अनेक चित्रपट दिग्दर्शक बॉक्स ऑफिसवर जे चालतंय त्या लाटेवर स्वार होऊन सिनेमा बनवत असतात; पण असेही काही दिग्दर्शक असतात जे आपल्याला काय सादर करायचं आहे, हे पक्कं मनाशी ठरवून सिनेनिर्मितीचा घाट घालतात. या पैकीच एक प्रमुख नाव आहे दिग्पाल लांजेकर. त्यांच्या श्री शिवराज अष्टक या संकल्पनेंतर्गत आत्तापर्यंत पाच चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. मराठीत ऐतिहासिक चित्रपट चांगली कमाई करत आहेत म्हणून वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी गेल्या मध्यंतरीच्या काळात अनेक टुकार मराठी ऐतिहासिक चित्रपट येऊन गेले. परंतु दिग्पाल यांचा संयमी, चिकित्सक मांडणीचा दृष्टिकोन आणि त्यांनीं घेतलेली मेहनत त्यांच्या ‘शिवरायांचा छावा’ सिनेमात पडद्यावर दिसते.
या चित्रपटाची सुरूवात संभाजी महाराजांच्या (भूषण पाटील) राज्याभिषेकाच्या घटनेपासून होते. आजवर संभाजी महाराजांच्या जीवनावरील नाटक-सिनेमांत शिवाजी महाराज- संभाजी महाराज यांच्यात झालेले मतभेद, शिवरायांच्या पश्चात गादीवर कुणाला बसवायचे यावरून झालेलं राजकारण अशा गोष्टी दाखवण्यात आल्या. परंतु या चित्रपटात या गोष्टी टाळून शंभूराजांच्या धाडसी व्यक्तिमत्वाची ओळख करून देण्यात आली आहे.
शिवरायांच्या देहावसानानंतर दख्खनच्या रयतेला कुणी वाली उरलाच नाही या भावनेने औरंगजेब (समीर धर्माधिकारी) आणि त्याच्या सहकार्यांनी रयतेवर अमानुष छळ सुरू केला आहे. ‘जिझिया’ कर वसूल करणे, मुली-महिलांवर अत्याचार करणे असे प्रकार सर्वत्र सुरू आहेत. वडील शिवछत्रपती (चिन्मय मांडलेकर) आणि आजी जिजाऊ (मृणाल कुलकर्णी) यांच्याकडून छत्रपती म्हणजे काय, रयतेशी राजाची वागणूक कशी असावी, बादशाही, पातशाही आणि आपल्यात काय फरक आहे याची शिकवण आणि संस्काराच्या वाटेवरून पुढे जाण्याचा निर्णय संभाजी राजे घेतात.
स्वराज्याच्या खजिन्यात भर टाकण्यासाठी ज्याप्रमाणे शिवरायांनी सुरतेवर छापा टाकला त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजही छापा टाकण्यासाठी मोगलांची मोठी वैभवनगरे कोणती या शोधात असतात. उत्तरेकडील आग्रा, दिल्ली यानंतर बुर्हाणपूर ही मोगलांची तिसरी मोठी वैभवनगरी असते. बुर्हाणपूरात अत्याचारी मोघली सरदार काकर खान (राहुल देव) राखणदार आहे. बहिर्जी नाईक (रवी काळे) यांच्यावर बुर्हाणपुरातील खजिन्याची इत्यंभूत माहिती मिळविण्याची जबाबदारी दिली जाते आणि त्यानुसार या मोहिमेची आखणी केली जाते. पत्नी येसूबाई (तृप्ती तोरडमल) यांच्यावर राज्यकारभाराची जबाबदारी देऊन संभाजीराजे सरसेनापती हंबीरराव (प्रसन्न केतकर), येसाजी कंक (भूषण शिवतरे) जोत्याजी (अभिजित श्वेतचंद्र) यांच्या सोबतीने बुर्हाणपूर स्वारीसाठी सज्ज होतात. ही मोहीम पूर्णत्वास जाते का? त्यामध्ये कोणत्या अडचणी येतात? काकर खान आणि त्याचे सहकारी शंभूराजांविरोधात कोणते डावपेच आखतात आणि त्याला शंभुराजे कसे सामोरे जातात, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ‘शिवरायांचा छावा’ बघायला हवा.
