महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सतत टोमणे मारत असतात, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी करत असतात. उद्धव यांनी केलेली टिप्पणी मर्मभेद करते, असाच त्याचा अर्थ. मात्र, फडणवीस स्वत: संधी मिळेल तेव्हा हिणकस टोमणेबाजी करतात, हे नुकतेच दिसून आले. भाज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ मंत्र्यांपासून खोगीरभरती करून घेतलेल्या फुटकळांपर्यंत कोणीही महाराष्ट्राच्या मानबिंदूंचा सतत अवमान करत आहेत. त्याविरोधात महाविकास आघाडीने मुंबईत विराट महामोर्चा काढला. त्याला फडणवीस यांनी कुत्सितपणे नॅनो मोर्चा असे संबोधले. या महामोर्चाला अपशकुन करण्यासाठी भाजपने कांगावखोर ‘माफी मांगो आंदोलन’ केले होते, त्याचे काय झाले, ते फडणवीस यांना दिसले नसावे; कारण ते आंदोलनच अतिसूक्ष्म स्वरूपाचे होते. त्याने त्यांचे हसेच झाले.
भाजपचेच लोक या पक्षाचे राज्य पातळीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत सर्वत्र हसे करत आहेत. फ्रॅक्चर्ड फ्रीडम या कोबाद गांधी यांच्या पुस्तकाच्या अनुवादाला दिलेल्या राज्य पुरस्कारावरून या पक्षाने हमखास तोंडावर पडण्याचा प्रयोग पुन्हा एकदा रंगवला. कोबाद गांधी यांचे पुस्तक नक्षलवादाला प्रोत्साहन देणारे आहे, असा शोध या सरकारने पुरस्कार दिल्यावर लावला. वास्तविक, राज्य सरकारने दिलेला पुरस्कार या पुस्तकाच्या अनुवादासाठी (म्हणजे अनुवादाच्या कौशल्यासाठी) दिलेला होता, त्याचा पुस्तकाच्या आशयाशी थेट काहीच संबंध नाही. मूळ इंग्लिश पुस्तकावर महाराष्ट्रात बंदीही नाही. अशा वेळी हा पुरस्कार मागे घेऊन सरकारने काय साधले?
कोबाद गांधी यांचे पुस्तक खरोखरच नक्षलवादाचे समर्थन करणारे असेल, घातक असेल, तर मूळ पुस्तकावरच बंदी यायला हवी होती. ती घातली गेली नाही. मग ते पुस्तक मराठीत अनुवादित झाल्याने काय आभाळ कोसळणार होते? मूळ इंग्लिश पुस्तकाचे वाचक प्रगल्भ आणि परिपक्व असतील, त्यांना या पुस्तकातील अपप्रचार लक्षात येईल; मात्र, मराठी वाचकांमध्ये तेवढी बुद्धी आणि परिपक्वता नाही, ते त्या अपप्रचाराला बळी पडतील, अशी सरकारची समजूत आहे का? सरकारच्या विरोधात मत मांडेल तो विरोधक नव्हे तर देशद्रोहीच, या भाजपने राष्ट्रीय पातळीपासून अवलंबलेल्या लोकशाहीविरोधी धोरणातून हा गोंधळ उद्भवला आहे. सत्तेविरोधात सशस्त्र कारवाया करणारा, पोलिसांचे, आदिवासींचे बळी घेणारा, त्यांचे शोषण करणारा नक्षलवाद समर्थनीय नाहीच; पण, आदिवासींचे प्रश्न, वनांवरचा त्यांचा अधिकार, यांच्याविषयी आणि विकासाच्या नावाखाली सरकारने बड्या कंपन्यांना जंगललुटीसाठी दिलेल्या मुक्त परवान्यांचा विरोध करणार्या प्रत्येकाला नक्षलवादी, नक्षलवाद समर्थक किंवा शहरी नक्षलवादी ठरवणे, हेही असमर्थनीय घृणास्पद आहे. आदिवासींना वनवासी संबोधून त्यांचे ‘कल्याण’ करू पाहणार्या (म्हणजे ते कोणी मागास समुदाय आहेत, असे परस्पर मानून त्यांना आपण ‘मुख्य प्रवाहा’त आणत आहोत, अशा पैतृक पद्धतीने बहुसंख्याक संस्कृती त्यांच्यावर लादणार्या) विचारधारेकडून वेगळी अपेक्षा व्यर्थच आहे म्हणा.
