– पत्र ‘कार्टा’
स.न.वि.वि.
भाऊ तुम्हाला या २०२१मध्ये पत्र लिहावं लागतंय, हेच मुळी आम्हाला आवडत नाहीये. म्हणजे काय आहे, गेल्या १०-१२ वर्षांपासून आम्ही तुम्हाला पप्पू म्हणून चिडवतोय. त्या आलिया भटची नसेल केली एवढी आम्ही तुमची चेष्टा केलेली आहे. पार तुमच्या खापरपणज्याने कोणाशी लग्न केलं इथपासून ते तुम्हाला अमेरिकेत अटक झाली होती इथपर्यंत आम्ही तुमच्याबद्दल काय वाट्टेल त्या भंपक स्टोरी बनवल्या. परदेशात गलेलठ्ठ पगार घेऊन `सागरा, प्राण तळमळला’, म्हणून कळवळणार्या राष्ट्रभक्तांपासून व्हाट्सअप्पवरून देश बदलून टाकायला निघालेल्या `योद्ध्या’पर्यंत सगळ्यांनी तुमच्या अकलेचे वाभाडे काढलेले आहेत. आणि तरी तुम्ही राजकारणात उभे? देशात सत्ता नाही, अनेक राज्यांत नाही, तर तुम्ही पूर्वजांनी कमावलेली (कालच शाळेच्या ग्रुपवर आलं होतं हे!) अफाट संपत्ती घेऊन एकदाचे चालते का होत नाही या देशातून?
पण असो, आत्ता तो मुद्दा नाही. आत्ता प्रश्न आहे तो तुमच्या कोविडकाळातल्या वागण्याचा. त्याने तर आम्हाला अधिकच राग आलाय. हे खास पत्र फक्त कोविडमध्ये तुम्ही किती चुका केल्या, ते सांगायला लिहिलंय!!
सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही कोरोना येत असल्याचा इशारा सगळ्यांच्या आधी दिला. अहो भाऊ, या देशात परकीय दहशतवादी असो, चीनचं सैन्य असो, का रोगराईची साथ, फक्त सत्ताधार्यांच्या मर्जीनुसारच येते. कोरोना भारतात आला, तो २० मार्चला, जनता कर्फ्यू जाहीर झाला तेव्हा! त्याच्या आधी तो नव्हताच आणि येण्याची शक्यताही नव्हती. तर तुम्ही कशाला उगीच इशारे देत बसलात? तरी तुम्हाला आरोग्यमंत्र्यांनी दम दिला होता नं, की उगीच भीती निर्माण करू नका, ही काय मोठी इमर्जन्सी नाही! बरोबरच होतं ते. अगदी २० मार्चलाही कोरोना ही पुरेशी गंभीर समस्या नव्हती. ती झाली २२ मार्चला, जेव्हा आदरणीय पंतप्रधानांनी ताबडतोब चार तासात देशभर टाळेबंदीची घोषणा करून या रोगाला करारा जवाब दिला तेव्हा.
बरं आता टाळेबंदी झाली, तर गुमान बसून राहायचं, तर ते नाही. तुम्ही इशारे द्यायला लागले की राज्यांना जास्त अधिकार द्या म्हणून. अहो, पेशंट शेकड्यात आहेत आणि रोग अक्राळविक्राळ झाला नसेल, तर राज्यांना अधिकार द्यायचे नसतात. ते स्वतःच्या मुठीत ठेवायचे असतात. त्यानिमित्ताने सारखं टीव्हीवर यायचं, प्रेरणादायी बोलायचं, जाहिराती करायच्या, जिथे आपल्या पक्षाचं सरकार तिथे जास्त सुविधा द्यायच्या. आकडे हजारांतून लाखांकडे जायला लागले, की हळूच अंग काढायचं. लोक टाळेबंदीने त्रस्त होऊन उपाशी मरायला लागले की राज्यांवर ढकलायचं. मग स्थानिक नेत्याची व्हायची ती बदनामी होऊ दे, आपण बांगलादेश फिरायला मोकळे! हे सगळं समजत नसल्यामुळे तुम्ही भलते सलते सल्ले देता उगाच.
मग तुमचं म्हणणं काय, की साथ चालू असताना लोकांना मदत द्या, नोकर्या टिकवा, त्याकरता खर्च करा.. नीट लक्षात घ्या, लोकांना मदत करणं महत्त्वाचं नाही, त्यापेक्षा मदत करतोय याचा प्रचंड गाजावाजा गरजेचा आहे. त्याकरता वीस लाख कोटी वगैरे असा एक भव्य आकडा सुचला पाहिजे. तो फेकला, की लोकांना खात्री पटते, की आपल्याला मदत मिळाली. पोट भरलं. आणि मग लोकांना करमणूक द्या, त्याकरता दिवे लावा, थाळ्या बडवा. राममंदिराचा भव्य सोहळा करा. संसदेच्या इमारतीची पायाभरणी करा. पुन्हा लस महोत्सव आहेच.
यातलं तुम्ही काही तरी चमकदार करू शकला का?
