‘डॉ. अल्बर्ट डिकुन्हा..’ निवेदकाने नाव उच्चारले आणि त्या हॉलमध्ये टाळ्यांचा प्रचंड कडकडाट निनादला. देशविदेशातून आलेले सगळे दिग्गज खुर्च्यांवर सावरून बसले. प्रत्येकाने जणू जिवाचे कान केले होते. डॉ. अल्बर्ट म्हणजे विज्ञान विश्वातील अग्रणी. त्यांचा प्रत्येक शब्द म्हणजे जणू एक अभ्यासनीय पुस्तकच असायचे. दोन वर्ष अज्ञातवासात गेलेले डॉ. अल्बर्ट आज पुन्हा जगासमोर येते होते. दोन वर्षापूर्वी त्यांच्या बायकोने आत्महत्या केली आणि डॉक्टर पूर्णपणे खचले. त्यामुळे आज पुन्हा प्रगट झालेले डॉक्टर काय बोलणार याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली होती.
‘फ्रेंड्स… माफ करा, गेली दोन वर्षे मी या जगापासून लांब गेलो होतो. माझ्या पत्नीच्या, मेरीच्या मृत्यूने मला जबरदस्त धक्का बसला होता. पण मी आता सावरलो आहे आणि एका नव्या ध्येयाने प्रेरित झालो आहे. हे ध्येयदेखील मला माझ्या पत्नीच्या मृत्यूने मिळाले आहे. माझ्या पत्नीने वेडाच्या भरात आत्महत्या केली असे तिचे डॉक्टर म्हणाले. पण मला ती मानसिक आजारी आहे असे कधीच जाणवलेही नाही. मी स्वत: एक डॉक्टर आहे, पण मला कधी तशी शंकाही आली नाही. या विश्वात असूनही ती तिच्या एका वेगळ्या विश्वात वावरत होती, याची जाणीवही कधी जवळच्या कोणाला कशी आली नाही?’ डॉक्टर काही क्षण थांबले, समोरच्या ग्लासमधले पाणी एका घोटात संपवत त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली.
‘आमच्याकडे हेल आणि हेवन अशा संकल्पना आहेत. सिल्व्हर सिटी म्हणतो आम्ही. हिंदूंमध्ये स्वर्ग आणि नरक आहे. प्रत्येक धर्मात नावे वेगवेगळी आहेत पण संकल्पना एकच आहे. पापी माणसांचे आणि पुण्यवान माणसांचे मृत्यूनंतरचे जग. पण माझ्या गेल्या दोन वर्षाच्या अभ्यासाने मी सांगतो, एक अजूनही तिसरे जग अस्तित्वात आहे आणि ते म्हणजे वेड्यांचे जग. नाही… असे आश्चर्याने माझ्याकडे बघू नका. मेरीच्या मृत्यूनंतर मी स्वतःला फक्त मानसोपचारात वाहून घेतले. जगातील प्रसिद्ध तज्ज्ञांची मिळतील तेवढी पुस्तके मी अभ्यासली. त्यातल्या व्याख्या समजून घेतल्या. विविध केसेस स्टडी केल्या. माझ्या दोन वर्षाच्या अभ्यासानंतर मी ठामपणे सांगतो की, आपण ज्यांना वेडे समजतो, ते वेडे नसतात, तर तुमच्या जगाला नाकारून ते स्वत:च्या एका विश्वात रममाण झालेले असतात. तुमच्या किंवा या जगाच्या अस्तित्वाचीही दखल ते घेत नाहीत. त्यांच्या विश्वात नक्की काय चालू असते? कसे असते हे विश्व? प्रत्येकाचे विश्व वेगळे असते हे नक्की. पण ते नक्की काय अनुभवत असतात? त्यांच्या जगात झाडे, पाने, फुले कोणत्या रंगाची असतात? प्राणी असतात का? असतील तर या जगात आहेत तसेच असतात, का काही वेगळे असतात? त्या जगातले लोक प्रगत असतात का? ते एकमेकांशी संवाद साधतात का? भीती, प्रेम, आनंद अशा भावना तिथे कोणत्या कारणाने निर्माण होतात? मुख्य म्हणजे त्या जगात असूनही आयुष्य संपवावे असे काही लोकांना का वाटते? ते नक्की आयुष्य संपवतात, का त्यामागे काही वेगळी प्रेरणा असते? मला अशा एखाद्या जगाचा अनुभव घ्यायचा आहे आणि त्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालत मी काही संशोधन करत आहे. तीन मनोरुग्ण सध्या माझ्याकडे उपचारासाठी आहेत आणि लवकरच मी त्यांच्यापैकी एकाच्या जगात प्रवेश मिळवेन असा मला ठाम विश्वास आहे.’ डॉ. अल्बर्टने आपले बोलणे संपवले तेव्हा तो हॉल विविध भावनांनी भरून गेला होता. कोणाच्या चेहर्यावर आश्चर्य होते, कोणाच्या चेहर्यावर असा जगावेगळा विचार करणार्या अल्बर्टचे कौतुक होते तर कोणी निव्वळ मूर्खपणा आहे असे समजत होते.
