माझ्या जीवनातील इस्त्र्या?…
हो… ही टायपिंगची चूक नाहीये.. इस्त्र्याच म्हणायचे आहे मला!
तुम्हाला स्त्रिया अपेक्षित होते ना?
वाटलंच मला!
तुमच्या मनात असलेला ‘माझ्या जीवनातील स्त्रिया’ हा नाजुक विषय. मला या पृथ्वीतलावर अजून काही वर्षे सुखाने जगता यावे अशी इच्छा असल्यामुळे तो विषय पुढे केव्हातरी घेऊ. (तूर्तास इस्रीचा शॉक देत आहे).
तर मनुष्याच्या अन्न, वस्र, निवारा या ज्या तीन मूलभूत गरजा आहेत त्यापैकी वस्र या मूलभूत गरजेसाठी तेवढीच मूलभूत गरज इस्री नामक यंत्राची आहे. चोर असल्यामुळे पोलीस, रोग असल्यामुळे डॉक्टर तसेच भौतिक जीवनात समस्या असल्यामुळे तथाकथित आध्यात्मिक बाबा लोकांची जशी गरज पडते, तशीच गरज कपड्यांवर सुरकुत्या पडल्यामुळे इस्रीची पडते.
कपडे धुण्यासाठी व त्यातील मळ काढण्यासाठी कपडे जोरात पिळावे लागतात. त्या पिळ्यामुळे त्यावर सुरकुत्या पडतात. तसेच सुरकुत्या पडलेले कपडे, अजून तसे कपडे वापरायची फॅशन न आल्यामुळे, विचित्र दिसतात. कपडे व तेही कडक इस्रीचे घालण्याची फॅशन आजतागायत कायम असल्यामुळे इस्रीवाल्यांचे धंदे चालतात.
मी लहानपणापासून इस्री केलेले कपडे घालू लागलो होतो. माझ्या बाबांना नीटनेटके राहणे आवडायचे. एके दिवस मी बिनइस्त्रीचा शर्ट घातलेले त्यांनी पाहिले व मला चांगलाच प्रसाद दिला होता. तेव्हापासून मी काहीही झाले तरी बिन-इस्रीचे कपडे घालत नाही.
मी लहान असताना बाबा तांब्यात विस्तव ठेवून कपड्याने त्या तांब्याचे तोंड पकडून त्यांच्या कपड्यांची इस्त्री करायचे. नंतर त्यांनी कोळशांवर चालणारी एक इस्री आणली होती. अंगणात चूल पेटवून ते जळते निखारे चिमट्याने गोळा करून त्या इस्त्रीत टाकायचे. आम्हा मुलांना तो प्रकार पहायला आवडायचा. पण बर्याच वेळा आई आम्हाला तेथून हाकलून द्यायची. नंतर बाबांनी विजेवर चालणारी इस्री आणली व इस्री करण्याची पद्धत सोपी झाली. ते चूल पेटवणे, मग त्यात लाकडे निवडून घालणे, ते निखारे व्यवस्थित बनतील एवढे गरम करणे व नंतर इस्रीमध्ये वापरणे ही सगळी झंझटच निघून गेली. एक बटन दाबले की इस्री गरम व्हायची. जास्त गरम झाली तर बटन बंद करायचं असा सगळा सोप्पा कारभार होता.
अशी इस्री मग मला सर्वप्रथम हाताळायची परवानगी मिळाली. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवल्यावर मला जेवढा आनंद झाला होता, त्यापेक्षा जास्त आनंद मला इस्री करायला परवानगी मिळाल्यावर झाला होता. मग ती जड इस्री घेऊन मी इस्री करायला शिकलो. बाबांनीच इस्री करायला शिकवले.
सर्वात आधी शर्टाच्या कॉलरचा आतला भाग घ्यायचा. कारण इस्री फारच गरम झालेली असेल तर कपडा जळू शकतो.
कॉलरचा मागील आतला भाग जळाला तरी कमीत कमी नुकसान झाल्याचे समाधान मिळते, असा हेतू. कॉटनचा शर्ट असेल तर वाटीमध्ये पाणी घेऊन बोटांनी कपड्यांवर शिंपडावे लागे. तेव्हा कुठे कॉटनच्या घड्या मोडत. टेरिकॉट-टेरेलिन वगैरे कपड्यांना अगदी हलकी गरम इस्री लागत असे. नाहीतर ते कपडे इस्त्रीला चिकटलेच म्हणून समजा!
