काहीशा अंधार्या खोलीत बसलेल्या त्या तिघांचा अस्वस्थपणा वाढत चालला होता. अस्वस्थपणा घालवण्यासाठी तिघेही विनाकारण काही ना काही हालचाली करत होते आणि त्यामुळे त्यांच्या अस्वस्थतेत अजून भर पडत चालली होती. तेवढ्यात दारावर दोन वेळा खुणेची टक् टक् झाली आणि सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मदनने पुढे होत दरवाजा उघडला. बाहेरच्या व्यक्तीने पटकन् आतमध्ये शिरत तो घाईघाईने आपल्या मागे बंद करून घेतला आणि एका मोकळ्या खुर्चीत अंग झोकून दिले.
‘रंगा.. आपले काय ठरले होते? एकाच वेळी एकाच ठिकाणी कधीही चौघांनी एकत्र भेटायचं नाही. तूच हा नियम घालून दिला होतास ना?’ पन्नाशीला पोहोचलेला पण अजूनही अंगपिंडाने भक्कम असलेला भैरव काहीशा नाराजीने बोलला.
‘खरे आहे तुझे भैरव. पण अचानक कामगिरी अशी मिळाली की, माझ्यापुढे काही पर्याय नव्हता. आपले बोलणे झाले, आराखडे मांडले गेले की, आपण लगेच रवाना होत आहोत,’ रंगा एका दमात बोलून गेला आणि इतर तिघे आश्चर्याने त्याच्या तोंडाकडे पाहत राहिले.
‘आत्ता लगेच?’ मदन आणि त्याच्या शेजारी बसलेला सुंदर एकाच वेळी घुसमटत्या आवाजात ओरडले.
‘पण कुठे? आणि कामगिरी काय आहे?’ भैरवने शांतपणे विचारले. रंगाने तातडीने बोलावणे धाडले म्हणजे कामगिरी अत्यंत महत्त्वाची, जोखमीची आणि बक्कळ पैसा मिळवून देणारी असणार याची त्याला खात्री होती. त्यातून तो आयुष्यात एकटा. ना मुलेबाळे ना मायबाप. त्याला उद्या काय आणि आज काय सगळ्या वेळा सारख्याच होत्या.
‘आठ दिवसात अस्वलाचे चार आणि बिबट्याचे आठ पंजे हवे आहेत,’ खर्जातल्या आवाजात रंगा बोलला आणि पुन्हा एकदा त्या खोलीतली अस्वस्थता वाढू लागली. काही क्षण शांततेत गेले आणि भैरवने उठून सगळ्यांचे पेग भरले. पुढची काही मिनिटे दारू रिचवण्यात गेली आणि सगळ्यांची डोकी जरा भानावर आली.
‘अस्वलाचे चार आणि बिबट्याचे आठ म्हणजे निदान एक अस्वल आणि दोन बिबटे मारायला लागणार…’ सुंदरने विषयाला पुन्हा हात घातला.
‘सध्या महाराष्ट्राचे वन खाते प्रचंड जागरूक झाले आहे आणि छत्तीसगडमध्ये नक्षलींविरोधात लष्करी कारवाई सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांत काही हालचाल करणे अशक्य आहे. त्यातच आता जागोजागी जंगलात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरेही आपल्या अडचणी वाढवणारे ठरत आहेत,’ भैरवने अडचणींचा पाढा वाचून दाखवला.
‘भैरव अगदी वीरप्पनची दहशत असतानाही आपण तिथली कामगिरी फत्ते करून आलो होतो. आपल्यासाठी शिकार हा काही नवा खेळ नाही. तो आपला व्यवसाय बनला आहे. जी काळजी तुला वाटते आहे, ती मलाही वाटली होती. ही कामगिरी स्वीकारण्यापूर्वी, मी खूप विचार केला, माहिती गोळा केली आणि माझी खात्री पटली, तेव्हाच मी होकार दिला. अर्थात यावेळी कामासाठी अवधी खूप कमी आहे हे मान्य, पण पैसेही दुपटीने मिळणार आहेत,’ पैसे दुपटीने मिळणार आहेत हे वाक्य इतर तिघांच्याही जिवाला सुखावून गेले.
‘तू काय ठरवले आहेस?’ मदनने आता उत्साहाने चर्चेत सहभाग घेतला.
