पावसाळा म्हणलं की आपसूक चमचमीत पदार्थ आठवायला लागतात. कांद्याची भजी, बटाटेवडे, मिसळ, आल्याचा चहा, गवती चहा या सगळ्यांचीच आठवण येते. माफक प्रमाणात हे चमचमीत पदार्थ खायला हरकत नसतेच. पण सतत तेलकट, मसालेदार, बाहेरचं खाणं कुठल्याही ऋतूत बरं नाहीच. त्यात पावसाळ्यात तर पचनशक्ती दुर्बल झालेली असते. रोगराई होण्याचं प्रमाण वाढलेलं असतं. जिभेच्या आहारी जाऊन डाएटचीही आपसूक वाट लागते. अशा वेळेस पावसाळ्यात डायटला चालतील असे काही चटपटीत पण पौष्टिक, पथ्यकर पदार्थ आज आपण या लेखात पाहूयात.
कढण/ कळण हे महाराष्ट्रातील जुने पदार्थ आहेत. ही एक प्रकारची गरमागरम पातळ सूप्स आहेत असंही म्हणता येईल. कढण/ कळण करण्यासाठी विशेषतः शिजलेल्या कडधान्यांचं पाणी वापरलं जातं. कडधान्याचं पाणी आणि थोड्या प्रमाणात कडधान्यं असल्यानं हे कळण प्रोटिन रिच असतं. यासाठी आवर्जून वापरली जाणारी कडधान्यं म्हणजे मूग, कुळीथ, मटकी, चवळी आणि क्वचित हरबरा. ज्वारी आणि बाजरीचंही कढण केलं जातं. त्याचं स्वरूप जरा दाट सूपसारखं असेल.
मुगाचं कळण
मुगाचं कळण आयुर्वेदानुसार पथ्यासाठी सर्वाधिक गुणी पदार्थ आहे. मूग हे कडधान्य असलं तरी पचायला हलके समजले जातात. केवळ पावसाळ्यात किंवा आजारपणात नव्हे, तर अधूनमधून मुगाचं कळण आवर्जून आहारात असायला हरकत नाही.
साहित्य : १. एक वाटी कच्चे हिरवे मूग. चार, पाच वाट्या पाणी.
२. दही/ ताक एक टेबलस्पून, हे ऑप्शनल आहे.
३. मीठ चवीनुसार, एक हिरवी मिरची, चिमूटभर साखर, मिरपूड, कढीपत्ता.
४. फोडणीला एक टीस्पून तूप, जिरं, हिंग, हळद.
कृती : १. एक वाटी हिरवे कच्चे मूग निदान चौपट पाणी घालून कुकरमधून बोटचेपे शिजवून घ्या.
२. मूग पाण्यासकट नीट घोटून घ्या. वाटल्यास अजून पाणी घाला. त्यात चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर, मिरपूड घालून घोटून घ्या.
३. तुपाची फोडणी करा. त्यात जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची हिंग घालून फोडणीत मुगाचं मिश्रण घाला. कळण उकळून घ्या.
४. पिताना वरून एक टेबलस्पून ताक/ दही घालू शकता. हे ऑप्शनल आहे.
५. याच पद्धतीनं मटकी, हरबरे, चवळी आदी कडधान्यांचं कळण करतात. कळण करताना या कडधान्यांचे केवळ शिजल्यानंतरचे पाणी वापरले जाते. कडधान्ये वेगळी काढली जातात. त्याची नंतर फोडणी करून उसळ केली जाते.
६. दही/ ताक घालून कळण उकळायचे असल्यास अगदी थोडेसे चणा डाळीचे पिठ लावावे. दही ताक फुटणार नाही या बेतानेच गरम करावे.
७. कुळीथाचे कळण करताना ठेचलेली लसूण वापरणे आवश्यक आहे. कुळीथ उष्ण असतात त्यामुळे पित्तकर आहेत. पण पौष्टिकही असतात व त्यात भरपूर प्रोटिन्स असतात.
आपल्या मराठी कळणांसारखाच एक पदार्थ म्हणजे रस्सम.
टोमॅटो रस्सम
मन नैराश्याच्या हिंदोळ्यात हेलकावे खाऊ लागलं की हमखास करावा असा पदार्थ म्हणजे स्स्स्स्स्स टोमॅटो रस्सम. विशेषत: पावसाळ्यातील उदासीवर हा उत्तम उपाय ठरू शकेल. या रस्समचे चार घोट घेताच सगळ्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात.
साहित्य : अर्धी वाटी तूरडाळीचं वरण नीट घोटून घेतलेलं, एक मोठा टोमॅटो अगदी बारीक चिरून, कुठलाही रस्सम मसाला, तिखट मीठ चवीनुसार, कढीपत्ता, चिंचेचं बुटुक, मिरपूड एक टीस्पून, कोथिंबीर, ओलं खोबरं : असल्यास.