तरीही वादाकरता हे पुस्तक घातक आहे आणि ते वाचकांपर्यंत पोहोचता कामा नये, असे या सरकारला खरोखरच वाटत असते तर त्यांनी या पुस्तकाच्या अनुवादाला दिल्या गेलेल्या पुरस्काराबद्दल कसलीच वाच्यता केली नसती. राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला, आता हे पुस्तक वाचलेच पाहिजे, असे कोणत्याही पुस्तकाच्या बाबतीत व्हायला हे काही बुकर पुरस्कार नाहीत. चाळीस-पन्नास पुस्तकांच्या यादीत एक पुस्तक असेच धकून गेले असते, विषय संपला असता. पण, या सरकारच्या अतिउत्साही नॅनो बुद्धिवंतांना पुरस्कार मागे घेण्याची उबळ आली. मग समाजात, समाजमाध्यमांत घमासान चर्चा सुरू झाली. अनेकांनी पुरस्कार परत केले. काहींनी सरकारी मंडळांचे राजीनामे दिले. या पुस्तकात असे आहे तरी काय, अशी उत्सुकता निर्माण झाली आणि जी आवृत्ती संपायला एरवी काही वर्षे लागली असती, ती आवृत्ती ऑनलाइन बुकिंगमध्येच संपली. पुस्तक वाचणार्यांनी, या पुस्तकात बंदी घालण्यासारखे काहीच नाही, उलट नक्षलवादाचा, हिंसेचा मार्ग चुकीचा आहे, हेच त्यात सांगितले आहे, असे स्पष्ट केल्याने सरकारची अक्कल निघाली ते वेगळेच. म्हणजे जे लोकांनी पाहू वाचू नये, असे तुम्हाला वाटत होते, ते अधिकाधिक लोकांनी पाहावे, वाचावे अशी व्यवस्था तुम्ही केलीत आणि ज्यांच्यापर्यंत हा लेखक आणि हे पुस्तक यांची नावेही गेली नसती, त्यांच्यापर्यंत तुम्ही ती पोहोचवलीत. या पुस्तकाची इतकी जाहिरात केल्याबद्दल प्रकाशक आणि लेखक यांनी या सरकारचे आभारच मानले पाहिजेत.
हाच नॅनोबुद्धीचा आविष्कार राष्ट्रीय पातळीवरही सुरू आहे. ‘पठान’ या शाहरूख खानच्या आगामी सिनेमातील ‘बेशरम रंग’ हे गाणे सांगितिकदृष्ट्या अतिशय सुमार दर्जाचे आहे. सिद्धार्थ आनंद या दिग्दर्शकाच्या ‘वॉर’ या सिनेमातील ‘घुंगरू टूट गये’ या गाण्याचे लोकेशन, त्याचे टेकिंग, नृत्य या सगळ्याची कंटाळवाणी पुनरावृत्ती या गाण्यात आहे. त्यामुळे हे गाणे एरवी शंभर टक्के फ्लॉप झाले असते. या गाण्यात काही सेकंदांकरता दीपिका पदुकोनच्या अंगावर भगव्या रंगाची बिकिनी आहे, यावरून हिंदू धर्माची बदनामी झाली म्हणून देशभर इतकी बहिष्कारी काव काव झाली की हे गाणे यूट्यूबवरचे सगळ्यात जास्त पाहिले गेलेले गाणे ठरले. शाहरूखच्या सिनेमाची फुकटात प्रसिद्धी झाली. भाजपच्या लाडक्या ‘कॅनडाकुमारा’पासून बायकांच्या अंगावर कपडे नसले की त्या अधिक सुंदर दिसतात, असे मौलिक आध्यात्मिक मार्गदर्शन करणार्या सरकारी बाबापर्यंत कोणी कोणी हा रंग कशा प्रकारे परिधान केला आहे, त्याने का बदनामी झाली नाही, तेव्हा का बहिष्काराची उबळ आली नाही, याची उजळणी यानिमित्ताने समाजमाध्यमांत झाली आणि या विद्वेषी विचारधारेचे पुन्हा एकदा हसे झाले. चीनने अरुणाचलच्या सीमेवर काय चालवले आहे, याची चर्चा होऊ नये, यासाठी हा फुटकळ वाद खेळला जात असावा, अशी शंका व्यक्त होते आहे. फ्रॅक्चर्ड मेंदू आणि नॅनो बुद्धीच्या लोकांकडून वेगळी काय अपेक्षा करणार म्हणा!