सदाशिव पेठ आणि पुणे हा कायमच टिंगलीचा आणि चर्चेचा विषय. पण एक काळ असा होता की पुण्यातील सर्व नामवंत कॉलेजच्या एवढेच काय मेडिकल किंवा इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा सदाशिव पेठेतील २५ टक्क्यांचा भरणा असे. याच सदाशिव पेठेत जन्म घेतलेला मोहन गोरे जात्याच हुशार. वडील बँकेत काम करणारे तर आई एका नामवंत शाळेत शिक्षिका. पाच वर्षांनी मोठी बहीण कॉमर्स पदवीधर होऊन वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून एका बँकेत चिकटलेली. हा सगळा काळ आहे १९८०च्या दरम्यानचा. त्यावेळी बँकेत चिकटणे हा शब्द सदाशिव पेठेत फारच कौतुकाचा होता. आयुष्याचे सारेच कल्याण झाले असे त्यात अभिप्रेत असे.
मोहन हुशार असल्यामुळे सायन्सला त्याने प्रवेश घेतला. उत्तम मार्काने बारावी संपवली आणि इंजिनिअरिंगसाठी पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये मेकॅनिकलला अॅडमिशन मिळवली. एक उल्लेख अत्यंत गरजेचा आहे. त्याचा सध्याच्या वाचकांना पत्ताच नाही म्हणून. त्यावेळेला कॉम्प्युटरमधील पदवी नव्हती व मेकॅनिकलचा पदवीधर हा सर्वोच्च समजला जायचा, तोही पुण्यातल्या एकुलत्या एक इंजिनिअरिंग कॉलेजमधून पास झालेला. खाजगी इंजीनियरिंग कॉलेज वा मेडिकल कॉलेजची सुरुवात १९८४ साली झाली. मोहनच्या आई-वडिलांना सार्थक झाल्याची भावना होती. मोहनला ‘दुनिया मेरी मुठ्ठी में’ ही भावना आली होती. उत्तम मार्काने मोहन पदवीधर झाला व त्या काळातील पद्धतीप्रमाणे टाटा मोटर्समध्ये ट्रेनी इंजिनियर म्हणून त्याची कामाला सुरुवात झाली. यथावकाश मोहनचे लग्न अशाच एका बँकेतील काम करणार्या सुंदर मुलीशी झाले.
आजच्या करियर कथेची सुरुवात आता खर्या अर्थाने होत आहे. नमनालाच घडाभर तेल म्हणतात, ते उगाच नव्हे. बँकर गोरे यांना मुलगा मोहन इंजिनियर झाल्याचे जसे कौतुक, तसेच मोहनच्या त्याच्या मुलाच्या संदर्भातील अपेक्षा अजूनच चार पावले पुढे गेलेल्या असणे अगदीच स्वाभाविक नव्हे का? पण या दरम्यान पुण्यातील सारेच वातावरण ढवळून बदलले होते. सदाशिव पेठ हळूहळू रिकामी होऊन कोथरूडमध्ये स्थलांतरित होत होती. प्रशस्त फ्लॅट, मोकळी हवा याचे आकर्षण आता पुणेकरांना सुरू झाले होते. मोहनचे कुटुंबसुद्धा कोथरूडमध्ये स्थलांतरित झाले.
मोहनचे लग्न होईतोवरच खाजगी इंजीनियरिंग मेडिकल कॉलेजांची सुरुवात झाली होती. मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणे हा पायंडा याच काळातला. आजी, आजोबा, आई-वडील हे सारे मराठी माध्यमातून शिकले असले तरी मोहनचा मुलगा ईशान हा एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये दाखल झाला. शाळा घरापासून आठ किलोमीटरवर. जाण्यासाठी शाळेची स्कूल बस. मात्र साडेसातची शाळा असली तरी ईशानला तयार होऊन साडेसहाला घर सोडायला भाग पडत असे. त्याचप्रमाणे शाळा अडीच वाजता सुटली तरी घरी यायला चार वाजत.
मराठीतील एक जुनी म्हण आहे, घोडं दमलं ओझ्यानी, शिंगरू दमलं हेलपाट्यानी. शाळा सुरू झाल्यापासून दमल्या भागल्या ईशानचे अभ्यासाकडे लक्ष कमी होऊ लागले. शिक्षिका असलेल्या मोहनच्या आईला हे सारे दिसत होते, पण मुलगा व सुनेपुढे त्यांची काही बोलण्याची प्राज्ञा नव्हती. त्या बिचार्या ईशानचा अभ्यास घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत, पण इंग्रजी माध्यमातून शिकणारा नातू, आजीला माझ्या अभ्यासातले, माझ्या पुस्तकातले काही कळत नाही, असे आईला सांगू लागला.