कृती : कढईत दोन टीस्पून तेलाची फोडणी करून घ्यावी. भरपूर कढीपत्ता आणि चिरलेला टोमॅटो त्यात परतून घ्यावा. टोमॅटोला तेल सुटले की त्यात घोटलेलं वरण, मीठ, तिखट, रस्सम मसाला घालून परतावे. चिंचेचे बुटुक टाकावे.
चार, पाच वाट्या पाणी घालून खळखळ उकळी आणावी.
वरून कोथिंबीर आणि मिरपूड घालून झन्नाट रस्सम तयार.
ओलं खोबरं भुरभुरावे.
टीप :
१. रस्सम साध्या वाटीत न पिता कुल्हड किंवा छोट्या उभ्या स्टीलच्या ‘काफी’ ग्लासमधून प्यावे.
२. तिखट आपापल्या चवीनुसार ठरवावे, पण रस्सम प्यायल्यावर नाकाला घाम फुटला तरच ते यशस्वी झाले असे समजावे.
बाजरीचं कढण
साहित्य :
१. दोन टेबलस्पून बाजरी पीठ. तीन चार वाट्या पाणी.
२. दोन टीस्पून तूप, एक टीस्पून जिरेपूड, मीठ चवीनुसार. दोन लसूण पाकळ्या ठेचून.
कृती : १. एक टीस्पून तुपावर बाजरी पीठ जरासे भाजून घ्यावे.
२. तीन चार वाट्या पाण्यात कालवून घ्यावे. गुठळ्या राहता कामा नयेत.
३. कढईत एक टेबलस्पून तुपाची फोडणी करून त्यात लसूण, जिरेपूड घालून बाजरीचे मिश्रण घालून उकळावे.
गरमागरम प्यावे.
४. याचेच गोड व्हर्जन करायचे असल्यास गूळ आणि सुंठ घालावी.
५. याच पद्धतीनं ज्वारीचेही कढण करता येईल.
तांदळाची उकड
हा विशेषतः कोकणातील सोपा आणि चविष्ट ब्रेकफास्टचा पदार्थ आहे. आता लगेच डायटला इतका तांदूळ कसा चालेल म्हणून शंका येईल. पण पावसाळ्यातील पथ्यकर आहारात हा पदार्थ अगदीच जाऊन बसतो. कधीतरी पोट बरं नसताना, सर्दी ताप असताना असं पचायला साधं, करायला सोपं तरी जिभेला चव येईल असं आपण खाऊच शकतो. डायबेटीस नसेल तर तांदळाची उकड बिनधास्त खाऊ शकता.
साहित्य : तांदळाची पिठी एक वाटी, दीड/ दोन वाटी दाट ताक (आंबट ताक पण चालतं, मला ते आवडत नाही), हिरव्या मिरच्या दोन तरी घालाव्यात, आलं किसून अर्धा टीस्पून, कढीपत्ता, मीठ, कोथिंबीर.
कृती : कढईत दाेन चमचे तेल घालून फोडणी करायची, हिंग जास्त घालायचं आणि हळद घालायची नाही. फोडणीत कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या वाटून किंवा मोठे तुकडे करून टाकायच्या. आलं किसून घालायचं.
ताकात तांदळाची पिठी आणि मीठ घालून छान नीटस फेटून घेऊन ते मिश्रण फोडणीत घालायचं. एक दणदणीत वाफ आणायची.
उकड तयार आहे.
– कोथिंबीर घालून खावी.
– काहीजण उकडीवर वरून कच्चे तेल/ तूप घालून खातात.
– काही जण उकडीत हळदही घालतात, हळद घातल्यावर चव जरा वेगळी लागते.
भाजणीची उकडपेंडी
नाश्त्याला चविष्ट तरी पौष्टिक असं काहीतरी करायच्या शोधात हा पदार्थ सापडला. भाजणीत ज्वारी, बाजरी, नाचणी वगैरे असल्याने भाजणीची उकड अधिक पौष्टिक होते. डायबेटिक लोकांनाही चालते.
साहित्य : एक वाटी थालीपीठाची भाजणी, अडीच/तीन वाट्या पाणी, कढीपत्ता, दोन हिरव्या मिरच्या, तिखट, मीठ, कोथिंबीर, ओलं खोबरं.
कृती : कढईत दोन टेबलस्पून तेल घालावं (नॉनस्टिक कढईत एक टीस्पून तेल पुरेल).
एका बाऊलमधे भाजणी, तिखट, मीठ आणि अडीच वाट्या पाणी घालून चांगले फेटून घ्यावं. गुठळ्या राहू देऊ नयेत.
तेल नीट तापल्यावर कढीपत्ता, हिंग, हळद, मिरच्या घालून परतून घ्यावं, चिमूटभर साखर घालावी. त्यावर भाजणीचं फेटलेलं मिश्रण घालून नीट ढवळून घ्यावे. एक दणदणीत वाफ काढावी. वरून कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालावं.
– यात फोडणीत कांदा बारीक चिरून घातलेलाही चांगला लागतो.
– वरून एक टीस्पून भाजलेले शेंगदाणे आणि भाजके तीळ घालून या पदार्थाची पौष्टिकता वाढू शकते.