त्या दिवशी माझा मानलेला परममित्र पोक्या माझ्याकडे एका जपानी वृत्तपत्राचं कात्रण घेऊन आला. ‘असाही शिम्बून’ या जपानी वृत्तपत्रातील एका लेखाचं कात्रण होतं. आता तुम्हाला म्हणून सांगतो आम्हाला जपानी भाषेसहीत जगातील अकरा भाषा येतात. हे भाजपवाल्यांना ठाऊक असल्यामुळेच त्यांनी आम्हा दोघांना त्यांच्या खास गोटात घेतलं, तेही केंद्रीय पातळीवर. मात्र आम्ही दाढीवाल्यांसारखे उठसूठ दिल्लीला सल्ले विचारण्यासाठी जात नाही. तर मुंबईतून केंद्रीय पातळीवरून गुप्त यंत्रणेद्वारे महत्त्वाचे सल्ले देत असतो. तर त्या जपानी पेपरात योगायोगाने गेल्याच आठवड्यात जगातील भिकार्यांवर एका विद्वान श्रीमंताने लिहिलेल्या प्रबंधाचा गोषवारा छापून आला होता. त्यात ‘भिकारी’ या विषयाचा सर्वांगीण चिकित्सक अभ्यास केला होता आणि जगप्रसिद्ध दाखले दिले होते. रस्त्यावर भीक मागणार्या भिकार्यांपासून मतांची भीक मागणार्या नेत्यांपर्यंत भीकेचे आणि भीक मागणार्यांचे प्रकारही दिले होते. भीक फक्त पैशांची नसते, अन्नाची नसते, तर इतरही अनेक गोष्टींची असते हे त्यांनी सोदाहरण पटवून दिलं होतं. कोणी दयेची भीक मागतो तर कोणी मायेची भीक मागतो. माधुकरी मागत दारोदार फिरणार्या याचकाला भिकारी म्हणता येत नाही, तसेच उत्सवाची वर्गणी मागण्यासाठी दारावर येणार्यांनाही कोणी भिकारी म्हणत नाही. चांगल्या कामासाठी लोकवर्गणी गोळा करणार्यांची भिकारी म्हणून संभावना करता येत नाही. परंतु महाराष्ट्रातील एका मंत्र्याने ती केली, हे सर्वांना ठाऊक आहे. तोंड फाटके असले तरी यांची तोंडपाटीलकी गटारगंगेसारखी धो धो वाहात असते. ही बातमी जपानमध्येच नव्हे तर इतर देशातही पोहोचली… आणि जगभरातून या बोलण्याचा तीव्र निषेध झाला. जपानी वृत्तपत्राने त्याची सर्वप्रथम दखल घेतली आणि त्याचाच अनुवाद करून जगातील बारा प्रमुख देशांना मी आणि पोक्या पाठवणार आहोत. त्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय पातळीवर या तोंडपाटीलकीची चर्चाही घडेल आणि मराठी भाषेतही शब्दांचा अर्थ समजून न घेता बोलणारे अर्थशून्य मंत्री आहेत, हेही जगाला समजेल.
