हेलसिंकी पाहून झाल्यावर आम्हाला नॉर्दर्न लाईट्सचे वेध लागले. हा एक प्रचंड अफलातून नैसर्गिक अनुभव आहे. पण निसर्गाच्या इतर गोष्टींसारखा तोही लहरी आहे. दिसेलच याचा भरवसा देता येत नाही. म्हणूनच नॉर्दर्न लाईट्सचा चक्क पाठलाग करायचा, या विचारानेच आम्ही आमच्या प्रवासाची आखणी केली होती. तो पाठलाग रोवानियमी शहारापासून सुरू होणार होता. म्हणजे तिथं पोचणं आवश्यक होतं. हेलसिंकीपासून रोवानियमीपर्यंत जायला रात्रीचा ट्रेनप्रवास सोयीचा असतो. त्या ट्रेनला सॅन्टा क्लॉज एक्स्प्रेस म्हणतात. ती घ्यायची म्हणून आम्ही हेलसिंकी स्टेशनवर जायला निघालो. वाटेत एक मस्त अनुभव आमची प्रतीक्षा करत होता. तीन चार वर्षांची शाळकरी मुलं घेऊन एक शिक्षिका कुठेतरी निघाली होती. मुलं हरवू नयेत म्हणून तिनं त्यांना एकमेकांना बांधलं होतं. गोर्या गोबर्या लालबुंद गालांच्या इवल्याशा मुलांची ती कवायत फार मजेशीर दिसत होती. अर्थात परदेशात मुलाच्या गालाला हात लावलेला कोणालाही आवडत नाही. म्हणून इच्छा असूनही आम्ही तो मोह आवरला.
हेलसिंकी स्टेशनला पोहोचेपर्यंत आकाश भुरभुरायला लागलं होतं. हिमवर्षावाचा मस्त आनंद घेत आम्ही स्टेशनवर जाईपर्यंत रस्ता हिमाच्या पांढर्या चादरीनं झाकून गेला होता. थंडीही विलक्षण वाढली होती. त्यामुळे, हेलसिंकीचं मध्यवर्ती रेल्वे स्टेशन खूप सुंदर असूनही त्याचं नीट दर्शन घेणं शक्य झालं नाही. ट्रेन आली आणि आम्ही चक्क गलका करतच आत शिरलो. पुढं कितीतरी वेळ आमचा धिंगाणा चालू होता. शेवटी शेजारच्या कुपीतला माणूस दरवाजा उघडून बाहेर आला आणि आमच्याकडे पाहून काहीही न बोलता त्याने पुन्हा आपला दरवाजा लावून घेतला. आम्ही काय समजायचं ते समजलो आणि गुमान गप्प झालो.
प्रवास एकदम झकास होता. दोन्ही बाजूला बर्फाळलेल्या भागातून आमची ट्रेन वेगानं जात होती. चार चार फूट बर्फाने झाकलेली जमीन, तितक्याच बर्फाने वाकलेली झाडं सगळं विलक्षण होतं. चंद्राच्या प्रकाशात पांढर्याशुभ्र धरेचं ते विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवत रात्री उशिरापर्यंत आम्ही जागे होतो. मग शेवटी थकून आपापल्या कुपीत जाऊन झोपलो.
सकाळी उजाडता उजाडता आमची ट्रेन रोवानियमीला पोचली. आम्हाला न्यायला आलेली बस थेट प्लॅटफॉर्मवरच येऊन थांबली होती. आमचं अप्पुक्का हॉटेल तसं थोडं लांब होतं. पण हॉटेलवर पोचल्यावर दोन गोष्टींचं अप्रूप वाटलं. तिथं आपलं सामान आपणच न्यायचं असतं. सामान वाहून न्यायला ‘स्ले’ किंवा ढकलगाडी होती. आतापर्यंतच्या गाण्यात ‘स्ले’ हा प्रकार फक्त ऐकला होता, आता प्रत्यक्ष अनुभवत होतो. खूप मजा आली स्ले ढकलताना.
अप्पुक्का रिसॉर्टवर काचेचं छप्पर असलेल्या काही खोल्या होत्या. नॉर्दर्न लाइट्सचं शास्त्रीय नाव आहे ऑरोरा बोरियालीस, म्हणून त्या पाहण्यासाठी बनवलेल्या खास खोल्यांचं नाव होतं ऑरोरा रूम्स. इथं झोपून देखील आकाश पाहता येत होतं. पण अडचण होती. त्या काचेरी छपरांवर देखील बर्फ साचत होतं. मग आकाश कसं दिसणार. सुदैवानं त्या खोल्यांमध्ये एक सोय होती. छप्पर दोन काचा एकमेकांवर बसवून बनवलेलं होतं आणि त्या दोन काचांच्या मध्ये हिटर बसवलेला होता. एक बटन दाबलं किती हिटर चालू व्हायचा आणि काचेवरचं बर्फ वितळून जायचं.
आम्ही सगळेजण त्या इवल्याशा खोलीत आकाशाकडे डोळे लावून बराच वेळ बसलो. पण निसर्ग नाखूष होता. आकाश ढगाच्छादित होतं. त्यामुळं नॉर्दर्न लाईट्स काही दिसले नाहीत. मध्ये मध्ये आभास व्हायचे. सगळे ताडकन उठून बसायचे. असा खेळ बराच वेळ चालल्यावर मग आम्ही तो नाद सोडून दिला आणि आपापल्या खोल्यांमध्ये जाऊन झोपलो.
