निवृत्त पोलीस अधिकारी अजित देशमुख यांच्या पोलीस तपासांतील आठवणींच्या कथांचा संग्रह असलेला, पोलीस आणि गुन्हेगार यांच्या मनाचा वेध घेणारा पोलीस`मन’ हा संग्रह संवेदना प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. त्यातील हे एक मनोज्ञ प्रकरण…
– – –
मुंबईतील घाटकोपरच्या पूर्वेला असलेला गारोडियानगर हा भाग पहिल्यापासूनच उच्चभ्रू गुजराती समाजाचा. प्रामुख्याने केमिकल्सचे कारखानदार आणि हिरे, किंमती खडे यांच्या व्यावसायिकांची निवासस्थाने असलेला. फेब्रुवारी १९९०मध्ये या परिसरातील इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर राहणार्या एका वृद्ध जोडप्याला राहत्या घरात लुटल्याची घटना घडली. त्यांच्या घरगड्याने साथीदारांच्या मदतीने दोघांचेही हात व तोंड बांधून ठेवून घरातील दागदागिने आणि थोडी रोकड लुटून पलायन केल्याची जबरी चोरीची फिर्याद पंतनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली. गुन्ह्याचे स्वरूप गंभीर होतेच, त्यात लुटलेल्या दागिन्यांमध्ये बहुतांशी दागिने हिरेजडित असल्याने लुटीची एकूण किंमतही मोठी होती.
असा काही गंभीर गुन्हा नोंदला गेला की, त्या परिसराशी संबंधित क्राईम ब्रँच युनिटच्या अधिकार्यांनी स्वतःहून समांतर तपास करणे अपेक्षित असते. घाटकोपरपासून मुलुंडपर्यंत हद्द असलेल्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या युनिट-६मध्ये त्या वेळी मी नेमणुकीस होतो. सर्वप्रथम मी आणि माझे सहकारी हवालदारांनी फिर्यादीच्या घरी विचारपूस केली. फिर्यादी कुटुंबीयांचा रबर उत्पादनाचा पिढीजात व्यवसाय आणि स्वतःचा कारखाना होता. लग्न झालेली दोन मोठी मुले, त्यांच्या पत्नी, मुले आणि आई-वडील अशा या मोठ्या कुटुंबाला राहण्यासाठी पाचव्या मजल्यावर भला मोठा पाच खोल्यांचा फ्लॅट होता. वय झाल्यामुळे वडील सध्या घरातच असत. एरवी सुना, नातवंडेसुद्धा घरात असत. मात्र गुन्हा घडला त्याच्या आदल्या दिवशी ते वृद्ध दाम्पत्य वगळता इतर सर्व जण जवळच्या नातेवाईकाच्या लग्नासाठी बाहेर गेले होते. नेमकी ती वेळ साधून घरगड्याने आपले काम फत्ते केले होते.
मी घरगड्याचे नाव विचारले.
`राजू.’ अपेक्षित उत्तर मिळाले.
`पूर्ण नाव?’
`माहीत नाही.’
`त्याचं गाव?’
`मद्रासी है.’
आता मद्रासी म्हणजे कर्नाटक, आंध्र, केरळ किंवा तामिळनाडू अशा कोणत्याही दक्षिणेकडील प्रांतातून आलेल्या इसमाला लोक मद्रासी म्हणून संबोधतात.
`राहतो कुठे?’
‘रमाबाई कॉलनीके आजूबाजूमें रहता हूँ, ऐसा कभी बोला था.’
अशी प्रश्नोत्तरे झाली.
संशयित आरोपीचा माग काढण्यात आम्हाला वाटल्या होत्या तशाच अडचणी समोर दिसू लागल्या. पोलिसांनी असंख्य वेळा जनजागृती कार्यक्रमांद्वारे आवाहन केले असले, तरी बहुतांशी लोक घरात कामाला ठेवलेल्या नोकराची तपशीलवार माहिती जवळ ठेवत नाहीत. आधार कार्ड वगैरे त्या काळात नव्हते. तरीही त्याचं पूर्ण नाव, राहता आणि गावाकडील पत्ता टिपून ठेवायला कितीसा वेळ लागतो? त्यात दक्षिण प्रांतातून आलेल्या मुलांची नावे लांबलचक असल्यामुळे घरकामाच्या ठिकाणी मालक-मालकीण त्याला राजू किंवा पिंटू करून टाकतात.
