पंगत बसली आहे.
सर्व जण एकाला खेटून एक बसले आहेत.
आदेशच तसा आहे तर…
खेटून बसून एकमेकाचा घाम काढला की कोरोना मरतो गुदमरून !
फॅन मोठ्ठा चालू आहे..पण वारं सगळं गरम फिरतंय.
मांडव आणि गर्दीमुळं घाम पण वाट घावंल तसा मानेवरनं पार खाली पायापर्यंत घरंगळतोय.
सगळीकडे नुसता घमघमाट सुटलाय.
काय शिजतंय कळेना पण काहीतरी रटरटतंय हे नक्की..
आपापल्या हनुवटीला मास्क लावलेल्या ग्रूपची वेगळी पंगत होती.
जागतिक तापमानवाढीवर त्यांची जंगी चर्चा चाललीये.
चकाट्या पिटताना एकमेकाला जोरजोरात टाळ्या देणं सुरू आहे.
`सोसल डिस्टन्सिंग पाळून काय होत नसतंया,माणूस हा सोशल प्राणीच हाया’अशी काहीबाही लांब पल्लेदार वाक्यं एकमेकाच्या तोंडावर फेकणे आणि व्हायरसचं आदानप्रदान सुरू आहे.
`अय बारक्या !’
एक बारक्या ऐकून न ऐकल्या सारखं करून पुढं निघालाच होता तोवर एकाने त्याचा शर्ट धरला..
`हां तूच,
मेनू काय हाय ???’
`कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड !’ बारक्या सरकारी कोरडेपणाने बोलला.
`एवढंच ???
दोनच ???’
`हां मंग !!!
वरनं तेवढंच आलंय !!!’
`बर जा आणि पटकन घेऊन ये,
आमाला दोघास्नी गच्च भरलेलं इंजेक्शन आण.
आणि शिस्तात टोच.’
`गच्च भरून !!!!
ही ही ही…’
बारक्या तिथून सटकला.
तोवर अजून एक बारक्या मोठ्ठं भांडं घेऊन `भात भात भात’ सारखं `कॉटन कॉटन कॉटन ‘ करत कुठेच न थांबता नॉनस्टॉप पळाला.
कुणाच्याच `अय शुक शुक… हिकडं वाढ अय !!!’ ला न जुमानता पळाला.
आधी येऊन गेलेला बारक्या परत त्या दोघांच्या समोर आला.
अर्धा मिली व्हॅक्सिन भरलेल्या दोन मिली च्या दोन सिरींज टेबलावर आपटून पुढं निघाला. तोवर एकाने त्याचा परत शर्ट धरला..
‘येवढंच ???
आं !!!!
तीन तास घामात भिजवत बसवून ठिवलासा,
आन आता लस गच्च भरून द्या म्हनलं तर एवढुस्संच देतायसा व्हय ???
खिशातनं देतायसा काय तूमच्या ???
आं !!!!!’
माणसाने हात उगारला.
बारक्या घाबरून ओरडला.
ते ऐकून चार पैलवान गडी पळत आले.
त्यांनी बारक्याला त्यांच्या तावडीतून सोडवलं.
आणि आगाऊपणा करणार्या त्या दोघांना पालखी करून बाहेर पार लांब नेऊन सोडलं..
लशीकरण परत सुरळीत सुरू झालं.
– पृथ्वीराज नलवडे