वैराळेवस्तीत काळजीचं वातावरण होतं. वस्तीत राहणार्या, घरकाम करून पोट भरणार्या वासंती या महिलेची सात वर्षांची मुलगी संध्याकाळपासून बेपत्ता झाली होती. तिचा बाप प्रशांत यानं पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर पोलिसांनीही लगेच तपासाला सुरुवात केली होती.
गौरी चुणचुणीत होती, भरपूर बडबड करून समोरच्या कुणालाही आपलंसं करणारी होती. रंगानं गोरी, घारी असल्यामुळेच आईनं तिचं नाव कौतुकानं `गौरी’ असं ठेवलं होतं. वासंतीचा तिच्यावर जीव होता. ती हरवल्यामुळे वासंती सैरभैर झाली होती. तिला काही सुचत नव्हतं. नवरा प्रशांत बाहेर कामावर गेला होता. घरी आल्यावरच त्याला ही बातमी समजली, तेव्हा तोही कोसळला. इन्स्पेक्टर लांजेकर चौकशीसाठी थेट वस्तीवरच पोहोचले.
“माझी गौरी गेली हो साहेब… आता काय करू मी…? देवा… का असा वाईट वागला असशील रे?“ वासंती धाय मोकलून रडत होती.
शेजारच्या बाया तिला धीर द्यायचा प्रयत्न करत होत्या, पण वासंती काही ऐकायला तयार नव्हती. तिचा धीरच सुटल्यासारखा वाटत होता.
इन्स्पेक्टर लांजेकर प्रत्येकाकडून बारीकसारीक तपशील मिळवायचा प्रयत्न करत होते. वासंती गरीब आणि प्रामाणिक होती. तिचा नवरा प्रशांत थोडा उनाड आणि कामचुकार होता. त्याच्या नोकर्या टिकत नसत. तो स्वतः घर चालवू शकत नव्हता. मिळतील ती कामं करून वासंती संसाराला हातभार लावत होती. गौरीवर तिचा जीव होता. वासंतीला शलाका नावाची एक मोठी लेक होती, तिच्या शिक्षणासाठीही वासंती पैसे साठवत होती. शलाकाला तिनं तिच्या मामाकडे ठेवलं होतं आणि तिचा सगळा खर्च वासंती करत होती.
गौरीला वासंतीचा फार लळा होता. ती जाईल, तिकडे गौरी पाठोपाठ जायची. नेमकी कालच ती गौरीला प्रशांतच्या भरवशावर घरी ठेवून गेली होती. प्रशांतला दारूचा नाद आहे, याची वासंतीला कल्पना होती, पण मुलीला तो एकटं टाकून जाणार नाही, असं तिला वाटत होतं. तिचा अंदाज चुकला.
“ही निघून गेल्यावर थोड्या वेळानं प्रशांतसुद्धा उठला आन् कुठंतरी निघून गेला. दारू ढोसायलाच गेला असणार. गौरी खेळत होती अंगणातच,” शेजारच्या एका बाईनं सांगितलं. नंतर मात्र तिनं बघितलं, तर गौरी अंगणात नव्हती.
एकतर अंगणातून गौरीला कुणीतरी घेऊन गेलं असावं किंवा ती खेळत आसपास गेली असावी आणि तिच्या बाबतीत काहीतरी दुर्घटना घडली असावी, असा पहिला संशय लांजेकरांना आला. वस्तीतली माणसं तिचा शोध घेतच होती, लांजेकरांनी त्यांच्याही पथकाला कामाला लावलं.
प्रशांतच तिला कुठे घेऊन गेला आणि ती तिथून बेपत्ता झाली का, याचा पोलिसांनी शोध घेतला. पण तसं काही घडलेलं नव्हतं.
रात्र अशी अस्वस्थतेतच गेली. सकाळ उजाडली आणि पोलिस स्टेशनचा फोन खणखणला. वस्तीपासून लांब, नदीच्या काठावर एका लहान मुलीचा मृतदेह सापडला होता. बहुधा नदीतून वाहत आलेला होता. लांजेकर तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांना मृतदेहाचं वर्णन ऐकून संशय आलाच होता, प्रत्यक्ष पाहिल्यावर खात्री पटली. ती गौरीच होती.