या दांपत्याकडे असलेला घरगडी त्या दिवशी भांडी धुणी करून दुपारी गेला. मात्र संध्याकाळी दोन मित्रांना घेऊन परत आला. मालकिणीने दार उघडल्यावर मित्रसुद्धा घरात घुसले. तिघांनी घरातील टॉवेल, पंचे घेऊन शेठ शेठाणीला खुर्चीला बांधले. दोघांनीही आरोपींना, ‘हवे ते घ्या, पण आम्हाला मारू नका’ असे विनवले. म्होरक्या त्याच घरातील घरगडी होता. त्याने शेठाणीला धमकावत तिच्या अंगावरील दागिने आणि कपाटाच्या चाव्या घेतल्या. लॉकर उघडून होते तेवढे दागिने आणि रोकड काढून घेतली. सुना लग्नसमारंभाला गेल्यामुळे बरेचसे दागिने त्यांच्याबरोबरच गेले असल्याने ते मात्र वाचले. घरात २० ते २५ मिनिटे वावरून तिघेही आरोपी लुटीचा माल घेऊन बाहेर पडले. ते गेल्यावर मालकिणीने महत्प्रयासाने आपले बांधलेले हात सोडवून घेतले आणि १०० नंबर फिरवून पोलीस कंट्रोल रूमला घडल्या प्रकाराची माहिती दिली. पोलीस तत्काळ हजर झाले आणि घरातील जबरी चोरीचा गुन्हा पंतनगर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला.
मुख्य आरोपी त्याच बिल्डिंगमध्ये दुसर्या बिर्हाडातही भांडी धुण्याचे काम करत असे. त्या घरातून असे कळले की त्यांच्या गिरगावमधील बहिणीकडे जो घरगडी होता, त्याचा हा लांबचा नातेवाईक होता. त्याच्याच शिफारशीवरून याने घाटकोपरला काम मिळवले होते. दुर्दैवाने शिफारस करणारा घरगडी त्या वेळी बायको आजारी असल्याने गावी गेला होता. बरं, त्याचं नाव विचारलं तर तेही `राजू’ असे कळले आणि गाव… माहीत नाही.
आता आली का पंचाईत? मात्र, गिरगावमधील संबंधित घराचा पत्ता समजला. त्या पोलीस ठाण्यात पूर्वी नेमणुकीस असलेले माझे जुने जाणते सहकारी भरगुडे हवालदार ताबडतोब म्हणाले, ‘सर, आरोपी पोरं आंध्र प्रदेशची आहेत. आदिलाबाद किंवा करीमनगर डिस्ट्रिक्ट. शंकाच नको. त्यांनी हे छातीठोकपणे सांगण्याचे कारण म्हणजे, मुंबईत डोक्यावरच्या करंडीत कुल्फीचे कोन घेऊन रात्री `कुल्फी ये’ ओरडत फिरणारे जसे एकाच तालुक्यातील, मुंबईतील डबेवाले जसे एकाच तालुक्यातील, चौपाटीवर रात्री काळे जाकीट घालून `तेलमालीशऽऽ’ असे ओरडत फिरणारे जसे बिहारच्या एकाच भागातील; तसे गिरगावमधील विल्सन शाळेच्या परिसरातील एकजात घरगडी आंध्र प्रदेशमधील त्या ठराविक दोन जिल्ह्यांतीलच असत. आमची एक टीम ताबडतोब रमाबाई कॉलनीमधील आंध्र प्रदेशकडून आलेल्या कामगारांची राहती ठिकाणे हुडकून काढण्यासाठी रवाना झाली. जे घरगडी नव्हते, ते बांधकाम मजूर म्हणून काम करणारे होते. गरिबीने पिचलेले असे राजय्या, व्यंकय्या अशा नावांचे ते कामगार एकमेकांपासून जवळजवळ राहत होते. त्यांच्या चौकशीत असे निष्पन्न झाले की, आदल्या दिवशी एकूण पाच गाववाले रात्री घरी आलेच नव्हते. फिर्यादीच्या घरी काम करणारा म्होरक्या आरोपी या पाचांमध्ये होता. सर्वांची नावे-गावेही मिळाली. इतकेच नव्हे, तर पाच आरोपींपैकी एकाचे वडील आम्हाला भेटले. नरसय्या नावाचा हा चाळिशीचा इसम तपासात मदत करण्यास स्वत:हून तयार झाला. आरोपींची ओळख २४ तासांच्या आत पटल्याचा आम्हाला आनंद वाटत असला, तरी खरे आव्हान पुढे होते. या पाचही संशयित आरोपींचे खेडेगाव रामगुंडम नावाच्या गावाशेजारी. जिल्हा आदिलाबाद, आंध्र प्रदेश.