अर्थात, कोणाला काय वाटते याने अल्बर्टला फरक पडणार नव्हता. तो त्याच्या स्वप्नाने पूर्ण झपाटलेला होता. मनोरुग्णांवर उपचार करायचे, तर त्याच्या मनाचा ठाव घ्यायला हवा आणि त्यासाठी जो तो रुग्ण अनुभवतो आहे ते स्वत:देखील अनुभवायला हवे या मतावर तो ठाम होता. एखाद्या रुग्णाचा पाय मोडला, तर आपण त्याला होत असलेल्या वेदना झटकन समजू शकतो, कारण आपण आयुष्यात कधी ना कधी एखादी तरी शारीरिक वेदना अनुभवलेली असते. पण मनाने आजारी असलेल्या माणसाचे काय? तो वेडाच्या भरात खदखदा हसतो, पण तो हसतोय म्हणजे खरंच आनंदात असतो का? का त्याच्या जगात दु:ख दर्शवायला हसणे ही क्रिया घडत असेल? तो रडतो तेव्हा कदाचित त्यांच्या जगात काही गमतीशीर देखील घडत असेल. आपल्या जगाचे नियम वेड्यांच्या जगाला देखील लागू असतील असे थोडेच आहे?
‘सर… साडे तीन वाजता आलेत. थोडे तरी काही खा आता…’ डॉक्टरांच्या असिस्टंट अंजलीने आवाज दिला आणि अल्बर्ट भानावर आला.
‘येस येस.. खातो आणि झोपतो लगेच. उद्या सकाळी मला सरोजचे सेशन देखील घ्यायचे आहे.’
‘सर, दुपारचे साडे तीन वाजलेत,’ हसू लपवत अंजली म्हणाली आणि अल्बर्टने डोक्याला हात लावला. तीन वर्षापूर्वी दिल्लीच्या एका सायन्स डिबेटमध्ये तिची आणि डॉ. अल्बर्टची पहिल्यांदा ओळख झाली होती. कुशाग्र बुद्धीच्या अल्बर्टने तिला चांगलेच प्रभावित केले होते. अल्बर्टला देखील इतक्या लहान वयात मानसोपचाराच्या क्षेत्रात मोठी झेप घेतलेल्या अंजलीचे खूप कौतुक वाटले होते. त्यामुळे एक वर्षापूर्वी जेव्हा अल्बर्टने तिला मदतीसाठी विचारले, तेव्हा एका सेकंदाचा देखील वेळ न घेता तिने होकार भरला होता. अल्बर्टचे सर्वस्व झोकून काम करणे तिला आधी खूप आवडले होते. पण आता त्याची थोडी काळजी देखील वाटायला लागली होती. तो त्याच्या कामात इतका गुंतायला लागला होता की ना त्याला जेवण-खाण सुचत होते ना वेळेची गणिते जुळत होती. इतक्या श्रमाने एखादा दिवस तोच आजारी पडायचा अशी तिला भीती वाटायला लागली होती.
‘तुला सरोजबद्दल काय वाटते?’ अल्बर्टचा प्रश्न एकदम बाणासारखा आला आणि आता स्वत:च्या विचारात गुंतलेली अंजली भानावर आली.