“गौरे” वासंतीनं टाहो फोडला. आपल्या लाडक्या मुलीला अशा अवस्थेत पाहणं तिला सहनच होत नव्हतं. ती गायब झाल्यापासून आता पुन्हा कधीच भेटणार नाही, अशा रीतीनं वासंती रडत होती, तिच्या मनातली भीती आता खरीच ठरल्याचं दिसत होतं.
मृतदेह पोस्टमार्टेमला पाठवून देण्यात आला, गावकर्यांची गर्दी पोलिसांनी हटवली. आता गौरीचा मृत्यू नेमका कसा झाला, ते पोस्टमार्टेमनंतरच समजणार होतं, पण पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली.
प्रशांत फक्त बेवडा नव्हता, तो पैशांसाठी लोकांना गंडवण्याचे धंदेही करत होता, असं पोलिसांना समजलं. त्यांनी आधी प्रशांतला दमात घेतलं, दोनचार रट्टेही दिले, पण त्याच्याकडून विशेष काहीच हाती लागलं नाही.
आता वस्तीतून काही माहिती मिळवण्यासाठी लांजेकरांनी स्वतः जायचं ठरवलं. साध्या वेशात लांजेकर आणि हवालदार जगदाळे वस्तीत शिरले आणि वेगवेगळ्या लोकांकडे चौकशी करू लागले.
“साहेब, ती पोरगी वस्तीमधून बाहेर पडून समोरच्या रस्त्याला लागली आणि एका बंगल्याच्या आवारात शिरल्याचं बघितलंय, असं एक बाई सांगतेय,” जगदाळेंनी खबर आणली.
“तिला तो बंगला माहितेय?” लांजेकरांचे डोळे चमकले.
“होय, पण ती स्वतः समोर येऊन दाखवणार नाही. वासंतीचं आणि तिचं जुनं काहीतरी भांडण आहे.”
“हरकत नाही!” लांजेकर म्हणाले आणि मग त्या बाईला त्यांनी वस्तीच्या बाहेरच कुठेतरी भेटायला सांगितलं. तिनं संध्याकाळी सातच्या सुमारास गौरीला ज्या बंगल्याच्या आवारात शिरताना बघितलं होतं, तो बंगला दाखवला. गौरी एकटीच वस्तीतून बाहेर पडून समोरच्या रस्त्यावर एका बंगल्याच्या आवारात शिरली, हे थोडं विचित्र वाटत होतं.
“मी त्याच बंगल्यात घरकामाला जाते, साहेब!” वासंतीनं सांगितलं, तेव्हा लांजेकरांना आश्चर्य वाटलं.
“गौरी संध्याकाळी तुला भेटली होती?”
“होय साहेब, पण सातच्या दरम्यान. मी त्या घरात काम करते, हे तिला माहितेय. इतर वेळी ती कधी घरातनं एकटी बाहेर पडत नाही, पण काल आलती.”
“मग हे आम्हाला आधीच का सांगितलं नाहीस?” लांजेकर आता जरा दरडावून म्हणाले.
“साहेब, ती आल्याचं बघून मला बी धकाच बसला. तिला वस्तीपर्यंत आणून सोडलं आन् परत कामावर गेले,” वासंतीनं सांगितलं.
ती संध्याकाळी मुलीला भेटल्याचं सांगत होती. याचा अर्थ सव्वासातनंतर गौरीला कुणीही बघितलेलं नव्हतं. ज्या बंगल्यात वासंती काम करत होती, त्याचे मालक रोहन मानकर यांच्याकडेही लांजेकरांनी चौकशी केली. गौरीबद्दलची थोडी माहिती मिळत होती, पण त्यावरून तिच्या मृत्यूबद्दल काहीच समजत नव्हतं. अशावेळी पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आला आणि लांजेकरांना एक मार्ग सापडला.
गौरीचा मृत्यू डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे झाला होता. ही दुखापत ती उंचावरून पडल्यामुळे तिला झाली होती. एखाद्या दगडावर ती पडली असावी, त्यामुळे तिचा जागीच जीव गेला असावा, असा निष्कर्ष पोस्टमार्टेममध्ये काढण्यात आला होता.