मी, भरगुडे हवालदार, अंकुश कोंडे हवालदार असे नरसय्याला बरोबर घेऊन प्रथम हैदराबाद आणि तिथून एसटी बसने करीमनगर मार्गे आदिलाबाद जिल्ह्यामधील मंचेरियाल तालुक्यातील रामगुंडम येथे पोहोचलो. जाताना हैदराबाद येथे राज्य पोलीस मुख्यालयात जाऊन तेथील वरिष्ठांची भेट घेऊन आमच्याकडील तपासाची माहिती सादर केली आणि ज्या ठिकाणी जायचे होते तेथील संबंधित पोलीस ठाण्यासाठी आम्हाला स्थानिक पातळीवर आवश्यकता भासल्यास मदत करण्याच्या सूचना मंजूर करून घेतल्या. त्या भागात नक्षलवाद्यांचा सतत वावर असल्याचे तेथील वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले, आवश्यकता असल्याशिवाय आणि स्थानिक पोलिसांना कल्पना दिल्याशिवाय कोठेही फिरू नका, अशा सूचनाही आम्हाला दिल्या. त्याबरोबरच विशेष शाखेचा एक अधिकारी आमच्याबरोबर दिला.
आम्ही रामगुंडमला रात्री पोचलो. स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन रिपोर्ट दिला. मुख्यालयातील अधिकारी बरोबर असल्याने सगळ्या प्रक्रिया सुकर झाल्या. आम्ही रात्रीच आरोपींच्या वस्तीवर जाण्याचे ठरवले होते, परंतु स्थानिक पोलीस ठाण्याने रात्रीच्या वेळी कारवाईस ठाम विरोध दर्शविला. सकाळी भल्या पहाटे त्या कामगिरीवर निघण्याचे आम्ही ठरवले. आरोपी हुडकण्याच्या प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी आमच्याबरोबर असण्यासाठी दोन पोलिसांची नेमणूकही पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्याने केली. हे सर्व सोपस्कार आटोपून आम्ही त्या गावातील एकुलत्या एका लॉजमध्ये उतरलो.
दुसर्या दिवशी भल्या पहाटे आम्ही पोलीस, नरसय्या आणि दोन पंच साक्षीदार असे पोलीस जीपने आरोपींच्या वस्तीवर २०-२५ मिनिटात पोहोचलो. नरसय्याला बुरखा घातला होता. कारण त्याची ओळख त्या वस्तीवर कोणालाही पटून चालणार नव्हते. भविष्यात त्याच्या जिवाला धोका निर्माण झाला असता.
अजून उजाडले नव्हते. वस्तीवरील कुत्र्यांच्या भुंकण्याने काही दारे किलकिली झाली, मात्र हत्यारबंद पोलिसांचा जथा पाहून कोणीही घराबाहेर पाऊल टाकायला धजावले नाही. त्या वस्तीवर आरोपींची झोपडीवजा घरे दाखवून झाल्यावर नरसय्याला एका पोलिसासोबत जीपने लॉजवर परत पाठविले. वस्तीवर भेटलेल्या त्यातल्या त्यात समजूतदार माणसाला हेरून आरोपींची चौकशी केली. आरोपींपैकी दोघे जण दोनच दिवसांपूर्वी येऊन घटकाभर थांबून लगेच `हैदराबादकडे कामासाठी जातो’ असे सांगून निघाले होते. त्यांच्यापैकी एकाची तब्येत बरी नव्हती, असेही कळले. सर्व आरोपींच्या घरांची पंचासमक्ष झडती घेतली. काही हाती लागले नाही. फक्त त्यांच्या घरातील अठराविश्व दारिद्र्याचे दर्शन झाले. आजूबाजूचे ओढे-तळ्यातील मासे पकडून आणि मिळेल त्या मोलमजुरीवर काम करून उदनिर्वाह करणार्यांच्या घरात काय असणार?
आम्ही लॉजवर परतलो.