‘आपल्याकडे एक तर कर्नाटकचा पर्याय आहे, पण सध्या तिथे महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन्ही वनखात्याचे मिळून कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. त्यामुळे तिथे शिरणे म्हणजे मूर्खपणा आहे. अशा वेळी मला हिमाचलमधल्या ‘पालाहार’ जंगलाची माहिती मिळाली आहे. या जंगलापर्यंत पोहोचणे थोडे कठीण आहे, कारण त्याच्या आजूबाजूला फारशी वस्ती नाही. या परिसराबद्दल काही भाकडकथा पसरलेल्या असल्याने, स्थानिक लोकही इथे फिरकत नाहीत आणि फारसा धोका नसल्याने इथल्या वन खात्याचेही जंगलाकडे तसे दुर्लक्षच आहे.’
‘तू बांग भागातल्या पालाहार जंगलाबद्दल बोलतो आहेस का?’ गंभीरपणे भैरवने विचारले आणि त्याच्या स्वरातील भीतीने इतरांनाही आश्चर्य वाटले.
‘काय झाले भैरव? आपण काय पहिल्यांदा जंगलात जात नाही आहोत. या आधी तुला कधी इतके घाबरलेले मी पाहिले नव्हते,’ रंगा काळजीच्या स्वरात म्हणाला.
‘रंगा, त्या जंगलाबद्दल मी खूप पूर्वी ऐकलेले आहे आणि जे ऐकले आहे ते ऐकल्यानंतर मी या जंगलाचे नाव कायमचे डोक्यातून पुसून टाकले होते. मी फक्त इतकेच सांगेन की, पार इंग्रजांच्या काळापासून ते आजपर्यंत जो कोणी वाईट विचाराने त्या जंगलात शिरला तो परत आला नाही,’ भैरवचा थंडगार स्वर सगळ्यांचे काळीज चिरत गेला.
‘भैरव, अरे मी तुला बोललो होतो ना, त्या जंगलाबद्दल अनेक गैरसमज पसरलेले आहेत. उलट त्यामुळे आपले काम अधिक सोपे झाले आहे.’
‘पण असे नक्की आहे तरी काय त्या जंगलात?’ सुंदरने आश्चर्याने विचारले.
‘सांगून टाक एकदा भैरव. तुझ्यासारखा वाघ देखील त्या जंगलाला का घाबरतो हे तरी कळू दे,’ थोड्याशा चेष्टेच्या सुरात रंगा बोलला.
भैरवने एका दमात समोरचा ग्लास रिकामा केला आणि दुसरा ग्लास दुप्पट भरत त्याचे डोळे कुठेतरी भूतकाळाचा वेध घ्यायला लागले.
‘मी तेव्हा बारा पंधरा वर्षाचा असेन. जंगलात फिरायला आलेल्या, चोरून शिकारीला आलेल्या लोकांना सोबत करणे आणि मदत करणे अशी कामे आम्ही वस्तीवरची पोरे करायचो. जंगलाचा चप्पा चप्पा आम्हाला ठाऊक होता. असाच एकदा शिकार्यांचा एक कळप तीन दिवस मुक्कामी होता. त्यांच्याबरोबर भोला नावाचा एक हरकाम्या होता. होता हरकाम्या पण जंगल वाचण्यात त्याचा हात धरणे कठीण. जंगलातले प्रत्येक झाड, प्राणी, पक्षी, त्यांचे आवाज, आवाजाचे अर्थ अचूक ओळखायचा. आमचा तर तो हीरोच झाला होता.’
‘तो त्या पालाहारला जाऊन आला होता?’ मदनने मध्ये तोंड घातले आणि इतर दोघांनी त्याला डोळ्यांनी दटावले. भैरवची थांबलेली गाडी पुन्हा चालू झाली.
