(भेगाळलेलं एक खोलीचं पत्र्याचं छप्पर असलेलं एकपाखी घर. आई, मुलगा, मुलगी नि वडील असे चौघेजण घरात बसलेले. एक कोपर्यात भांडेकुंडे लावलेले. तिथेच चुल्हे, जवळ एक उज्ज्वला योजनेचे स्टिकर लावलेली शेगडी उभी, मांडणीखाली रेग्युलेटर पडलेलं. दुसर्या कोपर्यात मोरी, तिथे पाण्याचे रिकामे ड्रम उभे, तर एक ठक्क कोरड्या नळाला बादली अडकवलेली. तिसर्या कोपर्यात देव्हारा, त्यात खंडोबा-अंबाबाईच्या प्रतिमा नि इतर देव मांडलेले. दारापुढे मागचं चाक नसलेली मोटारसायकल भिंतीला लागून उभी.)
आई : ओ…!
वडील : (सूर लावत) ओऽऽऽ होऽऽ!!
आई : (लटक्या रागात) तुमचं काय हो? भलतंच?
वडील : भलतं कुठं काय? मला वाटलं तू गातेयेस! मग मीही थोडा घसा खाकरून पाहिला! पण का गं? रोज पहाटी गल्लीतल्या कुत्र्यांबरोबर इवळण्याची प्रॅक्टिस केली तर जंतेच्या मनातल्या मामींना मी नक्की टफ देऊ शकेन ना?
आई : त्याचं नाही माहीत. पण चौदा दिवस दररोज चौदा इंजेक्शन घ्यावे लागून शरीर मात्र वेगळं टफ बनेल त्याचं काय? वडील : (रागाने) बरं, का आवाज देत होतीस?
आई : आवो! आपल्या रेशनकार्डचं काही बघायचं ना, किती दिवस बंद ठेवायचं ते?
वडील : काऽऽऽय? अगं रेशनकार्डसाठी गेलो होतो, पण ते अंत्योदयचं नवं रेशनकार्ड देत नाहीत ना हल्ली?
आई : का देत नाही?
मुलगा : चहापन्हानं घोषित केलंय की नवीन २५ कोटी लोकं गरिबीरेषेच्या बाहेर गेलीत म्हणून!!!
मुलगी : म्हणजे आपुनबी श्रीमंत झालो का?
मुलगा : चहापन्हानी किया मतलब कुछ अच्छाही किया होगा…
वडील : ऐऽऽऽ माझा शारुख! तुला रस्त्याचं काम चालुय तिथून डांबर आणायला लावलं होतं ना? आणलं का?
मुलगा : गेल्थो तिथं! पण अर्धी खडी अन् अर्धा उकरेल रोड तसाच टाकून कंत्राटदार फरार झालाय म्हणी! तिथं आता काहीच नाहीये!
आई : आवो, पण ह्या साली नुस्त्या डांबरानं पत्रे गळायचे थांबणार आहे का? मी म्हणते नवे पत्रे टाकायचं बघा की!
वडील : (कुत्सितपणे) नाही, प्लॅन तसा स्लॅब टाकायचाच आहे पण समृद्ध टनेल बनवणार्या मेघावाल्याकडे त्या क्वालिटीचं शिमेंट शिल्लक नाहीय!
आई : बाई! बोला टोचून! पण हे तीन पिढ्यांआधीचं घर आहे. आपलं नवं केव्हा व्हायचं? (तेवढ्यात आढयाचा फॅन फिरू लागतो) बाई! लाईट आली वाटतं? (फॅन पुन्हा फिरणं बंद होतो. तशी ती डोक्याला हात लावत) गेली लगेच!
मुलगी : (काही आठवल्यागत) काओ, आबा! चोवीस तास लाईट देणार म्हणत होते ना नौरंगजेब?
मुलगा : (गाऊ लागतो.) वाट बघू या देवाऽऽ खोटं पचू दे!!!
(तोच बाहेर गलका उठतो! दवंडी पिटणारे, हाकारे, पुकारे सरदार-उमराव हत्ती, घोडे घेऊन गावात येतात. त्यांच्या येण्यानं भैसटलेली कुत्री गोल गोल फिरून भुंकू लागतात. त्या तालावर पुकारे नौरंगजेबाचे पोवाडे गाऊन दाखवतात. चाट पडलेली पब्लिक आपलीच बोटं तोंडातून ओढून ओढून शुद्धीवर राहण्याचे अचाट प्रयोग करत राहतात. तोच काही उमराव-सरदार भेगाळलेल्या घराकडे मोर्चा वळवून आत शिरतात.)
