सोनार कुणाचे नाही होणार असं म्हणतात. पण नाना सोनाराचा स्वभावच विरळा. नाना सर्वांच्या हृदयात विराजमान… या नम्र सौजन्यमूर्तीला भेटण्यासाठी सोलापूरची मंडळी मुंबईत आली होती. यंदा प्रथमच त्यांच्या सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचे दागिने नानांनी बनवून दिले. ते घेऊन जातांना काही कार्यकर्ते म्हणाले, ‘नाना सोलापूरला यायचं ठरवा, आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊ, तुम्हाला मध्ये बसवू, तुमचा फोटो आणि मुलाखत घेऊन सर्व पेपरात छापून आणू. आता श्रावण चाललाय नंतर गणपती बसला की सोलापुरी शाकाहारी खाऊ घालतो. दोन दिवस मुक्कामालाच या,’ असे म्हणून त्यांनी नानांना वाकून नमस्कार केला.
नाना वेदक गेली ५३ वर्ष मुंबईत गिरगांवातील मुगभाटात सोनारकाम करतात. शुद्ध सोन्या-चांदीत नवग्रहांच्या अंगठ्या बनाविण्यात त्यांचा हातखंडा… चोख व्यवहार आणि प्रामाणिकपणामुळे त्यांना हरी महादेव गोखले यांच्या सुवर्णपेढीकडून देवदेवतांचे दागिने घडविण्याचे काम मिळू लागले. मुंबईची महालक्ष्मी, लोणावळ्याची एकवीरा आई, प्रभादेवीचा सिद्धीविनायक, लालबागचा राजा, शिर्डीचे साईबाबा, गाणगापूरचे दत्तगुरु, अक्कलकोटचे स्वामी समर्थ अशा अनेक जागृत देवस्थानांची कामे नानांकडे येऊ लागली.
सिद्धीविनायकाचे शंभराहून अधिक सुवर्णमुकूट तसेच १२० किलो चांदीचा अक्कलकोट मंदिराचा गाभारा आणि दरवाजे त्यांनी बनविले. स्वामी समर्थांचा मुखवटाही नानांच्या हातचा आहे. कार्ला येथील एकवीरा देवीचा मुखवटा घडविताना त्यांना आठ वेळा मातोश्रीवर जावे लागले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकवीरेचे निस्सीम भक्त. त्यांनी बारीकसारीक फेरफार सुचविल्यामुळे देवीचा सुंदर चेहरा घडविता आला.
२००६ साली लालबागच्या राजाची सोन्याची पावले बनवितांना साहेबांचा फोन आला. त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते घराबाहेर पडू शकत नव्हते. त्यांच्या आग्रहाखातर राजाची पावले घेऊन नाना मातोश्रीवर गेले. साहेबांनी नानांच्या कपाळी कुंकवाचा टिळा लावून त्यांचे स्वागत केले. पावलांचे दर्शन घेऊन डोकं टेकवले. ही बातमी बाहेर वार्यासारखी पसरली आणि नारायण राणे तसेच अनेक नेते मंडळींचे फोनवर फोन येऊ लागले. प्रत्येकजण बंगल्यावर बोलावू लागला. नानांची पंचाईत झाली. कुणाकुणाची मर्जी राखायची. जो तो आपल्या घरचा राजा, त्यांचे रुसवे फुगवे नको म्हणून ज्याची होती ती सुवर्णपावले त्या राजाच्या पायात नेऊन घातली. विषय संपला.
एव्हाना नानांची कीर्ती सातासमुद्रापार पोहचली. अमेरिकेतील मराठी मित्रमंडळाच्या १२ फूट उंचीच्या गणपतीचे सुवर्ण अलंकार बनविण्याचे काम आले. अशी अनेक कामे वाढू लागल्यावर नाना एकटे पडले. त्यांच्या मदतीला जावई संजोग चोणकर धावून आला. त्याने मुंबई विमानतळावरची नोकरी सोडून नानांचा भार आपल्या खांद्यावर घेतला. त्यांच्या सोबतीने सर्व कामे आता तोच पाहातो.
महाराष्ट्रातील सर्व भाविकप्रिय देवदेवतांचे दागिने घडविणार्या या भाग्यवान सोनाराची भेट झाल्याने मी धन्य झालो. देव देवळात भेटेल तेव्हा भेटेल, पण त्याचा कृपाप्रसाद लाभलेल्या नाना वेदकांना मी नमस्कार करतो. तो सर्व देवांना पोहोचेल आणि मला भरपूर आशीर्वाद मिळतील अशी आशा बाळगतो.