हल्ली सगळ्या मुलांना नोकरी करणारी बायको हवी असते, पण घरकामात मदत करायची तयारी नसते. ही डबल नोकरी (त्यात एक बिनपगारी) बायकोने का करावी?
– पल्लवी रेणापूरकर, बीड
म्हणजे नवर्याने बाहेर नोकरी करून, पगार घरी देऊन, वर घरची कामंही बिनपगारी करावी असं वाटतं की काय तुम्हाला, पल्लवी मॅडम?
या मुलींचं मला काही कळत नाही. चांगला, सुस्वभावी, निर्व्यसनी, देखणा, काळजी घेणारा नवरा हवा आहे, असं त्या मलाच सांगतात, मी समोर असताना…
– समीर गोरे, पनवेल
तुम्हाला बघूनच त्यांना कळत असेल की तुम्ही फक्त नावाचेच गोरे आहात. (अशा सिच्युएशनला मी करतो तो उपाय करा. मुलगी असं काही बोलायला समोर आली तर हात पाय गाळू नका. थोडी हिंमत करा. तिच्या समोरून पाय लावून पळा…. हाताला.)
तुमच्याबद्दल अफवा पसरवणार्या माणसाला तुम्ही काय सल्ला द्याल?
– प्रीतेश पाटील, अहमदनगर
खरं सांगा तुमच्याबद्दल कोणी अफवा पसरवतंय का? (मग मी त्याला कशाला, तुम्हालाच सल्ला देतो. कोणी तुमच्याबद्दल अफवा पसरवत असेल, तर लपून-छपून काही करू नका. खुलेआम करा. कोण कशाला अफवा पसरवेल? खरं आहे तेच पसरवेल.)
शाळेत असताना तुम्हाला मोठे झाल्यावर काय बनायचं होतं?
– प्रथमेश घुले, निगडी
नवरा बनायचं होतं (कोणाचा ते मात्र विचारू नका. ते फारच पर्सनल होईल. विचारलंत तरी आम्ही सांगणार नाही जा… जुन्या जखमेवरची खपली निघेल.)
मुंबईतला मराठी माणूस अनोळखी मराठी माणसाशी पण आधी हिंदीत बोलायला सुरुवात का करतो?
– सुनील प्रतापवार, सोलापूर
मराठी माणूस आपल्यासमोरच्या मराठी माणसाच्या हिंदीतल्या चुका कधीच काढत नाही (कारण त्याच स्वतःच हिंदी तेवढंच अगाध असतं); पण स्वतःचीच मराठी प्रमाण मानून, दुसर्याच्या मराठीतल्या मात्र चुका काढत असतो आणि म्हणूनच एक मराठी दुसर्या मराठी माणसाशी हिंदीत बोलत असतो.
जगातले सगळे शोध आपल्या वेदांमध्येच लिहून ठेवले होते, असं बरेच जण म्हणतात; पण, डीजे आणि लाऊडस्पीकरचा शोध पण आपल्याकडेच लागला होता, हे का दडवून ठेवतात?
– वसंत विनायक बेळगावकर, चिक्कोडी
डीजे आणि लाऊड स्पीकरचा वापर सगळ्या धर्मात होत असला, तरी पुराणात डीजे आणि लाऊडस्पीकर वापरलेला मेसेज अजून वरून आला नसेल.
एखाद्या तरूण, देखण्या मुलीने तुम्हाला काका किंवा अंकल म्हटल्यावर तुमच्या मनात काय विचार येतो?
– रिया शेख, सातारा
पटकन तिला जवळ घ्यावं… पुतणी म्हणून (खोटं वाटत असेल तर माझ्या समोर येऊन मला काका किंवा अंकल म्हणून बघा).
संतोषराव, यावेळी धोंड्याच्या महिन्यात सासुरवाडीकडून तुम्हाला काय काय मिळालं?
– संजय क्षीरसागर, सृष्टी चौक, पिंपळे गुरव
आमच्यात ‘धोंड्याला’ काही देत नाहीत, असे माझे सासू-सासरे म्हणतात (हे धोंड्याच्या महिन्याला की जावयाला उद्देशून ते म्हणतात ते मला अजून कळलेलं नाहीये. पण त्याचं मला काही वाटत नाही. कारण जावयाच्या गळ्यात जो धोंडा आपण बांधलाय तो जावयाने आयुष्यभर नीट वागवावा म्हणून सासू-सासरे जावयाला धोंड्याच्या महिन्यात लाच देत असावेत असं मी स्वत:ला समजावतो).
लोकप्रतिनिधी नेमकं काय काम करतात?
– अशोक परशुराम परब, सावरकर नगर, ठाणे
असा प्रश्न का विचारता हो… भाईंना, दादांना, साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. असा बोर्ड आपल्या कार्यकर्त्यांचे फोटो शुभेच्छुक म्हणून टाकून लोकप्रतिनिधीच लावतात ओ. तरी तुम्हाला लोकप्रतिनिधी काय काम करतात हे कळत नसेल तर हा तुमचा प्रॉब्लेम आहे, त्यांचा नाही.
परभाषिक माणसांचं बोलणं अजिबात समजत नसताना जणू ते समजतंय असा आविर्भाव करून गबाळ्यासारखं हसत राहण्याचा प्रकार तुम्ही कधी केलाय का हो?
– प्रशांत दिंडोकर, पुणे
मला समोरच्याची परकी भाषा कळत असली, तरीही ती मला कळत नाही, असा चेहरा करून मी उभा असतो. कारण, मला सगळंच कळतं असं समजून मी गबाळ्यासारखा हसलो आणि समोरच्या परभाषिक माणसाला मी येडा समजलो, तरी बघणारी माणसं येडी गबाळी नसतात. ती मला येड्यात काढतील… आणि माझी बाजू माझ्या ‘परिवारातली’ही माणसं घेणार नाहीत याचं मला भान असतं.