काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेत आदर्श घोटाळ्याचे ‘डीलर’ अशोक चव्हाण हे नुकतेच हातात कमळ घेऊन भाजपवासी झाले आहेत. त्यांना आता लीडर म्हणून सोबत घेण्याची वेळ राज्यातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे नेते आणि (तरीही) उपमुख्यमंत्रीच राहिलेल्या फडणवीस यांच्यावर आली आहे. हे डील थोडे आधी झाले असते तर कदाचित राज्याला आणखी एक उपमुख्यमंत्री लाभला असता आणि महाशक्तीची ही भ्रष्ट महाबिघाडी पाहून मराठी जनतेचे डोळे निवले असते.
तिकडे मध्य प्रदेशात नको त्या गुर्मीत राहून राज्य भारतीय जनता पक्षाला बहाल करणारे काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनीही आता ‘कमलदास’ होणं पत्करल्याची चर्चा आहे. बिहारचे पलटूराम आधीच भाजपच्या गळाला लागले आहेत. पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष यांनी एकला चालो रे असा नारा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची आणि इंडिया आघाडीची दैना उडाली आहे, अशी समजूत भाजपच्या समर्थकांनी करून घेतली आहे. त्यात आश्चर्य नाही. पण, अनेक तटस्थ पत्रकारांनाही घाम फुटला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता लोकसभा निवडणुकीची अर्धी लढाई जिंकलीच आहे, असा साक्षात्कार त्यांना झाला आहे, हे मनोरम आहे.
खुद्द मोदी यांनी तर, आपणच पुन्हा पंतप्रधान बनणार आहोत, याबद्दल सगळ्या जगालाच खात्री आहे; म्हणून आपल्याला अनेक देशांनी ऑगस्टनंतर देशाचे पंतप्रधान म्हणून निमंत्रण दिलं आहे, अशा दर्पोक्ती केल्या आहेत. त्यांच्या जागी लोकशाहीची, निवडणूक प्रक्रियेची बूज असलेला कोणी प्रगल्भ नेता असता, तर निवडणूक होण्याच्या आधीच असा राजनैतिक अगोचरपणा करणार्या देशांचे कान उपटले असते. अर्थात, अमेरिकेत जाऊन तिथे ट्रम्प यांच्या प्रचारसभेत ‘अगली बार ट्रम्प सरकार’ अशी अपरिपक्व घोषणा देणार्या मोदींकडून ही अपेक्षा अवाजवीच आहे म्हणा! आपल्याला सगळ्या जगाने नेता म्हणून स्वीकारलं आहे आणि आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत, अशा दोन दिवास्वप्नांमध्ये ते गुंग झालेले आहेत. आता तुम्ही या विश्वनेत्याला मत देणं ही फक्त औपचारिकताच आहे, अशी मतदारांची समजूत करून देण्यापलीकडे या दर्पोक्तीला काहीही अर्थ नाही. मोदी यांनी ‘मीच पुन्हा येईन’, ‘मीच पुन्हा येईन’ अशा कितीही वल्गना केल्या, तरी जमिनीवरचे वास्तव त्यांच्या पक्षाचे इतर नेते जाणून आहेत. एनडीएचे सगळे सहकारी सोबत घेऊन आणि मंदिर पूर्ण होण्याच्या आधीच रामलल्लाची प्रतिष्ठापना करूनही भाजपला सत्ता मिळण्याची शाश्वती नाही.
ती असती तर चारशे पार नावाचे कागदी कमळ फुलवायला मूळ भाजपचा चिखल कमी होता का? मूळच्या चिखलाला ओलावा पुन्हा कमळ फुलवण्यासाठी कमी पडणार आहे म्हणून इतर ठिकाणचा चिखल ओढून आणून देशातल्या राजकारणाची दलदल करण्याचा चंग भाजपने बांधला आहे. देशात इतका सत्तालोलूप पक्ष दुसरा झाला नसेल! सत्ता गेली की अनेक घोटाळे उघड होतील, अनेक नेते तुरुंगात जातील, अनेक मित्रांची दुकानं बंद होतील, म्हणून सुरू असलेली ही अंतिम वळवळ आहे. लोकसभेच्या एकेका जागेसाठी एवढी प्रचंड ताकद लावण्याची वेळ या जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षावर का आली असेल?
सर्व प्रसारमाध्यमांनी तयार केलेली मोदींची महानेता अशी इमेज खरी असेल, तर मुळात त्यांना स्वत:च्या योजनांच्या जाहिराती करण्याचीही वेळ येता कामा नये. शिवाय इथल्या वर्तमानपत्रांपासून खलीज टाइम्सपर्यंत सर्वत्र पानोपानी आपलीच छबी झळकवण्याचीही गरज भासता कामा नये. प्रत्येक जाहिरातीत त्यांनी केलेले दावे काय असतात आणि वस्तुस्थिती काय असते, याचा शोध सरकारी जाहिरातींनी मिंधी झालेली पत्रकारिता काय घेणार? उज्वला योजना असो किंवा तथाकथित घरबांधणी असो, तोंडाला येतील ते मोठमोठे आकडे फेकायचे, हे भाजपचं धोरण आहे. जागतिक पातळीवर देशाची प्रगती मोजण्याचे मापदंड असतात. त्या सगळ्या निर्देशांकांमध्ये आपण आपल्या मागासलेल्या शेजार्यांपेक्षाही मागे पडतो आहोत आणि आप्रिâकेतल्या देशांच्या पंक्तीत बसतो आहोत, ही वस्तुस्थिती कशी झाकणार?
निवडणुकीच्या मैदानातली मोदी आणि भाजप यांची सर्वोत्तम कामगिरी २०१९मध्येच होऊन गेली आहे. आता तिच्यात फक्त मोदींच्या बळावर नव्याने भर घालणं अशक्य आहे, याची जाणीव भाजपच्या निवडणूक संचालन करणार्या मंडळींना आहे. ही निवडणूक अवघड नसती, तर देशात राम लल्ला इतक्या लवकर अवतरले नसते. पण, तेही हात देणार नाहीत, हे भाजपच्याच अंतर्गत सर्वेक्षणांतून स्पष्ट होतं.
त्यामुळेच तर आता लोकसभेच्या हमखास हरणार्या एकेका जागेसाठी विरोधी पक्षातला एकेक नेता गळाला लावण्याची केविलवाणी धडपड सुरू आहे. यातल्या प्रत्येक नेत्यावर भाजपनेच घोटाळ्याची राळ उडवलेली आहे. मोदींनी ज्यांना भ्रष्ट म्हटलं, त्या प्रत्येकाने या देशाचं काहीतरी नुकसान केलं आहे, देशातल्या जनतेच्या पैशांची लूट केली आहे, असं मानलं पाहिजे. मग या लुटारूंना सोबत घेऊन मोदी कोणते रामराज्य आणायला निघाले आहेत?
इतके ढोंग तर कधी रावणानेही केले नसेल.