लोकसभा निवडणूक एप्रिल-मे महिन्यात होणार आहे. यावेळी देशात भाजपाप्रणित एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी लढत होईल. तर काही राज्यात एनडीए विरुद्ध प्रादेशिक पक्ष यांच्यात लढाई होईल. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात शिंदे-फडणवीस-अजित पवार यांच्या महायुतीविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी पवार गट आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीची लढत होईल. १९ एप्रिलपासून महाराष्ट्रात पाच टप्प्यांत ही निवडणूक होणार आहे. यात ठाणे व मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे.
देशातील ५४३ जागांपैकी भारतीय जनता पक्ष ३७० जागा मिळवेल तर एनडीए ४०० पार आकडा करेल असा आत्मविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहांसह भाजपाचे नेते दाखवत आहेत. ‘मोदी गॅरंटी’वर त्यांचा भरवसा आहे. म्हणून ‘अब की बार ४०० पार’ हा नारा भाजपावाले देत आहेत. २०१४ सालापासून मोदी यांचा करिश्मा व लाट भाजपाला विजय मिळवून देण्यास कारणीभूत ठरली आहे. पण आता मोदींच्या जुमलेबाजीला लोक कंटाळले आहेत. त्यांची फसवी आकडेवारी व भूलथापा या जनतेला कळल्या आहेत. सरकारी तपासयंत्रणेचा गैरवापर करून विरोधी पक्षात फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. देशात भाजपाची हवा आणि लाट आहे असे चित्र निर्माण केले जात आहे. पण निसर्गाचा नियम आहे. लाट उसळली तरी काही दिवसांनी ती विरून जाते. २०१४ साली उसळलेली लाट २०२४ साली देखील प्रचंड उसळेल असे भाजपा नेत्यांना वाटते. ही लाट डोंगराएवढी आहे असे भाजपाला वाटत असेल तर ते विरोधी पक्षातील बलाढ्य नेत्यांना भाजपामध्ये का प्रवेश देत आहेत? त्यांना मोदींच्या करिश्म्यावर, लाटेवर विश्वास नाही असाच याचा अर्थ होतो. सध्याच्या देशातील वातावरणामुळे आणि निवडणूक निकालानंतर भाजपचा समज खरा की निव्वळ भ्रामक हे स्पष्ट होईलच.
महाराष्ट्रातही वेगळी परिस्थिती नसेल. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पाडून गद्दारांना बरोबर घेऊन महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा दावा किती फोल होता हे निकालानंतर कळेलच. मुंबईतील सहा जागांपैकी पाच जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील असा अंदाज राजकीय निरीक्षकांनी नोंदवला आहे. कारण मुंबईत शिवसेनेचाच बोलबाला आहे.
मुंबई उत्तर-पश्चिम या लोकसभा मतदारसंघात मुंबई उपनगर जिल्ह्यातील जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. २००९ साली नव्याने झालेल्या या मतदारसंघात चुरशीची लढत झाली होती. त्यावेळेस मनसेमुळे शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत व्हावे लागले होते. इथल्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपाकडे ३ तर शिवसेनेकडे २ मतदारसंघ आहेत. नुकताच रवींद्र वायकरांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
या मिश्र वस्तीच्या लोकसभा मतदारसंघात मराठी मतांबरोबरच मारवाडी, गुजराती, उत्तर भारतीय, मुस्लीम व ख्रिश्चन समुदायांची मतेही निर्णायक ठरतात. मराठी-अमराठी असे मतांचे ध्रुवीकरण होते. पश्चिम द्रुतगती मार्गाचा भाग हा झोपडपट्टी, बैठ्या चाळी आणि इमारतीत निम-मध्यमवर्गीय तर पश्चिमेकडे सुशिक्षित मध्यमवर्गीय, व्यापारी-सिनेकलावंतांची वस्ती आहे. उत्तर भारतीय व मुस्लीम समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. या लोकसभा मतदारसंघातून २०१४ व २०१९ साली शिवसेनेचे गजानन कीर्तिकर निवडून आले होते. ते सध्या शिंदे गटात आहेत. शिंदे गटाकडून ही जागा भाजप मागत आहे. ही जागा आपल्याला जिंकता येईल असे भाजपा धुरिणांना वाटते. पण वस्तुस्थिती वेगळी आहे. शिवसेना (उबाठा)तर्फे शिवसेना उपनेते व युवा सेनेचे सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी पक्षप्रमुखांनी घोषित केली आहे. अमोल कीर्तिकर यांचा तळागळातील सगळ्या कार्यकर्त्यांशी चांगला संबंध आहे. एक अजातशत्रू म्हणून ते मुंबई उपनगरात ओळखले जातात. समर्पित भावनेने गरजूंची सेवा व युवासैनिकांचे नेतृत्व करणारा सर्वांचा ‘अमोलभैय्या’ निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे या मतदारसंघातील मविआ कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी कीर्तिकरांच्या उमेदवारीवर नाराजी दर्शवली असली तरी काँग्रेस पूर्ण ताकद अमोल यांच्या पाठीशी उभी करून आघाडीचा धर्म पाळेल.
मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात मुंबईतील वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी आणि कुलाबा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या मतदारसंघात हिंदू ६१ टक्के, मुस्लीम २५ टक्के तर मागासवर्गीय ४.५० टक्के आहेत. असे असले तरी गिरणगाव, वरळी, गिरगाव व भायखळा मतदारसंघात शिवसेनेचा प्रभाव लक्षणीय आहे. २००९ साली नव्याने तयार झालेल्या या मतदारसंघात मनसेच्या बाळा नांदगावकर यांना १.६० लाख मते मिळवल्यामुळे शिवसेनेचे खा. मोहन रावले तिसर्या क्रमांकावर गेले. परंतु २०१४ साली शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी मुसंडी मारून विजय मिळवला. काँग्रेसचे मिलिंद देवरा यांचा २०१४ आणि २०१९ साली सावंत यांनी पराभव केला. देवरा सध्या शिंदे गटात असून ते राज्यसभा सदस्य आहेत. भाजपाचे अॅड. राहुल नार्वेकर निवडणुकीच्या रिंगणात असतील. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ३, भाजपाचे २ तर काँग्रेसचा १ उमेदवार या जागेवर विजयी झाला होता. भायखळाच्या शिवसेना आमदार यामिनी जाधव या शिंदे गटात गेल्या आहेत. शिवडी आणि वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला सुरुवातीपासून आहे.
कुलाबा, मलबार हिल मतदारसंघातील गुजराती, मारवाडी, उच्चभ्रू मतदार हा मोदींचा चाहता असला तरी शिवडी, परळ, वरळी व काही प्रमाणात भायखळा मतदारसंघातील कष्टकरी, कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या बाजूने आहे. भाजपावर नाराज असलेला मुस्लीम वर्ग शिवसेनेला सहानभूती दाखवत आहे. शिवसेना ही जागा निश्चित राखेल. अभ्यासू, ससंदपटू व कामगार नेते अरविंद सावंत विजयाची हॅटट्रिक निश्चित साधतील असा विश्वास महाविकास आघाडीला वाटतो.
मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात अणुशक्ती नगर, चेंबूर, धारावी (अ.जा.), सायन-कोळीवाडा, वडाळा आणि माहिम या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. इथे २०१४पासून शिवसेनेचा खासदार आहे. सहा विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसकडे १, भाजपाकडे २, शिवसेनेकडे २ असून राष्ट्रवादीकडे १ मतदारसंघ आहे. या मतदारसंघातील निवडून गेलेला खासदार १० वर्षांपेक्षा जास्त काळ राहत नाही, असा इतिहास आहे. दादर, प्रभादेवी, माहीमसारख्या भागात सुशिक्षित मराठी मतदारांची संख्या अधिक आहे. तर धारावी, चेंबूर व सायन भागात दाक्षिणात्य, दलित, मुस्लीम यांची लोकसंख्या लक्षणीय आहे. मागासवर्गीय आणि मुस्लीम हे मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडे झुकले आहेत. महाविकास आघाडीही भक्कम आहे.
