालाही जमते.. थोडीफार..)
तुम्ही देशाचा अभिमान बाळगला पाहिजे, संस्कृत भाषा शिकली पाहिजे, गुरुकुलांची पद्धत आणली पाहिजे, पारंपरिक पोषाख घातला पाहिजे, असा आग्रह करणार्या सगळ्या थोर नेत्यांची मुलं परदेशात शिकायला कशी जातात? स्वत:पासून सुरुवात करायला पाहिजे ना?
– देवयानी चौगुले, सोलापूर
सगळ्या थोर नेत्यांच्या मुलांनी जर देशाचा अभिमान बाळगला, संस्कृत भाषा शिकून ते सुसंस्कृत झाले, पारंपारिक पोशाख घातला तर आपल्या पुढच्या पिढ्यांना देशाचा अभिमान बाळगा, संस्कृत शिका, पारंपरिक पोशाख घाला, असं कोण सांगणार? बापजाद्यांचा देशातला धंदा सांभाळावा म्हणून मुलांना परदेशात शिकायला जावं लागणारच ना! नाहीतर सतरंज्या पण थोरमोठ्यांची मुलं घालणार आणि नंतर सतरंज्यांच्या घड्याही तीच मुलं घालणार, हे आपल्या देशाच्या परंपरेच्या विरुद्ध होणार नाही का? ती परंपरा जपण्यासाठीच थोर नेत्यांच्या मुलांना परदेशात शिकायला जावं लागतं बिचार्यांना…