आता तुम्ही कितीही कोंबडं झाका म्हटलं तरी दर पहाटेला कोंबडं आवाज देणारच. म्हणूनच बोलतानाच शब्द तोलून मापून वापरावा आणि थोर पुरुषांच्या बाबतीत तर फारच सावधानतेने काळजीपूर्वक बोलावं याची साधी अक्कल ज्यांना नाही त्यांना मंत्रीपदावर राहण्याचाही अधिकार नाही. आम्ही या भाजपवाल्यांची एक सवय पाहिली की ‘आपलं ठेवावं झाकून आणि दुसर्याचं पहावं वाकून’. नको तिथे कारण नसताना हे लोक तोंड खुपसत असतात. सत्तेचा माजच इतका असतो की कोणीही मंत्री बंदुकीच्या नळीतून निलंबनाच्या पैâरी एकामागून एक झाडतो तेव्हा त्याला त्याचे सहकारी जाबही विचारत नाहीत. आपले दाढीवाले तर तोंडात मिठाच्या गुळण्या घेऊनच कायमचे बसलेले असतात. एकमेकाला सांभाळून घेण्यात हे मंत्री आणि भाजप नेते इतके पटाईत आहेत की दोन ठिकाणी जबरदस्त मार खाऊनही अजून गुजरातचा डंका वाचवत नाचत आहेत. उद्या मोदींनी यांना पक्षासाठी ‘भीक मागो आंदोलन’ सुरू करा सांगितलं तर तेही करायला हे मागेपुढे पाहणार नाहीत. कदाचित भाजपतर्पेâ ‘भिकार्यांचं महासंमेलन’ आयोजित करा असा आदेश दिला तर तेही करतील. कारण मुंबईत श्रीमंत भिकार्यांची अजिबात कमतरता नाही. काहींचे तर आलिशान फ्लॅट्स आहेत. मोटारी आहेत. भरपूर गुंतवणूक आहे. पैसा कमवायचा असेल तर भिकारी व्हा, असा संदेश या संमेलनाचे प्रमुख पाहुणे आपल्या खास कोल्हापुरी शैलीत देतीलच. आम्ही देशातील मोठमोठ्या मालमत्ता, वित्तीय संस्था विकून त्याच मार्गाने अधोगतीच्या विकासाची वाटचाल करत आहोत, असा पंतप्रधानांकडून आलेला संदेश ते वाचून दाखवतील आणि त्याचा अर्थ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उलगडून सांगितल्यावर त्या आपल्या खास शैलीत ‘भिकारी’ या विषयावर बोधप्रद व्याख्यान देतील. एकूणच भिकार्यांना यापुढे ‘अच्छे दिन’ येण्याची चिन्हे आहेत.
या विषयावर माझी आणि पोक्याची द्विपक्षीय पद्धतीची म्हणजे दोन मैत्रेय पद्धतीची बैठक अगदी साग्रसंगीत झाली. त्यामध्ये पाटीलबुवांचे समर्थन करणार्या इतर भाजप नेत्यांनाही समाविष्ट करून घ्यावं असं ठरलं. म्हणजे बैठकीचा पाया अगदी मजबूत आणि विस्तारक्षम रचला जाईल हा चांगला हेतू त्यामागे होता. पाटीलबुवांनी ते प्रकरण आता गुंडाळून ठेवा, अशी सारवासारवीची भाषा केली असली तरी आम्हाला ती मान्य नव्हती. मात्र ही बैठक गोहाटीला अगदी गुप्त जागी आयोजित करण्याचं ठरलं. त्याप्रमाणे आम्ही सुरत-गुजरातमार्गे गोहाटीला एका नव्या आलिशान बंगल्यात भुयारी मार्गे गेलो. तिथे मोटारी, बोटी, विमाने, हातगाड्याही जाऊ शकतात. सगळे महत्त्वाचे भाजपनेते आले होते. अर्थात राज्यपाल कोश्यारी यांच्याशिवाय त्यांचं पानच हलणार नव्हतं. त्यामुळे त्यांनी शेंगदाणे खात ‘गरीबी’ या विषयावर बीजभाषण केलं. प्रत्येकाच्या भाषणाचा थोडक्यात सारांश पुढे देत आहे.
राज्यपाल : मैं क्या बोलू क्या बोलू रे. पाटीलजी का कुछ चुक्या है ऐसा मुझे लगता नहीं. भीख मांगना कोई पाप नहीं है. हम दुसरे देशों से मदद मांगते हैं उसे भीख ही कहना चाहिए. भीख मांगना हमारा जन्मसिद्ध हक्क है. मैंने कभी किसी चीज की भीख नहीं मांगी, लेकिन मुझे पदों का तोहफा मिल गया. उसे मैंने लाचारी से नहीं, स्वाभिमान से मेरे जाकिट में लिया. मैं पाटीलजी का समर्थन करता हूं.