शिवसेनेतर्फे माजी खासदार अनिल देसाई हे संभाव्य उमेदवार असतील. त्यांच्या रुपाने एक सुशिक्षित, सुसंस्कृत चेहरा या मतदारसंघाला लाभणार आहे. उत्कृष्ट संघटन कौशल्य, मृदूभाषी, अभ्यासू, मराठी, हिंदी, इंग्रजीवर प्रभुत्व व सतत कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असलेले अनिल देसाई अजातशत्रू आहेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे २, भाजपाचे २, काँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रत्येकी १ आमदार निवडून आला आहे. काँग्रेसला मानणारा दलित व मुस्लीम मतदार लक्षणीय आहे. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड धारावी विधानसभेच्या आमदार आहेत. महाविकास आघाडी एकजुटीने लढून शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करील.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर पूर्व व पश्चिम, शिवाजीनगर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. शिवसेना २, भाजपा ३ तर समाजवादी पक्षाचा १ आमदार निवडून आला आहे. २०१४ व २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार निवडून आले होते. राष्ट्रवादीचे संजय पाटील यांचा पराभव झाला होता. ते सध्या शिवसेनेत आहेत. ते शिवसेना (उबाठा)कडून निवडणूक लढवतील असे दिसते.
संमिश्र वस्ती असलेल्या या लोकसभा मतदारसंघात मराठी, गुजराती, मुस्लीम मतांचा वरचष्मा आहे. कोकणातील मराठी व आगरीही लक्षणीय आहेत. यामुळे भाजपचा पराभव करणे कठीण नाही.
मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदार संघात मविआतर्फे काँग्रेस पक्ष निवडणूक लढवणार आहे. मुंबईकर जनता भाजपच्या जुमला सरकारमुळे त्रस्त आहे. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारची पावले हुकूमशाहीच्या दिशेने पडत आहेत. संविधान वाचविण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी महाविकास आघाडी एकजुटीने, एकदिलाने, भाजपला हरवायचेच या इराद्याने निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे. त्यामुळे मविआला ३३ ते ३५ जागा निश्चितच मिळतील असे आत्तापर्यंत विविध सर्वेक्षण संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
मुंबईत शिवसेनेचाच डंका वाजणार आहे. ८० टक्के समाजकारण आणि ६० टक्के राजकारण करणार्या शिवसेनेची नाळ समस्त मुंबईकरांशी जुळली आहे. गेली ५० वर्षे मुंबईतील मराठी माणसाचे, सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात शिवसेना तत्पर असते. मुंबईकरांच्या अडी-अडचणीला प्रथम धावून जाते. नागरिकांना मिळणार्या सेवासुविधांसाठी झगडतो आणि न्याय्य मिळवून देतो तो शिवसैनिकच. जुलै २००५ साली मुंबईतील अतिवृष्टी, ९१-९२ सालची जातीय दंगल, २६/११चा अतिरेक्यांचा मुंबईवरील हल्ला अशा कठीण प्रसंगी शिवसेना मुंबईकरांच्या मदतीसाठी धावून जाते. रक्तदान शिबीर भरवून जखमींना रक्त देताना तो कुठल्या जाती-धर्माचा आहे ते न पाहता वेळप्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून त्याचा जीव वाचवते. मानवधर्म हा शिवसेनाचा ‘हिंदू धर्म’ आहे. सामान्य मुंबईकरांच्या अनेक प्रश्नांवर रस्त्यावर उतरून शिवसेनेने अनेक लढे दिले आहेत. त्यामुळे मराठी माणसासह इतरांनाही शिवसेना जवळची वाटते. शिवसेनाच मुंबईकरांचे जीवन सुस्थितीत व सुरक्षित ठेऊ शकते याची खात्री समस्त मुंबईकरांना वाटते. ‘शिवसेना म्हणजेच मुंबई आणि मुंबई म्हणजेच शिवसेना’ हे नाते अधिक घट्ट झाले आहे. त्यामुळे मुंबईकर शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबईत शिवसेनेचाच डंका वाजणार आहे.