□ गोदी मीडियावर ‘इंडिया’चा बहिष्कार; १४ अँकरची यादी तयार.
■ देर आये, दुरुस्त आये… हे आधीच करायला हवे होते… पत्रकार नव्हेत, सुपारीबाज चरणचुंबक आहेत हे…
□ जरांगे यांचे उपोषण मागे, पण आंदोलन सुरूच.
■ आता उपोषणाचा परिणाम पातळ झाला तर सगळंच मुसळ केरात जाईल, त्याचं काय?
□ आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलली
■ कितीही वेळ काढा, जनता घरी पाठवणार आहेच कायमची घरी. तोवर घ्या मजा करून.
□ काँग्रेसने आणले भन्नाट गाणे- ‘ईडी ईडी क्या है? ईडी का मतलब’.
■ ईडी का मतलब बीजेपी असं देशातला शाळकरी मुलगाही गाणं न ऐकता सहज सांगू शकेल.
□ सरकारच्या जाचक धोरणामुळे शेकडो मराठी विद्यार्थी आयुर्वेद ‘एमडी’ प्रवेशापासून वंचित.
■ शिकताय कशाला मुळात, शिक्षण सोडा, भिकेला लागा, हातात दगड घ्या आणि सरकारचे छुपे एजंट ज्याच्याकडे शत्रू म्हणून बोट दाखवतील, त्याच्यावर भिरकवा…
□ गणेशोत्सवात लाऊडस्पीकरसाठी पाच दिवस परवानगी नाहीच.
■ कशाला रात्री बेरात्रीपर्यंत कान किटवायचे बाप्पांचे आणि भक्तांचे. त्यातून नेमकं काय साध्य होतं?
□ गणेशोत्सवावर महागाईचे सावट; तरीही भाविकांमध्ये उत्साह.
■ ऋण काढून सण साजरा करणारे लोक आहोत आपण, फक्त ही वेळ कुणामुळे येते आहे, ते विसरू नका म्हणजे झालं…
□ डिलाईड रोड पूल की ‘डिले’ पूल! – आदित्य ठाकरेंचा सणसणीत टोला.
■ सगळ्या मुंबईभर अशी डिले झालेली कामं आहेत… थूकपट्टी चालली आहे वरवरची. सततच्या धूळमातीमुळे अख्खी मुंबई एव्हाना श्वसनरोगी झाली असेल.
□ उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचा दोषमुक्ततेचा अर्ज कोर्टाने स्वीकारला; राहुल शेवाळेंनी दाखल केला होता मानहानीचा खटला.
■ नको त्या निसरड्यावर पाऊल टाकले की घसरून पडायला होतेच.
□ राष्ट्रवादीत दोन गट; निवडणूक आयोगापुढे ६ ऑक्टोबरला सुनावणी.
■ काय फार्स असतो तो, ते आता सगळ्यांना माहिती आहे…
□ फडणवीसांनाही लागली दिल्लीच्या ‘पातशहां’सारखी शब्द फिरवायची सवय; अंबादास दानवे यांनी लगावला टोला.
■ तिकडे मोठे चाणक्य, इकडे छोटे चाणक्य… कार्यपद्धती सेम.
□ राणा दांपत्यावर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार; काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा इशारा.
■ ती आहे अजून त्यांच्याकडे शिल्लक?
□ गिरणा कारखान्यातील १७८ कोटींच्या घोटाळ्याचा हिशेब द्या – शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांचे दादा भुसे यांना आव्हान.
■ भुसभुशीत भुसनळे हिशोब कसला देतायत, यांचा आता निवडणुकीत हिशोब करायचा… जनतेने.
□ महाविकास आघाडीच्या विकासकामांचा सुनील तटकरे यांनी वाचला पाढा.
■ पर्याय काय आहे? आताच्या सरकारकडे सांगण्यासारखे काम काय आहे?
□ तिसरी मुलगी झाली म्हणून आईनेच घोटला पोटच्या गोळ्याचा गळा.
■ तिला तरी दोष का द्यायचा? समाज मुलींना कसा वागवतो, हे तिने पाहिले असेल, भोगले असेल.
□ खात्रीनंतरच मतदार यादीतील नावे वगळा; पालिका आयुक्तांनी दिल्या प्रशासनाला सूचना.
■ खात्री कसली? विरोधी पक्षांना मतदान करतील याची?
□ महागाई आणखी भडकणार; विकासदर ६.३ टक्के राहणार.
■ जोवर केंद्रात आणि राज्यात हे सरकार आहे, तोवर यापेक्षा वेगळे काही घडणार नाही.
□ शहिदांच्या कुटुंबांचा आक्रोश सुरू होता, तेव्हा मोदींवर फुलांचा वर्षाव सुरू होता; भाजपविरोधात देशभरात संतापाची लाट.
■ पुलवामा हत्याकांड झाले तेव्हा बेअर ग्रिल्सबरोबर शूटिंगमध्ये मग्न असलेल्या मोदींकडून वेगळी अपेक्षा कशी करतात, हेच कळत नाही.
□ दुष्काळाने शेतकरी त्रस्त; मिंधे फाईव्हस्टारमध्ये मस्त.
■ यांच्यापुढे आदर्श कोणाचा, ते सांगायला नकोच.
□ शेतकर्यांचा आसुड आता शांत बसणार नाही – आदित्य ठाकरे.
■ निवडणुकीत असा कडाडायला हवा की पुन्हा या शेतकरीद्रोही शक्तींना डोकं वर काढायला जागा मिळता कामा नये.
□ नोकरभरतीत मराठा उमेदवारांना न्यायाची प्रतीक्षा.
■ कृपया प्रतीक्षा कीजिए… आप कतार में हैं… हे अनादि अनंत काळ ऐकायची तयारी ठेवा भावांनो…
□ ईव्हीएममध्ये घोळ; निवडणूक आयुक्तांना हायकोर्टाचे समन्स.
■ आता घोटाळा उघडकीला आला तरी काय होणार, देशाचे चक्र दहा वर्षांनी मागे नाही फिरवता येणार.