मुख्यमंत्री : जय मोदीजी, जय शहाजी, जय फडणवीस, पाटीलजी साब बरोबर बोलले की चुकीचे बोलले याचा निर्णय मी घेणं बरोबर ठरणार नाही. तो फडणवीस साहेब घेतील. माझ्या मुखीचे शब्द तेच बोलतात. त्यामुळे ते जे बोलतील त्याला माझं अनुमोदन असेल.
उपमुख्यमंत्री : दाढीवाले बोलले ते अगदीच चुकीचं नाही. त्यांनी कोणत्याही प्रकरणात तोंडावर शेकेल किंवा दाढीवर शेकेल असे वादग्रस्त वक्तव्य करू नये याची काळजी मी जातीने घेतो. त्यामुळे माझ्या मुखानेच ते बोलतात. पाटीलबुवांच्या त्या वक्तव्याचे मी समर्थन करावे वा त्याला विरोध करावा इतका मोठा मी नाही. ते ज्येष्ठ आहेत. भीक हा मोठा गहन विषय आहे. कोण त्याच्याकडे कसा पाहतो या दृष्टीवर सारं अवलंबून असतं. ऐतिहासिक सत्याचा अपलाप होणार नाही याची काळजी मात्र सर्वच नेत्यांनी घेण्याची जरुरी आहे. मी नेहमीच गोलमाल पद्धतीने बोलतो असं म्हटलं जात असलं तरी ते सत्य नाही. शेवटी खरं ते खरं असतं आणि खोटं ते खोटं असतं. भीक हा एक शब्द आहे. त्याचा वापर कुठे, कधी, कसा करावा हे ज्याच्या त्याच्या बुद्धीवर अवलंबून असतं. माझ्या पाटीलजींना शुभेच्छा. त्यांच्या शर्टावरचे शाईचे डाग एव्हाने धुवून निघून गेले असतील. नसतील तर त्यांनी भाजपच्या कोणत्याही नेत्याची पापे धुण्याच्या मशीनमध्ये धुण्यासाठी पाठवून द्यावे. एकदम चकाचक. धन्यवाद.
तिरकीट सोमय्या : पाटीलजी धन्यवाद. मीसुद्धा भ्रष्टाचाराच्या पुराव्यांची भीक मागत फिरतो. त्यात वाईट काहीच नाही. चांगल्या कामासाठी म्हणजे निवडणूक फंडासाठी आपण नको त्या माणसांकडे भीक मागतोच ना. आता तो विषयच संपलाय. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. भीक मागणे वाईट नाही याचा प्रचार करण्यासाठी मी तुमच्याबरोबर असेन. जय फाफडा.
घनघंटीवार : ते जे बोलले ते बोल्ले. गरीबों की सुनो, वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे, वो दस लाख देगा. एवढंच सध्या पुरे.
केसरकर : भीक हा मोठा गहन विषय आहे. ती जागतिक समस्या आहे. तिला इतिहास आहे तसाच वर्तमान आणि भविष्यकाळ आहे. ज्यांना भिकेची ओढ असते त्यांना भिकेचे डोहाळे लागतात. मात्र पाटीलसाहेब त्याला अपवाद आहेत. त्यांनी भिकेवरील माझ्याकडील वाड्:मय वाचण्यासाठी न्यावे. खूप उपयुक्त आहे.
तानाजी सावंत : भीक हा माझ्याही संशोधनाचा विषय आहे. भिकार्यांसाठी स्वतंत्र खात्याचा मंत्री नेमावा व त्यांच्या समस्या सोडवाव्या ही माझी मागणी आहे.
नारायण राणे : पगडी सलामत तो कोंबड्या हजार. भीक मागण्याची गरज नाय.
नंतर अनेकांची भाषणे झाली. सर्वांनी कोंबड्यांवर ताव मारला आणि बेगर कॉन्फरन्स संपली.