मुलाच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला मोहनला वेळ कधीच नव्हता. आजोबांना त्यातले काही कळत नव्हते. ईशानची कॉमर्स पदवीधर आई त्याबद्दल काहीच करू शकत नव्हती. जातिवंत शिक्षिका असलेल्या आजीला कोणी विचारत नव्हते.
इंटरनॅशनल स्कूलने सुचवलेला एक ट्युटर रोज सायंकाळी कोथरूडात ईशानच्या घरी दाखल होऊ लागला. महिना वीस हजार रुपये त्याला देणे या कुटुंबाला अजिबातच अवघड नव्हते. मुख्य म्हणजे न सुटणारा प्रश्न फक्त वीस हजारात सुटला याचाच आनंद मोहनला झाला. स्वतःचे शिक्षण, स्वतःचा अभ्यास, स्वतःचे कष्ट, मनातील जिद्द मोहनने विस्मरणात टाकली आणि मुख्य म्हणजे ईशानच्या मार्कांच्या संदर्भात एक छोटीशी पळवाट शोधली. ईशानला अभ्यास काय कळला यापेक्षा ट्युटरने घोटून घेतलेली प्रश्नोत्तरे परीक्षेत लिहून मिळणारे मार्क आता मोहनला महत्त्वाचे वाटू लागले होते.
सध्याच्या बहुसंख्य पालकांना सतावणारा एकुलता एक प्रश्न म्हणजे मुलांचे मार्क. स्वतःच्या मुलांचे मार्क सांगायला लाजणारे पालक ही कथा वाचणार्या प्रत्येकाला सहज सापडतील. अभ्यास कळला का नाही? विषय समजला का नाही? विषयाशी संबंधित अवांतर वाचन केले का? मुलांमध्ये चौकस वृत्ती बाणते आहे का? अशा मूलभूत प्रश्नांकडे अस्सल पुणेरी सदाशिव पेठी मोहनचे आता दुर्लक्ष होऊ लागले. मुलगा शिकेल कसा आणि तो इंजिनियर बनेल कसा या एकाच ध्यासाने मोहन पछाडला गेला होता.
ईशानची शाळा संपली. ट्युटरच्या मदतीने व शाळेने दिलेल्या अंतर्गत मार्कांच्या कृपेने ईशानला दहावीला ७५ टक्के मार्क मिळाले. मुलाला इंजिनियर बनवायचेच या स्वप्नांनी भारलेल्या मोहनने कॉलेज व क्लास एकत्रित असलेल्या इंटिग्रेटेड किंवा टाय-अप अशा नवीनच निघालेल्या संस्थेत ईशानचा प्रवेश नक्की केला. मुलाला एकच आनंद तो म्हणजे कॉलेज अटेंड करण्याची कटकट वाचली आणि प्रवेश कुठे मिळेल याचीही चिंता मिटली.
टाय-अप किंवा इंटिग्रेटेड कॉलेजमध्ये मुख्यत: इंजिनिअरिंगऐवजी आयआयटीसाठीची तयारी करून घेतली जाते. ही तयारी सगळ्यांना झेपणारी असते असे नाही. अत्यंत हुशार मुलांनासुद्धा अभ्यासाचे सखोल ज्ञान नसेल तर ही तयारी जमत नाही. हे वास्तव लक्षात न घेता सहसा पालक, कॉलेजची कटकट नाही, प्रवेशाची कटकट नाही, पैसे भरले की काम झाले आणि जमले तर आयआयटीचा प्रवेश कुणाला नको आहे, अशा भूमिकेत शिरतात. ईशानसारख्या मुलांची फरपट इथेच सुरू होते. शालेय अभ्यासात सुद्धा शिकवणीची गरज पडलेली मुले मानसिक दडपणाखाली यायला इथेच सुरुवात होते.
हे दडपण ईशानचे मनावर पण सुरू झाले होते. घरी कोणाला सांगायची सोय नाही आणि क्लासमध्ये बोलायची शक्यता नाही अशा अवस्थेत ईशानची बारावी संपत आली. मुलाला इंजिनियर करण्याचे स्वप्न मोहनच्या मनात अधिक अधिकच घट्ट होत होते, तर इंजिनियर बनणे आपल्याला जमेल की नाही याबद्दल ईशानचे मनात अधिकाधिक भीती वाढत होती. या सार्याचा एक दिवशी व्हायचा तो स्फोट झालाच. बारावीची परीक्षा व्यवस्थित पार पडल्यानंतर होणार्या जेईई परीक्षेला ईशान बसलाच नाही. गेली दोन वर्षे टायअप कॉलेजसाठी भरलेले चार लाख रुपये आईच्या डोळ्यासमोर दिसत होते, तर मुलाला इंजिनिअर बनवण्याचे स्वप्न भंगले याचे अतिव दुःख मोहनला झाले होते. या सार्याकडे पूर्णतः बेफिकरीने बघणारा ईशान मात्र आनंदात होता. इंजिनिअरिंगच्या दडपणातून सुटल्याची भावना त्याचा आनंद दाखवत होती.
