ज्या किरीटाचा अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडीओ पाहून देशातील प्रत्येक नागरिकाची मान लज्जेने खाली गेली, तो किरीट इतकी बेअब्रू झाल्यावरही उलट त्याच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगणार्या एका वाहिनीच्या पत्रकारावर गुन्हा दाखल करतो, हा निर्लज्जपणाचा कळस आहे, अशी प्रतिक्रिया माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्याने ‘बीजेपी माझा’ या तथाकथित वृत्तवाहिनीला दिली. त्या किरटाच्या किळसवाण्या कृतीचा पर्दाफाश करणार्या वृत्तवाहिनीचे राज्यभर कौतुक होत असताना कायद्याच्या कलमांचा गैरअर्थ काढत पोलिसांनी कामपिसाट किरटाच्या दबावामुळे त्या वाहिनीच्या संपादकाविरुद्धच गुन्हा दाखल केल्याने पत्रकार जगतात एकच खळबळ माजली. सर्व पत्रकार संघटनांनी पोलिसांच्या या कृतीचा निषेध केला. आमच्या पोक्याच्या तळपायाची आग तर मस्तकात गेली होती. एवढी अब्रू धुळीला मिळाल्यावरही हा लाजलज्जा कोळून प्यायलेला किरीट दहीकाला उत्सवात स्टेजवर कसा थिरकत होता, नृत्यांगनेसोबत कसा फुगडी घालत होता हे सार्या जनतेने पाहिलं आणि शिव्यांची लाखोली वाहिली. पोक्याही माझ्याकडे तणतणत आला. म्हणाला, टोक्या, तू मला सांग याचं मी काय करू? मी म्हटलं, सध्या तू सरळ किरटालाच भेट आणि त्याची खोटी बाजू काय आहे ते समजून घे. त्या क्षणी पोक्या तडक बाहेर पडला आणि मुलाखत घेऊनच प्रकटला.
– नमो नम: हरी ओम किरीटजी.
– हरी ओम. नमो नम: संघ दक्ष, नको तिथे लक्ष, असं तू मला म्हटलंस तरी हरकत नाही. मी आता कुणाचीही कसलीही पर्वा करत नाही. मी दोषी नसून मला गुन्हेगार ठरवणारे सगळे दोषी आहेत. अरे, ज्यांनी माझ्या त्या क्लिप्स पाहिल्या त्या आमच्या नेत्यांनी कुठली टॉनिक्स घेता ती आम्हालाही सांगा, असं कौतुक केलं माझं. आणि तुम्ही मला कामपिसाट, लाजलज्जा कोळून प्यायलेला म्हणता हे साफ चुकीचं आहे. आमचे काही नेते तर म्हणाले, किरीटजी आपल्यासारखं भाग्य कुणालाच लाभत नाही. एक नेते तर मस्करीने म्हणाले की, किरीटजी, तुम्ही स्वत:च्या प्रसिद्धीसाठी जाणूनबुजून केलेला हा स्टंट तर नव्हता ना? आता यांना मी काय सांगू?
– पण तुम्ही त्या पत्रकाराविरुद्ध अब्रूनुकसानीचा गुन्हा दाखल करायला नको होता. तुमच्या अब्रूचे निघालेले धिंडवडे सार्या जगाने मिटक्या मारत पाहिले. त्याची तुम्हाला काडीचीही खंत वाटत नाही. उलट तुमची अब्रू आणि नागडं सत्य चव्हाट्यावर आणणार्या त्या पत्रकाराची आणि जनतेची क्षमा मागणं हे तुमचं नैतिक कर्तव्य होतं. ते विसरून तुम्ही गोविंदामध्ये चमकोगिरी करायला गेलात, झिंग झिंग झिंगाट गाण्यावर तुम्ही पिसाटल्यासारखे नाचत होता. तेव्हा सभोवताली जमलेल्या विशाल जनसमुदायाच्या डोळ्यांसमोर त्या व्हायरल क्लिपमधील तुमची ती दमछाक झालेली कसरतीची दृश्यं नाचत होती. काही दिवसांपूर्वीच लाखो लोकांनी पाहिलेली ती ओंगळवाणी, किळसवाणी दृश्यं हा तुम्हाला अभिमानाचा विषय वाटत असला तरी या माणसाला मुळीच लाजशरम कशी नाही, याची चर्चा लोक करत होते. तुम्हाला वाटलं असेल की ते आपल्याला दाद देऊन सारं काही विसरले असतील, पण तसं नव्हतं ते. स्वत:बरोबर आपल्या पक्षाचीही इज्जत धुळीस मिळवणार्या तुमच्यासारख्या निलाजर्या लोकप्रतिनिधीची ते कीव करत होते.