`गावात डॉक्टर किती आहेत?’ अशी मी लॉजच्या मालकाकडे चौकशी केली. तिथे रेड्डी नावाचे एकुलते एक एल. सी. पी. एस. डॉक्टर होते. त्यांना जाऊन भेटलो. त्यांना इंग्लिश जेमतेम कळत होते आणि हिंदीचा गंध नव्हता. हे डॉक्टर आपल्या घराच्या ओटीवरच दवाखाना थाटून होते. भाषेची कसरत करत प्रथम मी माझी ओळख करून दिली. दोन दिवसांपूर्वी कोणी दोघे तरुण येऊन गेले काय, अशी विचारणा करताच ते ‘येस-येस,’ असं म्हणत घरात गेले आणि एक मध्यम आकाराचा पॅनासॉनिक कंपनीचा कॅसेट टेपरेकॉर्डर घेऊन बाहेर आले. दोघांपैकी आजारी असलेल्याला औषध घेण्यासाठी ते दोन आरोपी या डॉक्टरांकडे आले होते आणि फी म्हणून रोख रकमेऐवजी हा टेपरेकॉर्डर डॉक्टरांना देऊन गेले होते. फिर्यादीमध्ये या टेपरेकॉर्डरचा उल्लेख होताच. रीतसर पंचनामा करून तो आम्ही ताब्यात घेतला. त्या केसमधील लुटीचा परत मिळालेला हा माल जरी अत्यल्प असला, तरी आमचा तपास योग्य वळणावर असल्याची खात्री पटली होती.
तिकडे आणखी दिवस थांबण्यात काही हशील नव्हते. आम्ही मुंबईत परतलो.
नरसय्या आमच्या निगराणीखाली कामावर जात होता. तो नात्यातल्या लोकांशी सतत संपर्कात होता. बिचारा दिवसा बांधकामाच्या साईटवर मजुरी करून संध्याकाळी विक्रोळी, भांडुप परिसरात फिरून अनेक गाववाल्यांच्या भेटी घेत असे. त्याने जमवलेल्या माहितीच्या आधारे आम्ही एक-एक करून चार आरोपींना उत्तर मुंबईतील वेगवेगळ्या भागांतून अटक केली. त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली होती की, त्या वृद्ध दांपत्याकडे घरकाम करणारा सुबय्या याने या गुन्ह्याची आखणी केली होती. घाटकोपर पूर्व भागात कामाला असलेल्या चार गाववाल्यांना एकत्र करून त्याने त्याची योजना समजावून सांगितली होती. शेठकडे रग्गड पैसा आहे आणि इतकी लूट मिळेल की, पुन्हा नोकरी करायची आवश्यकताच भासणार नाही, असे चित्र निर्माण करून त्याने इतरांना गुन्ह्यात सामील होण्यास राजी केले होते. गुन्हा करताना सोबत दोघांना घरात घेऊन, कोणी आलेच तर इशारा करण्यासाठी इतर दोघांना त्याने जिन्यात उभे करून ठेवले होते.
गुन्हा केल्यावर आरोपींना कळून चुकले की, अपेक्षा केली होती तशी रोख रक्कम फार काही हाती लागली नाही. जी मिळाली, ती पळून जाताना प्रवासखर्चात संपत आली होती. जेवढी उरली त्यातील बरीचशी स्वत:कडे ठेवून बाकीची म्होरक्या सुबय्याने इतरांना वाटली. लुटीतील इतर सर्व माल मात्र त्याने स्वत:कडेच ठेवला होता. गुन्हा घडल्यावर ते प्रथम गावाकडे पळून गेले. तिथे गावाबाहेरील स्मशानाजवळ उघड्या माळरानावर लूट उघडून पाहिली. त्यात जे काही दागिने होते, ते जवळजवळ सर्वच हिरेजडित होते. त्यांचा हिरमोड झाला. सोनं विकता येईल; पण या हिर्यांचं काय करायचं, हा यक्षप्रश्न! लहानपणापासून खायची ददात असलेल्या घरात वाढलेल्या त्यांना तो पडला. एक मोठा चपटा दगड घेऊन त्यावर ठेवून दुसर्या दगडाने एक-एक करत सर्व दागिने चेचून टाकत त्यांनी हिर्यांपासून सोने मोकळे केले. मातीत पडलेले हिरे तिथेच सोडून चेचलेल्या दागिन्यांचे सोने घेऊन खुशीत निघाले. हा ऐवज सुबय्याने स्वत:कडे ठेवला आणि काही दिवसांनी एकत्र भेटल्यावर आपण सोने विकून पैसे वाटून घेऊ, असे सांगून बाकीच्यांना एकत्र न फिरण्याचा सल्ला देऊन स्वतः कुठे जातोय ते न सांगता निघून गेला.