शाळेच्या गणवेशाला रोज इस्री करून जाणारा त्या पूर्ण सरकारी शाळेत मी एकटाच विद्यार्थी असेन. शाळेच्या गणवेशात बुटांचा अंतर्भाव होता, पण बरीचशी मुले साधी चप्पल घालून येत. काही तर अनवाणीच असत. शिक्षकही उगाच शिस्तीच्या नावाखाली त्यांना विचारत नसत. मला एकदा आदर्श विद्यार्थी (गणवेश कसा असावा या संदर्भात) म्हणून स्टेजवर बोलावून सर्वांना दाखवलेले चांगलेच आठवते.
ती पहिली जड इस्री बरीच वर्षे वापरली होती. दोन-तीन वेळा रिपेअर फक्त करावी लागली. आतमधे एक तार असते, जी चालू केल्यावर लालभडक होऊन तापते व त्यामुळे खालची लोखंडी प्लेट तापते असा साधा हिशोब असायचा. नंतर तिचं हँडल गंजून तुटून गेल्यावर ती निकाली काढण्यात आली. नंतर एक हलकी, तापमान हवं तेवढं ठेवता येणारी इस्री घेतली. तेवढे तापमान वाढल्यावर ती आपोआप बंद होत असे. म्हणजे कपडे जळायची भीती अगदी कमी झाली होती. पण कधी चुकून जास्त तापमानावर सेट केली तर अध्येमध्ये कपडे जळले आहेत!
इस्रीवाल्याकडे कपडे दिल्यावर एक मोठा धोका असतो… नाही, कपडे गहाळ व्हायचा नाही… घरात ढेकूण नावाच्या किळसवाण्या प्राण्याचे आगमन होण्याचा! लोकल, थिएटर्स या आणि अशा काही जागा या प्राण्याच्या प्रसाराच्या जागा आहेत. पण इस्रीवाला ही तर अगदी हक्काची जागा.
त्या भीतीने मी नेहमी घरीच इस्री करायचा प्रयत्न करायचो. मनुष्य जेवढा दुसर्यावर विसंबून राहतो, तेवढाच निष्काळजी बनत असतो. रोज सकाळी मुलीच्या शाळेच्या गणवेशाची आणि माझ्या व सौ.च्या कपड्यांची इस्री करणे यात अर्धा तास राखून ठेवला जायचा. क्वचित प्रसंगी जमलंच नाही एखादे दिवशी तरच इस्रीवाल्याकडे पदर पसरत असे. सणासुदीला गरीबांना मिठाई खायला मिळते तसे पावसाळ्यात ओलसर असलेल्या आतल्या कपड्यांनाही इस्रीचा उबदार स्पर्श अनुभवायला मिळे! त्यातून भसाभसा वाफ बाहेर येत असे. पावसाने भिजलेल्या नोटासुद्धा इस्रीखालून गेल्यावर नव्याकोर्या नोटांसारख्या कडक होऊन येत. पावसाळ्यातच सर्दी-पडसे झाले की पूरग्रस्त भागात मिलिटरी पाठवतात, तशी कापडाचा गोळा गरम करून शेकायच्या पवित्र कामी इस्रीची सेवा घेतली जायची!
पूर्वी एक रंगीबेरंगी स्टिकर यायचे. ते पाण्यात ओले करून कपड्यावर उलटे ठेऊन त्यावरून गरम इस्री फिरवली की कपड्यांवर उमटायचे. लहानपणी असले उद्योग पण चोरून बरेचदा केले! इस्रीची रूपे काळानुसार बरीच बदललीत. तांब्यातल्या कोळशापासून आताच्या वाफ बाहेर टाकणार्या इस्रीची सत्ता आली आहे. आता तर इकडून कपडे आत टाकले की तिकडून इस्री केलेले कपडे आपोआप बाहेर पडतात अशी टेक्नॉलॉजी तयार आहे म्हणे.
जिवाभावाची मैत्रीण असल्यासारखी माझ्या जीवनात आलेल्या इस्त्र्यांनी साथ दिलीय. काही मंगलकार्य असताना घाईघाईत मारलेली इस्री असो की ऑफिसला जाताना उशीर झाल्यामुळे बेंबीपर्यंतच शर्टाची इस्री केल्याचा प्रसंग असो. कधी सर्दीपडशाने लाल नाक झालेल्या मुलीला शेकून देण्याचा प्रसंग असो… माझ्या जीवनातल्या अशा बर्याच बर्यावाईट प्रसंगाची साक्षीदार इस्रीच आहे.
आयुष्यात पुढे पण जीवनसाथीसारखी अशीच साथ ती देणार आहे…