– हे बघा, तुम्ही मला विचारवंतासारखं लेक्चर देऊ नका. मी कमरेचं डोक्याला गुंडाळलेला माणूस आहे. ज्या गोष्टी अनेक राजकारणी लपून छपून करतात, त्या मीसुद्धा लपून छपूनच करत होतो. पण माझ्या वाईटावर असलेल्या माझ्या पक्षातील किंवा विरोधी पक्षातील काही मंडळींनी माझ्यावर पाळत ठेवून मी केव्हा, कुठे लपून छपून कुठल्या हॉटेलात जातो किंवा मसाज ब्युटी पार्लरमध्ये जातो, याची अचूक माहिती मिळवली आणि तिथल्या व्यवस्थापनातील काहींना हाताशी धरून मला दिसणार आणि कळणार नाही अशा तर्हेने तिथे छुपे व्हिडिओ कॅमेरे लावले. त्या जाळ्यात मी सापडलो. असं एखाद्याच्या खासगी जीवनाचं गुप्तपणे व्हिडीओ शूटिंग करणं हा माझ्या दृष्टीने गुन्हाच आहे. कोणीतरी सूडबुद्धीच्या कारणास्तव माझी अब्रू चव्हाट्यावर मांडली. त्याचा मी निषेध करतो.
– तुम्ही स्वत:ला खूपच निष्पाप समजता. पण तुम्ही आणि तुमच्या पक्षाने सूडबुद्धीने ईडीचा वापर करून अनेक विरोधकांवर खोटे आरोप करून तुरुंगात पाठवलं, त्यांना भाजपमध्ये प्रवेश न केल्यास चौकशीचा ससेमिरा पाठीशी लावू अशा धमक्या दिल्या, जे ईडीला घाबरून तुमच्या पक्षात आले त्यांना सर्व गुन्हे माफ करून शुद्ध करून घेतलं. या प्रकाराला काय म्हणतात? मग खोटे पुरावे गोळा करून एखाद्याच्या मागे हात धुवून लागणं तुमच्या कुठल्या फिलॉसॉफीत बसतं? त्यामुळे तुमचा सूड एखाद्याने वेगळ्या पद्धतीने घेतला असेल तर त्याला चुकीचं कसं म्हणता येईल?
– पण हे म्हणजे अति झालं.
– तरीही त्यांनी तुम्हाला माती खायला लावलीच. आता तुमच्यासारखे दगडाचे काळीज असलेले काही लोक समाजात आणि तुमच्या पक्षात असतात. त्यांना स्वत:च्या आणि दुसर्याच्या अब्रूची पर्वा नसतेच. कोडगे असतात ते. बरं, तुमची ती क्लिप व्हायरल झाल्यावर तुमची अवस्था ओशाळल्यासारखी झाली असणार ना!
– मुळीच नाही. उलट माझ्या खासगी जीवनांचे महत्त्वाचे पैलू जगासमोर आल्यामुळे मी या विषयात किती पारंगत अाहे हे सार्या जगाला समजलं. माझा या विषयाचा इतका अभ्यास आहे की सरकारने या विषयाचं स्वतंत्र खातं निर्माण करून मला त्याचा कॅबिनेट मंत्री करावा. लैंगिक शिक्षण शाळेपासूनच द्यावं हे माझं मत जगजाहीर आहे. वात्सायनाच्या कामसूत्रापासून ओशोंच्या ‘संभोग से समाधी तक’पर्यंत सर्व पुस्तकांचा माझा अभ्यास आहे. आजकाल अनेक लोक चोरून पोर्नोग्राफीचे व्हिडीओ पाहतात. असं चोरून शिकण्यापेक्षा पोर्नोलॉजी हा विषय शालेय अभ्यासक्रमापासून सक्तीचा करावा, म्हणजे त्याविषयीची कुतूहल संपून त्याविषयी यथार्थ ज्ञानप्राप्ती होईल, असं मला वाटतं. सरकारला या बाबतीत हवी ती मदत करण्यास मी नेहमीच तत्पर आहे.
– तुमच्याशी बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपटून घेण्यासारखं आहे.
– आपटा मग. मैं तो चलाऽऽ जिधर चले रस्ताऽऽऽ