लांजेकरांनी आता पुन्हा सगळ्यांची चौकशी करायचं ठरवलं. वासंती, प्रशांतला पुन्हा प्रश्न विचारले गेले. वस्तीमधले जे कुणी या दोघांना आणि गौरीला ओळखत होते, त्यांच्याकडून पुन्हा माहिती मिळवण्यावर पोलिसांनी भर दिला. एक गोष्ट नक्की होती, की उंचावरून पडून गौरीचा मृत्यू झाला होता आणि तिच्या शरीरावर अत्याचार वगैरे केल्याच्या काही खुणा नव्हत्या.
गौरीला वस्तीतून बाहेर जाताना एका बाईनं बघितलं होतं, पण वासंती पुन्हा तिला सोडायला वस्तीपर्यंत आली होती, हे कुणाच्या नजरेला आलं नव्हतं. खरंतर वस्ती गजबजलेली होती. वस्तीत शिरणार्या गल्लीच्या तोंडापाशी नेहमी गजबज असे. तिथेही कुणी गौरीला परत येताना बघितलं नव्हतं. याचा अर्थ ती वस्तीत परत आलीच नव्हती.
जवळच्याच एका बंगल्याच्या मालकाकडून त्याच्या बंगल्याबाहेरचंही फुटेज मिळालं आणि लांजेकरांना हुरूप आला. त्यात संध्याकाळी सात वाजून पाच मिनिटांनी गौरी बंगल्याच्या आवारात शिरताना दिसत होती. वस्तीतली ती बाई, वासंती या दोघीही जे सांगत होत्या, ते मात्र सीसीटीव्हीमध्ये दिसलं नाही. लांजेकरांना आश्चर्य वाटलं. ते पुढचं फुटेज बघायला लागले आणि आठच्या दरम्यान एक गाडी बंगल्यातून बाहेर पडताना दिसली. ती गाडी अर्थातच रोहन मानकरची होती. गाडी वेगाने निघून गेली आणि गेट आतून बंद झालं.
गौरी बंगल्यात एकटीच गेली, बाहेर काही आली नाही. पण आठ वाजता रोहनची गाडी बंगल्याच्या बाहेर गेली. गाडीत बसलेला रोहन फुटेजमध्ये दिसत होता.
“ही वासंतीसुद्धा बंगल्यातून बाहेर पडताना दिसली नाहीये ना, जगदाळे?” लांजेकरांनी विचारलं. जगदाळेंनी होकारार्थी मान हलवली.
आता लांजेकर पुढचं फुटेज जास्तच उत्सुकतेनं बघू लागले. एका घटनेनं त्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि त्यांना अचानक काहीतरी सापडल्यासारखं ते वेगानं तिथून निघाले.
मानकरांच्या बंगल्यापाशीच लांजेकरांची गाडी थांबली आणि ते सरळ आत घुसले. खालूनच त्यांना दिसलं, की बंगल्याच्या
गॅलरीत लोखंडी रेलिंगच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं.
“थांबा!” लांजेकर तिथून ओरडले. जगदाळेंना पाठवून त्यांनी ते काम थांबवायला सांगितलं आणि स्वतः बंगल्याच्याच आवारातल्या गार्डनकडे गेले. झाडांच्या शेजारी लावलेल्या एका दगडावर त्यांना जे हवं होतं, ते सापडलं. तातडीने फॉरेन्सिकची टीम त्यांनी बोलावून घेतली आणि तिथल्या काही गोष्टी ताब्यात घेतल्या. गॅलरीच्या कठड्यापाशी जाऊनही टीमने तपासण्या सुरू केल्या.
“माझ्या बंगल्यात फॉरेन्सिकची टीम काय करतेय?” संतापलेला रोहन मानकर पोलिस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर लांजेकरांना जाब विचारायला लागला लांजेकरांनी त्याच क्षणी त्याच्या एक सणसणीत थोबाडीत दिली, तसा मानकर गारठला.
“त्या निष्पाप पोरीचा जीव का घेतलास ते सांग आधी!” लांजेकरांनी दरडावून विचारलं. त्यांनी वासंतीलाही पोलिस स्टेशनला बोलावून घेतलं होतं. ती मुलीच्या आठवणीने आधीपासूनच रडत होती.