अगदी खूप नव्हे, परंतु काही दिवस काम न करता ढकलता येतील, या विचाराने हे चार जण प्रथम हैदराबादला गेले. तिथे त्यांची राहायची सोय नव्हतीच. कामही मिळेना. तेव्हा मग सर्वांना सामावून घेणारी आणि कोणालाही उपाशी न ठेवणारी मुंबई नगरीच बरी, म्हणत हे चारही जण मुंबईत परतले. घाटकोपरपासून लांब राहिलो तर पोलीस पकडू शकणार नाहीत, या भ्रमात त्यांनी विक्रोळी-भांडुप परिसरात मजुरी करून गुजराण करायला सुरुवात केली होती.
त्यांच्यापैकी एका आरोपीला घेऊन आम्ही परत रामगुंडम गाठले. जिथे या आरोपींनी सोने आणि हिरे वेगळे करण्यासाठी दगडाने चेचले होते, त्या जागेचा पंचनामा करून पुरातत्त्व विभागाचे शास्त्रज्ञ जशी उकरतात तशी तेथील माती काळजीपूर्वक तपासत त्यातील लहान-मोठे हिरे जमा केले. जमीन ढेकळांची होती. त्यांच्या फटीत टॉर्च मारला की आतून हिरे चमकत. मग अगदी खालची माती काढणे भाग पडायचे. त्यात पाचू, किमती खडेही मिळाले. माती लागून मळलेले हिरे पट्कन दृष्टीस पडत नसत. त्यामुळे जवळजवळ पाच फूट व्यासाचे क्षेत्र फूटभर उकरून काढून त्यातील माती काळजीपूर्वक तपासत हिरे, माणके अथकपणे शोधण्याचे काम काही तास चालले.
लुटीचा बहुतेक सर्व माल आता हस्तगत झाला होता. गुन्ह्यातील मुख्य आरोपीकडे सगळे सोने असल्याने त्याला लवकरात लवकर अटक होणे जरुरीचे होते. त्याच्या राहत्या गावातील घरात कोणीही नव्हते. ते घर बंद असल्याने त्याचे नातेवाईक, मित्रमंडळींविषयी काही माहिती मिळत नव्हती. त्याचे वर्णन व इतर आवश्यक तपशील नमूद करून त्याचा सुगावा लागल्यास अटक करून मुंबई पोलिसांना तत्काळ कळविण्याबद्दलचे पत्र स्थानिक पोलीस ठाण्याला देऊन आम्ही परतलो.
मे महिना उजाडला आणि एक दिवस रामगुंडम पोलीस ठाण्यातून आमच्या युनिटमध्ये फोन आला की, वॉन्टेड आरोपी सुबय्या त्या पोलीस ठाण्याला सापडला आहे. आम्ही विनाविलंब पुन्हा रामगुंडमला निघालो. या वेळी जरा अधिक उत्साहात, कारण मुख्य आरोपीला ताब्यात घ्यायचे होते. या वेळी काही तांत्रिक कारणामुळे रेल्वेगाडी हैदराबाद येथे फार उशिरा पोहोचली. तिथून करीमनगर, मंचेरियाल करत रामगुंडम येथे आम्ही मध्यरात्री पोहोचलो. एकदा आरोपीचा ताबा घेतला की, कशालाही फुरसत मिळणार नाही, अशी खूणगाठ मनाशी बांधून सर्व आवरून पोलीस स्टेशनला सकाळी लवकर गेलो.