तुम्ही काय केलं, तर म्हणे तज्ज्ञांशी गप्पा मारल्या. अर्थतज्ञ, साथीच्या रोगांवरचे निष्णात डॉक्टर, वगैरे लोकांशी चर्चा केली. ही काय राज्यकारभाराची पद्धत आहे? अहो, नेत्याला मुळी स्वतःलाच सगळं माहीत असतं. नोटा कधी बंद करायच्या, रडारला चुकवून विमान कसं उडवायचं, चार तासात देश कसा बंद करायचा, सग्गळ्या सग्गळ्या गोष्टींची माहिती एकट्या नेत्याला हवी. फालतूमध्ये तज्ञाबिज्ञाला विचारत बसायचं नसतं. आणि त्यात पुन्हा हार्वर्ड वगैरेसारख्या जगप्रसिद्ध संस्थांना कोण विचारतोय? त्यापेक्षा हार्डवर्कवाले रामदेवबाबा जास्त महत्त्वाचे!
बरं, हे सगळं झाल्यावर तुमचा सल्ला काय, की लस आयात करा…!
अहो, तोपर्यन्त आपण कट्टर राष्ट्रभक्त होतो. अशी लस आयात करून तुम्ही कंपन्यांचे दलाल आहात, एवढंच सिद्ध झालं नं? मग तब्बल तीन ते चार दिवसांनी आपण वैश्विक झालो. साथीचं संकट क्षुद्र हेवेदाव्यांपेक्षा मोठं झालं. तेव्हा मग लस आयात करायला हरकत नव्हती. तेव्हा चुकीच्या वेळेला सल्ले देणं आतातरी थांबवा!
पण खरं सांगू का? तुमचा खरा प्रॉब्लेम वेगळाच आहे, राहुलशेठ! नेता होण्याची तुमची तयारीच नाहीष्ठ आहो, नेत्याने २४ तास राजकारणाचा विचार केला पाहीजे. तुम्ही कोरोना धोका आहे सांगत बसलात, त्याऐवजी ट्रम्पच्या स्वागताला नाही जाता आलं? त्याच्या जवळजवळ करून स्वतःच्या प्रतिष्ठा नाही वाढवता आली? कोरोनामुळे आर्थिक संकटाची त्सुनामी येईल म्हणालात, त्यापेक्षा मध्य प्रदेशचं सरकार नाही वाचवू शकलात? आमदार फोडायचे कसे, वाचवायचे कसे, कोणत्या हॉटेलला न्यायचे, कुठून तपास मागे लावायचे, याला खरं राजकारण म्हणतात भो. तुमच्या पक्षातले लोकही तुम्हाला `राजकारणाविषयी गंभीर नाही’ म्हणतात ते यामुळेच. मुळात कोरोनाच्या काळात तुम्ही उगा आजाराच्या समस्येवर विचार करत बसलात. त्याऐवजी पुढे कोणत्या राज्यात निवडणूक आहे, याची चिंता तुम्हाला वाटली नाही? नीट पहा, आजही तुम्ही कोरोना कोरोना म्हणताय, तेव्हा महामहीम नेते जिवाच्या आकांताने प्रचार करत फिरतायत. त्यांना तर मुख्यमंत्र्यांशी बोलायलाही वेळ नाही. आणि तुम्ही अजून साथीचा अभ्यास करताय? आणि या सर्वांवर कडी म्हणजे तुम्ही म्हणे चक्क निवडणुकीतल्या रॅली थांबवल्या??? कमाल आहे तुमची पप्पू… अश्याने कसं तुम्हाला ग्रेट नेता म्हणता येईल? मतदार मेले तरी बेहत्तर, पण आपल्याला मत देऊन मेले पाहिजेत, हे एकच लक्ष्य ज्याला दिसतं, तो खरा नेता, बाकी सगळे पप्पू, हे लक्षात ठेवा…!!
पप्पूकुमार, लक्षात घ्या. आजारपणं, साथी वगैरे गोष्टी जनतेच्या नशिबावर सोडायच्या असतात. दूरदृष्टी वगैरे वापरून त्याचा अभ्यास करायचा नसतो. मतदान, हे लोकशाहीत सर्वात पवित्र कर्तव्य आहे, त्यामुळे प्रचार ही सर्वात मोठी जबाबदारी आणि सरकार बनवणं, हे सर्वात मोठं काम! साथ ही स्वतःचे फोटो लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर छापायला उपयोगी असते. आपलं सरकार असेल, अश्या राज्यांवर मेहेरनजर करायला साथीत मोका साधायचा असतो. रोड शो, कुंभ, रॅल्या यामुळे साथ पळून जात असते. त्यामुळे आतातरी आजारपण, नोकर्या, एमएसएमई वगैरे फालतू विषय बाजूला ठेवा आणि राजकारणावर लक्ष केंद्रित करा. स्वतःच्या प्रतिमेवर अपरंपार प्रेम करता आलं आणि लोकांना तिच्यावर भक्ती करायला लावता आली, २०२४ ला आम्ही तुम्हालाही साथ देऊ एखाद वेळेस…
तुमचा (नसलेला)
उच्चविद्याविभूषित जागरूक मतदार