रोहनने एकदा वासंतीकडे बघितलं. त्याची बोलतीच बंद झाली होती.
“हा असं नाही ऐकणार. जगदाळे, ह्याला टायरमध्ये घाला!” लांजेकर म्हणाले आणि त्यांनी रोहनला ओढून हवालदारांच्या ताब्यात दिलं. तेवढ्यात वासंती ओरडली, “साहेब, त्यांचा काय दोष नाहीये, तुम्ही मला आत टाका, मी खून केलाय माझ्या पोरीचा!”
जगदाळेंनीही दचकून बघितलं, पण लांजेकरांना अंदाज असावा.
रोहनला त्यांनी वेगळ्या खोलीत पाठवून दिलं आणि जबाब देण्यासाठी वासंतीला समोर बसवलं.
“तू पोरीला सोडायला वस्तीत परत आल्याचं आम्हाला खोटं सांगितलंस, हे आम्हाला माहितेय. आता बंगल्यावर काय आणि कसं घडलं, ते सांग.” लांजेकर तिच्याकडे रोखून बघत म्हणाले. वासंती गप्प झाली होती. बोलताना तिची चलबिचल होत होती.
“त्या रोहनबरोबर तुझं लफडं होतं. बंगल्यावर तू कशासाठी जायचीस, हे सगळं आम्हाला कळलंय, आता तुझ्या तोंडानं सांग!”
“साहेब, लफडं म्हणू नका ओ. गरीबी वाईट असते साहेब. पोटासाठी, लेकरांसाठी काय काय करावं लागतंय, तुम्हाला नाय कळायचं. त्यातनं नवरा असला आईतखाऊ असल्यावर तर…!” वासंतीला रडू येत होतं. “साहेब, खरं सांगते, पोरीला मारलं नाही हो मी. पोटचा गोळा होता तो. माझा जीव होता. तिला कसं मारंन? पण ती नको त्या येळी अचानक समोर आली आन् तिला काय सांगावं कळंना. मलाच येऊन चिकटायला लागली. बाला सगळं सांगन म्हणाय लागली. मग मला काय सुधरंना. डोसकं फिरलं आन् त्याच रागात तिला ढकलून दिली.
गॅलरीचं रेलिंग तुटलेलं हाय, ह्याची कल्पना नव्हती साहेब. ती मागं फेकली गेली आन्
गॅलरीतनं खाली पडली ती नेमकी दगडावर..वरनं बघते तर सगळं संपलेलं..!!’’ वासंतीनं सांगून टाकलं आणि पुन्हा धाय मोकलून रडायला लागली.
वासंतीच्या वागण्या-बोलण्यावरून ती मुद्दाम पोरीचा जीव घेणार नाही, याची कल्पना येत होती. तरीही लांजेकरांना सगळं तिच्याकडून ऐकून खात्री करून घ्यायची होती. वासंतीच्या हातून रागाच्या भरात चुकून गौरीला धक्का दिला गेला आणि
गॅलरीतून खाली पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर मात्र गौरी घाबरली. रोहन श्रीमंत होता, स्वार्थी होता, वासंतीचा गैरफायदा घेत होता, तरी तिचं दुःख त्याला कळत होतं. तिला काही त्रास होऊ नये, म्हणून त्यानंच तिला समजावलं. गेलेली मुलगी आता परत येणार नाही, हे सत्यच होतं. निदान वासंतीचं आयुष्य बरबाद होऊ नये, म्हणून गौरीच्या मृतदेहाची आपण परस्पर विल्हेवाट लावून टाकू, असं त्यानंच सुचवलं. त्यानंतर स्वतःच तो गाडीतून तिचा मृतदेह घेऊन बाहेर पडला आणि त्यानं नदीत तो फेकून दिला. दुर्दैवानं तो कुठेतरी अडकून लोकांच्या नजरेत आला आणि पोलिस या दोघांपर्यंत पोहोचलेच.
कुटुंबासाठी, मुलीसाठीच वासंती उघड्या डोळ्यांनी जे पाप करत होती, त्याची तिला आता आयुष्यभराची शिक्षा मिळाली होती.
(लेखक मालिका व चित्रपट क्षेत्रात नामवंत संवादलेखक आहेत)