‘हा भोला रात्री पाळतीवर असलो की आम्हाला वेगवेगळ्या जंगलातले अनुभव सांगायचा. एकदा त्याने त्याच्या आजोबांनी त्याला सांगितलेला एक अनुभव आम्हाला सांगितला. तो इतका धारदार मनावर कोरला गेला की, आजही स्पष्ट आठवतो आहे. भोलाचे आजोबा तेव्हा कर्नल रॉबर्ट नावाच्या ब्रिटिश अधिकार्याकडे हिमाचलमध्ये नोकरीला होते. या आधिकार्याला शिकारीचा जबरदस्त शौक. आसपासचे बरेच मोठे प्राणी त्याने संपवून टाकले होते. अशातच एक दिवस खेमनाच्या जंगलात, जे पालाहारचे पूर्वीचे नाव होते, एक वाघ दिसल्याची बातमी त्याला मिळाली. रॉबर्ट हत्तीवर, जुन्या काळच्या जीपमध्ये त्याचे मित्र डायर आणि तिथला संस्थानिक असे उत्साहाने बाहेर पडले. बरोबर भोलाचे आजोबा होतेच. जंगलात काहीसे आत शिरल्यावर एका गुहेसारख्या बोगद्याजवळ त्यांना वाघाचे दर्शन झाले. उत्साहाने फसफसलेल्या रॉबर्टने लगेच बार टाकला, मात्र नेम हुकला आणि वाघ पळाला. मात्र काही दूर जाताच तो पुन्हा दबकत त्या गुहेकडे यायला लागला आणि सर्वांना आश्चर्य वाटले. मात्र त्याचवेळी गुहेतून दोन पिल्ले अडखळत बाहेर आली आणि ती मादी असल्याचे उघड झाले. अंगात वारे शिरलेल्या रॉबर्टने पुन्हा बार टाकला, तो मात्र अचूक निशाण्यावर बसला. इतकी गंभीर जखम होऊनही पिलांच्या रक्षणासाठी ती वाघीण हत्तीकडे झेपावली. रॉबर्टच्या जोडीला आता डायर आणि संस्थानिकानेही आपापले बार उडवायला सुरूवात केली. वाघीण तर मारली गेली पण मरण्यापूर्वी तिला दुर्दैवाने आपल्या बछड्यांना रक्तात नाहलेले पाहावे लागले…’ भैरवच्या गोष्टीने आता सगळ्यांनाच गुंगवून टाकले होते. त्यामुळे तो बोलता बोलता थांबला तसे सगळेच खट्टू झाले.
‘पुढे काय झाले?’ सुंदरने उत्सुकतेने विचारले.
पुढच्या एका आठवड्यात आधी रॉबर्ट, मग संस्थानिक आणि सगळ्यात शेवटी डायर मेला. तिघांचाही मृत्यू हिंस्र प्राण्याने केलेल्या हल्ल्यात झाला होता. शरीराचे अक्षरश: लचके तोडण्यात आले होते. पण नक्की कोणत्या प्राण्याने आणि कसा हल्ला केला हेच कोणाला शेवटपर्यंत समजले नाही. त्या संस्थानिकाचा मृतदेह तर त्याच हवेलीच्या बंद खोलीत मिळाला. मात्र भोलाच्या आजोबांनी आणि हवेलीतल्या काही लोकांनी एका वाघाला रात्री त्या परिसरात फिरताना पाहिल्याचे नंतरच्या चौकशीत उघड केले होते. तो वाघ म्हणजे ती वाघीण होती असा भोलाच्या आजोबांचा ठाम विश्वास होता!’ भैरवने आपले वाक्य संपवले आणि डोळे बंद करत मान खुर्चीवर मागे टेकवली.
‘म्हणजे त्या वाघिणीचे भूत झाले? पण भुतं तर फक्त माणसात होतात ना?’ रंगा उत्सुकतेने म्हणाला.
‘काय घडले, कसे घडले ते नक्की कोणालाच माहिती नाही. पण त्यानंतर त्या जंगलात शिकारीला शिरलेला कोणीही परतला नाही. आजूबाजूचे जंगली लोकही त्या अरण्याच्या सीमा सोडून लांब गेले. आजही त्यांच्या पिढीतले तिकडे कोणी फारसे फिरकत नाही. एखादा धाडस दाखवतो, पण परत येत नाही. त्या संपूर्ण परिसराचे आणि तिथल्या प्राण्यांचे रक्षण ती वाघीण आजही करते आहे, असा तिथल्या लोकांचा ठाम विश्वास आहे. म्हणून त्या जंगलाचे नाव पालाहार पडले आहे. पालाहार हा पालनहारा शब्दाचा झालेला अपभ्रंश आहे. पालनहारा म्हणजे पहाडी भाषेत पालन करणारा, रक्षण करणारा.’
भैरवच्या कथेने काही काळ सगळे सुन्न झाले खरे, पण शेवटी पैशाचा मोह माणसाकडून काय करून घेत नाही? धाडस बांधून सगळे पुन्हा मोहिमेसाठी सज्ज झाले. मात्र भैरवने जंगलात शिरण्यास ठाम नकार दिला. तो जंगलापासूनच्या सर्वात जवळच्या वस्तीत थांबेल आणि त्यांची वाट बघेल असे ठरले. याबद्दल भैरव त्याचा वाटा देखील कमी करायला तयार झाला, तेव्हा तिघांना आश्चर्य वाटले आणि कुठेतरी मनाच्या कोपर्यात भीती पुन्हा दाटून आली.