सरोज नुकतीच उपचारासाठी अल्बर्टच्या बंगल्यावर यायला लागली होती. आठ वर्षाची चिमुरडी पोर मोठी लाघवी होती. तिच्याकडे पाहताना वाटायचे देखील नाही की क्षणात हा निरागस चेहरा एकदम क्रूर बनेल आणि हाताला येईल ती वस्तू घेऊन ती आपल्यावर हल्ला करेल. सरोजची केस मोठी विचित्र होती. गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे वयाच्या सातव्या वर्षीपर्यंत सरोज अगदी नॉर्मल होती. इतर सगळ्या मुलींसारखीच हसणारी, बागडणारी, सिंड्रेला, परी आणि जादुनगरीत रमणारी. काहीशा हट्टी असलेल्या सरोजला एक दिवस तिच्या आईने शिक्षा म्हणून अडगळीच्या खोलीत बंद केले आणि तिथे नक्की तिच्यासोबत काय घडले कल्पना नाही, पण त्यानंतर सरोज पूर्णपणे बदलून गेली. बोलता बोलता अचानक समोरच्या माणसावर धावून जायला लागली, हाताला लागेल ती वस्तू फेकून मारायला लागली. एक वेळ तर अशी आली की, तिला शाळेतून काढून कायमचे घराच्या एका कोपर्यात बांधून ठेवायला लागले.
‘मी तिची केस स्टडी केली आहे सर. मला वाटते तिला कसला तरी जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. कोणत्या तरी गोष्टीची तिला प्रचंड भीती वाटते आहे. ती गोष्ट अचानक पुन्हा पुन्हा तिच्या समोर येते आणि मग ती हिंसक बनते.’
‘अगदी बरोबर. तिला नक्की कशाची भीती वाटते आहे हे समजणे महत्त्वाचे आहे. त्या अडगळीच्या खोलीतल्या अंधारात नक्की काय घडले? तिथे तिला काही जाणवले का? तिच्या मनाने त्या अंधारात तिच्या समोर काय काय कल्पनाचित्र उभी केली असतील? तिला कसले कसले भास झाले असतील?’
‘पण ती सतत घाबरलेली नसते. कधी कधी तर संपूर्ण दिवस ती अगदी नॉर्मल असते.’
‘बरोबर! पण ती बरेचदा स्वत:च्या आईवडिलांना देखील ओळखत नाही. असे का होत असेल? त्यांच्या जागी मग तिला दिसते तरी कोण? कारण तिने काही वेळा त्यांच्यावर देखील हल्ला केलेला आहे. ज्या आईच्या मिठीत रात्री शांत बिलगून झोपली होती, त्याच आईच्या हाताला ती पहाटे पहाटे करकचून चावली देखील होती.’
‘तिचे वय देखील असे आहे की नक्की काय घडते आहे हे देखील तिला उमगत नसावे सर. मला वाटते आपण हिप्नॉसिसचा प्रयत्न करून बघितला तर?’
‘नो वे! ज्या तंत्रज्ञानावर मी काम करतो आहे ते अशा रुग्णांसाठीच तर आहे.
हिप्नॉसिसची काही गरजच नाही. माझा प्रयोग यशस्वी झाला तर सरोजच्या जगात मला सहज प्रवेश मिळेल आणि तिच्या अशा वागण्याचे रहस्यही मला क्षणात उलगडेल. आणि मग तिला मदत करणे माझ्यासाठी अगदी सहज शक्य असेल,’ डॉक्टर आत्मविश्वासाने म्हणाले तेव्हा अंजलीच्या चेहर्यावर कौतुक दाटून आले होते.
रात्री बारा वाजता फोन वाजला आणि सरोजचे वडील खडबडून जागे झाले. स्क्रीनवर डॉ. अल्बर्टचे नाव दिसले तसे ते विचारात पडले. डॉक्टर आणि इतक्या रात्री?
‘नमस्कार डॉक्टर साहेब..’
‘राजन तुम्ही आता या क्षणी सरोजला घेऊन बंगल्यावर येऊ शकाल का? लगेच निघा…’
‘डॉक्टर साहेब काय झाले आहे? काही काळजीचे कारण नाही ना?’