आरोपी कुठे आहे विचारलं, तेव्हा तेथील हवालदारानी खोलीतल्या एका कोपर्यात बोट दाखवलं. तीन दिवसांपूर्वी पकडलेल्या या सुबय्याने केलेल्या गुन्ह्याची आणि त्यातील त्याच्या सहभागाची पुरेपूर कल्पना असलेल्या स्थानिक पोलिसांनी तो आढळताच आमचे काम हलके करण्यासाठी त्याची कसून चौकशी केली होती; परंतु लुटीतील सोन्याबद्दल सुबय्या काही बोलला नव्हता. ते सोने इतर आरोपींकडेच असल्याचा घोषा त्याने चालू ठेवला होता. मी त्याच्या जवळ गेलो. पोटाशी पाय धरून, जमिनीवर मुटकुळं करून निपचित पडून राहिलेल्या त्या अत्यंत कृश प्रकृतीच्या तरुणाच्या डोळ्यांत कसलीच जाणीव दिसत नव्हती. ‘त्याला ताबडतोब डॉक्टरकडे न्यायला पाहिजे’ असं मी तिथल्या अधिकार्याला सांगितलं. त्यावर ‘हां-हां. मंचेरियाल लेके जाना पडेगा. डॉक्टर आनेका मेसेज मिलतेही भेज देंगे,’ असं त्यानं सांगितलं. अशा अवस्थेत आरोपीला मुंबईपर्यंत नेणे अशक्य होते. त्याच्यात उभं राहण्याचेही त्राण नव्हते. त्याने सोने कुठे ठेवले आहे याची चौकशी होणे तर तातडीचे होते. माझे सहकारी हवालदार अंकुश कोंडे यांना मी खुणावून आरोपीला पोलीस ठाण्याच्या बाहेरील ओट्यावर घेऊन यायला सांगितले. सुबय्या उठू शकत नव्हता. कसाबसा खुरडत तो बाहेर आला. कोंडे यांनी त्याला ओट्याशी टेकून बसवला. हनुवटी छातीला टेकवून, मान खाली घालून तो बसला.
त्याला बोलतं करण्यासाठी मी त्याला पुन:पुन्हा हाका मारल्या, पण तो वर पाहत नव्हता. बोलण्याच्या ओघात मी त्याच्या हाताला धरून किंचित हलवले आणि हाताला अक्षरश: चटका लागला. त्याचं अंग तापाने फणफणलं होतं. कोंडे यांना मी ताबडतोब लॉजवर पाठवून माझी सूटकेस घेऊन यायला सांगितलं. दहा-पंधरा मिनिटांत कोंडे आले. दुसर्या प्रदेशात तपासाला जाताना आम्ही पोलीस नेहमी ताप, सर्दी, खोकला, पोट बिघडणे यावरील जुजबी औषधे आमच्याबरोबर नेत असतो. त्यातील क्रोसिनची गोळी आणि पाण्याची बाटली मी सुबय्याच्या पुढे धरली.
‘ये दवा लो…’ असे सांगताच त्याने प्रथम गोळीकडे आणि मान कष्टाने वर करत माझ्याकडे पाहिले. मग गोळी घ्यायला नकारार्थी मान हलवली. एक तर पोलीस आपल्या हाताने औषध देत आहेत, हे त्याच्या अतर्क्य होते किंवा ती गोळी औषधाचीच की आणखी कसली देत आहेत, याबाबत तो साशंक असावा. मी त्याला हाक मारून `ये देखो’ असे म्हणत त्या गोळीचा एक लहान टवका काढला आणि त्याच्या समोर तोंडात टाकून गिळला. तो प्रथमच क्षीण हसला. पुन्हा राहिलेली गोळी त्याच्या समोर केली. त्याने ती घेतली. त्यावर हळूहळू पाणी प्यायला. समोरच्या चहाच्या टपरीवरून त्याच्यासाठी मी दोन कप चहा मागवला. माझ्या बॅगमध्ये असलेला ग्लुकोज बिस्किटांचा पुडा उघडून त्याच्या हातात दिला. तो विलक्षण ओशाळला. चहा-बिस्कीट घेईना. उपाशीपोटी औषध घेतलं तर त्रास होतो, हे त्याला सांगून त्याचे ओशाळणे कमी व्हावे म्हणून मी तिथून उठलो आणि जरा लांब गेलो. कोंडे यांनी त्याला विश्वासात घेऊन समजावून सांगितलं, तेव्हा कुठे त्याने चहा-बिस्किटे खाल्ली. अर्धा तास झाला असेल-नसेल, त्याला तरतरी वाटू लागल्याचे स्पष्ट दिसू लागले.