उमराव : जै जै नौरंग!
उपस्थित सर्व : मैं मैं कलंक! (घोषानंतर सर्व जण बसून घेतात.)
उमराव : तुम्ही सर्वजण जाणताच आम्ही आज तुमच्या इथे का आलोत ते?
मुलगा : (अतीव शंकेनं) खंडणी गोळा करायला?
सरदार : अजाण बालका नाही रे!!
उमराव : तुमचा परिवार पूर्ण करायला!
वडील : (चमकून) पूर्णच आहे की! मी, बायको नि दोन मुलं!
उमराव : बालका! तू विसरतोय तुझ्या नात्यांत तू एक जागा मिस करतोय! तुला गरज आहे एक चांगल्या मित्राची, सख्याची, भावाची, बापाची…!
वडील : (अंमळ संतापाने) अऽऽय बिन बापाच्या! तुला बाप नसंल तर तू दहा शोध! मला एक बाप होता, तो सर्गात गेलाय! त्याची जागा दुसरा कोणी घेऊ शकत नाही. तेव्हा तुझी सावत्र बाप पुरवठादार कंपनी तुह्यापाशीच ठेव!!!
उमराव : अरेरे! तुम्ही माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला!
वडील : तू बोलला चूक! हे आधी बघ!
सरदार : तुम्ही संतापू नका हो! त्यांचा म्हणण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही तुमच्या परिवारात एक व्यक्तीला मिस करताय…
आई : (आश्चर्याने) बयाऽऽऽ हे तुम्हाला कोण म्हणलं?
उमराव : कोण कश्याला म्हणायला हवं? आम्हाला दिसतंय की!
वडील : काय?
सरदार : मिसिंग पर्सन!!!
उमराव : (नजरेनं खुणावतो, एक सेवक तबक घेऊन आत येतो.) खुद्द नौरंगजेब!!! (तबकातील नौरंगजेबाची तसबीर कुटुंबप्रमुखासमोर धरत) यांनाच मिस करताय तुम्ही!
मुलगा : कश्यावरून?
सरदार : आता हेच बघा! (मांडणीवरील रिकामं ताट पुढं करीत) तुमच्या भुकेची सर्वात जास्त चिंता कुणाला आहे?
मुलगी : भूक भागवण्याची? की भुकेलं ठेवण्याची?
उमराव : प्रश्नं तो नाहीये बाळा! तुम्ही उपाशी झोपला तर वेदना कुणाला होतात? चहापन्हा नौरंगजेबांना! म्हणून त्यांनी फुकट रेशन चालू केलंय!
वडील : काय सांगता?
सरदार : आता हेच बघा, तुमचं गळकं छत बघून, त्यांनी भकास योजना लागू केली नि गावागावात घरं बांधून दिली! त्यातून तुमचं हे तीन मजली घर उभं राहिलं!! हे खरंय का खोटंय?
उमराव : त्यांनी काय सांगावं? खरंच आहे की ते! आता हेच घ्या! वहिनींना मागल्या महिन्यात दोन नवी कोरी बुबुळं लावली, त्याचा खर्च कुणी दिला?
वडील : कुणी?
सरदार : हे काय विचारणं झालं का? नौरंगजेबाने! तुमच्या घरात आधी पाणी यायचं नाही! आता चोवीस तास पाणी येतं! कुणामुळे?
उमराव : अर्थात नौरंगजेबामुळेच! तुमची मुलगी आज रशियात एमबीबीएस करते. कशी?
वडील : (चमकून मुलीकडे पहात) काय सांगता? रशिया?
सरदार : हो, हो! रशियाच!! त्याची शिष्यवृत्ती दिली चहापन्हांनी! मागे युक्रेन युद्ध केवळ शिट्टी मारून थांबवून मुलीला परत आणलं कुणी?
वडील : कुणी?
उमराव : दिलेदिलदार नौरंगजेबांनी!
सरदार : तुमच्या अग्निवीर मुलासोबत दिवाळी साजरी केली कुणी?
उमराव : ब्यादश्या नौरंगजेबांनी!!