‘आज बहुदा मला सरोजच्या मानसिक आजाराचे खरे कारण कळणार आहे, मिस्टर राजन. मला वाटतंय माझा प्रयोग यशस्वी झाला आहे आणि मी आता अजून वाट नाही बघू शकत,’ अधीर आवाजात डॉक्टर
म्हणाले आणि ते ऐकून सरोजच्या वडिलांनाही कमालीचा आनंद झाला. वर्षभर अनेक डॉक्टर, हकीम, वैद्य, ज्योतिषी, तंत्र-मंत्र करून झाल्यावर आज कुठे त्यांना डॉ. अल्बर्टच्या रुपाने आशेचा किरण दिसत होता. त्यांनी झटकन कपडे बदलले, सरोजला घेतले आणि डॉक्टरांच्या बंगल्याकडे रवाना झाले.
बंगल्याचा दरवाजा सताड उघडा ठेवलेला होता. जणू आता दरवाजा उघडण्यातही वेळ घालवायची डॉक्टरांची तयारी नव्हती. सरोजचे बाबा तिला घेऊन थेट डॉक्टरांच्या स्टडी रूममध्ये घुसले. सरोजची सेशन्स बरेचदा तिथेच होत असत. आत डॉक्टर अस्वस्थपणे येरझारा घालत होते. टेबलावर एक कॉम्प्युटरच्या स्क्रीनसारखे दिसणारे यंत्र होते आणि त्याच्यावर दोन रंगाच्या दोन समांतर रेषा सतत आकार बदलत धावत होत्या. या सगळ्या धावपळीत सरोजलाही टक्क जाग आलेली होती. तिला काही मिनिटे स्वस्थ बसून दिल्यावर डॉक्टरांनी लगबगीने कामाला सुरुवात केली. त्यांनी आधी एक इंजेक्शन सरोजला दिले आणि दुसरे स्वत: घेतले.
‘राजन साहेब, साधारण पाच मिनिटांनी खर्या प्रयोगाला सुरुवात होईल. मी आणि सरोज दोघेही निद्रावस्थेत गेलेले असू, तुम्ही फक्त शांतपणे इथे बसून राहा. ही जी वर खाली होणारी लाल रेषा आहे, ती सरोजची आहे आणि खालची निळी रेषा माझी. या रेषा स्थिर झाल्या की खरा प्रयोग सुरू होईल. यातील एक रेषा जरी पुन्हा वर खाली व्हायला लागली, आकार बदलायला लागली तरी मला ताबडतोब जागे करायचे. वेळेला पाणी मारावे लागले तोंडावर तर तेदेखाrल करा, पण मला लगेच भानावर आणा.’ थोडेसे घाबरत का होईना राजन तयार झाले आणि डॉक्टरांनी त्या यंत्राची एक वायर सरोजच्या मेंदूला आणि एक हृदयाला चिकटवली. एक काळ्या रंगाची वायर त्यांची आपल्या मेंदूला लावली आणि यंत्राची काही विशिष्ट बटणे सुरू केली.
आधी सरोजचे आणि त्यानंतर डॉक्टरांचे डोळे बंद होत गेले. समोरच्या स्क्रीनवरील रेषा आता पुन्हा वर खाली होऊ लागल्या होत्या. काही क्षणात त्या दोन्ही रेषा वेड्यावाकड्या होत चक्क एकमेकीला चिकटल्या आणि क्षणात पुन्हा स्थिर पण समांतर धावू लागल्या. रेषा ज्या क्षणी एकमेकींना चिकटल्या त्या क्षणी डॉक्टर अल्बर्टचे अंतर्मन सावध झाले. त्यांना समोर एक प्रचंड मोठा काळा किल्ला आणि त्याच्या दारावर उभे असलेले सात फूट उंचीचे, अक्राळ विक्राळ चेहर्याचे कुत्रे देखील दिसले. किल्ल्याच्या मध्यभागी उंचीवर एक छोटी खिडकी होती आणि त्या खिडकीत सरोज बसलेली होती. रडवेल्या चेहर्याची बंदिवान सरोज…
डॉक्टर सावकाश पावले टाकत किल्ल्याच्या दिशेने निघाले. मात्र त्या कुत्र्याने त्यांची दखलही घेतली नाही. सरोजच्या मनोविश्वातल्या गोष्टींचा बहुदा आपल्याला धोका नसावा अशी त्यांना खात्री वाटायला लागली. तरी देखील सावधपणे ते किल्ल्याकडे निघाले. आत प्रचंड अंधार आणि कुबट वास भरून राहिला होता. आत एक मोठा हॉल होता आणि एका मोठ्या दिवाणावर एक अत्यंत रागीट चेहर्याची स्त्री आणि दोन मुली बसल्या होत्या. त्यांनी डॉक्टरांकडे पाहिले आणि नाक मुरडले.
