कसं काय पवार साहेब बरं हाये का? काल काय ऐकलं ते खरं हाये का?
– अप्पासाहेब मुंडले, भोकरदन
आमचं अगदी बरं आहे आणि जे तुम्ही ऐकलंत ते खरं आहे… पण उद्या ‘अगं बायो बायो’ असं म्हणत टाळ्या वाजवत फिरेन असं वाटतंय… तुमच्या प्रश्नामुळे… (तेव्हा प्लीज प्रश्नच विचारा… गाणी म्हणून आमचा गणा करू नका.)
आपला फोन आपल्या बायकोच्या हातात दिसला तर नवर्याने त्यानंतर कसं वर्तन केलं पाहिजे? तुम्ही अनुभवी सिनियर आहात, म्हणून विचारतोय.
– श्रीनिवास कांगणे, बीड
अशा वेळेला कसलाही कांगावा करू नये कांगणेजी… गप्प स्थितप्रज्ञ व्हावे. आरग्युमेंट न करता शरण जावे… आलिया भोगासी म्हणत सर्व भोगावे… (यात आमचा अनुभव शून्य आहे. कारण आमच्या फोनमध्ये आमच्या कर्माचा डाटा शून्य आहे. कारण आम्ही विषाची परीक्षाच घेत नाही… तुम्हीही घेऊ नका. (तुमच्या प्रश्नावरून आपण भोळे सांब वाटत नाही. त्यामुळे हलाहल पचणार नाही.. हाल हाल होतील… तुमचेही आणि तुमच्या फोनचेही.) विशेष सूचना : अशा प्रकरणात सीनियर ज्युनिअर चालत नाही.
सिनेमावाल्यांच्या जगात कास्टिंग काऊच नावाचा काहीतरी प्रकार असतोय, असं ऐकलंय. तुमच्या नाटकवाल्यांच्या जगात असतंय का असं काही? जरा विस्कटून सांगा.
– नझीर शेख, कोल्हापूर
का? आयुष्य ‘विस्कटून’ घ्यायचंय का? कसंय… द्राक्षं सगळ्यांनाच खावीशी वाटतात… पण ज्यांच्यात ‘अशी’ द्राक्षं पचवण्याची हिंमत नसते ते द्राक्षांच्या वाटेला जात नाहीत. पण जे आंबटशौकीनच असतात ते द्राक्षं गप खातात आणि गप पचवतात… पण ‘अशी’ द्राक्षं ज्यांच्या ‘रेंज’मध्ये येत नाहीत, ते द्राक्षं आंबट आहेत म्हणून बोंब मारतात… मग ते लबाड कोल्हे असोत की कोल्हीणी. आणि असे कोल्हे आणि कोल्हीणी प्रत्येक जगात आहेत. उगाच सिनेमा-नाट्य जगाच्या नावाने ‘तिकीट’ फाडू नका…
फेसबुकवर त्याला माझ्यापेक्षा चांगली मुलगी भेटली म्हणून तो मला सोडायला निघालाय… फेसबुकवरची ‘ती’पण मीच आहे, हे कळल्यावर त्याचं काय होईल?
– सारिका नेने, पुणे
आपल्या नशिबात हीच आहे म्हणून आयुष्याचा कंटाळा येईल त्याला. किंवा मी हिचाच असतानाही ही माझ्यात दुसरा शोधतेय, अशी शंका आली तरी आयुष्याचा कंटाळा येईल त्याला… आणि तुम्हाला सोडायला निघालेला जग सोडायला निघेल बिचारा… (जर तुम्हालाच त्याला सोडायचं असेल तर त्याला असं धरून ठेवू नका.. त्याला तसं स्पष्ट सांगा… त्याच्याबरोबर फेबू फेबू खेळू नका.. काय होतं… मांजराचा खेळ होतो पण उंदीर जातो जिवानिशी..
परवा आमचे नाना भेटले होते. मी पुन्हा येईन पुन्हा येईन, म्हणता म्हणता, आता मला मोकळं करा, मला मोकळं करा, असं काहीतरी अॅरिथमॅटिक सांगायला लागले आहेत हल्ली. कशाने असा परिणाम झाला असेल त्यांच्यावर?
– विलास झगडे, नाशिक
आधी नानांच्या पुन्हा येण्याच्या कर्तृत्वाने खुश होऊन नानींनी नानांचं ‘गुणगान गायला’ सुरुवात केली असेल… पण नानांच्या नाना ‘कळा’ नानांच्याच अंगलट आल्यावर नानीने ‘रडगाणं गायला’ सुरुवात केली असेल.. नानींच्या त्याच ‘गाण्यांचा’ परिणाम नानांवर झाला असेल. नानांचा प्रॉब्लेम समजून घ्या. जगावर तोंडसुख घेताघेता स्वतः तोंडघशी पडल्यावर आपल्या घरी तोंड देणं कठीण होतं… तेव्हा भल्याभल्यांच ऐरोथमॅटिक ऑटोमॅटिक बिघडतं… (आम्ही उत्तर तर दिलंय.. पण तुमच्या प्रश्नातले नाना कोण हे नाही कळलं.)
पवार साहेब, तुम्ही देव मानता का हो?
– नरेंद्र मुळीक, पनवेल
प्रत्येक प्राणी माणसात देव आहे असं आम्ही मानतो… पण जो माणूस स्वतःला देव मानतो अशा माणसाला आपण ‘मानतो.’
शहाण्या माणसाने लग्न करण्याच्या फंदात पडू नये, असं म्हणतात. म्हणजे जगात शहाण्या माणसांची संख्या फार कमी आहे का?
– अद्वैत कामत, पणजी
कबूल आहे माणसं लग्न करण्याचा गाढवपणा करतात.. पण काही गाढवं शहाण्यासारखं गप संसाराच ओझं वाहतात. अशा गाढवांची संख्या कमी आहे. कारण काही गाढवं ‘तरीही माणस लग्न का करतात’ असं विचारत स्वत:चा गाढवपणा लपवतात आणि अशा अतिशहाण्या गाढवांची संख्या जास्त आहे. (आपलं लग्न झालंय का अद्वैतजी… सहज विचारलं. बाकी काही नाही.)