सरदार : आता त्याला काश्मीरी वधू नि मणिपुरी स्टार्टअप सुरू करून कोण देणार आहे?
वडील : (हात जोडत) झोलमखोर नौरंगजेब!
उमराव : बरोब्बर! आता हेच घ्या ना! तुमची फसल विमा योजना काढून…
वडील : फशेल विमा म्हणताय ना? हां मग ठिके!
उमराव : (उर्वरित वाक्य पूर्ण करत) सेवा केली कुणी?
सरदार : अर्थात नौरंगजेबांनी!
उमराव : त्यामुळे आम्ही तुमच्या प्रचंड काळजीवाहू कुटुंबसदस्याची तसबीर तुम्हाला भेट द्यायला आलोय! (तसबीर कुटुंबप्रमुख वडिलांच्या हाती सुपूर्द करतो. तसबीर हाती घेताच वडील ती तसबीर काळजीने निरखून पाहू लागतो.)
सरदार : ऊर भरून आला ना? येणारच! दिवसाचे अठरा-अठरा तास हा माणूस कामं करतो. केवळ तुमच्यासारख्या परिवारासाठी!
वडील : भरून आला म्हणजे? अगदी पावसाळ्यातल्या दिल्लीच्या नाल्यासारखा तुंबलाय!
उमराव : मग ह्या इलेक्शन सिझनमध्ये तुम्ही त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ काही बोलणार आहात की नाही?
वडील : मग सोडतो की काय? आजवर मी नौरंगजेबासारखा कुटुंब सदस्य पाहिला नव्हता! म्हणजे दोन वेळचं जेवण मिळावं म्हणून जे रेशन दिलं जातं, ते अत्यल्प किंमतीत दिलं जातं, मात्र महाशय फुकटचे ढोल पिटतात. काही राज्यात केवळ सत्ता नाही म्हणून ते अडवून ठेवलं जातं. अमुक कोटी लोकांना पक्की घरं देणार म्हणून तुमच्या सारखी भाट बोंबलत असतात, दरवेळी निराळेच आकडे सांगत, प्रत्यक्षात किती जणांना दिली याचा कुठलाही अधिकृत खात्रीशीर डेटा नाही. प्रत्येक घरात पाणी दिलं म्हणताना काहीक टक्के जनता अशुद्ध पाणी पितेय, याची आकडे पद्धतशीर मांडीखाली लपवली जातात. उपचाराचा खर्च सरकार करतंय म्हणताना औषधं-गोळ्यांवर देखील जीएसटी लावून लूट चालूय हेही लपवलं जातं. ज्या उज्ज्वला योजनेचं कौतुक सांगितलं जातं त्यातल्या किती लाभार्थी महिलांनी कोरोनानंतर रिफिल बंद केलंय, त्याचा डेटा बघितला तर योजना चुल्ह्यात गेलीय, हे सांगायला पुरोहित लागणार नाही. मुलांच्या शिक्षण आणि कौशल्य विकासाचे ढोल बडवताना वगळलेल्या बहुमूल्य धड्यांशिवाय ही मुलं पाश्चात्य जगाशी स्पर्धा करतील का? याची शंका येते! अग्निवीरच्या नावाखाली लष्कराचं इतकं बाजारीकरण झालंय की तरुण मुलं ही युज अँड थ्रोचं प्लास्टिक वाटू लागलीत. किसान हिताच्या नावाखाली शेतकर्यांच्या माना पिळणारे कायदे नि धोरणं राबवून शेतकरी दिल्ली ते गावच्या वेशीवर नागवला जातोच आहे. आणि हे नवीन स्टार्टअप नावाचं निरुपयोगी, निर्जीव खेळणं बाजारात चालतही नाही नि… आणि शंभर स्मार्ट सिटीच्या प्रिंटा कुठल्या गटारात वाहिल्या ते (ग्राज)नाथालाच ठाऊक! त्यात परिवार सदस्य होण्याची घाई करताना घरातल्या महिलांची अब्रू लुटणार्यांना बगलेत घेऊन येताना शरम वाटायला हवी! एकूण खंडणीखोर, रक्तपिपासू, नराधम, निर्दयी अशी विशेषणं शोभतील अशा समाजविघातक व्यक्तीला समाजानेही दूर लोटायला हवं! त्याची सुरुवात मी माझ्या घरापासून करेन. ही तसबीर घेऊन निघा आता!