दिग्पाल लांजेकर यांनी नेहमीच्या शैलीत याही सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा लक्षवेधी आहे. शिवाय सिनेमातील सरदारांची ओळख वेगळ्या शैलीत करून दिली आहे. सिनेमातली संगीत, गाणी, लढाईचे प्रसंग अंगावर रोमांच उभे करतात. मध्यंतराआधीचा सिनेमा राजवाड्यात घडतो. यात संवाद जास्त आहेत. या प्रसंगांची लांबी थोडी कमी केली असती तर पूर्वार्ध अधिक रंजक झाला असता. उत्तरार्धात बुर्हाणपूर मोहीम सुरू होते तेव्हा सिनेमा वेग घेतो. या मोहिमेमागे संभाजी राजांनी किती बारकाईने विचार केला होता, शत्रूला गाफील ठेवून गारद करण्यासाठी मराठे सुरतेवर स्वारी करणार याच्या अनेकदा उठवलेल्या वावड्या, कूटनीती, शत्रूच्या अंतर्गत गोटात शिरून मिळविलेली माहिती. हल्ला करण्याची रणनीती या कामी हंबीरराव मोहिते, बहिर्जी नाईक यांची लाभलेली साथ या गोष्टींवर भर दिल्याने चित्रपट प्रेक्षकांना धरून ठेवतो.
संभाजीराजांच्या आठवणीतून (पास्ट-प्रेझेंट मांडणी) शिवाजी महाराज जिजाऊ यांचे काही एकत्रित प्रसंग अनुभवण्याची संधी चित्रपटात मिळते. यातून प्रेक्षकांना लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टकाची आठवण होत राहते. शंभूराजांचा वाघासोबतचा प्रसंग छान सादर झालाय. मात्र व्हीएफएक्सचे बजेट जास्त असतं तर हा प्रसंग आणखी रोमांचकारी झाला असता.
अभिनेता भूषण पाटील याचा देखणा लुक, शरीरयष्टी आणि भेदक नजर हे संभाजीराजेंच्या भूमिकेचे सर्वोच्च बिंदू आहे. त्याची मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न दिसत असला तरीही संवादकौशल्याच्या अनुषंगाने मेहनत कमी पडली आहे. खूपदा तारस्वरात बोलल्याने काही महत्त्वाचे संवाद आणि प्रसंग तितके प्रभावी सादर होताना दिसत नाहीत. जिजाऊंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर यांच्या पाहुण्या भूमिका लक्षात राहतात. तृप्ती तोरडमल यांनी साकारलेली येसूबाईंच्या ठीक. काकर खानाच्या भूमिकेतील राहुल देव यांचा अभिनय लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. रवी काळे यांचा बहिर्जी, विक्रम गायकवाड यांनी साकारलेला कवी कलश, प्रसन्न केतकर यांचा हंबीरराव या छोटेखानी भूमिका सहज आणि प्रभावी वाटतात. ज्योत्याजीची भूमिका साकारणारा अभिजित श्वेतचंद्र विशेष लक्षात राहतो. देवदत्त बाजीचं संगीत, अमर मोहिलेचं पार्श्वसंगीत यांनी चित्रपटात जीव ओतलाय. तर चित्रपटाचं संकलन आणि छायांकन उत्तम झालंय.
लांजेकर शैलीचे ऐतिहासिक पोषाखीपट पाहण्याची आवड असलेल्या प्रेक्षकांसाठी ‘शिवरायांचा छावा’ हा सिनेमा न चुकवण्यासारखाच आहे.