मी पुन्हा त्याच्याजवळ खुर्ची टाकून बसलो. त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्या वेळी एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती. तो काहीही बोलायच्या आधी स्थानिक पोलिसांपैकी कोणी ऐकतंय का याचा कानोसा घेत होता. दुपार उलटून गेली होती. त्याच्याशी तिथे बोलण्यातून फार काही निष्पन्न झाले नव्हते. थोड्याच वेळात त्याची तब्येत बरी झाली की रिमांड घेऊन रीतसर चौकशी करू, असा विचार करून ‘चलो, मैं निकलता हूँ’ असे म्हणून मी उठलो तोच त्याने एका हाताने माझा पाय घोट्याजवळ पकडला आणि मला म्हणाला, ‘रुको साब… मत जाओ.’ त्याच्या त्या चार शब्दांत मला का कोण जाणे, एक वेगळेच आर्जव जाणवले आणि मी खुर्चीत बसलो.
पुन्हा मध्यंतरी त्याला आणखी बिस्किटे आणि गरम चहा दिल्यामुळे त्याच्या तब्येतीत तुलनेने बराच फरक पडला होता. आता तो स्वतः उठून बसू शकत होता.
तिन्हीसांजेला काळोख पडताना तो सरकत- खुरडत एका झाडाजवळ गेला. कोंडे आणि माझ्याशिवाय कोणी पाहत नाही ना याची खात्री करून त्याने छोट्या काडीने तिथे थोडी जमीन उकरून तिथून एक हिरा बसवलेली सोन्याची अंगठी काढून माझ्या हातात दिली. लुटीपैकीच ही अंगठी असणार, हे मी ताडले आणि `बाकी सोना कहाँ है?’ असं त्याला विचारताच’ मेरे पास है. त्याला ताब्यात घेण्याचे सोपस्कार आम्ही उरकून घेतले आणि त्याला पोलीस ठाण्याच्या लॉक-अपमध्ये ठेवून आम्ही लॉजवर परतलो. दुसर्या दिवशी स्थानिक न्यायालयात त्याचा रिमांड घेऊन आम्ही पोलीस ठाण्यात परत आलो. त्याच्याकडे विचारपूस केली तेव्हा असे निष्पन्न झाले की, इतर आरोपी हैदराबाद येथे रवाना झाल्यावर हा करीमनगर येथील एका सराफाकडे दगडाने ठोकून हिरे बाजूला केलेला एक दागिना विकण्यासाठी गेला. त्या सराफाला काही तरी गडबड असल्याचा संशय आला. त्याने याला बसायला सांगितले आणि कुणाला तरी फोन केला. हळू आवाजात बोलणारा सराफ आपल्याबद्दल पोलिसांना खबर देतोय, असा संशय येऊन सुबय्या तिथून सटकला आणि थेट गंभीररावपेट या गावी आपल्या सासरी जाऊन राहू लागला. इकडे रामगुंडम गावाजवळील त्यांच्या वस्तीतून दूर गेलेले त्याचे कुटुंबीयसुद्धा त्याच्या सासरी जाऊन राहू लागले. दोन-तीन महिने लोटल्यावर पोलिसांचा ससेमिरा बंद झाला असेल, या कल्पनेत बापलेक घराला भेट देण्यासाठी आले आणि स्थानिक पोलिसांच्या खबर्याने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सुबय्याच्या वडिलांना धरून पोलीस ठाण्यात नेले. सुबय्या तेव्हा घरी नव्हता. मात्र तो मिळाल्याशिवाय वडिलांना पोलीस सोडणार नाहीत याची खात्री असल्याने तोही पोलीस ठाण्यात हजर होण्यासाठी गेला. सर्व आरोपींनी हिरे आणि किमती खड्यांपासून दागिने वेगळे करण्या अगोदर त्या लुटीतील एक टपोरा हिरा बसवलेली अंगठी सुबय्याला फार आवडली होती. त्याने ती गुपचूप बाजूला काढून ठेवली होती. बाकी आरोपी गावाला येऊन काम शोधण्यासाठी पुन्हा हैदराबादला रवाना झाल्यावर तो ती अंगठी बोटात घालत असे. पोलीस ठाण्यात हजर होण्यासाठी तो आला, तेव्हा ती अंगठी त्याच्या बोटात होती. मात्र पोलिसांनी ती आपल्या हातात पाहिली तर आपण पुराव्यासकट आयतेच अडकले जाऊ, हे समजण्याइतका तो शहाणा होता.