कधी रेल्वे, कधी स्थानिक बस असा प्रवास करत, आपली शस्त्रे, हत्यारे लपवत कोणाला संशय येऊन न देता ‘कुमांघाटी’पर्यंत पोहोचायला त्यांना दोन दिवस लागले. तिथल्या जवळच्या वस्तीत त्यांनी आपला तळ ठोकला. इथल्या झाडांचा आणि वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी आपण आलो असल्याचे त्यांनी मोडक्या तोडक्या हिंदी आणि पहाडी भाषेत त्यांना समजावले आणि आपला मार्ग आणखी सुकर करून घेतला. अर्थात फार पुढे जंगलाच्या दिशेने न जाण्याचा त्या वस्तीवरील वृद्धांचा सल्ला त्यांनी मान डोलवत ऐकला, तरी कधी जंगलात शिरतोय आणि परत फिरतोय असेच तिघांनाही वाटत होते.
संध्याकाळ गडद व्हायला लागली आणि एकेक करत तिघांनी हळूच जंगलाची वाट धरली. कुठे एकत्र यायचे हे त्यांनी दुपारीच ठरवून ठेवलेले असल्याने एका तासात तिघेही खुणेच्या झाडाजवळ पोहोचले. अरण्ये आणि जंगले तुडवायची सवय असली तरी हे जंगल नेहमीपेक्षा खूप विचित्र वाटत होते. अक्राळविक्राळ विचित्र आकाराची झाडे उगाचच मनात संभ्रम निर्माण करत होती. सर्वात महत्त्वाचे जंगलात पसरलेली एक विचित्र शांतता. त्यांना जंगलात शिरून आता वीस मिाfनटे होत आली होती, मात्र एकाही पक्षाचा, प्राण्याचा आवाज देखील कानावर पडला नव्हता, का त्यांचे दर्शन झाले होते. जणू काही त्यांची चाहूल लागल्यासारखे सारे जंगल दबा धरून बसले होते.
इतक्यात एका झाडाच्या बुंध्याशी सुंदरला माकडासारखा छोटा प्राणी झाडावर चढताना दिसला. क्षणाचाही वेळ न घालवता सुंदरने चाप ओढला आणि सायलेन्सर असूनही गोळीचा आवाज जंगलात बर्यापैकी घुमला. तो प्राणी अत्यंत चपळपणे झाडावर पळाला. तिघेही झाडाकडे धावले. आपला नेम चुकल्याचा धक्का सुंदरला सहन होत नव्हता. त्याने घाईघाईने झाडाच्या बुंध्यावर प्रकाश फेकला. मात्र कुठेही गोळी घुसल्याचे निशाण नव्हते. गोळी चुकली म्हणावे तर इतका मोठा बुंधा सोडून कुठे जाणे अशक्य, गोळी लागली म्हणावे तर ते काही माकडासारखे होते, ते कुठलीही वेदना न दाखवता, किंचाळी न फोडता पळाले होते.
घडलेली घटना उगाचच त्यांची धास्ती वाढवून गेली. मनाच्या तळकोपर्यातली भीती डोके वर काढू लागली आणि भर अरण्यात बंदूक धरलेल्या हातांना घाम येऊ लागला होता. त्याचवेळी जवळून सळसळ असा आवाज झाला आणि एक हिरवाजर्द जाड साप वळवळताना दिसला. चंद्राच्या प्रकाशात त्याची कांती एखाद्या काचेप्रमाणे चमकत होती. असा साप त्यांनी यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. रंगाने घाईघाईने त्याच्या अंगावर आपला बूट दाबला आणि तिघांचेही चेहरे भयाने विस्फारले गेले. रंगाचा पाय त्या सापाच्या शरीरातून आरपार गेला होता आणि साप मात्र काही न झाल्यासारखा वळवळत पुढे निघून गेला होता.
आता मात्र तिघांनी हाय खाल्ली. पैशाच्या मोहात आपण काय चूक करून बसलो आहोत याची त्यांना जाणीव झाली आणि एकही शब्द न उच्चारता थरथरत्या पावलांनी तिघांनी परतीच्या वाटेकडे पळायला सुरूवात केली. दिशा कोणती आहे याचेही भान उरले नव्हते. जीव वाचवणे हेच या क्षणी सर्वात महत्त्वाचे होते. मात्र उशीर झाला होता. एका झाडाच्या बुंध्यामागून त्यांचा वेध घेत असलेली ‘ती’ आता शिकारीसाठी सज्ज झाली होती. एकदा शरीराची कमान करत ‘ती’ आळसावली आणि दुसर्या क्षणी तिची दमदार पावले त्यांच्या मागे धावण्यासाठी सज्ज झाली.