आता मुलाचे काय करायचे? त्याला काय शिकवायचे? त्याचे कसे होणार? या प्रश्नांनी ग्रासलेल्या मोहनला त्याच्या मुरलेल्या बँकर वडिलांनी शांत तर केलेच पण छानसा रस्ताही दाखवला. सायन्समधील किंवा कॉम्प्युटरमधील छानशी फर्स्ट क्लासची पदवी ईशानने प्रथम घ्यावी व नंतर जवळपास ५० टक्के इंजिनियर करतात ते एमबीए करावे असे त्यांनी सुचवले. कधी नव्हे ते आजोबांचे कौतुक ईशानचे मनात दाटून आले.
ईशानने आजोबांचे ऐकून, वडिलांची नाराजी बाजूला टाकून बीएससीला प्रवेश घेतला. अभ्यासाचे दडपण बाजूला जाऊन, इंजिनीयर बनण्याची नकोशी भीतीसुद्धा संपल्याने ईशानचा मनापासून अभ्यास सुरू झाला. पदवीदरम्यान सर्व वर्षे ७५ टक्के मार्क मिळवून तो बीएससी झाला. या दरम्यान त्याच्या डोक्यात वेगळाच विचार व दिशा येत होती. बँकेतील आजोबांची संपन्न करिअर व आईची बँकेतील नोकरी, त्यातून घरात येणारे उत्पन्न याची त्याला हळूहळू माहिती होत होती. सदाशिव पेठ सोडून कोथरूडमध्ये घर घेताना आजोबांना केवळ बँक कर्मचारी म्हणून कित्येक लाखांचे कर्ज जेमतेम चार टक्के व्याजाने मिळाले होते. नवी कोरी मोठी गाडी घेण्यासाठी आईलासुद्धा बँकेचे असेच कर्ज मिळाल्याचेही त्याला कळले होते. असे कोणतेच फायदे इंजिनीयरला मिळत नाहीत हेही तो जाणून होता. पदवीधर होतानाची शेवटची दोन वर्षे त्याने आजोबांकडून बँकांच्या परीक्षांची सविस्तर माहिती घेतली होती. गंमतीची गोष्ट म्हणजे या परीक्षांचा अर्ज घरातील कोणालाही न सांगता त्याने भरलाही होता. त्या अभ्यासात त्याला खूपच रस वाटू लागला होता. भाषा, तर्कविचार, अंकगणित, इंग्रजी व सामान्य ज्ञान यावर आधारित प्रश्नपत्रिका सोडवण्याचा दर रविवारी त्याने सपाटाच लावला. पहिल्या प्रयत्नात बँकांसाठीची क्लेरिकलची परीक्षा तो पास झाला, एवढेच नव्हे, तर त्याची निवडसुद्धा झाली.
पण आता ईशानला वेध लागले होते ते प्रोबेशनरी बँक ऑफिसर परीक्षेचे. कारण त्याची पूर्वपरीक्षा ईशान उत्तम मार्काने पास झाला होता. पण मुख्य परीक्षा थोडक्यात अडकली होती. आजोबांनी यावेळी अजून एक त्याला सल्ला दिला. ज्या पदावर नेमणूकपत्र मिळाले आहे ते घेऊन तू बँकेत रुजू हो व काम शिकून घे. ऑफिसरच्या परीक्षेसाठी तुला त्याचा उपयोगच होईल. या लाखमोलाच्या सल्ल्याचा ईशानला शब्दशः फायदा झाला. आज एका सरकारी बँकेत ईशान ऑफिसर म्हणून दाखल झाला आहे. एकदा चहा पिताना गमतीने त्याने वडिलांना सांगितले, माझ्याकडे कर्जासाठी अनेक इंजिनिअरांचे अर्ज येत असतात व त्यांना बसा म्हटल्याशिवाय ते माझ्यासमोरच्या टेबलावर बसतसुद्धा नाहीत. बरे झाले ही वेळ माझ्यावर आली नाही. आजी, आजोबा व ईशानची आई यावर दिलखुलास हसले तर मोहननी ईशानच्या पाठीवर थाप टाकून त्यालाही दाद दिली. आता गोर्यांच्या कोथरूडमधील घराला वेध लागले होते ईशानच्या लग्नाचे.
तात्पर्य : सायन्स आणि इंजिनियरिंग हेच सर्वस्व नाही. दहावीनंतरचे जसे शाखानिवडीचे वेगवेगळे रस्ते असतात तसेच कोणत्याही पदवीनंतर सुद्धा विविध रस्ते असतात. राज्य व केंद्र सेवेत अधिकारी, सैन्य दलात ऑफिसर, एमबीए करून
मॅनेजर, बँक ऑफिसर, जाहिरात किंवा पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी एकच गोष्ट लागते ती म्हणजे फर्स्ट क्लासची पदवी. कोणत्याही शाखेची.