प्रत्यक्ष सॅन्टा क्लॉज
रोवानियमीमधल्या मुख्य आकर्षणाने, म्हणजे नॉर्दर्न लाईट्सने चांगलाच दगा दिल्यावर आमचा मोर्चा दुसर्या तितक्याच महत्वाच्या ठिकाणाकडे वळला. जगाच्या या भागाला लॅपलॅन्ड म्हणतात आणि तिथे सॅन्टा क्लॉज वास्तव्याला असतो म्हटल्यावर आम्ही सगळी साठीच्या पुढची ‘मुलं’ त्याला भेटायला निघालो. बसमधून उतरताक्षणीच लक्षात आलं की आपण अगदी योग्य जागी आलो आहोत. तीच चहुबाजूंनी बर्फाळलेली जमीन, तसाच सूचिपर्णी झाडांवर लगडलेला बर्फ आणि समोरच्या टुमदार गावातल्या प्रत्येक इमारतीवर लाल रंगाचं प्राधान्य. आम्ही जे काही पाहत होतो ते सर्व पूर्वी कधी ना कधी चित्रात पाहिलेलं. आज प्रत्यक्षात नजरेत भरून घ्यायची संधी मिळालेली. आता लहान मूल होऊनच त्याचा आनंद भरघोसपणे लुटता येणार होता. आम्ही मग जराही वेळ दवडला नाही. वयाची वस्त्रं बाजूला ठेऊन लहानातलं लहान मूल होऊन गेलो.
कुणी रेनडिअरच्या कटआऊटमध्ये स्वतःचं डोकं घुसवून फोटो काढून घेतले, कुणी बर्फानं बनवलेल्या सिंहासनावर बसून सेल्फी काढल्या. रोवानियमीपासून उत्तरेकडे उत्तर ध्रुवाचा म्हणजे आर्क्टिक प्रदेश सुरू होतो. तिथं एका इमारतीत पहिल्या मजल्यावर एके ठिकाणी जमिनीवर मोठी रेष काढलेली आहे. ही आर्क्टिक सर्कलची रेष. जणू काही कुठला तरी मोठा भूभाग पादाक्रांत करतो आहोत अशा आवेशात आम्ही त्या रेषेच्या अलीकडे आणि पलीकडे एकेक पाय टाकून तळ्यात-मळ्यात केलं. उंबर्याचं माप ओलांडून येणार्या नववधूच्या चेहर्यावरचा आनंद सर्वांच्या हास्यात दिसत होता. (हल्लीपर्यंत आर्क्टिक सर्कल सॅन्टाच्या गावातून जाते असा समज होता. आताच्या कॉम्प्युटरच्या जगात कळलंय की प्रत्यक्षात ही रेष तिथून दोन किलोमीटर अंतरावर आहे.)
पण खरी उत्सुकता होती ती सॅन्टा क्लॉजला भेटण्याची. त्या गावातल्या एका छोटेखानी इमारतीत तो बसतो. म्हणजे त्याच्यासारखी दिसणारी, तशीच लांब पांढरी दाढी असलेली, लाल पायघोळ अंगरखा घातलेली आणि तशीच मान टाकलेली टोकदार टोपी परिधान केलेली एक व्यक्ती एका खोलीत बसते. तिला आपण भेटायचं. त्याच्याशी गप्पा मारायच्या. तिथं असलेल्या दुकानातून एखादी भेटवस्तू विकत घेतली की तीच तो आपल्या हातात देणार. प्रत्यक्ष सॅन्टा क्लॉजच्या हातून भेटवस्तू मिळतेय या कल्पनेनं मुलं प्रचंड हरखून जातात. खूप छान आठवण सोबत घेऊन जातात. आम्ही सॅन्टाला भेटायला रांगेत उभे राहिलो आणि प्रत्यक्षात त्याला पाहून आम्ही ‘साठीची मुलं’ देखील तितकीच हरखून गेलो. सॅन्टाने आम्हाला शेजारी बसवून घेतलं. आम्ही त्याच्यासोबत फोटो काढून घेतले. इथं एक हॉटेल आहे. त्या खोल्यांमध्ये राहणार्या लोकांना सॅन्टा अचानक भेट देतो आणि मुलांना सुखद धक्का देतो. अर्थात गावातल्या खोल्यांचं भाडं बरंच जास्त असतं, ही गोष्ट निराळी.
अजून आणखी एक गंमत बाकी होती. या गावात एक पोस्ट ऑफिस आहे. हे इथलं सगळ्यात मोठं पोस्ट ऑफिस. आपण एक कार्ड किंवा लिफाफा विकत घ्यायचा. त्यावर काहीतरी मजकूर, आपला पत्ता लिहायचा आणि योग्य किमतीची टपाल तिकिटं डकवून ते पत्र तिथल्या पेटीत टाकायचं. आता आमची वयं पुन्हा साठीची झाली. आमच्या नातरांना आम्हीच पत्रं लिहिली आणि पेटीत टाकली. पुढे जेव्हा ती पोष्टाने आमच्या नातरांच्या हातात पडली तेव्हा त्यांच्या चेहर्यावरचा आनंद अवर्णनीय होता.
(क्रमश:)