मूळ लेखक – अज्ञात
पुन:कथन – पृथ्वीराज तौर
—————————
समुद्रकिनारा.
पर्यटकांची लगबग.
समुद्राच्या गंभीर गाजेत विरघळत चाललेली संध्याकाळ.
ती मुलं घरी निघाली तेव्हा सूर्य उतरून आलेला होता.
दोघांच्याही हातात शंख होते, शिंपले होते.
खिशातही शंख शिंपले भरलेले.
दोघांचे चेहरे अनोख्या आनंदात न्हालेले.
तो आनंद त्यांच्या चेह-यावर ओसंडून वाहात असलेला.
दुपारपासून तहान भूक विसरून दोघांनी आपला हा अमूल्य ऐवज जमा केला होता.
संध्याकाळ झाली तेव्हा दोघांनी परतीची वाट पकडली.
तो आणि ती.
तो पाच वर्षांचा आणि ती सहाची.
वारा त्यांचे केस उडवत निघालेला.
त्यांच्या ओठांवर हसू उमलून आलेलं.
अचानक त्यानं पाहिलं.
काहीतरी गडबड झालीय.
तिचं हसू विरत विरत विरत गेलं.
ती एका दुकानाकडं पहात असेल.
मग अचानक तिचे डोळे चमकले आणि दुस-याच क्षणी विझून गेले.
तो भाऊ होता, तिच्यापेक्षा लहान का असेना.
त्याला काहीतरी चुकचुकल्याचं लक्षात आलं.
त्यानं तिच्या नजरेच्या दिशेला पाहिलं.
तर बाहुल्यांचं दुकान.
नटून थटून मांडलेल्या बाहुल्या.
सजून धजून बसलेल्या बाहुल्या.
‘कोणती?’ त्यानं एकाच शब्द उच्चारला.
‘गुलाबी ड्रेस घातलेली. परी.’ ती म्हणाली.
तसा तो ऐटीत दुकानात शिरला.
एखाद्या राजानं मागावी तशी त्यानं बाहुली मागितली.
गुलाबी ड्रेस घातलेली. सोनेरी केसांची. निळ्या डोळ्यांची. काजळ ल्यालेली. हसणारी परी.
तिच्याकडे पाहून त्यालाही हसू आलं.
‘बरं झालं आता तिघे मिळून खेळू.’
त्यानं बहिणीला बाहुली दाखवली.
तिनं मान हलवून होकार भरला.
त्यानं मोठ्या ठसक्यात विचारलं, ‘केवढ्याची?’
दुकानदार केव्हापासून त्याला, त्याच्या हालचालीला, विश्वासाला न्याहाळत होता.
तो म्हणाला, ‘तुला जेवढ्याची वाटते तेवढ्याची.’
तत्क्षणी मुलानं खिशातील शिंपले समोर ठेवले.
शिंपलेच शिंपले.
त्यानं दुकानदाराला विचारलं, ‘इतके पुरे कि आणखी देऊ?’
दुकानदार हसला गालातल्या गालात. म्हणाला, ‘हेही खूप जास्त झाले बाळा.’
त्यानं सात शिंपले ठेऊन घेतले आणि उरलेले मुलाला परत केले.
मुलानं शिंपले पुन्हा खिशात भरले.
बाहुली घेतली आणि उड्या मारत तो निघून गेला.
दुकानात चाललेली ही गंमत पाहणारा नोकर म्हणाला, ‘बाबूजी, असं का केलंत? एवढी महागाची बाहुली सात शिंपल्यात देऊन टाकलीत.’
बाबूजी म्हणाले, ‘केवळ सात शिंपले नाही. अनमोल सात शिंपले. मुलाचं वय एवढं नाही की त्याला पैश्याचं मोल कळावं. त्याच्यासाठी आज शिंपले अनमोल आहेत. उद्या तो मोठा होईल. त्याला जगरहाटी कळून येईल. त्याला पैशांचं मोलही कळेल आणि तेव्हा त्याला कळून येईल की सात शिंपल्याच्या मोबदल्यात एका दुकानदारानं आपल्याला एक बाहुली विकत दिली होती. कदाचित त्याला हेही कळून येईल की आपल्या आजूबाजूला काही चांगली माणसे आहेत. काही चांगली माणसे जी इतरांच्या आनंदावर ओरखडा उमटवत नाहीत. झालंच तर हे चांगुलपण त्याच्यातुनही पुढे प्रवाहित होईल. गोष्ट केवळ शिंपल्याची नाही, मुलाच्या स्वत:वरच्या विश्वासाची आणि त्याच्या बहिणीच्या आनंदाची आहे.’