डॉक्टर लगबगीने जिन्याकडे वळले आणि त्यांनी सरोज बंद असलेली खोली अंदाजाने गाठली. सरोजला एका साखळीने बांधलेले होते आणि तिच्या आजूबाजूला काही उंदीर फिरत होते. त्या उंदरांनी चक्क कपडे घातले होते.
स्वत:च्या मनोविश्वात सिंड्रेला बनून बंदी झालेली सरोज अत्यंत केविलवाण्या नजरेने त्यांच्याकडे बघत होती. तिला ज्या खोलीत बंद केले होते ती हुबेहूब तिच्या घरातल्या अडगळीच्या खोलीसारखी होती हे डॉक्टरांच्या लगेच लक्षात आले. त्या दिवशी सरोजला तिच्या आईने खोलीत बंद केल्यावर काय घडले असावे आणि सरोजच्या मनाने त्यावेळी खेळलेले खेळ सारे त्यांच्या आता लक्षात आले होते. त्यांनी झटक्यात सरोजला बंधनातून सोडवले आणि तिला घेऊन ते खाली निघाले. अलगद जिन्यावरून खाली उतरले आणि क्षणात त्यांनी सरोजला खांद्यावर घेत दरवाजा गाठायचे ठरवले आणि पळत सुटले. मागून भुंकण्याचा कर्कश आवाज झाला आणि ते सावध झाले. सरोजच्या विश्वात त्यांना नसला, तरी सरोजला धोका नक्की होता आणि त्यांना काही करून तिची सुटका करायची होती. जिवाच्या आकांताने ते धावत होते, पण किल्ला काही संपत नव्हता आणि त्याचे दार देखील दिसत नव्हते…
एखादा चकवा लागल्यासारखे ते धावत होते आणि भुंकण्याचा आवाज जवळ येत चालला होता. त्याचवेळी अचानक त्यांना काही अंतरावर उजेड दिसायला लागला आणि मागचा भुंकण्याचा आवाज देखील नाहीसा झाला. त्यांना स्फुरण चढले. ते वेगाने त्या दिशेने धावले. तिथला एक दरवाजा उघडा होता आणि दरवाजाबाहेर सरोजचे वडील अत्यंत आनंदी चेहरा करून दोघांचे स्वागत करायला उभे होते. त्यांनी पटकन सरोजला खाली उतरवले. ती धावतच बाहेर पळाली आणि वडिलांनी बिलगली. थकलेले डॉक्टर अल्बर्ट कष्टाने एकेक पाऊल पुढे टाकत दरवाज्याकडे निघाले. मात्र त्याचवेळी अचानक सर्वत्र काळोख पसरला आणि समोरचा दरवाजाही क्षणार्धात बंद पडला.
बंगल्याचा दरवाजा सकाळी सकाळी सताड उघडा बघून अंजलीला जरा आश्चर्यच वाटले. ती आपल्यामागे दरवाजा लावत आत शिरली. डॉक्टर स्टडीमध्ये असणार होते हे नक्की पण ते चक्क गाढ झोपलेले होते हे आणखी एक नवल. तिने त्यांना हाक मारली पण ते गाढ झोपलेले असावेत. शेवटी तिने चक्क त्यांना हालवून उठवले आणि ते जागे झाले. काही क्षण त्यांची नजर एकदम कावरी बावरी झाली आणि दुसर्या क्षणी ते घाबरून तिच्यापासून लांब झाले आणि म्हणाले, ‘ड्रिझेला.. मी शपथ घेऊन सांगते.. ती काचेचे बूट घालून काल समारंभात आलेली मुलगी मी खरंच नव्हते! विश्वास ठेवा माझ्यावर…’