मतदार
लालूंनी तो तीर मारता
कर्तव्याचे आले भान
मेरा भारत मेरा परिवार
गर्जत सुटले पंतप्रधान
किती करावे कौतुक त्यांचे
देशासाठी करती त्याग
खरे सांगता की ते खोटे
जनता त्याचा घेईल माग
घ्या घ्या मागून काय हवे ते
ये है मोदी की गारंटी
आई, बाप नि मुलेही मजबूत
होतील त्याची काय गॅरंटी?
—– —–
सुप्रीम कोर्ट
आमच्या निर्देशांना टाळून
का करतो हा ही मनमानी
खोक्यात गेली हवा त्यांच्या
आठ एप्रिलला मागेल पाणी
चोरांना हा साव ठरवतो
कसा करी तो आंधळा न्याय
सत्ताधार्यांचा आहे बाहुला
खाली डोके, वरती पाय
खरीच सेना आहे कुणाची
जनतेलाही आहे माहीत
उगाच अक्कल पाजळतो हा
आठ एप्रिलला जाईल खाईत
—– —–
मोदी – शहा
पक्षाची जी विचारधारा
संपवण्याचे करतो काम
जे जे कट्टर करतो निकामी
आयारामातच दिसतो राम
अटल – लाल ते नितीन गडकरी
संघशक्तीचे सच्चे पाईक
खड्यासारखे वगळू त्यांना
घेऊ भ्रष्टाचारी घाऊक
ठरवून सारे भावी प्लॅनिंग
जाणीवपूर्वक करतो निश्चित
पक्षाचा हा भेसूर चेहरा
आता भुता हाती भागवत
—– —–
अजित पवार
भ्रष्टाचार-मुक्त झालो तरी
अजून सोडत नाही ईडी
फडणवीसांचा संशय वाटतो
त्यांचाच खेळ हा नवी सापशिडी
बजेटमध्ये कापून टाकले
पोलिसांचे मी निम्मे बजेट
त्याचेच तर हे काढती उट्टे
आता मलाही करून टार्गेट
मी निवडणुकीत पडणार याची
त्यांना आहे पुरी खात्री
मार्ग मोकळा करण्यासाठी
हातात घेऊन बसलेत कात्री
—– —–
जनता
सरकारलाही पुरून उरले
आंदोलन हे शेतकर्यांचे
पाशवी हल्ले त्यांच्यावरती
कसले कैवारी जनतेचे?
दिल्लीसीमेवर शेतकर्यांना
ट्विटर बंदीची का सक्ती
आणीबाणीपेक्षा भयंकर
केंद्राची ती निष्ठुर युक्ती
शेतकर्यांच्या भल्यासाठीच्या
गारंटीच्या फक्त घोषणा
शेतकरी तर विटून गेले
ऐकून यांच्या झूठ भाषणा