पोलीस ठाण्यापाशी आला. चौकशीदरम्यान त्याच्या वयस्क वडिलांची पोलिसांनी आरोपीसारखी अवस्था केल्याचे त्याला कळले आणि तो बिथरला. अगोदर त्याने ती अंगठी पोलीस ठाण्याच्या आवारात एका ठराविक जागी मातीत पुरून ठेवली आणि पोलिसांना सामोरा गेला. पोलिसांनी त्याच्या वडिलांना सोडून दिले. सुबय्याची दोन दिवस त्यांनी फारच सख्त चौकशी केली, मात्र त्याने कबुली दिली नाही. माझ्या ताब्यात स्वत:हून दिली होती ती हीच अंगठी. त्या अंगठीच्या केवळ खड्याची किंमत त्या काळी पासष्ट हजार रुपये इतकी होती!
सोने ताब्यात घेण्यासाठी त्याच्या सासरच्या गावाला तातडीने जाणे क्रमप्राप्त होते. सुबय्याची सासुरवाडी बेदमपल्ली गावापासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर एका डोंगरमाथ्यावर असलेल्या आदिवासी वस्तीत होती. तेरा किलोमीटरचा रस्ता जंगलातून जाणारा अन् चढाचा होता. ताडाच्या झावळ्यांनी शाकारलेल्या, बांबूपासून केलेल्या चटयांच्या, शेणाने सारवलेल्या भिंतींच्या गोल आकाराच्या झोपड्या वर्तुळाकार मांडून ठेवल्यासारखी रचना असलेली ती वस्ती पाहताना एखादे चित्र पाहत आहोत, असे वाटत होते. आमची गाडी पुढे आणि राखीव पोलिसांची गाडी मागे असे आम्ही त्या वस्तीत सुबय्याने दाखवलेल्या झोपडीजवळ पोचलो, तेवढ्यात त्या झोपडीतून परकर-पोलकं घातलेली मुलगी दोन्ही हाताने पोटाशी काही तरी धरून दुसर्या झोपडीकडे धावत जाताना दिसली. तिला पाहताच सुबय्याने तिला मोठ्याने हाक मारून थांबवले. ती सुबाय्याची पत्नी होती. तिच्या हातातला पत्र्याचा एक गंजलेला डबा मागून घेतला आणि तो त्याने माझ्या स्वाधीन केला. दगडाने ठोकून वाकडे-तिकडे झालेले सोन्याचे सगळे दागिने त्यात होते, हे सांगायला नकोच. तो ऐवज रीतसर ताब्यात घेऊन, राखीव पोलिसांचे आभार मानून आम्ही रामगुंडम येथे परतलो.
सुबय्या कोणाशीही बोलत नसे. मी आणि कोंडे असे दोघे सोडलो, तर कुणाच्या प्रश्नाला उत्तरही देत नसे. इथे येण्याची ही तिसरी वेळ होती. काही थोडी रोकड सोडली, तर लुटीतील सर्व मालमत्ता परत मिळवण्यात आम्हाला यश आले होते. घेतलेले श्रम सार्थकी लागले होते.
मुंबई सेशन कोर्टात खटला दाखल झाला. सुनावणीदरम्यान आरोपींना जेलमधून अगोदरच कोर्टात आणून बसवून ठेवलेले असे. मी आणि कोंडे केससाठी कोर्टात गेलो की, सुबय्याचा चेहरा उजळत असे.
सर्व आरोपींवर गुन्हा शाबीत होऊन सर्वांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. कोर्टात शेवटच्या दिवशी आरोपींना जेलमध्ये घेऊन जाण्याच्या आधी सुबय्याने मला हात केला. कोंडे आणि मी त्याच्या जवळ गेलो, तेव्हा त्याच्या डोळ्यांत पाणी तरळले. पट्कन वाकून त्याने दोघांना नमस्कार केला. `साब…’ अस म्हणून त्याने माझा हात हातात घेऊन किंचित दाबला आणि निरोपाचं हसला.
गुन्हेगारांची चौकशी करण्याच्या पद्धतींमध्ये इमोशनल इंटरॉगेशन टॅक्टिक्स हा विषय अलीकडच्या काळात महत्त्वाचा ठरत आहे. चौकशी करताना आरोपीच्या जाणिवांना हात घालण्याची हातोटी असली, तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये पश्चात्ताप किंवा उपरती निर्माण होते. त्यातून चौकशीचा हेतू सहज साध्य होतो, हे आता सिद्ध झालं आहे. याच सूत्राचा प्रत्यय सुबय्याच्या बाबतीत, त्याच्या आजारपणात त्याला औषधाची गोळी दिल्याने आम्हाला अजाणतेपणी आला होता. गोळी औषधाची, परंतु त्याच्या वर्मात घुसली होती.